गोठलेलं आयुष्य…

0
250

आज रेखाच्या जीवनातील आनंदाचा क्षण. आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार तिला मिळाला होता. तिच्या कार्याचा गौरव झाला, त्यामुळे तिला कृतकृत्य वाटत होते, पण इथपर्यंत येईपर्यंत ज्या दिव्यातून ती गेली होती, ते क्षण पुन्हा तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. एका डोळ्यात हासू तर दुसर्‍या डोळ्यात आसू होते. राजूचा निरागस चेहरा तिच्या डोळ्यापुढे पुन्हा पुन्हा येत होता. सतीश तिचा नवरा, राजू आणि तिच्या सासूबाई या सोहळ्याकरिता हजर होत्या. पुरस्काराचे कळताच मित्र, मैत्रिणी आणि अनेक संस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण इथपर्यंत येईपर्यंत १६ वर्षांचा काळ लागला होता. तिच्या नकळत तिचं मन भूतकाळातील आठवणीत गुंतून गेलं.
बी. ए. चं शेवटचं वर्ष होतं. रेखा दिसायला सुंदर. आपसातील माहितीतील सतीशने तिला मागणी घातली. सतीश इंटरनेट सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होता. आई, बाबा, लग्न झालेली एक बहीण जी कायम परदेशात वास्तव्याला आहे. देखण्या सतीशला नकार देण्यासारखं कोणतंच कारण नव्हतं. जवळचा मुहूर्त पाहून रेखाचे दोनाचे चार झालेत. नवनवलाईचे सोनेरी दिवस आणि चंदेरी रात्री आयुष्यातील स्वप्न साकार करीत होते. सासर गर्भश्रीमंत, त्यामुळे रेखाला नोकरी करण्याची गरज नव्हती. एक टिपिकल हाऊसवाईफ म्हणजे रेखा. संध्याकाळी सतीश घरी येण्याच्या वेळेस नटून-थटून दारात त्याची वाट पाहत ती असायची. जरा फ्रेश होऊन रात्री फिरण्यास ती दोघं बाहेर पडायची. वर्षभराचे सणवार सासर-माहेर दोन्हीकडे पार पडले. त्यातच आनंदाच्या बातमीची भर पडली. रेखाला किती जपू, कुठे ठेवू कुठे नको असं होऊन गेलं. दर महिन्यात मेडिकल चेकअप होत होतं. तिसर्‍या महिन्यातच सोनोग्राफीमध्ये बाळाच्या मेंदूत गाठ आहे, हे लक्षात आलं. डॉक्टरांनी अबॉर्शनचा सल्ला दिला. सतीश व घरातील वडीलधारी मंडळींनी पण होकार दिला, पण रेख़ाचं मन तयार होईना. नुकतीच सुखाची चाहूल लागली. आपल्या आणि सतीशच्या प्रेमांकुराला खुडून टाकणं तिला योग्य वाटेना. डॉक्टरांनी पुढील धोक्याची कल्पना दिली होती, पण अतिशय भावनेच्या उत्कट टप्प्यावर तिचं मन गर्भपाताकरिता तयार नव्हतं. काळ कोणाकरिताही थांबत नाही. यथावकाश रेखाची प्रसूती झाली. बाळ चांगल्या वजनाचं, नाकीडोळी नीटस्, गोर्‍यापान रंगाचं व काळ्याभोर जावळाचं जन्माला आलं. थाटात बारसं झालं. राजीव नाव ठेवलं, पण लाडाने सर्वजण त्याला राजू म्हणत.
