साप्ताहिक राशिभविष्य

0
800

रविवार, १८ ते २५ डिसेंबर २०१६

सप्ताह विशेष
• सोमवार, १९ डिसेंबर : मोरया गोसावी पुण्यतिथी- चिंचवड (पुणे), मंगळवार, २० डिसेंबर : संत गाडगेबाबा पुण्यतिथी, बुधवार, २१ डिसेंबर : कालाष्टमी, मकरायन (१६.१४), उत्तरायणारंभ, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, शंकरस्वामी पुण्यतिथी- शिऊर (औरंगाबाद), गुरुवार, २२ डिसेंबर : (भारतीय) सौर पौष मासारंभ, अयन करिदिन, शुक्रवार, २३ डिसेंबर : श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी, पार्श्‍वनाथ जयंती (जैन), शनिवार, २४ डिसेंबर : सफला एकादशी, भारतीय ग्राहक दिन.
मुहूर्त : • साखरपुडा- १८ डिसेंबर व २४ डिसेंबर, बारसे- २४ डिसेंबर, • जावळं- २३ डिसेंबर,
• गृहप्रवेश- १६ डिसेंबर व २३ डिसेंबर.

मेष : कुटुंबात समाधान राहील
आपला राशिस्वामी मंगळ धनेश शुक्रासोबत दशम स्थानात खुश आहे. शुक्र सप्तमेश आणि कुटुंबेश आहे. त्यांच्यावर शुभंकर गुरूची दृष्टी आहे. त्यामुळे या राशीच्या मंडळींना सध्याचा काळ कौटुंबिक सुख, समाधान आणि सौहर्द्राच्या दृष्टीने उपयुक्त आहे. कुटुंबात मंगलकार्ये, विवाहादी कार्यक्रम, धार्मिक सोहोळे आयोजित केले जाऊ शकतात. यामुळे घरात पाहुणे, नातेवाईकांची वर्दळ राहील. आनंदाचे वातावरण राहील. विशेषतः भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍या मंडळींना या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कळू शकतात. सत्पुरुषांचा सहवास लाभण्याचे देखील योग येऊ शकतात. शुभ दिनांक- २१, २२, २३.
वृषभ : भाग्याची उत्तम साथ
आपल्या राशिस्वामी शुक्रासोबत व्ययेश आणि सप्तमेश मंगळ भाग्यस्थानात स्थानापन्न आहे. मंगळ त्याच्या उच्च राशीत आहे. शुक्र व मंगळावर गुरूची शुभ दृष्टी आहे. या काळात आपणास भाग्याची उत्तम साथ लाभणार असल्याचेच हे द्योतक आहे. काही चांगल्या घटना अचानक किंवा फारच अल्प कालावधीत घडून आपणास सुखद धक्का देऊ शकतील. विशेषतः युवा वर्गाला नोकरी-व्यवसाय-विवाह अशा भाग्योदयकारक घटनांचे योग यावेत. काहींना विदेश गमनासाठी उत्तम संधी लाभू शकते. नोकरी, शिक्षण किंवा पर्यटनासाठी देखील विदेशात जायचे स्वप्न पुरे व्हावयास हवे. काही खर्चीक योग संभवतात.
शुभ दिनांक- १८, २०, २२.
मिथून : जोमाने कामाला लागा
आपला राशिस्वामी बुध सप्तमस्थानात आहे. त्याच्या एकीकडे शनी व पराक्रमेश रवि, तर दुसरीकडे मंगळ व शुक्र आहेत. बुध काहीसा पापग्रहांच्या मध्यात अडकला आहे. रविच्या सहवासामुळे त्याचा प्रभाव घटणार आहे. अशात आपल्याला अतिशय जोमाने, प्रयत्नांची शिकस्त करून आपली कामे पूर्णत्वास न्यावी लागतील. भागीदारीच्या व्यवहारात असाल तर काहीसे मिळते-जुळते घेणेच फायद्याचे ठरेल. षष्टातला शनी प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करू शकतो. लाभेश मंगळ व व्येश शुक्र अष्टमात आहेत. ते अचानक व मोठ्या खर्चाचे संकट उभे राहाण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे या आठवड्यात आपणांस सकर्तता आवश्यक आहे. शुभ दिनांक- १९, २०, २१.
