लेनिनचा ऐतिहासिक प्रवास

0
3284

पुढच्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर २०१७ मध्ये रशियातल्या साम्यवादी क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होतील. २० व्या शतकाच्या प्रारंभीच घडलेली साम्यवादी क्रांती ही आधुनिक जगाच्या इतिहासातली एक थारेपालटी घटना होती. कार्ल मार्क्सने मांडलेल्या विचारांवर आधारित अशी राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था निर्माण करण्याचा हा एक विशाल प्रयत्न होता. एका व्यक्तीची किंवा एका घराण्याची मिरासदारी असणारी सरंजामशाही म्हणजेच राजेशाही आणि लोकांनी निवडून दिलेल्या काही निवडक व्यक्तींची मिरासदारी असणारी लोकशाही; यांच्याही पुढे जाऊन, प्रत्यक्ष लोकांचंच राज्य आणण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळेच भारतातले लोकमान्य टिळकांसारखे जनतेने अतिशय उत्सुकतेने, कुतूहलाने या क्रांतीचं निरीक्षण करत होते.
प्रत्यक्षात ती क्रांती आणि तिने निर्माण केलेली राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था ही पूर्वीच्या कोणत्याही जुलमी राजसत्तेेेपेक्षाही अत्यंत भीषण, अमानुष आणि क्रूर ठरली. ७० वर्षे संपूर्ण जगाच्या डोक्यावर थयथया नाचल्यावर ही अमानुष राजवट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली नि कोलमडून पडली. ‘क्रांती आपल्याच पिलांना खाते,’ असे एक वचन साम्यवादी मंडळी उठल्याबसल्या वापरत असत. त्याच्या उलटही घडू शकतं हे जगाने पाहिलं. साम्यवादी राजकीय प्रणालीतूनच राष्ट्राध्यक्ष बनलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनीच सोवियत रशियन साम्यवादी साम्राज्य मोडीत काढलं. शोषित, पीडित आणि श्रमिकांचं राज्य असल्याचं ढोंग करणार्‍या एका अमानुष साम्राज्यसत्तेचा अंत झाला. साम्यवादी क्रांती घडवून आणणार्‍या रशियन साम्यवादी क्रांतिकारक पक्षाचं नाव होतं ‘बोल्शेव्हिक पार्टी’ आणि तिचा नेता होता ब्लादिमीर इलिच लेनिन. त्याचा उजवा हात होता लिआँ ट्रॉट्‌स्की.
साम्यवादी विचार आणि त्यावर आधारित राज्यव्यवस्था यांचा आता पूर्ण बोजवारा उडालेला असला तरी पश्‍चिमेतल्या विद्वान लोकांना रशियन क्रांतीबद्दल अजूनही फार कुतूहल वाटतं आणि ते साहजिकच आहे. युरोप आणि आशिया खंडाचा अतिविशाल भाग व्यापलेल्या, मागासलेल्या रशियात लेनिनने क्रांती कशी यशस्वी केली? झार निकोलस दुसरा या रशियन सम्राटाची राजेशाही राजवट उलथून टाकण्याचं काम लोकशाहीवादी क्रांतिकारकांनी केलेलं होतं, पण त्यांचं म्हणजे अलेक्झांडर केरेन्स्की याचं लोकशाही सरकार लेनिनने कसे उलथून पाडलं? रशियन जनतेला लोकशाही केरेन्स्कीपेक्षा साम्यवादी लेनिन जास्त पसंत पडला? की लोकांना काही कळण्यापूर्वीच लेनिनने सत्ता हडपली? जर तसं असेल तर त्याला हे कसं साध्य झालं?
अशा प्रश्‍नांवर पश्‍चिमेतले विद्वान सतत विचार, चिंतन, संशोधन करीत असतात. लेख, पुस्तकं लिहीत असतात. साम्यवाद हा विचार म्हणून असफल ठरला असला तरी, शोषित-पीडित-श्रमिकांचं राज्य, हा त्यातला बीज विचार आजही अनेकांना ‘अपीलिंग’ वाटतो. त्यामुळे डाव्या-उजव्या अशा सगळ्याच मतांचे विद्वान असं चिंतन करीत असतात. विशेष म्हणजे यात महिलाही आहेत.
