रविवारची पत्रे

0
108

राहुलबाबा बोलाच…!
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिगत भ्रष्टाचार केला आहे,’’ असे आमचे पुतणे राहुलबाबा म्हणतात आणि ‘‘माझ्याजवळ पुरावे आहेत म्हणूनच मला संसदेत बोलू देत नाहीत,’’ असेही म्हणतात. चान्स मिळत नसतो, तर स्वकर्तृत्वाने घ्यावा लागतो. बोलण्यासाठी तुम्हाला कुणी पायघड्या घालणार नाही. तुमच्या पक्षातील लोक संसदेत गोंधळ घालून काम होऊ देत नाहीत. त्यांना चूप बसायला सांगा व बोलायला उभेे राहा. पहा, सर्वजण कसे चिडीचूप होतात ते. पण, तुम्ही त्यांना शांत करतच नाही. तुम्हाला संसदेत बोलू देत नसतील, तर जनतेसमोर भ्रष्टाचार मांडा, आम्ही ऐकायला तयार आहोत. ज्यांच्या नोटबदलीचे आम्ही स्वागत केले, त्यांचा घोटाळापण ऐकू. संसदेत झोपा काढणारे आमचे पुतणे काय बोलणार? बोला… बोला… आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे आमच्यासाठी फायद्याचे आहेे. ‘बोले तैसा वागे’ हे सिद्ध करून दाखवा. पुढच्या निवडणुकीत माझे मत राहुलबाबा तुम्हालाच!.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०
नवीन विद्यापीठ कायदा  सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडवणारा
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ पारित केल्याबद्दल सर्वप्रथम या सरकारचे मनपूर्वंक अभिनंदन.
गेल्या अनेक वर्षांपासून अभाविपनेही विद्यापीठ कायदा लागू करावा म्हणून आग्रही भूमिका घेतलेली होती. या कायद्यामुळे विद्यापीठातील सिनेट, मॅनेजमेंट काऊंसिल बैठकीत आता विद्यार्थी प्रतिनिधी असल्याने बैठकीत विद्यार्थीहिताचे प्रश्‍न मांडून त्यावर चर्चा करीत ते पारित करण्याचे अधिकार मिळणार आहेत. या कायद्यामध्ये विद्याथ्यार्र्ंचा सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे विद्याथ्यार्र्ंमध्ये नेतृत्व, कौशल्य, कला गुण, सामर्थ्य या सर्व बाबींना वाव देणार्‍या खुल्या छात्रसंघ निवडणुका या सुद्धा होणार आहेत. त्यामुळे विद्याथ्यार्र्ंमधून निवडून येणारा नेता हा विद्याथ्यार्र्ंचे नेतृत्व करणार असल्यामुळे बरेच बदल येत्या काळात आपल्याला दिसून येणार आहेत.
विद्यापीठ कायदा हा विद्याथ्यार्र्ंच्या हिताचा असणार आहे असे या सरकारचे म्हणणे आहे. आता तो कितपत हिताचा ठरेल हे पाहणे आवयक आहे.
गौरव हरडे
८९२८०४०४५५
नेत्यांचे बरळणे
देशातील धुरंधर राजकारणी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मोदीजींच्या ८ नोव्हें. च्या नोटबंदी निर्णयावर सुरुवातीला समाधानी होते. परंतु गत २-३ आठवड्यांपासून मायावती, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, गुलाम नबी आझाद, राहुल गांधी, केजरीवाल इ. नेत्यांनी या नोटबंदीमुळे सामान्य जनतेला जी गैरसोय होत आहे, त्याविषयी टीकास्त्र सोडलेले आहे. त्यासोबतच शरद पवार यांनाही सामान्य जनतेला होणार्‍या त्रासाबद्दल फारच कळवळा आलेला दिसतो. शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनीही सोबत केंद्र सरकारवर (अपरोक्षपणे मोदींवर) टीका करून आपली हौस भागविली आहे.
