राहुलचा भूकंप, कॉंग्रेसला कंप!

0
239

‘‘मी लोकसभेत बोलल्यास भूकंप होईल, मोदींना सभागृहातून बाहेर जावे लागेल.’’ या राहुल गांधींच्या विधानाने कॉंग्रेसला कंप झाला आहे. राहुल गांधी आमची किती फजिती करणार, असा प्रश्‍न वरिष्ठ कॉंग्रेस नेते विचारत आहेत, तर काहींना राहुल गांधींच्या मानसिक स्थितीविषयी शंका निर्माण झाल्या आहेत.
नोटबंदी हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे, असेही राहुल गांधी म्हणत आहेत. आता प्रश्‍न आहे, राहुल गांधींना एवढा मोठा गौप्यस्फोट करण्यापासून कुणी रोखले आहे? सत्ताधारी सदस्य राहुल गांधींना सभागृहात बोलू देण्यास तयार नाहीत हे क्षणभर खरे मानले, तरी सभागृहाबाहेर पत्रपरिषद घेऊन गौप्यस्फोट करण्यास त्यांना कुणी रोखले आहे? राहुल गांधींनी संसदभवनात पत्रपरिषद घ्यावी, संसदभवनाबाहेर पत्रपरिषद घ्यावी व नोटबंदीचा कथित घोटाळा उघड करावा. राहुल गांधी असे करणार नाहीत, कारण त्यांच्याजवळ शब्दांशिवाय काहीच नाही! ‘‘मी बोललो तर भूकंप होईल, त्सुनामी येईल,’’ अशा वल्गना राहुल गांधींनी करता कामा नये. ‘‘मला बोलू दिले जात नाही,’’ ही त्यांची टेप जुनी झाली आहे. त्यांना सभागृहात अभ्यास करून बोलता येत नाही, सरकारकडून येणारे उत्तर त्यांना झोंबणारे असेल, याची कल्पना असल्याने त्यांनी संसदबंदी सुरू केली आहे.
मोदी! मोदी!!
‘‘मोदी! मोदी!!’’ या घोषणा लोकसभा निवडणूक प्रचाराचे आकर्षण होत्या. मोदी जगात कुठेही गेले, तरी या घोषणा दिल्या जातात. बहुधा याचा परिणाम कॉंग्रेसवरही झाला असावा. लोकसभेचे कामकाज बंद पाडण्यासाठी विरोधी सदस्य ‘‘मोदी! मोदी!!’’ अशा घोषणा देतात तेव्हा त्यावर हसावे की रडावे, असा प्रश्‍न भाजपा सदस्यांना पडत होता. याच्या सोबतीला आणखी एक घोषणा होती, ‘‘वुई वॉण्ट मोदी!’’ अशा घोषणा देत विरोधकांनी संसदबंदी सुरू केली आहे. मोदींच्या नोटबंदीला राहुल संसदबंदीने उत्तर देत आहेत.
चर्चा नको
नोटबंदीवर संसदेची दोन्ही सभागृहे ठप्प आहेत. पंतप्रधानांनी राज्यसभेत यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. पंतप्रधान राज्यसभेत आले. यानंतर विरोधी पक्षांनी दुसरी मागणी केली. नोटबंदीवर चर्चा होईपर्यंत पंतप्रधानांनी सभागृहातच बसून राहिले पाहिजे. म्हणजे विरोधी सदस्य मोदींच्या नावाचा शिमगा करणार आणि मोदी दोन दिवस सारे कामकाज बाजूला ठेवून तो ऐकत बसणार? अशा पोरकट मागण्यांनी सभागृह चालत नसते.
लोकसभेतील गतिरोधात नियम १९३ विरुद्ध नियम १८४ असा तिढा अनेकदा निर्माण झाला आहे. तो नोटबंदीच्या निमित्ताने पुन्हा तयार झाला आहे. कॉंग्रेसला नियम १८४ अंतर्गत चर्चा हवी आहे. या नियमात चर्चा झाल्यास त्यावर सभागृहात मतविभाजन होते; तर सरकारचा आग्रह नियम १९३ अंतर्गत चर्चा करण्यावर आहे. या नियमात होणार्‍या चर्चेत मतविभाजन होत नाही. लोकसभेत राहुल गांधी बोलतील आणि सरकारचे उत्तर न ऐकता सभागृह बंद पाडून ते निघून जातील, अशी माहिती सरकारजवळ असल्याने, सरकारही विरोधी पक्षांच्या मागणीवर फार गंभीरपणे विचार करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही.
काळा पैसा कुठे?
देशातील एकूण चलनात ५०० व १००० च्या नोटांचे प्रमाण ८५ टक्के होते. ही रक्कम जवळपास १६ लाख कोटी असल्याचे मानले जाते. यातील फक्त १२ लाख कोटी बँकांत जमा होतील, उर्वरित ३-४ लाख कोटी बँकेत जमाच होणार नाहीत. म्हणजे तो काळा पैसा आपोआप बाद होईल, असा अंदाज होता. आता समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार, सारेच १५-१६ लाख कोटी रुपये बँकेत जमा होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, अर्थव्यवस्थेत काळा पैसाच नव्हता, असा काढावयाचा काय? कॉंग्रेस नेते हा मुद्दा उपस्थित