प्राध्यापक डॉक्टर कॅथरिन मेरिडेल या अशा प्रकारच्या ब्रिटिश विदुषी आहेत. ‘लेनिन ऑन द ट्रेन’ हे त्यांचं ताजं पुस्तक म्हणजे लेनिनच्या झुरिक ते पेट्रोग्राड या ऐतिहासिक प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे.
जुलै १९१४ मध्ये युरोपातल्या ऑस्ट्रिया आणि सर्बिया या दोन देशांमध्ये युद्ध जुंपलं. ऑगस्ट १९१४ च्या पहिल्या आठवड्यात या युद्धात, तत्कालीन जगातल्या ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, इटली, तुर्कस्तान या सगळ्याच महासत्ता उतरल्या. साध्या युद्धाचं महायुद्ध झालं. एका बाजूला ब्रिटन-फ्रान्स-रशिया विरुद्ध जर्मनी-तुर्कस्तान असं हे महायुद्ध दरोबस्त फोेफावू लागलं. युरोपचा नकाशा पाहिलात तर लक्षात येईल की, जर्मनीला एकाच वेळी पश्‍चिमेला ब्रिटन-फ्रान्स आणि पूर्वेला रशिया यांना तोंड द्यावं लागत होतं, पण जर्मनीचं युद्धयंत्र अद्ययावत होतं नि रशियाचं मागास होतं. परिणामी रशियन सेना मार खात मागे हटू लागल्या. रशियात अन्नधान्य आणि सर्वच वस्तूंचा प्रचंड तुटवडा झाला. परिणामी ८ मार्च १९१७ या दिवशी रशियन राजधानी पेट्रोग्राड ऊर्फ सेंट पीटर्सबर्गमध्ये दंगे सुरू झाले. त्यातून जनतेचा उठाव झाला आणि २० मार्च १९१७ रोजी झारशाही संपली. अलेक्झांडर केरेन्स्कीचं लोकशाही सरकार सत्तेवर आलं.
या क्रांतीचा युद्धावर काहीच परिणाम झाला नाही. झार सरकारप्रमाणेच आपणही युद्धात ब्रिटन-फ्रान्सच्या बाजूनेच लढत राहू, असं केरेन्स्की सरकारने जाहीर केलं. म्हणजेच जर्मनीवर पूर्वेकडून रशियन लष्कराचा दबाव कायम राहणार होता. तो दूर करण्यासाठी जर्मन युद्धकचेरीतल्या काही मंडळींच्या डोक्यात एक फार अभिनव कल्पना आली. रशियन क्रांतीत लोकशाही पक्ष विजयी झाला होता. बोल्शेव्हिक पक्षाला काहीच मिळालं नव्हतं. त्यांचा नेता लेनिन हा स्वित्झर्लंडमध्ये झुरिक शहरात एक प्रकारे विजनवासातच होता. बोल्शेव्हिकांच्या ‘महान’ तत्त्वज्ञानावाचून रशियाचं काहीही अडलेलं नाही; केरेन्स्की सरकार राज्यकारभार बर्‍यापैकी चालवतंय आणि त्यामुळे ‘इतिहास आपल्याला साईडट्रॅक करून पुढे निघून जात आहे,’ अशीच त्याची भावना होत चालली होती.
तोच जर्मन युद्धकचेरीतून त्याला संदेश मिळाला की, तुला रशियात नेऊन सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल. केरेन्स्की सरकार पाडण्यासाठीही मदत करण्यात येईल. सत्ता मिळाल्यावर युद्धातून बाजूला व्हायचं.
लेनिनने अर्थातच ही संधी झडप घालून पकडली. ९ एप्रिल १९१७ या दिवशी लेनिन झुरिकहून आगगाडीने निघाला. युद्धमान स्थितीतलं युरोप खंड ओलांडत तो सात दिवसांनी म्हणजे १६ एप्रिल १९१७ या दिवशी रशियन राजधानी पेट्रोग्राडमध्ये पोहोचला.
यानंतर क्रांतीच्या तराजूने बरेच वरखाली हेलकावे देऊन अखेर ८ नोव्हेंबर १९१७ ला बोल्शेव्हिकांच्या पारड्यात वजन टाकलं. २ डिसेंबर १९१७ ला नव्या राजवटीने युद्धविराम घोषित केला. जर्मनीला अनुकूल घटना अखेर घडली. जर्मन पूर्व आघाडीवरील सैन्य मोकळं झालं.
