कलेचा उपजत ज्ञानाचा सिद्धांत

0
141

मागील भागावरून…
आता एक महत्त्वाचा मुद्दा समजणे आवश्यक आहे की, जर सहजज्ञान कला आहे आणि उपजत ज्ञानाचा हा विभाग प्रत्येकच मनुष्याजवळ आहे, तर असे का त्यातील काहीच कलाकार होतात? ग्रोसच्या मते, तांत्रिक कौशल्यामुळे कुणी खरा कलाकार होत नाही, तर खरा कलाकार होतोे ‘खर्‍या उपजत ज्ञानामुळे.’ आपल्याला उगाचच असे वाटत असते की, चित्रकार, शिल्पकार किंवा कोणत्याही कलाकाराजवळ कौशल्य तंत्र असल्यामुळे तो आपल्या मनातील संवेदना आपल्या कलाकृतीतून इतरांपर्यंत पोहचवू शकतो. आपल्यात, म्हणजे सामान्य माणसात हे कौशल्य नसल्यामुळे तो स्वत:ला अभिव्यक्त करू शकत नाही. मात्र, हे विचार ग्रोसला मान्य नाही. सामान्य माणसांना जगाविषयीचे जे सहजज्ञान असते, त्याचे स्वरूप लहानसे असते. ही अभिव्यक्ती अगदी लहान स्वरूपाची असते. मात्र, नंतर ती मोठे रूप धारण करते. त्या-त्या क्षणी निर्माण झालेली अलौकिक चित्तवृत्ती हा या रूपाचा आधार असते. अधिदैवत कलाकार नावाची कोणतीही गोष्ट नाही, असे त्याचे मत आहे. कलाकार असलेल्या व कलाकार नसलेल्याच्या उपजत ज्ञानात केवळ संख्यात्मक अंतर असते गुणात्मक नाही. कलाकार किंवा कला-समीक्षकांजवळ एक प्रकारची विशेष सौंदर्यदृष्टी असते किंवा विशेष संवेदना इंद्रिय असते, हे सुद्धा ग्रोसला वाटत नाही. सर्वच प्रकारच्या पारंपरिक कला सिद्धांतांचा त्याने निषेध केला. आपल्या मनातील आंतरिक भाव प्रकट करण्यामागे कोणताही सौंदर्यशास्त्रीय उद्देश नसतो. सौंदर्य म्हणजे अभिव्यक्तीचे सकारात्मक मूल्य असते. कलेचे कार्य संवाद साधण्याचे आहे, हे तत्त्व ग्रोसला मान्य नाही. भावनांची अभिव्यक्ती हे सुद्धा कलेचे कार्य नाही. निराकार असलेल्या इंद्रियजन्य ज्ञानाला आकार देण्याचे कार्य कला करते, असे त्याचे स्पष्ट मत आहे.
तांत्रिक कौशल्य व तर्कापेक्षा कलाकाराला जवळ असलेली आंतरिक गतिविषयक शक्ती खरे म्हणजे कलेचे सत्व आहे. आपल्या मनातील कल्पना, भाव प्रतिमा यांना प्रत्यक्ष सिद्ध वस्तूत रूपांतरण करणे, कलेत आवश्यक असते. कारण, त्या शिवाय कलेचे रसग्रहण शक्य नाही. अमूर्ताचे रस-ग्रहण करता येत नाही. मात्र ग्रोसला याची आवश्यकता वाटत नाही. कारण, सहज्ञानामुळे झालेली अभिव्यक्ती स्व-प्रकटीकरण असते. स्व-प्रपत्ययित असते. केवळ कलेचे रसग्रहण करण्याच्या बाह्य व्यक्तीलाच त्याची आवश्यकता वाटते. प्रत्यक्ष सिद्ध वस्तूची निर्मिती, ही कलेची गतिविधी असू शकते, सौंदर्याची नाही.
डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२