कर्क : अनपेक्षित, संमिश्र घटना
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी आपल्याच राशीत आहे. मात्र, तो काहीच वेळाने राश्यांतर करून राहूच्या सान्निध्यात धनस्थानी जाईल. सप्तमात मंगळ व शुक्राची जोडगोळी आहे. पराक्रमातील गुरू भाग्याला पाहात आहे. हा आठवडा तसा बराच संमिश्र घटनांनी युक्त राहील. काही अतिशय उपयोगी व भाग्यकारक घटना घडतानाच मनाचा विरस करणार्‍या, प्रसंगी काही मोठ्या अनपेक्षित घटनांचा आघातही सहन करावा लागू शकतो. काहींना चंद्र-राहू सहवासामुळे भ्रमित झाल्यासारखे देखील होऊ शकते. या काळात महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहावयास हवे. खर्च करताना भान ठेवायला हवे. आश्‍वासनांना बळी पडू नका. शुभ दिनांक- १८, २१, २२.
सिंह : मानसिक, आर्थिक समाधान
राशिस्वामी रवि पंचमात असून राशिस्थानी राहू आहे. चंद्र सुरुवातीला व्ययात असला तरी तो काही तासातच आपल्या राशीत येऊन सुखकर ठरेल. मानसिक व आर्थिक दृष्ट्या हा आठवडा आपणास उत्तम जावा. एखादेवेळी काहींना याची सुरुवात खर्चीक व त्रासदायक ठरू शकते. मात्र, नंतर तो उत्तम ठरेल. आठवड्याच्या पूर्वार्धातच अनेक चांगल्या बातम्या कळतील. मुलाबाळांची प्रगती होईल. युवा वर्गास नोकरी-व्यवसाय, परीक्षेत यश मिळेल. काहींच्या विवाहादी योगासंबंधी वेगवान हालचाली घडू शकतील. विशेषतः व्यावसायिक वर्गाला आठवड्याचा उत्तरार्ध आर्थिक प्रगती करणारा ठरेल. व्यवसाय वाढ, नवे प्रस्ताव फायद्याचे ठरतील.
शुभ दिनांक- १९, २१, २३.
कन्या : अधिक प्रयत्नांची गरज
आपला राशिस्वामी बुध सुखस्थानात रविसोबत आहे. त्याच्या एका बाजूस शनी व दुसरीकडे मंगळ व शुक्र आहेत. अशा प्रकारे आपला राशिस्वामी पापमध्यात अडकलेला असताना राशिस्थानी मात्र गुरू बसला आहे. त्याने आपल्या बाबतीत सारे चांगले करण्याचा विडा उचललेला आहे. गुरूच्या दृष्टीमुळे या राशीच्या युवा वर्गाला विवाहादिकाचे उत्तम योग निर्माण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. बुध व्ययेश रविसोबत असल्याने यशासाठी जरा अधिक प्रयत्न करावे लागतील. काहींना मोठा खर्च देखील उचलावा लागू शकतो. मात्र, हे सारे सहज व सुलभनेने गुरू घडवून आणेल.
शुभ दिनांक- २१, २२, २३.
तूळ : व्यावसायिक प्रगतीचा काळ
आपला राशिस्वामी शुक्र धनेश मंगळासोबत सुखस्थानात आहे. धनस्थानात शनी आणि व्ययस्थानात शुक्र आहे. चंद्र दशमातून या आठवड्यातील भ्रमण सुरू करीत आहे. हा आठवडा आपणास प्रामुख्याने व्यावसायिक प्रगतिकारक ठरावा. युवा वर्गास नोकरीच्या व व्यवसायाच्या उत्तम संधी चालून येतील. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांना देखील उत्तम यश मिळू शकेल. नोकरीत बदल किंवा व्यवसायविस्तार करणार्‍यांना देखील त्या दिशेने पावले उचलता येऊ शकतील. काहींना या आठवड्यात वाहन खरेदी, स्थावराबाबत महत्त्वाचे व्यवहार, सहली-प्रवासाच्या योजना आखता येतील. युवांना विवाहादी योग संभवतात.
शुभ दिनांक- १९, २३, २४.
वृश्‍चिक : महत्त्वाच्या घटनांची पायाभरणी
आपला राशिस्वामी मंगळ व्ययेश शुक्रासोबत पराक्रम स्थानात उच्चस्थितीत आहे, तर राशिस्थानी शनी आहे. शनी मंगळाच्या तर मंगळ शनीच्या राशीत असल्याने हा एक उत्तम योग झालेला आहे. मंगळाच्या समोरून चंद्र या आठवड्यातील त्याचे भ्रमण सुरू करणार आहे. जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची पायाभरणी करणारा हा काळ आहे. आर्थिकदृष्ट्या पाहता हा काळ जेमतेम राहील. मात्र, साडेसातीच्या अंतिम टप्यात काही चांगले होण्याचा क्रम आता सुरू होईल असे दिसते. नोकरी, व्यवसाय, विदेश गमन यासाठीच्या काही घटना या काळात वेग घेऊ शकतात. प्रवासाच्या योजना आखता येतील. काहींना नोकरी-व्यवसायात बदल करावा लागू शकतो.
