राम आणि कृष्ण

0
262

अपरात्र झालेली होती जेव्हा महर्षी वेदव्यासांनी श्रीमहागणपतीस महाभारत सांगून पूर्ण केले! दोघांनीही दर्भाच्या काटेरी शय्येवर अंग टाकले. गणपतीस नॉनस्टॉप लिहिण्याचा थकवा असेल म्हणून तो या कडावरून त्या कडावर होत असावा आणि या शय्येचे काटे रुतत असतील म्हणून कदाचित आपल्याला झोप लागत नसेल, असे व्यासमुनींना वाटत राहिले.
सर्वसामान्यांना भयभीत करणारा रात्रिंचरांचा स्वर उमटत होता. पर्णकुटीच्या कुडाच्या भिंतीकडे तोंड फिरवून कडावर असताना ते दचकले. कारण श्रीगजाननाची सोंड त्यांच्या दंडाला हल्ल्लक विळखा घालून त्यांना सरते करीत होती. मुनी वळले. गणपतीने विचारले, ‘‘झोप येत नाही वाटते!’’ व्यासांनी एक मोठा सुस्कारा टाकला.
‘‘इतके घाणेरडे कॅरेक्टर्स धुडगूस घालून गेलेत आपल्या मेंदूत, शरीरात;’’ गणपती म्हणाला, ‘‘त्यामुळे ही युगांताची बेचैनी आली आहे, मुनिवर आपल्या आत! मीही अनुभवत आहे!!’’
‘‘यावर काही उपाय आहे का, विघ्नहर्त्या?’’
‘‘यावर एकच उपाय आहे, महर्षी; तो म्हणजे श्रीकृष्णचरित्राचे कथन करणे! त्यामुळेच केवळ निवांत तसल्लीचा सुकून मिळेल.’’
दोघेही उठून बसले. सरसावले. भीषण स्वर निमाले होते. रात्रीचे तीन वाजून चाळीस मिनिटे असतील. नंदादीपाची ज्योत व्यासांनी फुलविली आणि ‘भागवता’ची रचना सुरू झाली. आरएल स्टिव्हन्सनने सांगितलेला ‘स्टरिंग अवर’ हाच असावा, असे माझे मत आहे. रात्रीचे स्वर जातात आणि पहाटपक्षी कुजन करतो; कोंबडा आरवतो. यामध्ये काळाचा खरोखरीचा नि:शब्द-निसूर-नि:स्वर असतो. त्या वेळीचा व्यास-गजाननाचा संवाद ऐकू येणार नाही; पण शब्दशून्य शांतता आपणही कधीतरी अवश्य अनुभवून पाहा.
-तर; श्रीकृष्णचरित्राचे स्मरण/कथन केले की, काळजातला हैदोस जातो. तसेच श्रीरामचरित्राचे आहे! दोघांचे स्मरण केल्याने आपल्या चित्तांत शांतता प्रवर्तित होईल!! का होते असे? दोघांनाही देव मानले म्हणून? ‘पूजावे’ असे त्या दोघांमध्ये आहे तरी काय कॉमन?
उत्तर क्रमांक एक : दोघेही विष्णूचे अवतार आहेत!!
प्रत्युत्तर : विष्णूचे दशावतार आहेत. त्या सगळ्यांची कुठे आहेत मंदिरे? राम-कृष्णांचे स्मरण करावे, वाटते; तसे वराह-कूर्मादींचे नाही वाटत.
बरे; राज्यपदी जो आहे तो विष्णूचा अवतार मानावा, तर क्रमाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विष्णूचा अवतार मानावे लागते. देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा!! राजास विष्णूचा अवतार मानावे, तर कृष्ण कधीच राजा नव्हता. कृष्णाचा आजा, बाप आणि थोरला भाऊ राज्यपदी होते; कृष्ण नाही!
उत्तर क्रमांक दोन : युद्धकौशल्य!
प्रत्युत्तर : राम एकबाणी होता. ‘रामबाण’ शब्द तिथूनच आला. राम रणांगणात कधी हारला नाही. (रामानंतर महाराजसाहेब शहाजीराजे आणि पहिले बाजीरावसाहेब हेही कधी रणांगणात पराभव पावलेले नाहीत.) त्याउलट, श्रीकृष्णाला ‘रणछोड’ अशी उपाधीच आहे. नेहमी तो रणांगणातून पळून गेलेला आहे. जरासंधाने पुन्हा येऊ नये म्हणून त्याने समुद्रात निवासनगरी स्थापिली. ऐन महाभारतीय युद्धात तर ‘न धरी शस्त्र करी’ अशी प्रतिज्ञाच त्याने केली होती. सबब, रणांगणावरली नीती दोघांनाही देवपदी नेऊन ठेवायला असमर्थ आहे.
उत्तर क्रमांक तीन : पराकोटीची नीतिमत्ता.
