चीन-बांगलादेशचे पाणबुड्या कनेक्शन आणि बहुआयामी सुरक्षा आव्हाने

0
174

राष्ट्ररक्षा

ममता बॅनर्जींचा भारतीय सैन्यावर बंडाचा आरोप
पश्‍चिम बंगालमधील टोल नाक्यांवर युद्ध अभ्यासासाठी तैनात सैनिकांनी बंड केल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्यांनी मीडियासमोर बोलताना माझ्या सरकारविरोधात लष्कर बंड करत आहे, असे म्हटले. तसेच लष्कर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांकडून पैसे वसूल करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. जोपर्यंत हे लष्कर हटवले जात नाही तोपर्यंत मी सचिवालयाच्या बाहेर येणार नाही व लष्कराविरोधातील लढाई सुरू ठेवील, असे सांगितले. त्यांच्या या पवित्र्याविरोधात लष्कराने पुराव्यांसह ते नेमके काय करीत आहेत, हे सर्वांसमोर खुलेपणाने मांडून चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराकडून कँटोन्मेंट असलेल्या विविध शहरांमध्ये वर्षातून एक वेळा काही सराव कार्यक्रम केले जातात. याचा मुख्य उद्देश त्या भागातून पाच टन आणि त्यापेक्षा जास्त टन वजनाच्या किती मालवाहू गाड्या जात आहेत याची आकडेवारी मोजणे. या सर्व गाड्यांच्या चालकांचे क्रमांक, गाडी क्रमांक आणि त्यांची माल नेण्याची क्षमता या गोष्टी नोंद केल्या जातात. गेल्या आठवड्यात कोलकात्यातील ईस्टर्न कमांडने संपूर्ण कमांडमध्ये हे युद्ध अभ्यास केले होते. याप्रमाणे कोलकाताच नव्हे तर आसाम, मेघालय, मणिपूर इथेही याच प्रकारचे युद्ध अभ्यास सुरू होते. या सरावाकरिता सरकारला खूप काळ आधीच पत्राद्वारे सूचित केले जात असते. हा सर्व पत्रव्यवहार ईस्टर्न कमांडने माध्यमांसमोर आणला. सरकारच्या विविध विभागांशी झालेला पत्रव्यवहारही सादर केल्याने ममता बॅनर्जी तोंडघशी पडल्या; पण एवढ्यावरच आपण खुश व्हावे का तर अर्थातच नाही. कारण ममता दीदींनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांचा पहिला आरोप होता की, लष्कर त्यांच्याविरोधात बंड करत होते. दुसरे लष्कर या ट्रक मालकांकडून पैसे घेत होते, असाही आरोप होता. ममता बॅनर्जी यांनी आरोपाला पुष्टी देणारे पुरावे सादर करावेत अन्यथा लष्कराची माफी मागावी. कारण अशा प्रकारच्या चुकीच्या आरोपामुळे आसाम, ईशान्य भारत यांसारख्या ठिकाणी काम करणार्‍या लष्कराच्या मनोधैर्यावर काय परिणाम होत असेल, याची आपण कल्पना करू शकतो.
काश्मीर खोर्‍यासारखी परिस्थिती पश्‍चिम बंगालच्या सीमावर्ती भागात होण्याची शक्यता
प. बंगालच्या सीमेवर अनेक मदरशांमध्ये जमाते इस्माली बांगलादेशच्या दहशतवाद्यांना आसरा दिला जात होता. तिथून ते बांगलादेश सरकारविरुद्ध दहशतवादी कारवाई करत आहेत. पश्‍चिम बंगाल हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण बनत आहे. अनेक संरक्षण तज्ज्ञांच्या मते काश्मीर खोर्‍यामध्ये जी सद्य:परिस्थिती उद्‌भवत आहे, तशाच प्रकारची परिस्थिती पश्‍चिम बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. आपल्याला आठवत असेल की, काश्मीर खोर्‍यात लष्कराच्या गाड्यांवर हल्ले केले जातात आणि तिथे अनेक नागरिक गाड्यांसमोर येऊन त्यांना थांबवतात, दगडफेक करतात, दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करतात. अशाच प्रकारच्या कारवाया येणार्‍या काळात पश्‍चिम बंगालमध्ये तिथले गुंड प्रवृत्तीचे, देशद्रोही व्यक्ती आणि बांगलादेशी घुसखोर करू शकतील.
ईशान्य भारत आणि इतर भारताला जोडणारा एक चिंचोळा भाग आहे, त्याला सिलिगुडी कॉरिडॉर म्हटले जाते. जो तीस ते चाळीस किलोमीटर रुंद आणि सत्तर ते ऐंशी किलोमीटर लांब एवढाच आहे. दुर्दैवाने हा भाग आता बांगलादेशी घुसखोरांनी भरलेला आहे. त्यांनी हिंसाचार करून हा भाग बंद करण्याचा प्रयत्न केल्यास ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी संबंध तुटू शकेल. त्यामुळे चीनबरोबर युद्ध झाल्यास आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या पश्‍चिम बंगालमध्ये जिहादी दहशतवादाचे प्रमाण नक्कीच वाढत आहे. शिवाय माओवादी पुन्हा एकदा सक्रिय आहेत. बांगलादेशी घुसखोरी वाढत आहे. आसामप्रमाणे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे जरुरी आहे. या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यापेक्षा ममता बॅनर्जी यांचे लक्ष भारतीय सैन्याकडे आहे, हे दुर्दैवाचे आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संस्थांनी या विषयात लक्ष घालून ममता बॅनर्जी यांना उत्तर द्यायला भाग पाडले पाहिजे. आपल्याच लष्कराबद्दल इतकी उथळ, असंवेदनशील आणि बेजबाबदार विधाने करणे एखाद्या मुख्यमंत्र्याला अजीबात शोभत नाही, पण या सगळ्या गोंधळामध्ये संसद बंद पाडण्यासाठी एक नवे निमित्त मिळाले
चीन-बांगलादेशचे पाणबुड्या कनेक्शन आणि भारत
गेल्या आठवड्याभरात देशाच्या सुरक्षेला छेद देणार्‍या घटनांची मालिका सुरू झालेली दिसत आहे. नगरोटा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सात जवान शहीद झाले आहेत. त्यापूर्वी पंजाबमधील नाभा तुरुंगावर सशस्त्र हल्ला करून खलिस्तान लिबरेशन फ्रंटच्या म्होरक्यासह अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या काही आरोपींना पळवून नेण्यात आले. त्यांना पकडण्यात यश आले असले तरी, यामुळे सुरक्षेविषयीचे प्रश्‍न गंभीर बनले असल्याचे दिसत आहे.
चीन लवकरच बांगलादेशला दोन पाणबुड्या देणार आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. बांगलादेशातील शेख हसिना यांच्याशी भारताचे संबंध अत्यंत चांगले आहेत. मात्र या पाणबुड्यांच्या माध्यमातून चीनला भारताची हेरगिरी करण्याची संधी मिळणार आहे. बांगलादेशी नौदलाला ही पाणबुडी चालवणे पुढील काही वर्षे तरी शक्य होणार नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षे चिनी पाणबुडी तज्ज्ञांना यातून प्रवास करावा लागेल. बांगलादेशाच्या माध्यमातून चिनी नौदल भारताच्या जवळ पोहोचणार आहे व हेरगिरी करणार आहे.
भारताला वेढा घालण्याचा प्रयत्न
अलीकडील काळात चीनने भारताच्या शेजारी राष्ट्रांशी सलगी वाढवून, तेथे पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या नावाखाली गुंतवणूक करून भारताला वेढा घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. आता चीनकडून बांगलादेशला दोन पाणबुड्या देण्यात येणार आहेत. वास्तविक, त्या पाणबुड्या जुन्या आहेत. त्या ३५-जी मिंग ग्रास डिझेल ऑपरेटेड आहेत. चीन आणि बांगलादेश यांच्यातील करारानुसार २३० डॉलर्स किमतीच्या या पाणबुड्या बांगलादेशला देण्यात आल्या आहेत. अलीकडेच त्याचा हस्तांतरण समारंभ चीनमधील एक बंदरामध्ये झाला. या पाणबुड्यांची नावे नबाज जत्रा आणि जॉयजिर्ता अशी आहेत. या नावाने २०१७ मध्ये या दोन्ही पाणबुड्या बांगलादेशात पोहोचण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे नौदल सध्या चिदगावजवळ कुबुदिया नावाच्या बेटावर तळनिर्मितीमध्ये गुंतले आहे.
बांगलादेशला पाणबुड्यांची गरज आहे का ?
चीन आणि बांगलादेश यांच्यादरम्यान घडलेली ही घडामोड भारताच्या दृष्टीने महत्त्वाची त्याचबरोबर धक्कादायकही आहे. बांगलादेशला सागरी दृष्टीने दोनच देशांचा शेजार लाभला आहे. एक भारत आणि दुसरा म्यानमार. या दोन्ही देशांशी युद्ध व्हावे, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. भारत-बांगलादेश आणि बांगलादेश-म्यानमार यांच्यातील समुद्रीसीमा निश्‍चित झालेल्या आहेत. त्यामुळे समुद्रीसीमांविषयीही कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. असे असूनही बांगलादेशला या पाणबुड्यांची गरज का भासते आहे, असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
बांगलादेशमध्ये सैन्य आणि पाणबुड्या या दोन्हींची संख्या कमी आहे. त्यामुळे भारताला त्यापासून कोणताही धोका होण्याची चिन्हे आणि शक्यताही नाही. मात्र, असे असूनही बांगलादेश अशा प्रकारे खर्चीक पाणबुड्या का घेते आहे? यामागे असणारा उद्देश चीनकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. चीन भारताच्या शेजारी राष्ट्रात घुसखोरी करून त्यांना आर्थिक आणि संरक्षणात्मक मदत देऊ करून भारताविरुद्ध वापरण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने दक्षिण आशियातील आपल्या शेजारी राष्ट्रांशी झगडण्यात गुंतून पडावे, असा चीनचा उद्देश आहे. तसे झाले तर भारताला जागतिक पातळीवरील महासत्ता म्हणून स्थापित होता येणार नाही, अशी चीनची समजूत आहे. त्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या घडामोडीकडे पाहावे लागेल.
