महावितरणच्या अनागोंदीविरोधात आ. ससाणे आक्रमक

कार्यकारी अभियंता यांना धरले धारेवर

    दिनांक :04-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव,
Mahavitraan- MLA Sasane : अनियमित होणारे भारनियमन, लोंबकळलेल्या वीजवाहक तारा यामुळे नेहमीच उद्भवणारे फॉल्ट, कर्मचाèयांची मनमानी, यामुळे नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अखेर आमदार नामदेव ससाणे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलावून नागरिकांच्या विजेच्या समस्या सोडविणार कोण, याबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरून जाब विचारला आहे.
 

y4May-Sasane
 
उमरखेड महागाव विधानसभेतील महागाव शहरासह हिवरासंगम, फुलसावंगी, गुंज, सवना, कलगाव, मुडाणा तसेच अनेक गावांमध्ये नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याला जबाबदार असलेली कर्मचाऱ्याची मनमानी, जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा, झुकलेले खांब, कमी जास्त विद्युत दाब यामुळे अनेक वेळा ‘फॉल्टङ्क निर्माण होतात. त्यामुळे वीज तासन्तास, तर कधी दोन-तीन दिवस गायब राहत आहे. साधा फॉल्ट असला किंवा फ्युज जरी टाकायचा असल्यास संपूर्ण फीडर बंद ठेवून अनियमित आणि अनधिकृत भारनियमन केल्या जात आहे.
 
 
यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबाबत नागरिकांनी महावितरणचे स्थानिक अधिकारी व कर्मचार्याना विचारणा केल्यास त्यांना उद्धट व उर्मट भाषेत उत्तर मिळते. यामुळे त्रस्त नागरिकांनी विजेची ही समस्या आ. नामदेव ससाणे यांच्या कानावर घालून महावितरणच्या तुघलकी कारभाराचा पाढाच वाचला. त्याने संतप्त झालेल्या ससाणे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय आडे यांना थेट कलगाव येथे बोलावून याबाबत जाब विचारला.
 
 
नागरिकांना विजेच्या बाबतीत नाहक त्रास कर्मचारी देत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी त्यांनी यावेळी दिली. तालुक्यातील नागरिकांना अनधिकृत भारनियमनाला तोंड द्यावे लागत असल्याने त्यावर तत्काळ तोडगा काढण्यात येऊन सर्व कामे ताबडतोब सुरू करावी, तसेच विजेच्या नादुरूस्त रोहित्रांची दुरुस्ती करून विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी सूचना केली. यावेळी कलगावचे सरपंच श्रीधर भवानकर, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.