शरद पवारांच्या पक्षाचे महाराष्ट्रात शासन असताना सिंचन विभागात ७९,००० कोटी रु. खर्च होऊन १ टक्काही कामाची निष्पत्ती नाही. त्यावेळी हा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच लावला होता. त्यावेळी हा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे किंवा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेला नव्हता. तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आरोप केलेला होता. सिंचन विभाग हा राष्ट्रवादी म्हणून पवार साहेबांच्या पक्षाकडे होता. त्यावेळी सिंचन क्षेत्राकडे विशेष आणि प्रामाणिकपणे लक्ष दिले असते, तर हजारो, लाखो शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणी पोहचून व्यवस्थित पीक घेता आले असते. या भ्रष्टाचारामुळे शेतकर्‍यांंचे किती प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. याचा हिशेब करायला पवार साहेबांना कधी वेळ मिळाला नाही काय? त्यावेळी त्यांना शेकडो सामान्य शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिसल्या नाही. आताच त्यांना सामान्य जनतेचा पुळका आला. म्हणे व्यवस्था चुकली.
उद्धव ठाकरे म्हणतात, मोदीजींनी हा निर्णय घोषित करण्यापूर्वी जनतेला विश्‍वासात घ्यायला पाहिजे होते. का? उद्धव साहेब (शिवसैनिकांच्या भाषेत) जनतेला विश्‍वासात घेणं म्हणजे काय त्यांच्या घरोघरी पत्रकं वाटायला पाहिजे होती? की, गल्लोगल्ली लाऊड स्पीकर फिरवायला पाहिजे होते? मग ही योजना बरोबर राबवल्या गेली असती. आहे की नाही मौज.
दादा हांडेकर
९०९६३८२११२
देशातील सद्यःस्थिती
भारत हा एक विकसनशील देश आहे. पण, गेल्या आठ वर्षांपासून आपला देश विकसनशीलच आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील पाहिले कारण म्हणजे राजकारण (पॉलिटिक्स म्हणे!). आपल्या देशात अशी अनेक कामे होत असतात ज्यामागे फक्त राजकीय हेतू असतो.
२०१४ साली सत्तांतर झाले तेव्हा लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या. परंतु, सत्तांतर होऊन एक वर्षसुद्धा झाले नव्हते. तेव्हापासून काही लोकांच्या टीका सुरू झाल्या. (विरोधी पक्ष) काही दिवसांपूर्वी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाचे सर्वांनी मनापासून स्वागत केले. परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. या प्रकरणातही आहेत. काळा पैसा असलेल्या लोकांसाठी हा निर्णय घातक असल्यामुळे ते सर्व आज रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. देशहिताच्या निर्णयाला सुद्धा ढोंगी लोक विरोध करत आहेत. दुसरे कारण म्हणजे मतभेद. भारत देशात अगदी प्राचीन काळापासून मतभेद आहेत. लिंगभेद, जातिभेद यामुळे आपापसात अनेक लोकांना संधी मिळत नाही. भारत देश विकसित होऊ शकतो यात मुळीच शंका नाही. परंतु, त्या प्रक्रियेतील मुख्य अडचण म्हणजे जातिभेद. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमध्ये जातिभेद जणू आवश्यकच झाला आहे. एखाद्या मुलीने आपल्या कर्तृत्वावर यश संपादन केले, तर तिच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून ती कोणत्या जातीची आहे, हे बघितले जाते. म्हणजे आम्ही अजूनही त्याच विश्‍वास गटांगळ्या खात आहोत.
वर उल्लेख केल्याप्रमाणे भारत देश विकसित होऊ शकतो. त्यासाठी अंतर्गत मतभेद दूर केले पाहिजे. काही लोक भारत देशात समानता असल्याचे मानत असले, तरीही जास्तीत जास्त लोक आजही जात-पात-धर्म बघूनच सहकार्य करतात. सर्व लोकांनी मिळून-मिसळून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.
मी त्या दिवसाची वाट पाहतो आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील की आज मध्यरात्रीपासून भारत देशात कोणतीही जात, कोणताही धर्म मानल्या जाणार नाही. देशात फक्त एकच धर्म असेल- हिंदू धर्म. कारण, हा धर्म कोणताही भेदभाव न करता जगण्याची जीवनशैली आहे.
अखिलेश कोतवालीवाले,नागपूर
विकासाचा प्राथमिक मंत्र
‘माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो’ असे म्हणतात ते खोटे नाही. माणसाचे शिक्षणाशी नाते तुटले की तो कायम अडाणीच राहातो. माझा बालमित्र, जो आज एका कंपनीत इंजिनीअर आहे. तो मला म्हणाला, ‘माझे वडील अगदी शाळेजवळच राहावयाचे. परंतु ते नियमितपणे शाळेत गेलेच नाही. शेवटी त्यांची शाळा सुटली. आणि कायमचे अडाणीच राहिलेत. ते जेथे पूर्वी राहात होते, अगदी त्यांच्या घरापाशीच देशी दारूचे दुकान होते. थोडे मोठे झाल्यावर ते अगदी न चुकता, नियमितपणे त्या दुकानात जायचे, दारूच्या नशेत आपण अडाणी राहिलो, हे कधी त्यांना कळलेच नाही.’
माझ्या मते, आपल्याला परमेश्‍वराने दोन कान दिलेले आहे. त्यापैकी एक, गुरुजींना ओढण्यासाठी आणि दुसरा कान वडिलांनी ओढावा, यासाठी दिलेले आहे. काय चांगले आहे? हे शाळेतील गुरुजी आपला कान ओढून समजावून सांगतात आणि काय वाईट आहे? हे कान ओढून आपले वडील समजावून सांगतात. आपल्याला जीवनात पुढे जावयाचे असेल तर कोणी तरी असे, कान ओढून सांगणारे पाहिजेच असतात. खरोखर आपण, आपल्या वडिलांचे, मनापासून आभार मानले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकलो, आपल्यातले अडाणीपण कमी करण्यास त्यांनी मोलाची मदत केलेली आहे. आज मी पूर्ण शिक्षण घेतलेले आहे आणि माझ्या मुला-मुलींना सुद्धा शिक्षण प्रदान केलेले आहे. आता तर सारेच शैक्षणिक वातावरण काळानुरूप बदलून गेलेले आहे. एकदा माझ्या इंजिनीअर असलेल्या मुलीनी मला मॉडर्न मोबाईल भेट म्हणून दिला आणि मला म्हणाली, ‘बाबा, तुम्ही मला या मोबाईलवरून एसएमएस करून जे सांगावयाचे ते सांगत जा. फोन करू नका. कारण बरेच वेळा मी कामात बिझी असते.’ मला नाही करावयाचा फालतू ऐसमेस’ असे म्हणत मी तिच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मी यावर गंभीरपणे विचार केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, अवाढव्य हत्तीला एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी आपण सहजपणे हलवू शकतो. परंतु माणसाला, तसे हलविता येत नाही. कारण कोणतेही काम करण्यासाठी त्याच्या काही टर्म्‌स अँड कंडिन्शस असतातच. माझ्याही बाबतीत तसेच घडलेले आहे. खूप प्रयत्न केल्यावरही त्या मोबाईलवरून मला माझ्या मुलीला मेसेज करताच आला नाही. माझ्या मुलीला वेळेअभावी, मोबाईलवरून मेसेज कसा करावा, हे मला शिकविता आले नाही. शेवटी माझी नात माझ्या मदतीला धावून आली. तिने मला ते शिकविले, त्यामुळे माझे अडाणीपण काही प्रमाणात दूर होऊ शकले. माझ्या अनुभवावरून माझ्या लक्षात आले की, माणूस कितीही आयुष्यभर शिकला तरी, कमी अधिक प्रमाणात तो अडाणी राहातोच. मला असे नेहमी वाटते की आपली मुलं-मुली लहान असताना, आपण ज्याप्रमाणे त्यांना महाभारत, त्यातील अर्जुन, कर्णाची कथा सांगत होतो, त्याप्रमाणे आपल्या मुला-मुलींनी ते मोठे झाल्यावर, आपल्याला भारतातील नवीन तंत्रांची, उपकरणांची कथा सांगावी. जीवनाश्यक तंत्र, सुविधासंबंधी आपल्याशी चर्चा करावी. लहानपणी आपण त्यांना त्यांचा हात धरून त्यांची इच्छा नसताना, जबरदस्तीने शिकविले होते. त्याचप्रमाणे मोठे झाल्यावर, आपल्या मुला-मुलींनी आपली इच्छा नसताना सुद्धा, जबरदस्तीने, त्या सार्‍या जीवनावश्यक गोष्टी शिकवाव्यात आपले बोट धरून. त्यामुळे आपले अडाणीपण कमी होण्यास मदत होऊ शकते. आता आपण तसे जागरूक झालेले आहोत. सरकारला आपण विचारतो, ‘आम्ही नियमित कर भरतो. सांगा तुम्ही आमच्यासाठी काय केले?’ यावर सरकार सुद्धा आपल्याला प्रश्‍न करते, ‘आम्ही इ-मेल, जीमेल, डेबिट क्रेडिट कार्ड, कॅशलेस डिजिटल पेमेंट इत्यादी तंत्रज्ञानाच्या व शिक्षणाच्या सर्व सोयी तुमच्या दारापर्यंत पोहचविल्या आहेत. या जीवनावश्यक गोष्टींपैकी किती गोष्टींचा तुम्ही प्रत्यक्ष उपयोग केलेला आहे?’ सरकारच्या या प्रश्‍नातच विकासाचा प्राथमिक मंत्र लपलेला आहे. या प्रश्‍नाचे सकारात्मक उत्तर आपल्याला देता आले पाहिजे, किमान आपल्या विकासासाठी.
प्रा. शशिकांत अ. पांडे
७५८८७४७९९६
अमिताभजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही!
सध्या टीव्हीवर अमिताभ बच्चन यांची एक जाहिरात प्रसारित होत आहे. ती आहे ‘एका ब्रॅण्डेड मसाल्याची’. या जाहिरातीमध्ये अमिताभजी सांगतात की, ते शर्मा नावाच्या मित्राच्या घरी जेवायला गेले होते तेव्हा शर्माजींच्या आईने केलेला स्वयंपाक इतका बेकार होता, म्हणून त्यांनी ठरवले की, पुन्हा शर्माजींकडे जेवायला बोलावले, तर काही कारण सांगून जेवायला जायचे नाही. कारण त्यांची आई मला आवडणारे मसाले वापरत नाही आणि त्याशिवाय स्वयंपाक चांगला होऊच शकत नाही!
अमिताभजी, तुमच्याकडून एका आईच्या स्वयंपाकाची अशी खिल्ली उडवणे हे काही पटले नाही. अहो, पूर्वी कुठे होते हे पॅकबंद मसालेबिसाले! आईच्या हातचा स्वयंपाक हा नेहमीच स्वादिष्ट असायचा आणि आताही असतो- ती ब्रॅण्डेड मसाले वापरो किंवा घरी तयार केलेले! अमिताभजी, पैशासाठी तुम्ही विचार न करता कसेही संवाद बोलता, हे तुमच्या प्रतिमेला शोभत नाही. तेव्हा जेवायला जाताना तुम्ही त्या मसाल्याचे पाकीट सोबत घेऊन जाता, हे जाहिरातीमध्ये तुम्ही म्हणता, हे पटले नाही बुवा!
राजीव दारव्हेकर
९०९६३२२२००
सेना-भाजपा युती आणि विकास
आमच्या अकोट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मागील २० वर्षांपासून शिवसेना करीत आलेली आहे. अगदी मधले बोडखेसाहेब सोडले, तर मतदारसंघ शिवसेनानिष्ठ आहे. ढोणे, कराळे, गावंडे उभयता… इत्यादी लोकांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. विकासाच्या बाबतीत बोलाल, तर विकास कुठल्याच बाजूने झालेला दिसत नाही, आता तर शिवसेनेचे तारणमूल्य जप्त झालेय. किमान आतातरी चूक सुधारा.
शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आहे, मतदारसंघाचा विकास घडवा, लोकांना चांगले रस्ते हवे आहेत, ग्रामीण भागात रस्ते, आरोग्यसेवा, आणि केंद्रीय आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवणे गरजेचे आहे. अंत्योदय हा स्वर्गीय दीनदयाळजींचा विचार रुजवायचा आहे, एमएसईबीची प्रतीक्षा सूची संपवा, किमान शेतकर्‍यांंसाठी १२ तास सातत्यपूर्ण समान दाबाचा वीजपुरवठा दिवसा करा. शेतकर्‍यांचे जीवन अमूल्य आहे. लोंबकळलेल्या तारा आणि वाकलेले पोल या भ्रष्टाचाराचे निशाण आहे. ताबडतोब सर्वे करून परिस्थिती सुधारा. आरोग्यबाबतीत जिल्हा उपरुग्णालय, अकोटची परिस्थिती सुधारा, एनआयएचएमच्या सीट भरा, ग्रामीण आरोग्यव्यवस्था ही बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टरांवर अवलंबून आहे, याचे भान ठेवून त्यांना न्याय द्या. परिस्थिती बिकट आहे.
आणि आता निधी नाही, असे कृपया म्हणू नका. कॉंग्रेस आणि भाजपा यातील भेद सामान्य जनतेस समजू द्या आणि खंडवा-अकोला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर तातडीने करा.
डॉ. विक्रम जोशी तेल्हारा