फुगा फुटला…

0
169

तिस्ता सेटलवाड ही बिचारी सामाजिक कार्यकर्ती असून पोलिस मुद्दाम तिच्या मागे, नाही ती चौकशी लावत आहेत, अशी हाळी अद्याप पुरोगामी मुलखातून उठली कशी नाही, याचे आम्हाला आश्‍चर्य वाटते आहे. गेले कित्येक दिवस तिची बाजू घेणारी आणि ऊठसूट कोणत्याही विषयावर तिची प्रतिक्रिया दाखवणारी माध्यमे एकाएकी शांत का बरे झाली आहेत? मध्यंतरी तिने काहीही कारण नसताना सर्वोच्च न्यायालयाला हिंदुत्व या शब्दाची व्याख्या ठरवावी, यासाठी निवेदन दिले होते. त्यावेळी चर्चा झाली होती. न्यायालयाने तिची मागणी धुडकावून लावली आणि एकवीस वर्षांपूर्वी दिलेल्या निवाड्यावर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्षांना अथवा तशा कार्यकर्त्यांना एकदम जातीयवादी अथवा धर्मांध ठरवून मोकळे होणे आणि निवडणुकीत धार्मिक भावना वापरल्या गेल्या वगैरे सारखे आरोप करता येणे, या सर्व गोष्टींना एकदम चाप लागला. मोठ्या मिनतवारीने जमवत आणलेला डाव न्यायालयाने उधळून की हो टाकला…! हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे, असे तेव्हा न्यायालयाने सांगितले होते. ते योग्यच होते. कारण हिंदुत्व हा धर्म नाहीच आहे. धर्म तर हिंदू आहे. न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालामुळे भाजपा अथवा शिवसेना यांना ऐन निवडणुकीत, सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येणार नाही, या विचाराने तिस्ताचे पुरोगामी साथी हादरून गेले असतील. तथापि, ते यातूनही वेगळा मार्ग काढून आपले डावपेच खेळतील, या बाबत आमच्या मनात मुळीच शंका नाही.
अहमदाबाद येथील दंगलीनंतर तिस्ताने तेथील मुस्लिमांसाठी खूप काम केले होते, असे तीच म्हणते. अगदी तेव्हाच्या मोदी सरकार विरुद्ध वेगवेगळ्या तक्रारी दाखल करणे, पोलिस अधिकार्‍यांना त्या तक्रारींमुळे तुरुंगात जावे लागणे आणि माध्यमातून सातत्याने मोदींच्या विरुद्ध सूर आळवणे, ही कामे करण्यात ती खूप मग्न होती. मोदींना मुस्लिमविरोधी ठरविण्यात आणि तिस्ताला मोठे करण्यात माध्यमे व्यस्त होती. त्यांनी तर असे वातावरण निर्माण केले होते की, लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री गजाआड जातील की काय, असे वाटावे. या सर्व बेताला सुरुंग लागला. मोदींची कित्येक तास कसून चौकशी झाली. त्या चौकशीला ते धीरोदात्तपणे सामोरे गेले. माध्यमांसमोर आपल्यावर अन्याय होतोय्, असे रडगाणे त्यांनी कधीच गायले नाही. त्यामुळे गुजरातबाहेर मोदींची छबी बनवायला एकप्रकारे माध्यमांचा हातभार लागला, असे म्हणायला हरकत नाही. तरी कोणालाही जाग आली नाही, याचे आश्‍चर्य वाटते. जितक्या जोमाने मोदींविरुद्ध मोहिमा राबवल्या गेल्या, तितक्या जोमाने मोदी अधिक जागा मिळवत यशस्वी होत गेले. अखेरीस पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव घोषित झाले, तेव्हा तर आपल्याकडील पुरोगामी फेक्युलर्सना हर्षवायू झाला आणि आता कॉंग्रेसला निवडणूक जिंकणे किती सोपे आहे, असा राग आळवला जाऊ लागला. पण, हाय रे दैवा! सगळे फासे उलटे पडले आणि कधी नव्हे इतके बहुमत घेऊन मोदींचा पक्ष निवडून आला. अशा वेळी तरी आत्मपरीक्षण करतील, तर ते पुरोगामी कुठचे? त्यांनी लोकांनाच मूर्ख ठरवले आणि मोदींच्या करिष्म्याला जनता भुलली, असे ठरवून टाकले. पण करिष्मा कुठचा, हा विचार कोणीच केला नाही. मोदींना सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे आपणच होतो याचा त्यांना विसर पडला असावा. मग अशा माणसाचा कुठचा आलाय् करिष्मा? याचा विचार करणे त्यांना गरजेचे वाटले नाही. निवडून आल्यावरही मोदींवर सतत कोणते ना कोणते तरी आरोप करीत राहाणे, यात ते समाधान मानत आहेत.
