साप्ताहिक राशिभविष्य

0
787

रविवार, ११ ते १७ डिसेंबर २०१६

सप्ताह विशेष
• सोमवार, १२ डिसेंबर- श्रीदत्तजयंती (गाणगापूर क्षेत्री), ईद-ए-मिलाद, • मंगळवार, १३ डिसेंबर- मार्गशीर्ष पौर्णिमा (प्रारंभ सकाळी ९.१४), श्रीदत्तजयंती, श्रीगुरुचरित्र सप्ताह समाप्ती,• गुरुवार, १५ डिसेंबर- रवीचा धनू राशी व मूळ नक्षत्र प्रवेश (२०.५२), पारशी अमर्दाद मासारंभ, • शुक्रवार, १६ डिसेंबर- धनुर्मासारंभ, • शनिवार, १७ डिसेंबर- संकष्टचतुर्थी (चंद्रोदय रात्री ९.२२).
• मुहूर्त : साखरपुडा- ११ डिसेंबर, बारसे- ११ डिसेंबर व १५ डिसेंबर, जावळे- १४ डिसेंबर,
गृहप्रवेश- १० डिसेंबर व १६ डिसेंबर.

मेष : नोकरीत चांगल्या संधी
या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपला राशिस्वामी मंगळ दशमातून लाभात जात आहे, तर कुंडलीतील धनेश शुक्र दशम स्थानातच राहणार आहे. शुक्र-मंगळाच्या या योगामुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रात यश व आर्थिक लाभ अनुभवू शकाल. नोकरीत बदल करण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांना चांगले प्रस्ताव लाभू शकतात. संधीचा व्यवहारिक दृष्टीने विचार करून निर्णय घेता येईल. काही युवकांना नोकरीच्या चांगल्या संधी लाभू शकतात. काही युवकांना उत्तम विवाहयोग संभवतात. काहींना कुटुंबातील वातावरण सांभाळावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने महिना उत्तम राहील.
शुभ दिनांक- ११, १२, १३.
वृषभ : खिशाला जपावयास हवे
आपला राशिस्वामी शुक्र भाग्यस्थानात असतानाच मंगल दशमात प्रवेश करणार आहे. चंद्र व्ययस्थानातून या आठवड्यातील त्याचे भ्रमण सुरू करणार आहे. त्यामुळे या आठवडाभर आपणास आपल्या भाग्ययोगांची उत्तम मदत मिळत राहणार आहे. सुरुवात खर्चीक ठरू शकते, मात्र नंतर पूर्ण आठवडा आर्थिक लाभ देणारा राहू शकतो. कुटुंबात काही कार्यक्रमांमुळे पाहुणे, नातेवाईकांची रेलचेल राहू शकेल. नाही म्हणता त्यातही पैसा खर्च होणारच. काहींना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागू शकते. या सार्‍यात आपण आपल्या खिशाला जपावयास पाहिजे. मनोरंजनाकडे कल राहील.
शुभ दिनांक- १२, १३, १४.
मिथून : कार्यक्षेत्रात मतभेद टाळा
राशिस्वामी बुध या आठवड्यातही सप्तमस्थानातच आहे, तर लाभेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीलाच अष्टमातून निघून भाग्यस्थानात जाणार आहे. चंद्रदेखील लाभस्थानातून त्याचे भ्रमण सुरू करणार आहे. व्यवसाय व नोकरीत काहीशी नकारात्मकच स्थिती राहू शकते. अधिकार्‍यांशी वादविवाद, मतभेद होऊ देऊ नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. भागीदारीच्या व्यवसायात जुळवून घेणे आवश्यक ठरेल. कुटुंबात मुलांच्या संदर्भात जरा अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या सार्‍यात आपला मनाचा तोल व शरीराचे आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. वाहने सांभाळून चालवावीत.
शुभ दिनांक- १४, १५, १६.