राजू तीन महिन्यांचा झाला, पण त्याच्या हालचाली फार मंद गतीने व्हायच्या. मांडीवर तो निर्विकारपणे पडून राहायचा. भूक लागली तर क्षीण आवाजात रडायचा. त्याची प्रगती मंद गतीने होती. लहान बाळ जसं कोणाकडेही पाहून खुदकन हसतं तसं काही घडत नव्हतं. सासूबाईंच्या लक्षात आलं. लहान मुलांच्या डॉक्टरांकडे नेलं. सर्व तपासण्या झाल्या. न्यूरो सर्जनकडे गेले. औषधं चालू होती, पण पाहिजे तशी प्रगती दिसत नव्हती. १-१॥ वर्षांचा तो चालू लागला, पण बोलता येईना. अडखळत काही शब्द यायचे. कानाची तपासणी झाली. स्पीच थेरपी झाली, पण फरक जाणवला नाही. भावना व्यक्त करता येत नव्हत्या म्हणून तो ओरडाआरडी करायचा, वस्तू फेकून देई. संवादाचा अभाव जाणवू लागला. तो स्वमग्न जास्त राहू लागला. सुस्त पडून राहू लागला. पुढे पुढे त्याला फिट्‌स येऊ लागल्या. एकटंच राहणं, एकाच खेळण्याशी दिवसभर एकटंच खेळणं याचं नक्की कारण समोर आलं नाही, पण अविकसित मेंदूची ही स्थिती आहे, असं डॉक्टरांचं मत पडलं. डॉक्टरांनी ऑटिझमचं निदान केलं. त्याला नाव घेऊन बोलावलं तरी प्रतिसाद नसायचा; लक्ष नसायचं. काही वेळेस तो खुणेने बोलायचा ते फक्त आई, आजीला समजायचं. बोलण्यात समस्या येऊ लागल्या. आता रेखाचं पूर्ण विश्‍व राजूभोवती फिरत होतं. घरातील काम आटोपलं की, सतीश कामावर गेला की राजूचं हवं नको पाहणं तिचंच काम होतं. माहेर-सासरच्या लोकांची मदत असायची, पण आई म्हणून राजूत ती जास्त गुंतली होती. त्याच्या वयाची इतर मुलं पाहताना, त्यांच्या बाललीला, खोड्या पाहताना तिच्या आतड्यात, काळजात तुटायचं. अविकसित मेंदूमुळे मल्टिपल डिसऑर्डर दिसू लागला. हातात वस्तू न पकडणे, चालताना तोल जाणे, शब्दोच्चार न होणे, प्रकृती कृश होत होती. स्पीच थेरपी, औषधोपचार चालू होते, पण गुण नव्हता. रेखाला राजूशिवाय दुसरा विषय नव्हता. तिचं आयुष्य राजूभोवती फिरत होतं.
आज तिच्या भावाच्या मुलाचं बारसं होतं. रेखा राजूला घेऊन सकाळपासून माहेरी आली. आईकडे आले की, ती थोडी रिलॅक्स असायची. इतर लोकही राजूकडे लक्ष द्यायचे. संध्याकाळी बाळाला पाळण्यात घालायचे होते. सर्वजण आपलं आवरायला आणि इतर तयारीत गुंग होते. राजू लहान बाळापाशी गेला. त्याचा एकच पाय जोराने ओढू लागला. बाळाच्या रडण्याने सर्वजण धावत आले. कोणीतरी खसकन राजूला मागे ओढले आणि दोन धपाटे त्याच्या पाठीत घातले. राजू किंचाळून रडू लागला. अस्ताव्यस्त घरात धावू लागला. तो आवरेनासा झाला. हळूहळू त्याची ताकद वाढत होती. रेखा त्याला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. घरात जमलेले सर्वजण हे दृश्य पाहत होते. रेखाला कमालीचा संकोच वाटला. आपण उगीचच आलो, असं तिला झालं. आज सतीश सोबत नव्हता. तो कामानिमित्त गावाला गेला होता. नाही तर अशा वेळेस सतीश राजूला सांभाळतो/आवरतो. त्याच्या रागावण्याला राजू घाबरून असायचा. पुढे असे प्रसंग वारंवार यायचे. सणावाराला, वाढदिवसाला एकत्र येणं, सर्वांमध्ये, गर्दीमध्ये राजूला अस्वस्थ, असुरक्षित वाटायचं. बोलता यायचं नाही. त्यामुळे भावना प्रकट करायला तो खूप जोराने ओरडायचा. वस्तू, खाऊ फेकून द्यायचा. आता राजूला आवरणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं.
