राहुल गांधींचे कलमाडी मॉडेल!

0
245

१९७७-७८ मधील घटना. मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान असताना ते पुणे दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी, सुरेश कलमाडी हे पुणे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी मोरारजी देसाईंच्या मोटारीवर चप्पल भिरकावली. कलमाडी रातोरात नेते झाले. राहुल गांधी यांनी आपले राजकीय नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कलमाडी मॉडेलचा अवलंब करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.
राज्याभिषेकासाठी
राहुल गांधी १२ वर्षांपासून संसदेत आहेत, चार-पाच वर्षांपासून ते कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, सोनिया गांधींची कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची इच्छा आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे असे त्यांना मनोमन वाटते. पण, राहुलच्या राजकीय क्षमतेवर पक्षातूनच प्रश्‍नचिन्ह उभे केले जात आहे. याने राहुलचा राज्याभिषेक लांबणीवर पडत आहे. तो उत्तरप्रदेशातील निवडणुकीनंतर होईल, असे मानले जाते. राहुलला तो लगेच हवा आहे. पक्षात आपली प्रतिमा उंचावून, पक्षनेत्यांमध्ये आपल्या नेतृत्वक्षमतेबद्दल विश्‍वास तयार व्हावा या भूमिकेतून राहुल गांधींनी हे दुस्साहस केल्याचे मानले जाते. विशेषत: त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेवले व आपल्या काही व्यक्तिगत सल्लागारांना हाताशी घेत मोदींवर आरोप लावले.
सभागृहाचा आग्रह
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्तिगत भ्रष्टाचारात अडकले आहेत, मी तोंड उघडल्यास संसद हादरेल, देश हादरेल असे म्हणत राहुल गांधींनी आरोपांचा सपाटा सुरू केला. पण, तुमच्याजवळ पुरावा आहे तर तो सादर करा, हे आव्हान काही त्यांना पेलता आले नाही. राहुल गांधींजवळ कोणताही पुरावा नाही. केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभेत, बिर्ला समूहाचे काही दस्तावेज दाखवीत मोदींवर आरोप केले होते. तसेच आरोप राहुल गांधींना करावयाचे होते. यात सहारा समूहाशी संबंधित काही दस्तावेज असल्याचे समजते. हे सारे दस्तावेज काही महिन्यांपूर्वी एका पाक्षिकात प्रसिद्ध झाले आहे. मात्र, सभागृहात एखादा आरोप केल्यास त्यावर मानहानीचा दावा दाखल करता येत नाही, असा सल्ला त्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी फक्त लोकसभेतच आपण पुरावा सादर करू अशी भूमिका घेतली. बाहेर आरोप केल्यास आपल्यामागे खटल्याचे प्रकरण सुरू होईल असे वाटल्याने त्यांनी बाहेर आरोप सादर केले नाहीत.
सेमीफायनल
२०१९ च्या निवडणुकीत मोदींविरुद्ध कोण लढू शकतो अशी एक स्पर्धा विरोधी नेत्यांमध्ये सुरू आहे. प्रारंभी यात केजरीवाल व राहुल गांधी हे दोघेच होते. आता यात ममता बॅनर्जी व मायावती उतरल्या आहेत. मोदींवर आरोप करण्याची या नेत्यांमध्ये जी स्पर्धा सुरू आहे त्याचे हे मुख्य कारण सांगितले जाते. यात कधी केजरीवाल आघाडीवर असतात, तर कधी राहुल गांधी. या सेमीफायनलमध्ये बाजी मारणारा नेता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल.
फुगा फुटला
मोदींचा गुब्बारा म्हणजे फुगा फुटेल असे म्हणणार्‍या राहुल गांधींचा फुगा २४ तासात फुटला. पंतप्रधानांवर आरोप लावल्यानंतर दुसर्‍या दिवशी लगेच अन्य विरोधी पक्षांना सोबत घेत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी पंतप्रधानांना भेटणे, लगेच राष्ट्रपतींकडे विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन जाणे या बाबी त्यांनी आपले नेतृत्व चमकविण्यासाठी केल्या, असे समजते. याचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादी कॉंग्रेस, सपा व बसपा या नेत्यांनी त्यांच्यासोबत राष्ट्रपतींकडे जाण्याचे नाकारले. राहुल गांधींनी आम्हाला विश्‍वासात न घेता पंतप्रधानांची भेट घेतली याची नाराजी या पक्षांना आहे.