कर्क : आर्थिक स्वस्थता लाभेल
आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्वामी चंद्र दशम स्थानात आहे व आठवड्याच्या शेवटापर्यंत तो आपल्या राशीत येणार आहे. मात्र, याच वेळी दशमेश मंगळ सप्तमातून अष्टमात जाणार असल्याने कार्यक्षेत्रात काही कटकटी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळाच्या प्रभावाने काही जण पोटाच्या त्रासामुळे त्रस्त होऊ शकतात. त्याचा परिणाम आपल्या नोकरी-व्यवसायावर पडू शकेल. त्यामुळे या संदर्भात सतर्क राहावयास हवे. काही तरुण-तरुणींच्या विवाहादीसंदर्भात कुटुंबात सुरू असलेल्या हालचालींना वेग मिळेल. पैसा येता-जाताच राहणार असला, तरी आर्थिक चणचण भासणार नाही, एवढे मात्र खरे!
शुभ दिनांक- ११, १३, १७.
सिंह : आरोग्य सांभाळावयास हवे
आठवड्याच्या सुरुवातीला राशिस्वामी रवी-शनीसोबत सुखस्थानात आहे. दोघेही शत्रू आहेत आणि त्याच वेळी राहू आपल्या राशीत आहे. मंगळ सप्तमात येत आहे. हे सारे उष्णतेमुळे प्रकृतीविषयी त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र, चंद्र भाग्यस्थानातून भ्रमण सुरू करण्यात असल्याने तो काहीसा दिलासा देऊ शकेल. पोट व ओटीपोटाचे त्रास बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाण्यापिण्याच्या सवयी, व्यसने यांबाबत सतर्क असावे. वाहने सांभाळून चालवावीत. कुटुंबात काही धार्मिक व मंगलकार्यांचे आयोजन होऊ शकते. त्यात सहभागी होऊन मनास विरंगुळा शोधता येईल.
शुभ दिनांक- ११, १३, १५.
कन्या : किंचित कटकटीची वाट
या आठवड्यातही राशिस्वामी बुध सुखस्थानात आहे, तर धनेश शुक्र पंचमात आहे. अष्टमेश मंगळ षष्टात जात आहे, तर चंद्र अष्टमातून भ्रमण सुरू करीत असल्याने हा आठवडा वाटतो तितका सोपा नाही. तथापि, राशीत असलेला गुरू शुभकारक असल्याने तो आपणास काहीसा मोकळा श्‍वास निश्‍चित घेऊ देईल. या राशीतील युवांना विवाह व संततीसाठी उत्तम योग लाभतील. प्रेमसंबंधात असलेल्यांना अधिक प्रगती साधून व कुटुंबाची सहमती लाभून विवाहासाठी संकल्पबद्ध होता येईल. त्यामुळे या संबंधाने काही मंगलकार्ये घडू शकतात. धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांच्या सहली घडू शकतील.
शुभ दिनांक- १३, १५, १७.
तूळ : कुटुंबात असमाधान, अनारोग्य
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र सुखस्थानात आहे. आतापर्यंत त्याच्यासोबत असलेला धनेश मंगळ पंचमात जात आहे, तर दशमेश चंद्र सप्तमस्थानातून या आठवड्यातील त्याचे भ्रमण सुरू करणार आहे. मात्र, धनस्थानातील रवी-शनी आपली काहीशी आर्थिक कुंचबणा करू शकतील. कुणी दुखावला जाईल, वादविवाद निर्माण होतील असे वर्तन टाळायला हवे. काही नव्या ओळखी होऊ शकतात. तसेच मोठ्या लोकांच्या सहवासात येण्याचीदेखील संधी मिळू शकते. कुटुंबात काहीसे असमाधान, कटकट व अनारोग्याचे वातावरण राहू शकते. मुलांशी, भावंडांशी मतभेद निर्माण होऊ शकतात.
शुभ दिनांक- ११, १५, १६.
वृश्‍चिक : आर्थिकदृष्ट्या उत्तम योग
या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपला राशिस्वामी मंगळ सुखस्थानात जात आहे. पराक्रमात शुक्र आहेच, तर राशीत साडेसातीचा कारक शनी रवीसोबत अस्तंगत आहे. भाग्येश चंद्र षष्ठातून त्याचे भ्रमण सुरू करणार आहे. हा आठवडा विशेषतः युवा वर्गाला नोकरी-व्यवसायासंबंधात उत्तम योग देणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्याही हा काळ उत्तम राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. युवावर्गाचे विवाह जुळून येण्यासाठी अनुरूप स्थळे लाभतील. तसेच नवपरिणितांना संततियोग लाभावा. या सार्‍यात प्रकृतीबाबत सावध राहावयास हवे. खाण्यापिण्यावर व विशेषतः व्यसनांवर अंकुश हवा. बाहेर खाणे टाळावे.