मृगाः मृगैः संगमुपव्रजन्ति गावश्‍च गोभिस्तुरंगास्तुरंगैः|
मूर्खाश्‍च मूर्खैः सुधयः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्‌|
हरीण हरणाशी, गाय गाईशी, घोडा घोड्याशी, मूर्ख मूर्खाशी व बुद्धिमान बुद्धिमानाशी मैत्री करतो. मैत्री ही नेहमी एकसमान गुण असलेल्यांची होते.
यातून सुज्ञ योग्य तो अर्थ काढतीलच. मोदी निंदेत आघाडीवर असलेल्या तिस्तावर गुजरात पोलिस साहायक आयुक्त राहुल पटेल यांनी ८३ पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या गोष्टीला काही दिवस उलटून गेले तरी माध्यमातून या गोष्टीची चर्चा झाली का? ती होणार नाही. कारण, मोदींवर बेछूट आरोप केलेली तिस्ता आता न्यायालयासमोर उभी केली जाणार, हे अटळ आहे. अशा वेळी तिची बाजू घेतली तरी खड्डा आणि न घेतली तरी खाई, अशा पेचात पुरोगामी अडकले आहेत. तिची बाजू घेतली, तर तिने ज्या गुलबर्गा सोसायटीतील दंगल पीडितांसाठी म्हणे काम केले, त्यांनीच तिच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे आणि ती नोंदवणारे मुस्लिम आहेत, त्याचे काय? बाजू न घेतली, तर आजवर एका उथळ विचाराच्या बाईला आपण अतिप्रसिद्धी दिली, हे मान्य करण्यासारखे होणार आहे. त्यामुळे माध्यमे मूग गिळून गप्प आहेत. इशरत जहांच्या वेळी जशी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था झाली होती, तशीच आत्ता झाली आहे.
तिस्ताच्या ‘सबरंग’ आणि ‘सेंटर फॉर जस्टिस ऍण्ड पीस’ या स्वयंसेवी संस्थांनी जो निधी जमवला होता, तो तिने वैयक्तिक गरजा पुरवण्यासाठी वापरल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. या दोन संस्थांकडे हा निधी गुजरात दंगल पीडितांची मदत करण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे विदेशातूनही काही निधी आला होता, असे म्हणतात. इतकेच नव्हे, तर त्यावेळच्या कॉंग्रेस सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही १ कोटी ४० लक्ष रुपयांचे अनुदान दिले होते. एकूण ९ कोटी ७५ लक्ष इतके पैसे जमा झाले होते. त्यापैकी ३.८५ कोटी रुपये स्वत:च्या खाजगी कामे आणि वैयक्तिक गरजा यासाठी तिस्ता आणि तिचा नवरा जावेद आनंद यांनी वापरला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्व गैरव्यवहाराचे पुरावेच पोलिसांच्या हाती आल्याने आता तिची सुटका होणे अशक्य आहे.
गुलबर्गा सोसायटीतील लोकांना आपल्यासाठी जमवलेल्या निधीचा अपहार तिस्ताने केल्याची तक्रार केल्यावर तब्बल चौदा वर्षांनी त्याची पडताळणी केली जाते आहे. त्यातून नव्या सरकारने तर सर्व स्वयंसेवी संस्थांना त्यांचे मागच्या पाच वर्षांचे ताळेबंद द्यायला सांगितले आहे. अशा वेगवेगळ्या संस्था आठ सहस्रांवर आहेत. कॉंग्रेसच्या काळात किती स्वयंसेवी संस्था उदयाला आल्या होत्या बघा! त्यातून त्यांच्याकडे कोणी हिशोब मागतच नव्हते. हे नवे सरकार मात्र ते मागत आहे, म्हणून ते असहिष्णू होय.
दंगलपीडितांच्या केसेस तर सेवाभावी वकील फुकट लढत आहेत, असा तिस्ताने दावा केला होता आणि त्याची व्यवस्थित जाहिरातही करून घेतली. आता तो दावाच अंगलट आला आहे. कारण ७१.४० लक्ष रुपयांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या वकिलांना लीगल फी म्हणून दिल्याच्या नोंदी पोलिसांना मिळाल्या आहेत.
एकूण समाजसेवी कार्यकर्तीच्या कथित कार्याचा फुगा फुटला आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे