फसलेली काल्पनिक रहस्यकथा

0
122

भारतीय राजकारणच मुळात सुरस आणि चमत्कारिक आहे. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे त्यामध्ये आणखी रंजकमूल्य आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. यापैकी अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अलीकडे भाजपाच्या मित्रपक्षांपैकी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे सुद्धा अशाच प्रकारचा ‘सामना’ रोजच करू लागले आहेत. या सगळ्या लोकांच्या आक्रमक आणि आक्रस्ताळ्या विधानांनी यांच्याकडे कीव करत पाहणार्‍या सामान्य सुज्ञ जनतेची मात्र चांगलीच करमणूक होते आहे.
आता नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर सर्वसामान्य जनता खुष आहे. देशात सामान्य माणसांच्या स्वप्नातील काहीतरी घडते आहे. अनेक वर्षांत पहिल्यांदा काळा पैसा, काळे धंदे करणारे हादरले आहेत. एरवी भलतेच टेचात सर्वसामान्य माणसांना तुच्छ समजणार्‍यांची भंबेरी उडाली आहे. हे सगळे घडले पाहिजे असे वाटणारा सामान्य माणूस यामुळे अंतर्मनातून सुखावला आहे. सामान्य माणसांना रांगेत उभे राहाण्याचा, कमीत कमी रकमेत व्यवहार चालविण्याचा थोडा त्रास होतो आहे. मात्र, लोक तरीही खुष आहेत. देशात काही सुधारणा होत असेल, तर थोडे दिवस त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, मोदी फोबिया झालेल्या भारतातील राहुल गांधी, केजरीवाल, उद्धव ठाकरे यासारख्या नेत्यांना मात्र बरे सापडले मोदी, असा आनंद झाला आहे. आता रांगेत उभे राहून त्रस्त झालेले लोक आपण करू त्या आरोपावर विश्‍वास ठेवतील असे वाटून ही मंडळी मोदींच्या विरोधात रोज नवे आरोप करू लागले आहेत. केजरीवाल यांनी नोटबंदी हा एक काही लाख कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला.
अशा वातावरणात मागे राहातील ते राहुल गांधी कसले. त्यांनी एक काल्पनिक शौर्यकथा तयार केली. ते म्हणतात की, ‘त्यांच्या जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे पुरावे आहेत आणि केवळ त्यामुळेच त्यांना संसदेच्या अधिवेशनात बोलण्यापासून रोखले जात आहे.’
याच्याइतका विनोदी आरोप दुसरा असूच शकत नाही. संसदेच्या अधिवेशनात रोज गोंधळ चालू आहे. काही ना काही कारण काढून विरोधी पक्ष संसदेचे कामकाज चालणार नाही, असा पवित्रा घेत आहेत. सत्ताधारी पक्षानं संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला विरोधी पक्ष आणि तथाकथित रहस्योद्घाटनाच्या अथक प्रयत्नात असल्याचे सांगणारे राहुल गांधी हे फिरकलेच नाहीत. असे असताना सत्ताधारी आपल्याला बोलू देत नाहीत, असे म्हणणे हे धादांत खोटे असल्याचे लोकांच्या लक्षात आले.
एका मित्रासोबत ऑटोरिक्षातून जाताना राहुल गांधींच्या या रहस्यमय विधानावर आमच्यात चर्चा चालू झाली. त्यावेळी आमची चर्चा ऐकणार्‍या त्या रिक्षाचालकाने आमच्या चर्चेत अनपेक्षितपणे हस्तक्षेप करत म्हटले की, ‘सीधी बात है साब, उसके पास अगर मोदी के विरोध मे सचमुच एक छोटा भी सबूत होता, तो वो कब का बता चुका होता. बात का बतंगड बनाने के खेल को राजनीती कहते हैं साब| कुछ बात पता चली तो रोकने से भी कोई नही रुकता|
सर्वसामान्य भारतीय माणसाचा राजकीय सुज्ञपणा अशा अनौपचारिक चर्चेतून दिसतो, तसा तो मतपेटीतूनही व्यक्त होत असतो.
राहुल गांधी यांच्या विधानाची विश्‍वासार्हता अशी संपलेली आहे. गालाला खळी पाडत बोलणारा हा तरुण काही प्रामाणिकपणे राजकीय भूमिका मांडेल असे लोकांना सुरुवातीला वाटत होते. मात्र, राहुल गांधी यांनी वरचेवर बालिश, अविश्‍वसनीय विधाने करून आपली विश्‍वासार्हता शून्याच्याही खाली नेली आहे.
राहुल गांधी यांनी एकदा कॉंग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला अध्यादेश नाट्यमयरीत्या फाडून टाकला होता. एकदा उत्तर प्रदेशातील निवडणूक सभेत समाजवादी पक्षाचा जाहीरनामा फाडल्याचा आविर्भाव करत त्यांनी फाडलेला कागद हा मंचावर बसलेल्या लोकांच्या यादीचा होता, हे नंतर स्पष्ट झाले. अशा एकामागून एका घटनांमुळे राहुल गांधींची विश्‍वासार्हता संपत गेली. राहुल गांधी ज्या प्रान्तात प्रचाराला गेले त्या त्या ठिकाणी कॉंग्रेसचा पराभवच होत गेला. राजीव गांधींना कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक जागा लोकसभेत मिळाल्या. मात्र, या त्यांच्या युवराजाच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने नीचांक गाठला.
