शिवाजी महाराज

0
327

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला चितारायला अतोनात कठीण सीन जर कोणता असेल तर तो, अफजलखानाच्या भेटीला जाण्यापूर्वी, महाराज हे महाराणी सईबाईसाहेबांना भेटावयास गेले, हा! त्यासमयी त्या दोघांनाही हे माहीत आहे की, ही आपली शेवटची भेट आहे! सईबाईसाहेब या मरणासन्न आजारी होत्या आणि महाराजांना अफजलखान मारल्याशिवाय राहात नाही, हे अलम दुनिया जाणत होती. एक तर सईबाईसाहेब आधी मरतील किंवा महाराज; पण, ही भेट अखेरची ठरणार हे नक्की होते! अंत:पुरात कोणताही इतिहासकार किंवा बखरकार शिरू शकत नाही. या पाऊणतासाच्या भेटीत महाराज आणि सईबाईसाहेब एकमेकांशी काय बोलले असतील, हा जगातल्या ‘मी मी’ म्हणणार्‍या लेखकांना आव्हानात्मक प्रसंग आहे. त्यांनी चितारून दाखवावा!! मी ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत प्रयत्न केला आहे. अगदी ‘शिवछत्रपती’ या, माझ्या येऊ घातलेल्या कादंबरीतही तो सीन नव्याने लिहिला आहे.
जो शिवाजी महाराजांना ‘ओळखतो’ तो हे जाणतो की, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून पलायन केले यात काहीच आश्‍चर्यकारक घडले ंनाही!! महाराजांना एकट्यास निसटावयाचे असते तर ते केव्हाच पसार झाले असते. पण, त्यांना काळजी होती ती सोबत आणलेल्या साडेतीनशे मावळ्यांची! हे सर्वच्या सर्व सोबती सुखरूपणे औरंगजेबाच्या तावडीतून निसटावेत याजसाठी महाराज विचार करीत राहिले, असे वाटते! आग्र्‍यात केवळ नजरकैदच होती. माणसे बाहेर जात येत होती. पण, पन्हाळगडावरून ‘फरार’ होणे, हे मात्र अतोनात कठीण होते. एक मुंगीसुद्धा सिद्दी जौहाराच्या वेढ्यातून बाहेर पडू शकत नव्हती. किंवा एकही मुंगी आत शिरू शकत नव्हती. येथून महाराजांनी एकट्यानेसुद्धा पलायन करणे मुश्कील होते\! तेथे सहाशे जणांनी निसटून जाणे, यासारखी अशक्य गोष्ट जगात दुसरी कोणती असू शकत नाही. सहाशे मावळ्यांनी शिवाजी महाराजांना सिद्दी जौहाराच्या वेढ्यातून नेले, हा हास्यास्पद भ्रम सर्वत्र पसरलेला आहे. येथे मावळ्याच्या पराक्रमाबद्दल, बाजीप्रभूंच्या निष्ठेबद्दल कोणताही संदेह उपस्थित करावयाचा नसून, शिवाजी महाराजांची पराकोटीची बुद्धिमत्ता काय होती, याची जाणीव निर्माण करून द्यायची आहे. सिद्दी जौहाराच्या करकचून आवळलेल्या वेढ्यातून सहाशे मावळ्यांना सुखरूप बाहेर काढून दाखविले आहे, ते शिवाजी महाराजांनी!! ‘आग्र्‍याहून सुटका’, त्यापुढे, काहीच नाही!
सिद्दी जौहाराच्या वेढ्यातून; ‘…आणि महाराज निसटले’, असे तथाकथित कथाकादंंबरीत किंवा निबंधात लिहिणे फारच सोपे असते. सिनेमात ते करून दाखवावे लागते. तेथे काल्पनिकतेपेक्षा वस्तुभूमीवरल्या अव्वल घटनांचाच बंध स्वीकारावा लागतो. शिवाजी महाराजांनी ते कसे बिनचूक करून दाखविले असावे, याचा काल्पनिक शोध मी मांडून पाहिला आहे. त्यावरून; पन्हाळगडावरून निसटण्याची दृश्यमानता आपल्याला स्वत:च्या मन:चक्षूंपुढे निर्माण करता यावी.
