बिहार : शहाबुद्दिन अन् जंगलराज

0
261

कटाक्ष

राष्ट्रीय जनता दलाचा नेता आणि खुनाचा आरोपी शहाबुद्दिन अखेर ११ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आला. दोन सख्ख्या भावांना ऍसिड टाकून ठार मारण्याचा आणि त्या घटनेचा साक्षीदार असलेल्या तिसर्‍या भावाची हत्या करण्याचा आरोप असलेल्या या शहाबुद्दिनला खरे तर आतापर्यंत फासावर लटकवायला पाहिजे होेते. पण, तो जेलबाहेर आला आणि त्याचे अभूतपूर्व असे स्वागतही झाले! एका गुन्हेगाराचे असे भव्य स्वागत फक्त आपल्याच देशात होऊ शकते!! बिहारमध्ये जंगलराज आहे, असा आरोप ज्या वेळी केला जात होता, त्या वेळी हा शहाबुद्दिन मोकाट होता. राजदचे नेते लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री होते अन् त्यांच्या राजवटीवर जंगलराजचा आरोप होता. या शहाबुद्दिनमुळेच बिहारमध्ये जंगलराज होते अन् ते टिकण्याचे कारण म्हणजे त्याला राजाश्रय होता. राजाश्रय असल्याशिवाय गुंडागर्दी चालूच शकत नाही. किमान शहाबुद्दिन करतो तशी तर मुळीच नाही. जेलमधून बाहेर येताच या शहाबुद्दिनने, त्याला राजाश्रय देणारे लालूप्रसाद यादव यांचे गुणगान गायले, तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्याच्या स्वागतासाठी हजारो लोक जेलबाहेर जमले होते, त्यात बिहारच्या मंत्र्यांचा आणि आमदारांचाही समावेश होता. सगळ्यांनी शहाबुद्दिनच्या गळ्यात हार घालून अन् त्याची गळाभेट घेऊन स्वागत केले. जणू तो ऑलिम्पिकमधून गोल्ड मेडलच जिंकून आला होता! पुढल्या काळात बिहारमध्ये काय काय घडणार, याची झलकच शहाबुद्दिनच्या स्वागतातून पाहायला मिळाली आहे.
बिहारच्या मंत्रिमंडळातील राजदचे मंत्री आणि आमदार शहाबुद्दिनच्या स्वागताला गेलेत, ते लालूप्रसाद यादव यांच्या परवानगीशिवाय तर नक्कीच नाहीत. भागलपूरच्या जेलमधून बाहेर आलेला शहाबुद्दिन, त्याच्या मतदारसंघात म्हणजे सिवानला रवाना झाला. भागलपूर ते सिवान हे अंतर चार-पाच तासांचे आहे. पण, त्याला मिरवणुकीने तिथे पोहोचायला फक्त १३ तास लागले! यावरून आपण त्याच्या दहशतीची कल्पना करू शकतो. वाटेत टोल नाके होते, पण एकाही ठिकाणी मिरवणुकीतील एकाही वाहनाने टोल दिला नाही. कारण, या ताफ्यात लाल दिव्याच्या गाड्याही होत्या अन् काही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनीही टोलवाल्यांना गाड्या न अडवण्याबाबत सूचना केल्या होत्या. ज्याच्यावर खुनाचा गंभीर आरोप आहे, ज्याच्यावर न्यायालयात खटला चालू आहे, त्याच्या स्वागतासाठी एवढ्या मोठ्या संख्येत जमाव जमतो, पोलिसही नको तेवढी खबरदारी घेतात, याला काय म्हणायचे?
काही वर्षांपूर्वी पाटणा उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्या सरकारची ‘जंगलराज’ अशी संभावना केली होती. लालूंच्या राज्यात जनता सुरक्षित नाही, अशी टिपप्णी केली होती, त्याच पाटणा उच्च न्यायालयाने या जंगलराजचा एक अविभाज्य भाग असलेल्या शहाबुद्दिनला जमानतीवर मोकाट सोडले, याचे आश्‍चर्य वाटायला नको? त्याला जमानत देण्यास बिहारच्या नितीशकुमार सरकारनेही कोर्टात विरोध केला नाही. त्याची कारणे तेच जाणोत! बिहार सरकारने ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते, शहाबुद्दिनवर क्राईम कंट्रोल ऍक्टनुसार कारवाई करीत त्याला पुन्हा गजाआड करायला हवे होते. पण, हे सगळे का केले नाही, याचे उत्तर स्पष्ट आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जदयूचे एकट्याचे सरकार नाही. ते लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या पाठिंब्याने सत्तेत आले आहेत. त्यामुळे नितीशकुमार सरकारने करता येण्यासारखी असूनही कायदेशीर कृती केली नाही, ही त्या सरकारची लाचारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणारे नितीशकुमार आता गप्पगार का झाले आहेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. शहाबुद्दिनच्या सुटकेसाठी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असे नितीशकुमार आता बोलूच शकणार नाहीत. ते बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे.
