सिपना शोधयात्रा

0
170

मेळघाटच्या घनदाट जंगलात आडवळणावर सुदूर वसलेल्या कुकरू नावाच्या एका छोट्याशा गावातल्या एका विहिरीतून उगम पावणारी एक नदी सिपना. इथली हिरवीगर्द वनराई आणि डोंगरदर्‍यांतून मार्ग काढत, खळखळाट करत अनिर्बंध वाहणारी. उगमापासून जेमतेम शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तापीच्या विशाल प्रवाहात तेवढ्याच आवेगाने सामावणारी… मेळघाटच्या निसर्गसौंदर्यात मोलाची भर घालणार्‍या सिपनेच्या काठावरच्या सर्वप्रकारच्या संपदांचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न गेली काही वर्षे चालला आहे. हा उपक्रम साकारणार्‍या कार्यकर्त्यांनी त्याला‘सिपना शोध यात्रा’ असे छानसे नावही दिले आहे.
तसा तर कुकरूच्या त्या विहिरीतून दोन नद्यांचा उगम होतो. एक खंडू. दुसरी सिपना. दोघांच्या दिशा वेगवेगळ्या. यातील एक पुरुष तर सिपना ही स्त्री वेषातील नदी असल्याची स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ही नदी म्हणजे अर्धनारी नटेश्‍वराचे रूप असल्याच्या सश्रद्ध भावनेने लोक तिच्यासमोर नतमस्तक होतात. अथपासून इतिपर्यंत इथल्या सागवानाच्या झाडांमधूनच तिचा प्रवास घडत असल्यानेही असेल कदाचित, पण त्याच अर्थाचे नाव या नदीला लाभले आहे. सिपना. नद्यांच्या तीनपैकी पैश्‍वती प्रकारात मोडणार्‍या सिपनेच्या पात्रात साहजिकच दगडांचे प्रमाण भरपूर आहे. पात्रात सर्वदूर विखुरलेल्या बव्हतांशी गोल आकाराच्या गुळगुळीत दगडांमधून खळखळाट करीत वाहणारा पाण्याचा प्रवाह, बाजारात विकत मिळणार्‍या बिसलेरीच्या पाण्याहून सरस, शुद्ध अन् निर्मळ असा…
कुकरूपासून सुरू झाल्यानंतर चेथर येथे तापीला जाऊन मिळेपर्यंतच्या प्रवासात सिपनेच्या पाण्याचा प्रवाह चहू बाजूला मुक्तहस्ते उधळण करतो ती निसर्गसौंदर्याची! ते दान असते निसर्गसंपदेचे. एकूण सहा प्रकारच्या निसर्गसंपदांची सभोवताल पखरण करत हा प्रवास अविरत सुरू असतो. सिपनेच्या बाबतीत बोलायचं तर पाण्याच्या या उथळ प्रवाहाने या परिसराला सारेकाही अगदी भरभरून दिले आहे. भूसंपदेच्या बाबतीत तर सिपनेचा काठ जणू गर्भश्रीमंत ठरला आहे. कुठे भुरकी, कुठे लाल, तर कुठे काळी माती वेगळाली पिके पिकविण्यासाठी मदतीची ठरते. वनसंपदेच्या बाबतीत तसा तर सारा मेळघाटच संपन्न आहे. पण सिपनेच्या काठावरचा परिसर त्याबाबतीत काकणभर सरसच ठरला आहे. इतरत्र कुठेही सापडणार नाही अशा जवळपास तीनशे प्रकारच्या जडीबुटी या परिसरात आढळतात. इथे गवसणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची, फळांची तर बातच काही और. कोरकूंपासून तर भिल्लांपर्यंत आणि गोंडांपासून तर गवळींपर्यंतच्या जाती, जमाती, वर्षानुवर्षे त्यांनी जपलेली त्यांची संस्कृती, खानपानाची त्यांची पद्धत, त्यांचे सणवार अभ्यासण्याजोगे आहेत. वाघांपासून तर दुभत्या गायींपर्यंतची या भागातली पशुसंपदा आणि इथल्या आसमंतात विहरणारे वेगवेगळ्या जाती-आकार-प्रकार-रंगांचे पक्षी… आ हा हा! सातपुड्याच्या पर्वतरांगांमधली निसर्गाची ही अमर्याद लयलूट अगदी देहभान विसरून अनुभवावी अशी…
पण पाण्यापासून तर जनजातींपर्यंत आणि मातीपासून तर झाडाझुडपांपर्यंत निसर्गाने जी श्रीमंती या परिसराला बहाल केलीय्, ती कालपर्यंत मेळघाटच्या दोन तालुक्यांच्या परिसरातच सीमित राहिली होती. या श्रीमंतीचा सार्‍या जगाला परिचय करून देण्याच्या उपक्रमाची, नव्हे एका प्रयत्नाची सुरुवात झाली ती पाच वर्षांपूर्वी. बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरात सेवाकार्याची मालिकाच उभारणारे सुनील देशपांडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘सिपना शोधयात्रे’त पहिल्या वर्षी सहभागी झालेल्या ७८ अभ्यासकांचा आकडा यंदा दोनशेवर जातो आहे. दरवर्षी २५ ते ३१ डिसेंबरच्या काळात या चलशिबिराचे आयोजन होते. महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून, अगदी राज्याबाहेरच्या-देशाबाहेरच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग या उपक्रमात अलीकडे नोंदवला जाऊ लागला आहे.
