कला प्रस्थापनेचा सिद्धांत

0
131

अनेक भाषांचे ज्ञान असणारे भाषा विश्‍लेषक तत्त्ववेत्त्यांचे म्हणणे असे आहे की कलेची व्याख्या अशक्यप्राय गोष्ट आहे. ज्या ज्या तत्त्ववेत्त्यांनी कलेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला ते अपयशी ठरले. सर्वच कलांना लागू होईल असा एकच निकाल ठरवता येत नाही. एका कलेचा दुसर्‍या कलेाशी काही बाबतीत संबंध प्रस्थापित करता येऊ शकतो. तसा प्रयत्न विचारवंतांनी केला आहे. नाट्य-नृत्य-संगीत यांच्यातील सम्बंध, तसेच चित्रकला व शिल्पकला, संगीतकला व चित्रकला, चित्रकला व काव्यकला यांच्यातील आंतरसंबंध प्रस्थापित करण्यात यश मिळाले आहे. या सर्व ललितकला एकाच कुटुंबातील आहेत याचा अनुभव येतो. विड्रेस्टाईनने यासाठी ‘कुटुंबीय साम्य‘ ही संज्ञा वापरली आहे.
याच मुद्याला धरून बर्ड्‌सली व जॉर्ज डिकी यांनी कलेचा एक नवा सिद्धांत मांडला. या सिद्धांताला प्रस्थापनेचा सिद्धंात असे म्हणतात. आपल्या ‘आर्ट ऍण्ड ऍस्थेटिक्स (१९७४)’ या ग्रथांत त्याने विट्झ या विचारवंताच्या मतांचे खंडन केले आहे. विट्झच्या आव्हानांना संस्थापनेचा सिद्धांत नेमके उत्तर आहे असे जॉर्ज डिकी म्हणतो. विट्झच्या मते कला-व्याख्येसाठी एक निश्‍चित निकाल लावता येत नाही. कलेचा कोणताच सिद्धांत कलेची व्याख्या करीत नाही. कलेची सर्वमान्य व्याख्या अजूनपर्यंत निश्‍चित झालेली नाही. संस्थापनाचा सिद्धांत काय आहे हे जाणून घेणे आवयक आहे. जॉर्ज डिकीचे विचार तीन भागांत सांगता येतील. पहिला भाग म्हणजे विडगेस्टाईन व विट्झ यांच्या मतांचे मॉरिस मँडलबॉम याने कलेले खंडन. दुसरा भाग म्हणजे कला संकल्पनेचे विश्‍लेषण तसेच कलावस्तू निर्मितीचे महत्त्व व आवश्यकता. तिसरा भाग म्हणजे कलेची व्याख्या व तिचे कला-जगतात झालेले रसग्रहण. कला संस्थांचे कार्य, कलाकार, रसिक, समीक्षक-संबंध आणि कला-इतिहासकार व कला सौंदर्यवेत्ते यांचे विचार.
कलेच्या मुक्त व बंदिस्त संकल्पनांचे जे चित्र विट्झने रेखाटले त्यावर खरे तर डिकीने प्रनचिन्ह उभे केले. विट्झने हे सिद्ध केले की कादम्बरी त्यातील उपकथानकांनाही कसे स्वातंत्र्य देते. उपकथानकांना मर्यादित रूप देत नाही. तसेच कला व तिचे घटक याबाबतीतही हे लागू व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे उपकथानक ‘मुक्त’ असते त्याचप्रमाणे ‘जीनियस’ कलावंतानेही मुक्त असायला हवे. डिकीला हा विचार मान्य नाही. या विचाराचे खंडन करताना तो म्हणतो, ‘जीनियस’ कलेची व्याख्या होत नसेल तर कला व अ-कला यांतील भेद स्पष्ट कसा होणार? जॉर्ज डिकीला सर्व कलांच्या बाबतीत एक मुद्दा जो सर्वच कलेत आहे. जाणवला व तो मुद्दा म्हणजे कलेचा ‘कलाकृतिपणा.’
डिकीने जे कलेचे वर्गीकरण केले ते समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्या मते कलेचा उपयोग खालील तीन समजुतींवर आधारित आहे. पहिले-वर्गीकरणाची समज, दुसरे-मूल्यांकनाची समज, तिसरे-व्युत्पत्तीची समज. वर्गीकरणची समज प्राथमिक स्वरूपाची असते. यात सर्वच प्रकारच्या कलांचा समावेश होतो. मूल्यांकनाची समज म्हणजे कलेचे असलेले मोल. निर्माण झालेल्या कलाकृतीचे एकूण मूल्यमापन. मूल्यमापनात कलावस्तूचे गुणधर्म नमुने म्हणून विचारात घेतले जातात. जेव्हा असे म्हटले जाते की एखाद्या झाडाची आकृती मुनष्याच्या आकृतीप्रमाणे वाटत आहे तेव्हा आपण व्युत्पत्तीच्या भाषेत बोलत असतो.