करीत आहेत. याला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नेमके उत्तर दिले आहे. सारा पैसा बँकेत जमा होत आहे याचा अर्थ नोटांचा रंग काही बदलत नाही. म्हणजे काळा पैसा बँकेत जमा होत आहे याचा अर्थ तो पांढरा होत नाही. यातील काळा पैसा किती व कोणता, हे सरकारला शोधावे लागेल. नोटबंदीचा निर्णय घोषित झाला रात्री ८ वाजता. त्या वेळी बाजारपेठा बंद होण्याची वेळ असते. पण, नवी दिल्लीतील सोन्याच्या एका दुकानात रात्री ८ ते रात्री १२ या चार तासांत ७५ कोटींचे सोने विकले गेले. हा पांढरा पैसा होता काय? ही तर एका दुकानाची कहाणी आहे. अशा अनेक बाबी समोर येतील. चेन्नईत २०० किलो सोने जप्त करण्यात आले. काही खाजगी बँकांनी काळ्याचे पांढरे करण्याचा मोठा उद्योग केला. तो उघडकीस येत आहे. यात काही बँकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. जनधन खात्यांमध्ये ५० हजारावर कोटी जमा झाले आहेत. हा सारा पांढरा पैसा आहे काय? अर्थव्यवस्थेतील काळा पैसा मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये जमा होत आहे. तो येणार्‍या काळात समोर येईल.
फक्त ४०० कोटी?
बनावट नोटांचे प्रमाण फक्त ४०० कोटी होते, असे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् म्हणत आहेत. बनावट नोटा प्रकरण मागील दोन दशकांपासून सुरू आहे. याचा अर्थ, पाकिस्तानने वर्षाकाठी फक्त २० कोटींच्या बनावट नोटा भारतात पाठविल्या? पाकिस्तान ज्या प्रकारे काम करीत आहे त्यावरून हे खरे वाटत नाही. पाकिस्तान आपल्या देशातील नोटांपेक्षा भारतीय नोटा अधिक छापत होता, असे ठामपणे सांगितले जाते. अतिरेक्यांना मदत करणे, यासोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणे, हेही पाकिस्तानचे एक उद्दिष्ट होते. केवळ ४०० कोटींच्या बनावट नोटा भारतात पाठवून हे कसे करता येणार होते? बनावट नोटांचा आकडा काही हजार कोटींच्या घरात असल्याचे मानले जाते. नोटबंदी फसली, असे देशातील विरोधी नेते म्हणत असताना पाकिस्तानील, जावेद खनानी या कुख्यात व्यापार्‍याने अत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. जावेदचा मुख्य व्यवसायच बनावट नोटा दुबई, नेपाळ, ढाका या मार्गांनी भारतात पाठविण्याचा होता. नोटबंदीचा फटका किती मोठा आहे, हेच जावेदच्या कथित आत्महत्येवरून दिसून येते.
परदेशातील पैसा
नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याबाबत त्यांनी काहीच केले नाही, असा आरोप केला जात आहे. आरोप करणार्‍यांना मोदींची कार्यशैली ओळखता आलेली नाही. जोपर्यंत ठोेस दस्तावेज वा माहिती समोर येत नाही, मोदी त्यावर काहीच बोलणार नाहीत. याचा अर्थ, परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या मुद्यावर ते शांत बसले आहेत, असा निष्कर्ष विरोधी नेते काढणार असतील तर ते फार मोठी चूक करीत आहेत. त्यांना मोदींना ओळखता आलेले नाही, असे यावरून म्हणावे लागेल.
नवे प्रकरण
अगुस्टा हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात माजी वायुदल प्रमुख त्यागी यांना अटक झाली. एकूण दलालीच्या रकमेपैकी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना फारच कमी पैसा मिळाला. मग, या सौद्याचे मुख्य लाभकरी कोण? यात जी नावे समोर आली आहेत, त्यात ‘एपी’ हे एक नाव समोर आले आहे. हे एपी कोण, यावर अधिकृतपणे काहीही सांगितले जाण्यापूर्वीच, आपल्याला यात गोवले जात आहे, असा आरोप सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी लावला होता. मग, आता त्यागी यांच्या अटकेवर हे प्रकरण थांबणार काय? राहुल गांधी भूकंप होण्याची भाषा बोलत आहेत. त्यात तथ्य आहे. पण, हा भूकंप कुठे होऊ शकतो, हे त्यांनी सांगितलेले नाही.

रवींद्र दाणी