शरीफ गेले, बाजवा आले

0
3354

पाकिस्तानचे सर्वोच्च सेनापती जनरल राहिल शरीफ निवृत्त झाले. त्यांच्या जागी जनरल कमर जावेद बाजवा हे नवे सरसेनापती आले. जनरल बाजवा यांची निवड स्वत: पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केल्याचं सांगितलं जातं. का, तर म्हणे, बाजवा हे पूर्णपणे व्यावसायिक सैनिक आहेत. म्हणजे त्यांना राजकीय उलाढालींमध्ये स्वारस्य नाही. शिवाय, ते म्हणे अतिरेक्यांना कठोरपणे हाताळणारे आहेत.
जनरल बाजवा हे पंजाबी जाट आहेत. त्यांचे वडीलही पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते. उत्तर भारतातली जाट ही जमात उत्तम शेतकरी आणि उत्तम लढवय्यांसाठी पूर्वापार प्रसिद्ध आहे. बाजवा हे कुलनाम हिंदू जाटांमध्येही आहे. थोडक्यात जनरल कमर जावेद बाजवा हे लष्करी पंरपरा असलेल्या घराण्यातले आहेत. त्यांचं लष्करी शिक्षण-प्रशिक्षण रावळपिंडी, कॅनडा आणि अमेरिकेतल्या ख्यातनाम लष्करी महाविद्यालयांमध्ये झालेलं आहे. २००७ साली झाईर किंवा झैरे किंवा कॉंगो या मध्य आफ्रिकी देशात प्रचंड यादवी युद्ध झालं. तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने तिथे सैनिक शांतता पथक पाठवलं. त्याचे प्रमुख होते, भारतीय सेनापती जनरल विक्रम सिंह आणि त्यांचे सहायक होते पाकिस्तानी सेनापती लेफ्टनंट कर्नल (त्या वेळी) कमर जावेद बाजवा. नंतर जनरल विक्रम सिंह भारताचे सरसेनापती बनले आणि निवृत्तही झाले. त्यांचंही मत असंच आहे की, जनरल बाजवा हे पूर्णपणे व्यावसायिक सैनिक आणि आपल्या कामात अत्यंत तरबेज आहेत.
कुणीही जबाबदार व्यक्ती, त्यातही विशेषत: निवृत्त सेनापती हे अतिशय जपून बोलतात. नॉन-कमिटेड विधानं करतात. पण त्या विधानांमध्ये भरपूर सूचकताही असते. देशाचे नेते जे ध्येय-धोरण ठरवतात, त्याप्रमाणे वागणं हेच कोणत्याही देशाच्या व्यावसायिक सैन्याचं उद्दिष्ट असतं. मग पाकिस्तानच्या नेतृत्वाचं धोरणच मुळी भारताचा अखंडित द्वेष करणं हे असलं, तर सैन्य दुसरं काय करणार? ते आपली सगळी व्यावसायिक कुशलता भारताला नामोहरम् करण्यासाठीच वापरत राहाणार.
पाकिस्तानचे सरसेनापती म्हणून जनरल बाजवा यांनी मावळते सरसेनापती जनरल शरीफ यांच्याकडून सूत्रं स्वीकारली, ती २९ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता. पण त्यापूर्वीच, म्हणजे २९ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ५.३० वाजता जैशे मोहम्मदच्या अतिरेक्यांनी नागरोटा आणि चमलियाल या ठिकाणी हल्ले करून, नव्या सेनाप्रमुखांना जणू सलामीच दिली.
जम्मू शहराजवळ, नागरोटा या ठिकाणी असलेल्या भारतीय लष्कराच्या तळावर, जैशे मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांनी २९ नोव्हेंबरच्या पहाटे हल्ला केला. हे तिन्ही अतिरेकी पोलिसी गणवेषात होते. ए-के ४७ मधून बेछूट गोळीबार करीत आणि हँडग्रनेड्‌स फेकत त्यांनी हल्ला चढवला. मग झालेल्या हातघाईच्या लढाईत भारताचे ५ जवान आणि २ अधिकारी ठार झाले. तिन्ही अतिरेकीही ठार झाले. त्याच सुमारास सांबा विभागातल्या चमलियाल या ठाण्याजवळ सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर दोन हत्यारबंद अतिरेक्यांनी हल्ला चढवला. तिथे मात्र भारतीय दलांनी स्वत:चं कोणतंही नुकसान होऊ न देता, दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा केला.
म्हणजे पहा, २ जानेवारी २०१६ च्या पठाणकोट अतिरेकी हल्ल्यापासूनची मालिका अखंडपणे चालूच आहे. २ जानेवारी २०१६ या नव्या वर्षाच्या प्रारंभकाळातच पठाणकोट या पंजाब प्रांतातल्या, पण काश्मीरच्या सीमेजवळ असलेल्या, भारतीय वायुदलाच्या ठाण्यावर ४ ते ६ हत्यारबंद अतिरेक्यांनी हल्ला चढवला. हे नाटक २ ते ५ जानेवारी असं तब्बल तीन दिवस चालू होतं. त्यात भारताची आठ माणसं ठार झाली. चार अतिरेकी ठार झाले. पण दोघे निसटले असावेत, असा अंदाज आहे.
२५ जून २०१६ रोजी, पुलवामा जिल्ह्यातल्या पामपूर या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका वाहन ताफ्यावर, लष्करे तैयबाच्या २ अतिरेक्यांनी हल्ला चढवला. हा वाहन ताफा पामपूरहून अन्यत्र जात असताना, रस्त्याच्या एका अवघड वळणावर वाहनांचा वेग मंदावल्याचा मोका साधून, अतिरेक्यांनी ग्रेनेड्‌स आणि ए-के ४७ चा बेछूट मारा करीत हल्ला केला. परिणाम दोन्ही अतिरेकी ठार, पण आपलेही आठ लोक ठार.