डिकीच्या विचारसरणीत ‘कलाकृतिपणा’ किंवा ‘कलावस्तुपणा’ किंवा ‘कलावस्तू’ ला सर्वाधिक महत्त्व आहे. किंबहुना कलाकृतीपणा कलेची आवश्यक शर्त आहे. याशिवाय याहून अधिक कलेत असे काही असते की ज्यामुळे कला अप्रदर्शनीय गुणवत्तेसाठी पात्र ठरते. ही दुसरी शर्त कठीण प्रकारची शर्त आहे. ही दुसरी शर्त शोधणे कला-विश्‍वातील सर्वात व्यामिश्र गोष्ट आहे. कलेचे असेही गुण आहेत ज्यांचे प्रदर्शन शक्य नाही. यात कलेबद्दलचे ज्ञान, कला-इतिहास, कला-सिद्धांत इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. यालाच डिकी ‘अ-प्रदर्शित कला गुण’ असे म्हणतो. कलेचे हे अ-प्रदर्शित कलागुण कलेचे ‘वैभव’ आहे असे त्याचे मत आहे. यालाच ‘कलेचे संस्थापनेचे स्वरूप’ असे म्हणतात.
‘कला-विश्‍व’ म्हणजे काय व कला-विश्‍वाचा विचार एक ‘सामाजिक संस्था’ म्हणून का केला पाहिजे याचा परामर्श डिकीने आपल्या विचारसरणीतून घेतला आहे. डिकीने कलाविश्‍वाचा विचार एक प्रस्थापित कृती किंवा प्रस्थापित संकेत या अंगाने केला. कला-विश्‍व म्हणजे कलाकार, समीक्षक, कला-इतिहासकार, तत्त्वज्ञ. कलाविचारक आणि कलाप्रेमी वर्ग यंाचा समावेश असलेली एक जिवंत संस्था असून कलाकृतीचा चांगली कलाकृती म्हणून स्वीकार किंवा वाईट कलाकृती म्हणून अस्वीकार कला-मूल्यमापनाच्या माध्यमातून ही संस्था करत असते.
रंगभूमीचे उदाहरण देऊन डिकी आपले विचार स्पष्ट करतो. तो म्हणतो ‘रंगभूमी’ ही एक संस्था असून तिला एक प्रदीर्घ इतिहास आहे. ग्रीक, संस्कृत व इतर रंगभूमींच्या इतिहासावरून स्पष्ट होते की त्यांच्यात सामाजिक संदर्भात बदल होत गेले. वेळोवेळी तंत्रात बदल होत गेले. धार्मिक उत्सवांपासून सुरू झालेल्या रंगभूमीने सामाजिक, राजनैतिक, पौराणिक विषयांपासून मानसिक विचारांपर्यंत अनेक विषय हाताळले. रंगभूमीवर विषय, आशय, तंत्रापासून तर अनेक नवनवे प्रयोग झालेत. काहीही झाले तरी नट व प्रेक्षक यांची भूमिका मात्र तीच राहिली. रंगभूमीचा पाया तसाच मजबूत राहिला. ज्याप्रमाणे रंगभूमीची एक विशिष्ट पद्धत विकसित झाली त्याचप्रमाणे कलाविश्‍वात इतर कलांची स्वत:ची विशिष्ट पद्धती व सादरीकरणाची शैली विकसित झाली. सर्व कलांमध्ये एक गोष्ट सर्वसाधारण आहे आणि ती म्हणजे कलेची चौकट कला सादरीकरणासाठी असते. ती चौकट केवळ सैद्धांतिक पातळीवरची नाही. भलेही सादरीकरणाच्या शैली वेगवेगळ्या असतील. नृत्य, नाट्य व संगीत कलांना रंगमंचाची आवश्यकता असते. मात्र, चित्रकला व शिल्पकलेस त्याची गरज नाही. या कलांसाठी कलादालन व संग्रहालय आहेत. याच गोष्टीला कलेची ‘संस्थात्मक चौकट’ म्हटले आहे व कलेविषयीचे रसग्रहण याच चौकटीतून होत असते. म्हणूनच अशा चौकटीला महत्त्व आहे व कलेची व्याख्या याच चौकटीत केली जाऊ शकते. कला-व्याख्येला इथे वाव आहे असे जार्ज डिकीचे म्हणणे आहे. त्याच्या मते खास करून चित्रकला व शिल्पकलेला अशा संस्थात्मक चौकटीची आवश्यकता आहे. केवळ पारंपरिक प्रस्थापित कला प्रकारांनाच नाही तर प्रायोगिक कलांना देखील संस्थात्मक चौकटीत स्थान प्राप्त होते. त्याही कलांचे मूल्यमापन सामाजिक संदर्भात होत असते. नवनवीन कला चळवळींना संस्थात्मक चौकटीत स्थान प्राप्त झाल्यामुळे कला व्यापक बनली. कलेत लवचीकता आली. एका कला चळवळीतून दुसर्‍या चळवळीला बळ प्राप्त झाले. सर्वच चळवळींचे त्यामुळे विश्‍लेषण झाले. त्यांचे महत्त्व कला-विश्‍वाला कळले. सृजनता मर्यादित न राहाता तिला भरारी मिळाली. कलेला वैभव प्राप्त झाले.