इतक्या दणदणीत पराभवानंतरही राहुल गांधी यांनी काही बोध घेतलेला दिसत नाही. आपल्याला चुकीचा सल्ला देणार्‍या सल्लागारांना बदलण्याची हिम्मत त्यांना दाखविता आलेली नाही. भारतीय जनतेच्या जीवनात काही कल्याणकारी बदल घडविण्याच्या दिशेने राजकारण करण्याऐवजी मोदीविरोध हाच त्यांनी राजकारणाचा केंद्रबिंदू केल्याचे दिसत आहे. सगळ्या लोकसभा निडणुकीतील प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी हे बड्या उद्योजकांचे पाठीराखे आहेत असे गौतम अडाणी, अंबानी यांची नावे घेऊन आरोप केला. मात्र, लोकांनी तो स्वीकारला नाही. तरीही दिशा न बदलता मोदी यांनाच टार्गेट करून कधी सूटबूट की सरकार, तर कधी अरहर मोदी असे लोकांना न पटणारे आरोप ते करत राहिले. सर्जिकल स्ट्राईक बाबत देशभर उत्साहाचे वातावरण असताना राहुल गांधी यांनी मात्र खून की दलाली अशा प्रकारचा अत्यंत सवंग आणि खालच्या दर्जाची भाषा वापरून आरोप केल्याने त्यांचीच नाचक्की झाली.
नुकतेच पार पडलेले संसदेचे हे संपूर्ण हिवाळी अधिवेशन कॉंग्रेस आणि विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज रोखून धरले आहे. संसदीय चर्चा, लोकहिताचे मुद्दे यापेक्षा फक्त गोंधळास्त्र कॉंग्रेसने वापरले. टू जी स्पेक्ट्रमच्या वेळी चौकशी सुद्धा नाकारणार्‍या सरकारला धारेवर धरण्यासाठी हेच अस्त्र भाजपाने उपसले तेव्हा सत्तेत असलेली कॉंग्रेस आणि त्यांना धार्जिणे असलेली माध्यमे यांनी अधिवेशन वाया गेल्याने जनतेचा किती पैसा वाया गेला वगैरे तर्क लढवीत होते. पुढे टू जी स्पेक्ट्रम, कोळसा खाण प्रकरणात देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सिद्धच झाले. आता तसे काहीही कारण नसताना, काळ्या पैशाच्या विरोधात मोदी यांनी काही निर्णय घेतले त्याबाबत विनाकारण खुसपटे काढून संसदेचे अधिवेशन होऊ न देण्याचा पवित्रा योग्य नव्हता. मात्र, अधिवेशनातील गोंधळाची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर ढकलण्यासाठी राहुल गांधी यांनी ही रहस्यकथा काल्पनिक रीत्या रचली आहे.
मोदी यांच्यावर आरोप करण्यात राहुल गांधी यांच्या स्पर्धेत अरविंद केजरीवाल असल्याने त्यांनी राहुल गांधींच्या या रहस्य स्फोटावर अनेक प्रश्‍नचिन्हे उपस्थित केली आहेत. ते म्हणतात की, मोदी यांच्या विरोधात पुराव्यांसह आरोप करण्याची राहुल यांची हिंमतच नाही. कारण, ज्या दिवशी ते आरोप करतील त्याच दिवशी मोदी रॉबर्ट वॉड्रा यांना अटक करतील, अशी त्यांना भीती आहे. केजरीवाल यांचे हे विधान राजकीय स्वरूपाचे असले, तरी राहुल गांधी यांची अगतिकता व्यक्त करणारे आहे.
पत्रकार बरखा दत्त म्हणतात की, राहुल गांधी एकीकडे मोदी यांच्यावर आरोप करतात. सरकारच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटत असताना राहुल गांधी मात्र पंतप्रधानांना भेटून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चा करतात. याला काय म्हणायचे.
यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मात्र फारच तिखट प्रतिक्रिया दिली आहे. स्वामी म्हणतात की, कायद्यानुसार जर बेकायदेशीर कृत्याची माहिती असेल तर ती कोणत्याही कारणाने दडवून ठेवणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्याकरिता तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
यापेक्षाही मोठे आश्‍चर्य म्हणजे कॉंग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना या राहुल गांधी यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या स्फोटक आरोपाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडे अशी काही माहिती असल्याचे त्यांनी आम्हाला काही सांगितलेले नाही. मीही त्यांना याबाबत विचारले नाही आणि त्यांनीही मला याबाबत काही सांगितलेले नाही.
अगदी राजकीय भूकंप होईल अशी माहिती आपल्याकडे असल्याने आपल्याला संसदेत बोलू दिले जात नाही, असा राहुल गांधींचा दावा असेल, तर त्यांनी या संदर्भात आपल्या पक्षातील लोकांना म्हणजे लोकसभेतील आपल्या नेत्यांना तरी सांगायला हवे होते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, काहीही माहिती जवळ नसताना माध्यमांना आकर्षित करेल अशी विधाने करायची, बातम्यांमध्ये चर्चेत राहायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिमाहनन केल्याचे क्षणिक समाधान मिळवायचे, इतकाच या सगळ्या उपद्व्यापाचा हेतू. ना भूकंप घडविणारी माहिती ना काही ठोस आरोप. सगळेच कपोलकल्पित!
अशा प्रकारच्या आरोपांमुळे राजकीय विश्‍वासार्हता कमी होत असते. ज्यांच्यावर असे भरमरसाठ आरोप केले जातात त्यांचे प्रतिमाहनन होण्याऐवजी त्यांचीच जास्त प्रसिद्धी होऊन त्यांनाच राजकीय फायदा होतो, असे पं. नेहरू, इंदिरा गांधी आणि आता नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत अनुभवाला आले आहे. कपोलकल्पित रहस्यकथेच्या निर्मात्याने किंवा त्यांना सतत चुकीचे स्क्रिप्ट देणार्‍या सल्लागारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
बाळ अगस्ती