यानंतर उरी ठाण्यावरचा प्रसिद्ध हल्ला झाला. १८ सप्टेंबर २०१६ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी या भारतीय लष्करी ठाण्यावर जैशे मोहम्मदच्या चार अतिरेक्यांनी अत्यंत कजाखी हल्ला चढवला. जबरदस्त चकमक उडाली. परिणाम चारी अतिरेकी ठार, पण आपले एकोणीस लोक ठार.
एवढं झाल्यावर भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. त्याबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. का, तर भारतातल्याच विझवट्या पत्रकारांनी, नेत्यांनी, माध्यमांनी सर्जिकल स्ट्राईकच्या विरोधात प्रचंड कोल्हेकुई अजूनही चालवलेली आहे.
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे २९ नोव्हेंबरलाच पाकिस्तानच्या नव्या सरसेनापतींनी पदभार ग्रहण करावा आणि त्याच दिवशी भारतावर पुन्हा दोन अतिरेकी हल्ले चढवले जावेत, हे सगळं मोठं सूचक आहे.
यातला चिंतेचा भाग असा आहे की, भारतीय सेनादलांच्या, पोलिस दलांच्या हेरखात्यांना या हल्ल्यांच्या योजनेचा जराही सुगावा लागू नये. म्हणजेच जम्मू-काश्मीर राज्यातल्या जनतेत, अंतस्थ गोटांमध्ये पाकिस्तानधार्जिणे लोक घुसलेले आहेत. उरी घटनेबद्दल असं सांगितलं जात आहे की, या हल्ल्याची अस्पष्टशी कल्पना काही खबरी लोकांकडून आली होती. पण नागरी व सैन्यदल दोन्हीकडील अधिकारी मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता जम्मू-काश्मीरच्या नागरी प्रशासनात कोण मंडळी असतील, याचा आपण अंदाज करू शकतो. पण सैनिकी अधिकार्‍यांनी जर खरोखरच दुर्लक्ष केलं असेल, तर मात्र ती दु:खाची आणि चिंतेची बाब आहे.
थोडक्यात जनरल कमर बाजवा आल्यामुळे पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांमध्ये फरक पडेल असं मानणं म्हणजे डावे विचारवंत उद्या हिंदुत्वाचे अभिमानी होतील, असं मानण्यासारखंच आहे.
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषद झाली. अफगाणिस्तान हा मध्यवर्ती देश धरून त्याच्या अवतीभवतीचे पाकिस्तान, भारत, चीन, इराण, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान, कजाकिस्तान, किरगिजीस्तान, रशिया हे देश आणि किंचित लांबचे तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती एवढे देश यात सामील होते. नीट समजून येण्यासाठी आशिया खंडाचा नकाशा पहा.
अफगाणिस्तानात १९७९ सालापासून अखंड युद्ध चालू आहे. ती स्थिती संपून तिथे शांतता नांदण्यात जसं खुद्द अफगाणिस्थानचं हित आहे, तसंच व्यापारी हितसंबंधांमुळे वरील सर्वच देशांना त्यात स्वारस्य आहे. त्याबाबत वाटाघाटी करण्यासाठी २०११ पासून दरवर्षी ही ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषद भरत असते.
भारताच्या इंग्रज सरकारने १९१९ साली अफगाणिस्तानच्या अमिराशी मैत्रीचा तह केला. स्वतंत्र भारतानेही तेच धोरण पुढे चालू ठेवलं. म्हणजे आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकीय धोरणानुसारही अफगाणिस्तान हा भारताचा मित्र देश आहे. अफगाणिस्तानचा औद्योगिक, व्यापारी, आर्थिक विकास व्हावा म्हणून भारताने भरपूर मदत केलेली आहे नि आजही करीत आहे.
या वेळच्या ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेचा यजमानच भारत होता. परिषद डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ३ व ४ डिसेंबरला अमृतसर शहरात पार पडली. अफगाणिस्तानात शांतता नांदण्यात पाकिस्तानला स्वारस्य नाही. त्यामुळे २००३ साली अमेरिकेने पुरा मोड केलेल्या तालिबानी अतिरेक्यांना पाकिस्तान पुन्हा फूस देऊन उठवतो आहे. त्यांना आर्थिक मदत, लष्करी प्रशिक्षण देतो आहे. यावर अफगाण राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी उघडपणे टीका केली. त्याआधी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिषदेच्या उद्घाटन समारंभातच पाकिस्तानला अतिरेक्यांचा पाठीराखा देश म्हणून ठोकलं होतं.
पाकिस्तानला भारतात शांतता नकोय्, तशीच अफगाणिस्तानातही शांतता नकोय्. असं का? कारण पाकिस्तान हा औरंगजेबाच्या मुघली ध्येयधोरणाचा वारसदार आहे. औरंगजेबाला काबूल ते रामेश्‍वर एवढा संपूर्ण भूभाग मुघल सत्तेच्या हिरव्या झेंड्याखाली हवा होता. पाकिस्तानचंही तेच उद्दिष्ट आहे. त्यामुळे अयुबखान, याह्याखान, झिया, मुशर्रफ, कयानी, शरीफ, बाजवा अशी माणसं बदलतील, पण उद्दिष्ट तेच राहाणार.

मल्हार कृष्ण गोखले