एका बंद, सुरक्षित आगगाडीतून जर्मन सैनिकांच्या बंदोबस्तात लेनिनने केलेला हा झुरिक ते पेट्रोग्राड रेल्वे प्रवास इतिहासात फारच गाजलेला आहे. साम्यवादी लोक देव-धर्म मानत नसले तरी, या प्रवासाबद्दल लिहिताना ते, जणू एखाद्या ईश्‍वरी प्रेषिताने स्वर्गातून पृथ्वीवर यावं नि रंजल्यागांजल्यांचा उद्धार करावा, तशा छापाचं रसभरीत वर्णन करत असत.
अगोदर उल्लेख केलेल्या कॅथरिन मेरिडेल या ब्रिटिश विदुषी महिलेने, लेनिननंतर बरोबर ९८ वर्षांनी म्हणजे ९ एप्रिल २०१५ रोजी, तोच झुरिक ते पेट्रोग्राड म्हणजे सेंट पीटर्सबर्ग हा प्रवास रेल्वेने केला; त्या विषयावर उपलब्ध असलेल्या साहित्याचं सपाटून वाचन केलं. संबंधितांशी चर्चा केल्या आणि मग ‘लेनिन ऑन द ट्रेन’ हे उत्कृष्ट ऐतिहासिक पुस्तक; ऐतिहासिक ललित कादंबरी नव्हे; लिहून काढलं.
ब्रिटनचा ख्यातकीर्त पंतप्रधानच नव्हे, तर इतिहासाचा व्यासंगी अभ्यासक आणि साक्षेपी लेखक असणार्‍या विन्स्टन चर्चिलने, लेनिनच्या या रेल्वे प्रवासाचं वर्णन करताना, ‘जर्मनीने लेनिनच्या रूपात स्वित्झर्लंडमधून रशियात जणू प्लेगचे भयानक विषाणूच नेऊन सोडले. युद्धात जर्मनीने रशियाविरुद्ध वापरलेलं लेनिन हेच सगळ्यात भयंकर शस्त्र होतं,’ असे शब्द वापरले आहेत.
जर्मनीने रशियाविरुद्ध वापरलेलं हे भयंकर शस्त्र, हे प्लेगचे
विषाणू नंतरच्या काळात खुद्द रशियाला तर भोवलेच; पण स्वत: जर्मनीसकट सगळ्या जगाला भोवले. महाभारतीय युद्धाच्या अखेरीस सुडाने पेटलेल्या अश्‍वत्थाम्याने पांडवांवर ब्रह्मास्र सोडलं. त्याचं निराकरण त्याला करता येईना. तेव्हा ते अस्त्र संपूर्ण जगाला जाळत सुटलं. अखेर महर्षी व्यासांना ते आवरावं लागलं. कलियुगात तसं कोणी नसल्यामुळे, साम्यवाद नावाच्या अमानुष व्यवस्थेने ७० वर्षांत जगभरातल्या कोट्यवधी माणसांना प्रत्यक्ष ठार केलं. किती जणांची आयुष्यं बरबाद झाली नि किती लोक जिवंतपणी आयुष्यातून उठले, याची तर गणतीच नाही.
ते कसंही असो. एका थारेपालटी घटनेची शताब्दी करण्यासाठी पश्‍चिमेतले विद्वान-विदुषी, त्या घटनेचा विविधांगी अभ्यास करतात, प्रवास करून प्रत्यक्ष अनुभव घेतात, हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.
आमच्याकडचे विद्वान असं काही लिहिण्याच्या भरीसच पडत नाहीत. खरा इतिहास संशोधन वगैरे करून लिहिण्यापेक्षा काल्पनिक, अद्भुत, प्रणयरम्य इतिहास लिहिणं बरं! पुस्तकं भरपूर खपतात. एकच कथासूत्र पुढे ओढून तीन-तीन पुस्तकं म्हणजे ट्रॉयोलॉजी, अशी मालिकादेखील निघते. पुढे-मागे अशांना ज्ञानपीठंसुद्धा मिळतात.
आणि विदुषी तर याही क्षेत्रात नाहीत. हलकं-फुलकं ललित लेखन, पाकक्रिया आणि व्हॉट्‌स ऍपवरील निरर्थक गप्पा यापुढे वेळ आहे कुणाला?

मल्हार कृष्ण गोखले