ज्या राजीव रोशन हत्याकांडात शहाबुद्दिन प्रमुख आरोपी आहे, त्या हत्याकांडात खटला प्रारंभ करण्यातच पोलिसांनी रुची दाखवली नाही. खटला चालवावा, असा आदेश पाटणा उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही पोलिसांनी कृती केली नाही. त्यामुळे न्यायालयाने शहाबुद्दिनला जामीन मंजूर केला. आता शहाबुद्दिनला पोलिसांनी क्राईम कंट्रोल ऍक्ट का लावला नाही, हा मुद्दा समोर येण्याचेही एक कारण आहे. शहाबुद्दिनप्रमाणेच बिहारमधल्या बाहुबली नेत्यांमध्ये आणखी एक नेता आहे. तो अपक्ष आमदार आहे. अनंतसिंह असे त्याचे नाव आहे. त्याच्यावरही शहाबुद्दिनप्रमाणेच अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्याच्यावर एकूण पाच प्रकरणांमध्ये आरोप आहे. चार प्रकरणांमध्ये त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाचव्या प्रकरणात अनंतसिंहला जामीन मंजूर व्हायच्या आतच पाटणा पोलिसांनी त्याच्यावर क्राईम कंट्रोल ऍक्टनुसार कारवाई केली. त्यामुळे आता न्यायालयाने त्याला पाचव्या प्रकरणात जामीन मंजूर केला, तरीही किमान वर्षभर तो बाहेर येऊ शकणार नाही. अशीच कारवाई पोलिसांना शहाबुद्दिनविरुद्धही सहज करता आली असती. पण, शहाबुद्दिन हा राजदचा नेता आहे आणि लालूंच्या गळ्यातला ताईत आहे! त्यामुळे नितीशकुमार यांनी कारवाईचे धाडस दाखविले नाही, हे म्हणायला भरपूर वाव आहे. शहाबुद्दिनला जेलात ठेवायचे की आपली खुर्ची वाचवायची, यात नितीशकुमार यांनी खुर्चीलाच महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
हत्या, अपहरण, लूटमार अशा एकूण ३६ पेक्षाही जास्त प्रकरणांमध्ये शहाबुद्दिनवर गुन्हे दाखल आहेत. त्याच गुन्ह्यांमध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. शहाबुद्दिनवर एकापेक्षा एक असे गंभीर गुन्हे आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये जे साक्षीदार आहेत, त्यांच्या जिवाला शहाबुद्दिनकडून धोका आहे, तो बाहेर पडला तर तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद जर पोलिसांनी केला असता, त्याच्यावरचे खटले वेळीच सुरू केले असते, तर आजही तो तुरुंगातच राहिला असता. ज्या राजीव रोशनची हत्या शहाबुद्दिनने केली होती, तो राजीव रोशन त्याच्या सख्ख्या दोन भावांच्या हत्येचा साक्षीदार होता. म्हणजे शहाबुद्दिन याने तीन सख्ख्या भावांना यमसदनी धाडले होते. पण, असे असतानाही त्याला जामीन मिळतो अन् जेलबाहेर आल्यावर मंत्री-आमदारांपासून तर सामान्य समर्थकांपर्यंत हजारो लोक त्याचे स्वागत करतात, ही आपल्या लोकशाहीची आणि एकूणच व्यवस्थेची क्रूर थट्‌टा आहे.
अपक्ष आमदार अनंतसिंह याला जामिनावर सोडले, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध क्राईम कंट्रोल ऍक्ट लावला. मग हाच न्याय पोलिसांनी शहाबुद्दिनला का लावला नाही? बिहारमध्ये दारूबंदी आहे. दारूची एखादी बाटलीही जवळ बाळगली तर त्याला तुरुंगात डांबले जाते अन् बाहुबली शहाबुद्दिनवर हत्या, अपहरण, खंडणीवसुली, लूटमार यासारखे गंभीर गुन्हे असतानाही तो मोकाट कसा काय सुटतो, असा प्रश्‍न फक्त बिहारवासीयांनीच नव्हे, तर देशवासीयांनी विचारायला हवा. शहाबुद्दिनच्या सुटकेसोबतच बिहारमधल्या सुशासनानेही सुटकेचा नि:श्‍वास घेतला आहे. नितीशकुमार आता सुशासनाचा दावा करूच शकणार नाहीत, एवढी त्यांच्या सरकारची प्रतिमा शहाबुद्दिनच्या सुटकेने डागाळली आहे. नितीशकुमार जेव्हा स्वबळावर पूर्ण बहुमतात सत्तेवर होते, तेव्हा त्यांनी एकामागोमाग बाहुबली नेत्यांना तुरुंगात डांबले होते. पण, आता ते लालूंच्या पाठिंब्याने सत्तेत असल्याने असहाय झाले आहेत. खरे तर त्यांनी लाचारी पत्करण्यापेक्षा आणि लालूंच्या धाकात राहण्यापेक्षा स्वत:च्या प्रतिमेला जपण्यासाठी सरकारचा राजीनामा दिला पाहिजे. लालूंच्या राजदसोबतची युतीही संपुष्टात आणली पाहिजे. नीतिमत्तेसाठी सत्ता सोडणारा प्रामाणिक नेता, अशी त्यांची ओळखही यामुळे निर्माण होईल अन् देशातील जनतेत एक चांगला संदेश जाईल.

गजानन निमदेव