बांगलादेश चीनच्या डावपेचाला बळी
बांगलादेशी नौदलाकडे काही जहाजे आहेत, त्यांचा वापर पाण्यावरील युद्धात केला जातो. मात्र शांततेच्या काळात या जहाजांचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. पाणबुड्यांचा वापर मात्र शांततेच्या काळातही केला जाऊ शकतो. पाणबुड्यांना छुपे शस्त्र असे म्हटले जाते. कारण लढाईच्या वेळेला किंवा शांततेच्या काळात त्या पाण्याखालून प्रवास करतात. हा प्रवास लपून केलेला असतो. कारण उघडपणे केल्यास शत्रूच्या नजरेस पडून पाणबुडीने वापरलेले डावपेच शत्रूच्या टप्प्यात येतात. म्हणून पाणबुडीची हालचाल ही कोणत्याही वेळी लपून पाण्याखालून करतात आणि पाण्याखाली तिचा माग काढणे अतिशय कठीण असते. पाणबुडीचा शोध घेऊ शकणारे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आजही अथांग समुद्रात एक पाणबुडी शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्याइतकेच अशक्य असते. त्यामुळे अनेक राष्ट्रे सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सामरिक सज्जतेच्या दृष्टिकोनातून पाणबुड्या बाळगत असतात. मात्र, बांगलादेशचा विचार केला तर त्यांच्यासाठी या पाणबुड्या निरुपयोगी आहेत. कारण त्यांना लपूनछपून भारताच्या जवळपास पाणबुडीचा वापर करण्याची गरजच नाही. वास्तविक, या देशाने आपल्या आर्थिक ताकदीचा वापर त्या देशातील उपासमारी, कुपोषण, दारिद्र्य यांचे निर्मूलन करण्यासाठी करणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता बांगलादेश चीनच्या डावपेचाला बळी पडत आहे.
चिनी हेरगिरी करणे शक्य होणार
बांगलादेशी नौदलाला ही पाणबुडी चालवणे पुढील काही वर्षे तरी शक्य होणार नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षे चिनी पाणबुडी तज्ज्ञांना यातून प्रवास करावा लागेल. इथेच खर्‍या अर्थाने भारतासाठी धोक्याची घंटा आहे. बांगलादेशच्या माध्यमातून चिनी नौदल भारताच्या जवळ पोहोचणार आहे. या माध्यमातून त्यांना बंगालच्या उपसागरामधील भारतीय नौदलाच्या हालचालींचे निरीक्षण करता येणार आहे. त्याचबरोबर अंदमान, निकोबार किंवा कोको द्वीपसमूहांच्या जवळ येऊन हेरगिरी करणेही शक्य होणार आहे. या दोन पाणबुड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी चिनी तंत्रज्ञ सतत बांगलादेशात जाणार आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या किनारपट्टीवरून त्यांना भारताकडे लक्ष ठेवता येणार आहे.
संयुक्त राष्ट्रसमितीच्या नियमानुसार आपल्या सागरी सीमेपासूनचा २०० नॉटिकल समुद्री मैल हा समुद्र आपला असतो. तिथे कोणत्याही प्रकारचे उत्खनन आपण करू शकतो. त्यापुढे असणार्‍या समुद्रावर कोणाचाही हक्क नसतो. जो देश पहिल्यांदा परवानगी मागेल त्या देशाला त्या क्षेत्रात उत्खनन करण्याची परवानगी मिळते. चीनने बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांना ३०० नॉटिकल सागरी मैल परिसरातील काही भागात गॅस आणि तेल यांचे उत्खनन करण्याची भारताजवळ परवानगी देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागणी केली आहे आणि अलीकडेच ती देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
मात्र, भारतीय एकमेकाशी भांडण्यात दंग
दुर्दैवाने, चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे देशांतर्गत परिस्थिती बिघडलेली आहे. विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जात आहे. नोटाबंदीसारख्या देशहिताच्या निर्णयाबाबत सरकारच्या मागे उभे राहण्याऐवजी त्यावर राजकीय पोळी भाजण्यात विरोधी पक्ष गुंतलेले आहेत. माध्यमांमधूनही त्याचीच चर्चा आहे. वास्तविक, सीमेलगतच्या राष्ट्रांबाबत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष या घडामोडींकडे जायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाहीये. बांगलादेशातील शेख हसिना यांच्याशी भारताचे संबंध अत्यंत चांगले आहेत. मात्र, या पाणबुड्यांच्या माध्यमातून चीनला भारताची हेरगिरी करण्याची संधी मिळणार आहे. ती सर्वात चिंतेची बाब आहे. चीन-पाकिस्तान धोका वाढत आहे, मात्र भारतीय एकमेकांशी भांडण्यात दंग आहे. देशाच्या सुरक्षेसाठी राजकीय एकताच हवी. हे शक्य करून दाखविणे, हीच शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल!

ब्रिगेडियर हेमंत महाजन/९०९६७०१२५३