दर वर्षी २५ डिसेंबरला रात्री सारे शिबिरार्थी एकत्र येतात. सकाळी योगासनापासून दिनक्रम सुरू होतो. मग श्रमदान. नदीवरच्या छोट्या छोट्या बंधार्‍यापासून तर वृक्षारोपणापर्यंतच्या विविध बाबी त्यातून साकारतात. वनभोजनाचा आनंद अनुभवला की मग दुपारी गावातली भटकंती. नदीकाठच्या गावात जाणे. लोकांशी भेटणे. बोलणे. त्यांची जीवनशैली, त्यांच्या समस्या, त्या सोडविण्याची त्यांचीच पद्धत समजून घेण्याचा, त्यांच्या अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधण्याचा प्रयत्न होतो. रात्रीच्या सत्रात पुन्हा सारे एकत्र येतात. दिवसभराच्या प्रत्येकाच्या अनुभवांवर सांगोपांग चर्चा होते. या अनुभवावरचे प्रत्येकाचे टिपण दुसर्‍या दिवशी सकाळी बातमीस्वरूपात फळ्यावर लावले जाते. ३० ला गावकर्‍यांच्या समवेत हे शिबिरार्थी सिपनेच्या पात्रात दीपदान करतात.
सुनील देशपांडे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, या दीपदानामागील कल्पना तशी भावनिक आहे. भारतीय जनमानसात गंगेला अतिशय पवित्र आणि मानाचे स्थान आहे. इतके की, इतर सर्वच नद्या त्यांच्या दृष्टीने ‘गंगा’ आहेत. गंगेइतकेच पावित्र्य लोकांनी त्या नद्यांनाही बहाल केलेले आहे. माणूस एकदा एखाद्या गोष्टीबाबत सश्रद्ध झाला की, त्याच्या वागण्याची तर्‍हा बदलते. त्या वस्तूबाबतचा त्याचा व्यवहार बदलतो. निसर्गाप्रतीही माणसांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय संस्कृतीचा जणू एक भाग झाला आहे. या नदीच्या पात्रात एक दिवस दीपदान करण्याचा, इतकेच नव्हे, तर सिपनेची आरती ओवाळण्याचा उपक्रम, हा या भागातील लोकांच्या मनात या नदीबद्दल गंगेच्या पावित्र्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. शेवटी काय, माणसांचा मानस तयार करणे हाच या शिबिराचा उद्देश आहे ना! त्यादृष्टीने पुरेपूर प्रयत्न शिबिराच्या या आठवडाभराच्या काळात होतात.
मग उगवतो तो शिबिराचा शेवटचा दिवस. या दिवशी आयोजित होते ‘सिपना पंचायत.’ यात गावकर्‍यांचा सहभाग असतो. लोकांचे म्हणणे, अगदी गार्‍हाणी असतील तरीही, ऐकून घेण्याचा प्रयत्न होतो. सारेच प्रश्‍न त्या पातळीवर सुटतात असे नाही. तसे तर प्रशासनाच्या पातळीवरतरी कुठे सार्‍या समस्या निकाली लागतात? पण त्या मांडण्याची आपल्यालाही संधी आहे, त्यासाठी एक मंच आपल्यासाठीही उपलब्ध आहे, आपल्या समस्या जाणून घेण्यातही इथे कुणाला स्वारस्य आहे, ही भावना देखील मोलाची, गावकर्‍यांच्या मनात विश्‍वास निर्माण करणारी असते. कालपर्यंत त्यासाठी कुणी पुढे येत नव्हते. सरकारपर्यंत पोहोचणे, तिथे आपली गार्‍हाणी मांडणे… या सार्‍या बाबी तर अगदी स्वप्नवत होत्या. पण या शिबिराच्या निमित्ताने आता बदल घडू लागला आहे.
एरवी, नदीची परिक्रमा ही तशी नवलाईची बाब नाहीच. पण खास काठावरच्या संपदा अभ्यासण्यासाठी शे-दोनशे लोकांनी एकत्र येऊन नदीचे अवलोकन करण्यासाठी निवड करावी, यादृष्टीने भाग्यवान ठरली ती सिपनाच! पुढच्या आठवड्यात सुरू होणार्‍या यंदाच्या इथल्या शोधयात्रेत ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंह सहभागी होताहेत. तटावरच्या सुमारे पन्नास गावांना शिबिरार्थींची भेट होणार आहे. आतातर केवळ पाचच वर्षे झाली आहेत. पण या उपक्रमात सहभागी होणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेतली, तर या शोधयात्रेच्या आयोजनामागील हेतू तसाच सफल झाला आहे. पण, ज्या दिवशी इतर नद्यांच्या संदर्भातही असे प्रयोग ठिकठिकाणी सुरू होतील, तो क्षण या यशाचा परीघ विस्तारणारा ठरेल… प
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३