प्रत्युत्तर : राम हा एकपत्नी व्रताने स्वत:ला बांधून होता. उलटपक्षी श्रीकृष्णाला सोळा हजार एकशेआठ बायका होत्या; शिवाय गोकुळातल्या रासातल्या सखी वेगळ्याच! पैकी, राधेबद्दल तर त्याच्या बायकांनाही संशय वाटत होता. लहानपणी गोकुळचा ‘चोर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कृष्णाला, मोठेपणीसुद्धा, ‘सिमंतक’ मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला आहे!
उत्तर क्रमांक चार : भाषण व आचरण
प्रत्युत्तर : राम हा सत्यवचनी होता. ‘रामाने म्हटले आहे’, असे कोणी सांगितले तर, ते खरेच आहे, असे मानले जात असे. पण, रघुकुलातले सगळेच ‘प्राण जाय पर वचन न जाए’ असे सत्यधर्मी होते. तरी, हरिश्‍चंद्राचे कोणी मंदिर बांधलेले नाही. रघुकुलाचे सोडा; महाभारतातला युधिष्ठिर धर्मराज हा सत्यवचनी सत्यधर्मी होता. पण, खरे बोलतो म्हणून कोणी त्याचे देऊळ बांधलेले नाही. उलटपक्षी त्याच्या समकालीन ‘खोटारड्या’ श्रीकृष्णाची असंख्य देवळे आहेत. कितीतरी वेळा कृष्णाला तथाकथित असत्याचा आसरा घ्यावा लागला आहे. त्यात प्रसिद्ध आहे तो धर्मराजाकडून अर्धसत्य वदवून घेण्याचा! यालाच पुढे कृष्णनीती असे गोंडस नाव पडले की काय!! पण, तो सत्यवचनी नव्हता हे खरे!
सबब, भाषण आणि आचरण, यावरूनही राम आणि कृष्ण यांचे देवपण दाखवता येऊ शकत नाही. सत्य, (अ)हिंसा, नीतिमत्ता या तीनही बाबतीत राम आणि कृष्ण हे परस्परविरोधी आढळतात. राजा किंवा विष्णूचा अवतार अशा भाबड्या कल्पना बाळगून राम आणि कृष्ण यांना जसे देवपद नाही, तसेच सत्य-अहिंसा-नीती या आधुनिक रॅशनल किंवा फॅशनेबल सभ्यतेच्या परमोत्कर्षी गुणधर्माच्या आधारावरदेखील देवपद नाही, हे नक्की! मग राम आणि कृष्ण यांचीच देवळे का?
असा कोणता कॉमन फॅक्टर राम आणि कृष्ण यांच्यात आहे की, दोघांची मंदिरे उभारली गेलीत? शोध घ्यावा लागेल. राम आणि कृष्ण यांच्या खालोखाल दुर्गेची, हनुमानाची, शंकराची देवळे आहेत. म्हणजे राम आणि कृष्ण यांतील कॉमन फॅक्टर शोधून तो दुर्गा-मारुती-महादेव यांना लागू होतो की नाही, ते पाहावे लागेल.
रामाने काय केले? दंडकारण्यात अहोरात्र धिंगाणा घालणार्‍या राक्षसांना, त्यांच्या खर-दूषण इत्यादी म्होरक्यांसह मारले. त्यानंतर वालीवध केला. लंकापतीस कुंभकर्ण, इंद्रजित इत्यादींसह ठार केले. संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान, मग्रूर दुष्टांमुळे, त्राही भगवान झाला होता तो, मुक्त केला. (दंडकारण्याचा महाराष्ट्र केला, ही बाब आणखी वेगळी. रामाने महाराष्ट्र निर्माण केला म्हणजे)-स्वातंत्र्य (श्रीरामचंद्र), बंधुता (लक्ष्मण), संस्कृती (सीता) या बाबी इथल्या मातीत रुजवल्या.
कृष्णाने काय केले? कंस, कालियवन, जरासंध, शिशुपाल, दुर्योधन इत्यादी टेररिरस्ट लोकांना ठार केले किंवा करविले. संपूर्ण उत्तर हिंदुस्थान टेररिझममधून मुक्त केला.
राम आणि कृष्ण यांच्या चिंतनाने चित्तांत शांतता नांदते. कारण, रामाने आणि कृष्णाने अनुक्रमे दक्षिण व उत्तर हिंदुस्थानातल्या दहशतवादी कारवायांचा पूर्णत: बीमोड केला. जो संपूर्ण पृथ्वी टेररमुक्त करून सर्वांच्या चित्तांत शांतता प्रस्थापित करतो त्याचेच मंदिर होते!
आपल्या प्रत्येकाला अजूनही चान्स आहे; आपली मंदिरे ठायीठायी उभी राहतील, याचा!
प्रतिक्रियांसाठी… आजच्या आसमंत पुरवणीतील मजकुरासंबंधी काही प्रतिक्रिया व्यक्त करावयाची असल्यास संपर्कासाठी भ्रमणध्वनी : ८८८८८७९८५४ तसेच तुमचे साहित्य response.asmant@gmail.com या ई-मेलवर पाठवू शकता.
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे/८४५०९६४४३३