त्या दिवसांत मग रेखाला एक प्रकाशकिरण दिसला. मतिमंद मुलांच्या शाळेत त्याला घातले. रेखा त्याच्यासोबत काही तास शाळेत असायची. आपणही हे ट्रेनिंग घ्यावे, असे तिच्या मनात आले आणि पुण्याला ती राजूला सोबत घेऊन गेली. राजूची शाळा आणि तिचे ट्रेनिंग सोबत सुरू झाले. आता राजूसारखी बाकीची मुलं पाहून तिचे दु:ख थोडं हलकं झालं. मन नवीन विचार करू लागले. ऑटिझमबद्दलची सखोल माहिती तिला मिळाली. त्या मुलांशी कसं वागायचं हे कळलं. थोडा डिफेक्ट असणारी मुलं बरीच नॉर्मल होती. ती आपली सर्व कामं हळूहळू का होईना स्वत: करीत होती. थोडी फार अडखळ बोलत होती. त्यांचं जगणं बर्‍यापैकी सुकर झालं. दोन वर्षांचं ट्रेनिंग झालं. सरकारच्या परवानगीने तिने शाळा काढली. आता राजूसोबत २०-२२ मुलांची ऍडमिशन झाली. पालकांच्या फीवर शाळा सुरू झाली. समाजातून काही मदत मिळाली. आता रेखाचा वेळ छान जाऊ लागला. डोळ्यापुढे काहीतरी ध्येय होतं, राजूसारख्या इतर मुलांचं जगणं सुकर करणं. शिक्षणासोबत इतरही सांस्कृतिक-राष्ट्रीय कार्यक्रम शाळेत होत. त्याकरिता वार्षिक स्नेहसंमेलन व्हायचं. त्यात प्रत्येकजण भाग घ्यायचं. शून्यातून उभं राहिलेलं विश्‍व समाज बघत होता. त्याची दखल घेत आज तिच्या श्रमाची जणू पावतीच पुरस्काराच्या रूपात तिला मिळाली.
आज राजू १६ वर्षांचा झाला. दरम्यानच्या काळात तिने दुसरा चान्स घ्यावा, असा सल्ला सर्वांनी दिला, पण दुसर्‍याचा विचार करताना राजूकडे दुर्लक्ष होईल. कदाचित ते आपण पेलू शकणार नाही. राजूवर अन्याय होईल. तो दुसर्‍या बाळाला स्वीकारेलच असेही नाही. म्हणून रेखाने तो विचार मागे टाकला. सर्व लक्ष राजूवर केंद्रित केलं. मल्टिपल डिसऑर्डर असल्यामुळे त्याची श्रवणशक्ती हळूहळू कमी झाली. दृष्टी कमी होता होता डोळ्यापुढे अंधार दाटला. आवाज क्षीण झाला. प्रकृती ढासळली. १६ वर्षांचा राजू ८-९ वर्षांचा असावा, इतका कृश दिसू लागला. गाडी उताराला लागली. सामाजिक पुरस्कार मिळाले, पण राजूला सुधरविण्यात यश आलं नाही. शाळा ठीक चालू होती. मुलांची संख्या वाढत होती. राजूकरिता सुरू केलेली शाळा राजूशिवाय चालत होती. वर्ग खोल्या, शिक्षक वाढले. रेखाचं शाळेत जाणं नियमित होतं, पण राजू मात्र असहाय स्थितीत गादीवर पडलेला असायचा. त्याला हाताला धरून बाथरूमकडे न्यावे लागे. तो चाचपडत चालत असे. क्षीण आवाजात आईला बोलावत असे. आता सगळी औषधं बंद होती. फक्त फिट्‌सचे औषध चालू होते. शाळेतील मुलांच्या गर्दीत रेखामधील आई राजूचं अस्तित्व शोधत राहिली.
