पोलिसांनी भूसुरुंग केले निकामी

0
56

तभा वृत्तसेवा
गडचिरोली, ११ डिसेंबर
नक्षलविरोधी शोध मोहीम राबवित असताना नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके विशेष अभियान पथकाने निकामी केल्याची घटना रविवार, ११ रोजी धानोरा तालुक्याच्या पेंढरी उपविभागातील चुटींगटोला ते कन्हेली गावाच्या दरम्यान पहाडीवर घडली. या घटनेमुळे घातपात करण्याचे नक्षल्यांचे मनसुबे उधळले आहे.
नक्षलविरोधी अभियान राबविणार्‍या पोलिस पथकावर घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी जमिनीत हे भूसुरुंग पेरले होते. यामध्ये नक्षल्यांनी पहाडीवर दोन क्लेमोर माईन, स्फोटकांनी भरलेले १५ ते २० किलोचो दोन स्टिल डब्बे, ७ ते ८ किलो वजनाची एक किटली या स्फोटकांचा समावेश होता. गडचिरोली येथील विशेष अभियान पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी तथा कर्मचार्‍यांनी सदर भूसुरुंगाचा नाश करून पोलिसांना इजा करण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेला हा नक्षल्यांचा डाव उधळून लावला. नक्षल्यांविरुद्ध पेंढरी येथील उपपोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून, या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.