तपोवनच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल आळशी

0
86

तभा वृत्तसेवा
अमरावती, ११ डिसेंबर
विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवनच्या अध्यक्षपदी दंतचिकित्सक डॉ. अतुल आळशी यांची रविवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. आळशी श्री अंबादेवी संस्थानचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळीत आहे.
शिवाजीराव पटवर्धन यांनी विदर्भ महारोगी सेवा मंडळाची स्थापना केली होती. त्यांच्या संस्थापक अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मंडळाने नावलौकिक मिळविला. त्यानंतर डॉ. मोतीलाल राठी यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे आली. त्यांनी सुद्धा या मंडळाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. डॉ.राठी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी रविवारी तपोवन येथील कार्यालयात कार्यकारी मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अतुल आळशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदावर प्रा.डॉ.सुभाष गवई यांना नियुक्त करण्यात आले. तसेच डॉ. मोतीलाल राठी यांच्या कार्यकारी मंडळातील रिक्त जागेवर त्यांचे पुत्र डॉ. प्रतीक राठी यांचा घेण्यात आले. सोबतच कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रभा मराठे यांनी वृद्धापकाळामुळे राजीनामा सादर केल्याने त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र विवेक मराठे यांना घेण्यात आले. प्रभा मराठे यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून ठेवण्यात आले आहे. कार्यकारी मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीला नवनियुक्त अध्यक्ष डॉ.अतुल आळशी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई, सचिव वसंत बुटके, सदस्य झुबिन दोटीवाला, दिलावरसिंग, विवेक मराठे, डॉ. प्रतीक राठी उपस्थित होते. विलास मराठे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. झालेल्या बदलांचे स्वागत करण्यात आले असून नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.