‘‘चला निघायचं न?’’ सतीशच्या आवाजाने रेखा भानावर आली. हार-तुरे, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह सर्व सासूबाईंच्या हातात होतं. राजू तिचा पदर घट्ट धरून तिला अगदी चिकटून उभा होता. त्याला हाताला धरून ती गाडीपर्यंत आली. गाडीत तिच्या मांडीवर डोकं ठेवून राजू झोपला. त्याच्या केसातून बोटं फिरविताना तिच्या मनात एक विचार सहजपणे तरळून गेला. १६ वर्ष राजूशिवाय आपलं वेगळं विश्‍व नाही. आज कित्येक दिवस नव्हे वर्षांत आपण सतीशबरोबर एकटंच फिरायला गेलो नाही. सहज बाल्कनीत खुर्च्या टाकून मोकळेपणाने गप्पा केल्या नाहीत. रात्री गच्चीवर हातात हात घालून चांदण्यात फिरलो नाही. त्याच्या आवडीचा बेत केला नाही की, त्याच्या आवडीची गुलाबी शिफॉनची साडी, स्लीवलेस ब्लाऊज घालून घरभर वावरलो नाही. कित्येक दिवसांत बारसं, वाढदिवस अशा घरगुती कार्यक्रमात गेलो नाही. नाटक, मुव्ही, बीसी पार्टीज तर इतिहासजमा झाल्या. सासूबाई मुलीच्या अडचणीला परदेशात २-३ दा जाऊन आल्यात. सतीश कामानिमित्त बाहेरगावी जात होता. रेखा मात्र एका अदृश्य धाग्याने राजूसोबत बांधली गेली होती. सर्वांनी कितीही राजूचं केलं तरी शेवटचा भोज्या आईच असते, हे सत्य आहे. लग्नालासुद्धा गेली तरी घरी राजू आहे, तो वाट पाहत आहे, आपण भरविल्याशिवाय तो जेवणार नाही या विचाराने ती घाईने घरी पोहोचायची. मित्रमंडळ, नातलग फक्त फोनवरच राहिले, पण यातूनही एक चांगली गोष्ट घडली. राजूसारख्या मुलांचे शाळेतील पालकत्व तिला मिळाले. त्यांच्या आया काही तासांकरिता मोकळ्या झाल्या. शाळेतील मुलं आईपासून वेगळी होती. त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू होतं. त्याचं सर्व श्रेय रेखाकडे जात होतं, असं वारंवार मुलांच्या पालकांनी विशेषत: आयांनी मान्य केलं. त्यांच्या स्टेजवरच्या भाषणातूनही ते व्यक्त होत होते. ‘‘तुम्ही नसत्या तर,’’ असा प्रश्‍नही वारंवार असायचा. स्टेजवरून उतरल्यावरही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत राहिला. ‘‘देवा! त्यांच्या आशीर्वादाने तरी राजूला बरे वाटू दे रे.’’ मनोमन ती प्रार्थना करीत असे. गाडीला ब्रेक लागला. घर आलं होतं. राजूला जागं करून आधार देत ती घरात आली. राजूला बिछान्यावर झोपवलं. त्याच्या अंगावर आपली साडी टाकली. ती साडी त्याला रोज झोपताना अंगावर लागायची. आई जवळ असल्यासारखं त्याला वाटे. आईच्या आधाराची, प्रेमाची ऊब तो अनुभवत असे. झोपलेल्या राजूकडे पाहताना एक विचार विजेसारखा मनात चमकून गेला. ‘‘आपलं आयुष्य गोठून गेलं आहे का?’’ मान हलवत तिने तो विचार झटकला. सर्वांचे कपडे बदलून झाले. जेवणं झाली. ‘‘कार्यक्रम छान झाला. खूप गर्दी होती. तुझा चाहता वर्ग पण मोठा आहे,’’ असे अभिमानाने सतीश म्हणाला. सासूबार्ईंनी त्याला पुस्ती जोडली. रेखा मनोमन सुखावली. गादीवर अंग टाकताना तिच्या मनात आलं, आयुष्यभर आपण काय केलं? आपलं पूर्ण आयुष्य राजूभोवती फिरत राहिलं आणि तिथेच ते गोठून गेलं. जणू गोठलेलं आयुष्य…
सुनीता गोखले/९८२३१७०२४६