शुभ दिनांक- १८, २०, २२.
धनू : अधिकार, जबाबदारी वाढेल
आपला राशिस्वामी गुरू दशमस्थानात असून राशिस्थानात सप्तमेश बुध व रवि आलेले आहेत. धनस्थानात शुक्र-मंगळ व व्ययात शनी आहे. नोकरी-व्यवसायात चांगले योग लाभावेत. अधिकार, जबाबदारी वाढेल, वेतनवृद्धी, आर्थिक लाभ होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍यांना बदल करता येऊ शकेल. युवा वर्गास नोकरीसाठी चांगल्या संधी मिळू शकतील. विवाहेच्छू युवा वर्गास जोडीदार लाभण्यासाठी हा काळ उत्तम ठरावा. काहींचे विवाह जमू शकतील. तसेच काही कुटुंबात बाळाच्या आगमनाची चाहूल लागून आनंदात भरच पडेल. घर, जमीन, वाहन खरेदीच्या संदर्भात हालचाली घडू शकतात. शनी प्रकृतीची काळजी घेण्यास सुचवीत आहे. शुभ दिनांक- २२, २३, २४.
मकर : कामाचे कौतुक होईल
आपल्या राशिस्थानी उच्चीचा लाभेश मंगळ व शुक्र असून राशिस्वामी शनी मंगळाच्या राशीत लाभस्थानी आहे. त्याची राशीवर दृष्टी आहे व भाग्यातून गुरू आपल्या राशीस सर्व प्रकारचे शुभत्व प्रदान करीत आहे.
आपल्या योजनांना उत्तम बळ देऊन त्याची पुरेपूर फले प्राप्त करून देणारा हा काळ आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित कामांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करू शकता. भाग्यस्थानात असलेला गुरू आपल्या यशाचे, कामाचे कौतुक करवेल. उत्तम प्रसिद्धी मिळेल. काहींना विदेशात जाण्याच्या योजना साकार करता येऊ शकतील. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. शुभ दिनांक- १८, २२, २३.
कुंभ : खर्चाला वाटा फुटणार
आपला राशिस्वामी शनी दशमस्थानात असून राशीत केतू विराजमान आहे. चंद्र षष्ठातून भ्रमण सुरू करणार आहे. व्ययस्थानात मंगळ-शुक्र आहेत. दशमातला शनी सध्या अस्तंगत असल्यामुळे व्यवसायासाठी फारसा उपयोगी नाही. मंगळ-शुक्राच्या या उपस्थितीने खर्चाला अनेक वाटा फुटणार आहेत. व्यसनांची वृद्धी होण्याचाही देखील धोका आहे. एखादेवेळी आर्थिक पेच निर्माण होऊ शकतो. पैसा विलंबाने येईल. अशातच आरोग्याची चिंता सतावत राहील. काही जुन्या तक्रारी असल्यास त्या डोके वर काढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात आर्थिक आणि आरोग्याबाबत सतर्क असणे आवश्यक राहील.
शुभ दिनांक- १८, १९, २०.
मीन : सरकारी कामात यश
राशिस्वामी गुरू सप्तमस्थानातून आपल्या राशीला सर्व शुभत्व प्रदान करीत आहे. लाभस्थानात मंगळ-शुक्र, भाग्यात शनी व दशमात रवि- बुध आहेत. बव्हंशी शुभ असलेली ही ग्रहस्थिती आपणास यशदायी ठरणार आहे. विशेषतः सरकारी कामात आपल्याला उत्तम यश मिळू शकेल. सरकारदरबारी आपला वट निर्माण होईल. मंगळाच्या उपस्थितीमुळे काही आकस्मिक लाभाचे प्रसंग उद्भवू शकतात. दशमातील रवि-बुध सुखस्थानास बळ देत असून कुटुंबात काही चांगले व मंगलमय प्रसंग साजरे होऊ शकतात. विशेषतः विवाहोत्सुक युवा वर्गास अतिशय चांंगले योग यावेत. आर्थिक तसेच आरोग्याची बाजू उत्तम राहील. शुभ दिनांक- २०, २१, २२.
मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६