शुभ दिनांक- १२, १३, १७.
धनू : मोठ्या खरेदीचे योग
या आठवड्यातही राशिस्वामी गुरू दशमात आणि राशीत बुध आहे. धनात शुक्र कायम असून तेथील मंगळ पराक्रमस्थानात जात आहे. चंद्र या आठवड्यातील त्याचे भ्रमण पंचम स्थानातून सुरू करून अष्टमापर्यंत जाणार आहे. नोकरी-व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छु युवावर्गास जोडीदार लाभण्यासाठी हा काळ उत्तम ठरावा. कुटुंबातील या संबंधातील हालचालींना वेग लाभेल. घर, जमीन, वाहन खरेदीच्या संदर्भात उपयुक्त संधी लाभू शकतात. मोठे वाहन घेण्याचे प्रयत्न होऊ शकतात. व्ययातील रवी-शनी काही आकस्मिक खर्चाचे प्रसंग निर्माण करू शकतात.
शुभ दिनांक- ११, १२, १५.
मकर : विद्यार्थिवर्गास अतिशय उपयुक्त
या आठवड्याच्या सुरुवातीलाच आतापर्यंत राशीमध्ये मुक्कामास असलेला मंगळ धनस्थानात जात आहे. योगकारक शुक्र राशीतच आहे. आपला राशिस्वामी शनी रवीसोबत लाभात आहे, तर सप्तमेश चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. विद्यार्थिवर्गास अतिशय उपयुक्त ठरणारा काळ आहे. विदेशात जाण्याच्या योजना असल्यास त्या पूर्ण करता येऊ शकतील. सरकारी कार्यात मोठ्या अडचणी न येता पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. युवावर्गास नोकरी व व्यवसायाच्या प्रयत्नात यश मिळावे. मित्रमंडळींसोबत होणारे मनरंजन आपणांस नवी उमेद देणारे ठरेल.
शुभ दिनांक- १३, १४, १७.
कुंभ : आर्थिक नियोजन हवे
या आठवड्यातही आपला राशिस्वामी शनी त्याचा शत्रू रवीसोबत दशमात अस्तंगत आहे, तर शनीचा शत्रू मंगळ आपल्या राशीत येत आहे. व्ययस्थानात योगकारक शुक्र आणि गुरू अष्टमात बसला आहे. चंद्र पराक्रमातून भ्रमण सुरू करणार आहे. आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी असल्यास त्या डोके वर काढणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात, आर्थिक आणि आरोग्याबाबत नियोजन व सतर्कता घेणे आवश्यक राहील. संततीच्या नोकरी-व्यवसायाच्या योगाने कुटुंबात सुलभता निर्माण होऊ शकेल. मुलांकडून काही चांगल्या वार्ता कळतील. काहींना धार्मिक कार्यात रस घ्यावासा वाटू शकतो.
शुभ दिनांक- ११, १३, १५.
मीन : अचानक खर्चाचे प्रसंग
आपला राशिस्वामी गुरू या आठवड्यातही सप्तमातून राशीवर तसेच लाभ आणि पराक्रम स्थानांवर दृष्टी ठेवून आहे. मंगळ व्ययात येत आहे. शुक्र लाभात आहे, तर चंद्र धनस्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत आहे. हे योग काही खर्चीक प्रसंग पुढ्यात टाकू शकतात. दशमातील ग्रह सुखस्थानास बळ देत असून, कुटुंबात काही चांगले व मंगलमय प्रसंग साजरे होऊ शकतात. विशेषतः विवाहोत्सुक युवावर्गास अतिशय चांंगले योग यावेत. काहींचे विवाह तर अतिशय अल्पकाळात ठरून तितक्याच घाईने करावेदेखील लागू शकतात. आर्थिक तसेच आरोग्याची बाजू उत्तम राहील.
शुभ दिनांक- ११, १२, १६.
मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६