Archives

आज विदर्भातील सांस्कृतिक गरज झालेल्या व विदर्भात विचारपत्र म्हणून ठसा उमटविणार्‍या दैनिक ‘तरुण भारत’ची परंपरा, मधला १८ वर्षांचा खंडित काळ वगळता, ८३ वर्षे जुनी आहे.

इतिहास


लोकमान्य टिळकपक्षीय ‘प्रतिसहकार पक्ष’ व महात्मा गांधींच्या अनुयायांचा ‘स्वराज्य पक्ष’ या कॉंग्रेसांंतर्गत दोन गटांच्या नीति-धोरणातील परस्परविरोधामुळे प्रतिसहकार पक्षाचा पुरस्कार करणार्‍या ‘महाराष्ट्र’ या वर्तमानपत्राकडून स्वराज्य पक्षीयांची कुचंबणा होऊ लागली, तेव्हा स्वराज पक्षाचे नरकेसरी बॅ. अभ्यंकर, श्री. दादासाहेब उधोजी आणि डॉ. ना. भा. खरे यांनी पुढाकार घेऊन २० जानेवारी १९२६ रोजी डॉ. खरे यांच्या संपादकत्वाखाली ‘तरुण भारत’ नावाचे साप्ताहिक, राष्ट्रीय सभा आणि स्वराज्य पक्ष यांच्या ध्येयधोरणाच्या प्रचारासाठी सुरू केले.

१९३० च्या असहकार आंदोलनात सरकारची वक्रदृष्टी आणि कर्त्या मंडळींचा कारावास यामुळे हे साप्ताहिक बंद पडले. पुढे बॅ. अभ्यंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायी मंडळींनी,अभ्यंकरांच्या ९ व्या स्मृतिदिनी २.१.१९४४ रोजी ‘तरुण भारत’ साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन केले. ‘महाराष्ट्र’ पत्राच्या संपादक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार श्री. ग. त्र्यं. उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर यांची या पुनरुज्जीवित ‘तरुण भारत’च्या संपादकपदी नेमणूक करण्यात आली.