एकाकी..!

0
167

२२ सप्टेंबर २०१६ पासून चेन्नई येथील अपोलो इस्पितळात असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी ५ डिसेंबर २०१६ च्या रात्री अखेरचा श्‍वास घेतला. कार्डियक अरेस्ट नंतर त्यांना एउचज ीूीींशा वर शिफ्ट करण्यात आले. ही अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणाली आहे.
फुफ्फूस व हृदयाला बायपास करून मशीनद्वारे रक्त संचरण आणि镶磉ुद्धीकरण केले जाते. अन्य लाईफ सपोर्टिंग सिस्टम्स होत्याच…! मल्टीपल ऑर्गन फेल्यूअर होऊनही त्यांना बहुधा कृत्रिम प्रणालीवर ठेवण㕍यात आले. असे का? बहुधा त्यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड होण्यासाठी की तामिळनाडूतील अतिभावुक जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी…? तामिळनाडूतील प्रभावशाली व्यक्ती स्वतःच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहात रुग्णशय्येवर पडून राहिली होती, याला काय म्हणावे? कर्माचा सिद्धांत म्हणावे काय? कारण ऐन दिवाळीत, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कांची कामकोटीच्या शंकराचार्यांना त्यांनी केलेली अटक आणि त्या प्रकरणात जवळपास नऊ वर्षे आचार्यांची विविध माध्यमातून झालेली बदनामी कोण विसरू शकेल?
माणूस कितीही मोठा आणि ऐश्‍वर्यवान असला तरी अखेर मृत्यू हेच एकमेव सत्य सामोरे येते.
मृत्यू न म्हणे बलाढ्य | मृत्यू न म्हणे धनाढ्य |
मृत्यू न म्हणे आढ्य | सर्व गुणें ॥
मृत्यू न म्हणे हा विख्यात | मृत्यू न म्हणे हा श्रीमंत ॥
मृत्यू न म्हणे हा अद्भुत | पराक्रमी ॥
मृत्यू न म्हणे हा भूपती | मृत्यू न म्हणे हा चक्रवती |
मृत्य न म्हणे हा करामती | कैवाड जाणे ॥
मृत्यू न म्हणे हयपती | मृत्यू न म्हणे गजपती
मृत्यू न म्हणे नरपती | विख्यात राजा ॥
मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनीं | मृत्यू न म्हणे राजकारणी |
मृत्यू न म्हणे वेतनी | वेतनधर्ता ॥ (दासबोध-दशक-३, समास-९)
खरेतर सर्व ऐश्‍वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. तामिळनाडूतील सर्वात शक्तिशाली महिला असा त्यांचा उल्लेख होत असे. त्यांच्या उंचीपेक्षा आपली उंची जास्त आहे असे जाणवू नये आणि त्यापायी रोष ओढवून घेतला जाऊ नये यासाठी त्यांच्या पक्षातील पुरुष सहकारी खांदे पाडून, पाठीला पोक काढून आणि अगदी झुकून त्यांच्या समोर नतमस्तक होत असत; परंतु या सर्वात आपला म्हणावे आणि मानावे असा कोणी होता काय? ७५ दिवसांच्या आजारपणात त्यांच्याजवळ त्यांच्या रक्ताचा एकतरी नातेवाईक अथवा जिवाभावाचा आप्त उपस्थित होता काय? केवळ एक सख्खी भाची आली होती. तिलासुद्धा पोलिसांनी पिटाळून लावले होते. मग सत्ता, अधिकार, संपत्ती मिळवलेल्या या सम्राज्ञीने नेमके काय मिळविले?
बालवयापासून अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या असलेल्या आणि कर्नाटकात जन्मलेल्या या कन्येची इच्छा आपल्या पित्यासारखे वकील होण्याची होती. वयाच्या दुसर्‍या वर्षी पित्याचे छत्र हरपले. अभ्यासाबरोबर तिचे नृत्याचे शिक्षण चालू होते. दोन्ही क्षेत्रात तिला उत्तम गती होती. पितृनिधनानंतर तिच्या आईने सिनेसृष्टीत आपले बस्तान बसवले. आई रात्री उशिरा घरी येत असे. तिची वाट पाहून ही मुलगी कंटाळून जात असे. आईसोबत झोपताना तिचा पदर घट्ट धरून ती निजत असे. हेतू हा की, आई उठताच आपल्याला जाग यावी आणि आई आपल्याला न भेटताच कामावर निघून जाऊ नये. सकाळी जाग आल्यावर लक्षात येत असे की, तो पदर तसाच मुठीत धरलेला असे, पण आई जवळ नसे. मुलीला जाग येऊ नये म्हणून आई अलगदपणे आपली साडी तिथेच सोडून निघून गेलेली असे. लहान वयापासून आई आणि वडिलांच्या प्रेमापासून दुरावलेली आणि म्हणूनच एकलकोंडी झालेली ही कन्या वयाने वाढत होती; पण मनाचा एक हळुवार कोपरा तसाच दुखावलेला राहिला.
तिला सिनेसृष्टीत यायचे नव्हते, पण ठरवलेल्या सर्वच गोष्टी पूर्ण होत नसतात ना! आईसोबत चेन्नईला जाऊन स्थिरावल्यावर एका शूटिंगच्या वेळी बालकलाकार असलेली मुलगी आली नाही म्हणून हिला कॅमेरापुढे उभे करण्यात आले. शॉट ओके झाला आणि तिच्या जीवनाला एक दिशा मिळाली. ज्या रस्त्याला जायचे नव्हते तोच तिच्यासाठी राजमार्ग बनून सामोरा आला. घराची ओढग्रस्तीची परिस्थिती असल्याने ती परिस्थितीला शरण गेली. उत्तम नृत्यांगना होतीच आणि अभिनयाचे छान अंग होते. या गोष्टी पडद्याला पोषक असतात. तशात मॅट्रिकचा रिझल्ट लागला. त्यात ती सर्वप्रथम आली होती, पण आता शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ शिल्लक राहिला नव्हता. मग तिने रूपेरी पडद्याकडे लक्ष केंद्रित केले. जयललिता हे नाव धारण करून आपल्या कारकिर्दीला घडवायला सुरुवात केली. कानडी, तेलुगु आणि तामिळ चित्रपटातून तिच्या भूमिका गाजायला लागल्या. नेमक्या त्याच सुमारास तिच्या मातेचे निधन झाले. आता एकाकीपणा खायला उठू लागला. सिनेमाचे झगमगते जग एका बाजूला आणि कौटुंबिक नाते दुसर्‍या बाजूला, अशी अवस्था होऊ लागली. हळूहळू या रंगीबेरंगी दुनियेमुळे नात्यांचे धागे विरत गेले. ती खर्‍या प्रेमाची भुकेली होती आणि ते घरात शोधायच्या ऐवजी बाहेर शोधत होती.
याच काळात विवाहित लोकप्रिय हिरो एमजीआर तिच्या जीवनात आले. या जोडीने लागोपाठ हिट चित्रपट दिले. दोघांमध्ये एकतीस वर्षांचे अंतर होते. एकीकडे त्यांची ओढ आणि दुसरीकडे येणारी निराशा यात तिचे तारुण्य हिंदोळत राहिले. एमजीआर राजकारणात आले. त्यांच्यासोबत तीसुद्धा आली. पक्षाच्या बांधणीत तिने सर्वस्व झोकून दिले. परिणामी तिला राज्यसभा सदस्यत्व मिळाले. मानमरातब मिळाला. या नव्या क्षेत्रात नाती-गोती आणि ओळख-पाळख नसते याची तिला लवकरच जाणीव झाली. यात फक्त पुढे जाणे आणि राजकारणात आपले पाय भक्कमपणे रोवणे इतकेच महत्त्वाचे असते. जो यात यशस्वी झाला तो जिंकला हे तिला कळून चुकले. त्यावेळी पुरोगामी मानल्या जाणार्‍या द्रविडी राजकारणात स्त्रियांना काहीही स्थान नव्हते. केवळ एमजीआरमुळे जयललिता यांना ते मिळाले. तो आधार तुटताच त्या सैरभैर झाल्या. एमजीआरच्या तिसर्‍या पत्नीने त्यांना अंत्ययात्रेतून हुसकावून लावले आणि पक्ष ताब्यात घेतला. पुढे द्रमुकच्या आमदाराने विधानसभेत थेट पदरालाच हात घातला. आतापर्यंत दुसर्‍यावर अवलंबून राहणार्‍या या स्त्रीने राजकारणात सर्व शक्तिनिशी उतरायचे ठरवले. जोवर अन्य कोणावर अवलंबून असते तोवर स्त्री ही अबला असते. एकदा तिने स्वबळावर लढण्याचे ठरवले की, तिच्याइतकी सबला सापडणे मुश्कील असते.
नंतर जे घडले ते आपण पाहतो आहोत. सहा वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून येणे, राजकारणावर भक्कम पकड मिळवणे. भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि तुरुंगात जावे लागले तरी डगमगून न जाणे, नामधारी मुख्यमंत्री बसवून तुरुंगातून राज्य चालवणे, एका मोठ्या राज्याची धुरा वाहाणे ही सोपी गोष्ट नव्हे. लोकांची नाडी अचूक जाणून त्यानुसार वागणे आणि कठोरपणे नोकरशाहीला वागवणे या गोष्टी त्यांनी केल्या. सुडाचे राजकारणही केले. मुख्यमंत्री झाल्यावर करुणानिधी आणि त्यांच्या मुलाला थेट घरातून उचलून तुरुंगात टाकण्याची कामगिरीसुद्धा केली. राजकारणातील चढ-उतार अनुभवले.
हे सर्व करून नेमके मिळवले काय, हा प्रश्‍न शिल्लक राहतोच. बालवयात पाहिलेली स्वप्ने धुळीला मिळाली इतकेच सत्य उरते. केवळ सूड, अहंकार, ईर्ष्या याचा जीवनात उपयोग नसतो. पैसा, अधिकार, सत्ता आदी त्यांनी मिळवले, पण एकही उत्तराधिकारी तयार करू शकल्या नाहीत. जवळचे अथवा ज्याच्या जवळ मन मोकळे करता येईल, असा विश्‍वासातील एकही माणूस त्यांना निर्माण करता आला नाही.
याला जीवनाची सार्थकता म्हणता येते काय?
डॉ. सच्चिदानंद शेवडे