सोबतीला असलेल्या मावळ्यांना महाराजांनी वार्‍यावर सोडले असते आणि सिद्धी जौहाराच्या वेढ्यातून किंवा औरंगजेबाच्या कैदेतून ते एकटेच पळून गेले असते तरी जगभर त्यांची वाहव्वाच झाली असती. तथापि, महाराजांना आपल्या सोबत्यांची अतीव काळजी होती. सिद्धी जौहाराच्या वेढ्यातून आणि आलमगिराच्या चंगुलामधून, आपले सर्वच्या सर्व सखेसोबती कसे निसटू शकतील, याचाच महाराजांनी ध्यास घेतला असावा. अतिशय बिकट मोहिमांमध्ये, सर्वांच्या पुढे राहून, महाराज नेतृत्व करीत असत!!
अफजलखानासारख्या राक्षसाला महाराजांनी एकट्याने पुढ्यात जाऊन ठार मारले आहे. तीन लाख शत्रू सैन्याच्या मध्यभागी तीनशे मावळ्यांसह जाऊन त्यांनी प्रत्यक्ष शाईस्तेखानावर शस्त्र चालविले आहे.
हा नुसता बेदरकारपणा नव्हे! अवघड मोहिमांमध्ये आपले सखेसोबती मरण पत्करतात, याची दु:खद जाणीव, या गनिमी काव्याच्या परमात्म्याला, मुळात होती. आपले सखेसोबती मोहिमेचा विडा उचलून जातात. मोहीम फत्ते करतात. तथापि, जिवंत परत येत नाहीत, याची कमालीची वेदना महाराजांच्या ठायी दिसते. पुढे, पन्हाळगड सर करण्याच्या मोहिमेचा जेव्हा कोंडाजी फर्जंद याने विडा उचलला; पन्नास-साठ मावळ्यांनिशी फत्ते करायला तो निघाला तेव्हा महाराजांनी आधीच त्याच्या हाती सोन्याचे कडे चढविले. पन्हाळा सर होण्याच्या आनंदापेक्षा, आपला कोंढ्या अक्षतपणे पुन्हा जिवंत भेटला, याचा आनंद महाराजांना विशेष असला पाहिजे!
सबब, महाराजांनी निर्माण केलेले भारतीय स्वातंत्र्य मातृमुखी होते!! आपल्या रयतेचे, आपल्या फौजेचे, आपल्या सख्यासोबत्यांचे जे इष्ट ते महाराजांनी मातेच्या ममतेने आणि आईच्या कराराने जोपासले. स्वराज्याचा इमला हा शिस्तीच्या हास्यास्पद बडग्यातून उगारला गेलेला नसून, जिव्हाळ्याच्या भावंडभावातून उभारला गेला आहे.
शिवाजी महाराज आग्र्‍याहून औरंंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले. त्यांनी नऊ वर्षांच्या संभाजीराजांना, वेषांतरात मथुरेत एका ब्राह्मणाकडे ठेवले होते. महाराजांनी अफवा उडवून दिली की, संभाजीराजे मरण पावले आहेत. त्याचे कारण असे होते की शत्रूने संभाजीचा शोध घेऊच नये. ही महाराजांच्या आयुष्यातली खाजगी घटना नाही!! संभाजी राजे भारतीय स्वातंत्र्याचे रीतसर राष्ट्रीय वारस होते.
आग्र्‍याहून निसटलेल्या महाराजांच्या काळजात आणखी एक शल्य होते. ते म्हणजे, स्वातंत्र्याचे परराष्ट्रमंत्री सोनोपंत डबीर यांचा पुत्र त्र्यंबकपंत आणि जावई रघुनाथपंत कोरडे हे कुठेतरी राहून गेले होते. इथे महाराजांच्या वेदनेचे स्वरूप हे अनेकपदरी आहे. आपले सगळेच्या सगळे सखेसोबती आपण परत आणू शकलो नाही. राष्ट्राच्या सेवेत असलेली दोन बुद्धिमान पराक्रमी माणसे आपण घालविली आहेत. स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री असलेल्या सोनोपंत डबीर यांना आपण कोणत्या तोंडाने सांगणार की, ती दोघे जर का औरंगजेबास सापडली असतील तर एव्हाना त्यांचा साफ शिरच्छेद झाला असेल. काही काळानंतर भयंकर कृश झालेले, फुलादखानाच्या फटकार्‍यातून थकून आलेले, निस्तेज असे दोन्ही पंत महाराजांपाशी पोहचले. आपल्यामुळे सख्यासोबत्यांना रोज चाबकाचा मार सहन करावा लागला, याचे दु:ख महाराज निरंतर करीत राहिले असले पाहिजेत.
ते परतले त्यावेळचा मोठा सुस्कारा मला आजही ऐकू येतो.
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे/८४५०९६४४३३