दुसरे हवाला
प्रत्येक औद्योगिक घराणे आपली एक व्यूहरचना तयार करत असते. आपल्यावर केहा ना केव्हा आयकर छापा पडणार हे त्यांनी गृहीत धरले असते व त्यानुसार आपली व्यूहरचनाही त्यांनी तयार करून ठेवली असते व त्यांच्या डायरीत सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी असतात. २० वर्षांपूर्वी गाजलेल्या जैन हवाला प्रकरणात असेच झाले होते. त्यात लालकृष्ण अडवाणींसह कॉंग्रेस व भाजपाच्या अनेक नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी जैनच्या डायरीत होत्या. हवाला प्रकरण पहिल्या न्यायालयातही टिकले नाही. बिर्ला व सहारा यांच्या दस्तावेजात मोदींपासून अनेकांची नावे आहेत. ते दस्तावेज केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत दाखविले. राहुल गांधी ते लोकसभेत दाखविणार होते.
आणखी एक डायरी
अगुस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्यात एक डायरी गाजत आहे. फॅमिली, एपी अशा नोंदीसमोर मोठ्या रकमांचा उल्लेख आहे. पण, केवळ याआधारे सोनिया वा राहुल, अहमद पटेल यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होणार नाहीत, तर एवढी मोठी रकम कोणत्या खात्यात जमा झाली हेही समोर यावे लागेल. जोपर्यंत पैसे दिल्याचा पुरावा समोर येत नाही तोपर्यंत अशा आरोपांना कोणताही अर्थ राहात नाही याची जाणीव कॉंग्रेस नेत्यांना असल्याने वरिष्ठ कॉंग्रेस नेते राहुलच्या या आरोपांवर फार बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. भूकंप येईल, त्सुमानी येईल असे म्हणणार्‍या राहुल गांधींनी आम्हाला तोंडघशी पाडलेले आहे, असे कॉंग्रेस नेत्यांना वाटत आहे. आपण परिपक्व झालो आहोत, हे सिद्ध करण्याच्या नादात राहुल गांधींनी आपली अपरिपक्वता सिद्ध केली आहे, असे कॉंग्रेस नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींनी हे करण्यापूर्वी पक्षाच्या एकाही वरिष्ठ नेत्याला विश्‍वासात घेतले नव्हते. आणि तसे करण्याचा प्रयत्न केल्यास वरिष्ठ नेते आपल्याला आरोप लावू देणार नाहीत असे त्यांना वाटत होते. काही वकिलांशी सल्लामसलत करून त्यांना लोकसभेत आरोपांचा धुराळा उडवायचा होता, जो त्यांना करता आला नाही.
आता काय
संसद अधिवेशन शुक्रवारी आटोपले. भूकंप झाला नाही. आता काय, असा प्रश्‍न कॉंग्रेस नेत्यांना पडला आहे. राहुल गांधींनी मागील अधिवेशनातही अधिवेशन बंद पाडण्याचा कार्यक्रम केला होता, यावेळी पुन्हा केला. पुढील अधिवेशनात आम्ही कोणत्या तोंडाने सभागृहात जायचे असा प्रश्‍न कॉंग्रेस नेते विचारीत आहेत.
दुसरीकडे नोटबंदीचा सामान्य जनतेला काही त्रास होत असला तरी जनता मोदींसोबत असल्याचे दिसत आहे. आम्हाला त्रास होत आहे. काही ठिकाणी पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. पण, निर्णय ठीक आहे, अशी भाषा ऐकू येत आहे.
छाप्यांचे सत्र
संसदेचेे सत्र संपले असले तरी आयकर छाप्यांचे सत्र मात्र सुरू राहाणार आहे. येणार्‍या काळात आयकर धाडींची तीव्रता वाढेल असे मानले जाते. यात दोषी बँकाही सुटणार्‍या नाहीत. जसजशी माहिती केंद्र सरकारकडे येत जाईल धाडींची संख्या वाढत जाईल, असे समजते. दरम्यान, जेवढ्या नोटा चलनातून बाद झाल्या, त्याच्या ५० टक्के नव्या नोटा या महिनाअखेरीस चलनात आलेल्या असतील. दररोज २० हजार कोटींच्या नोटा चलनात आणल्या जात आहेत. याचा अर्थ जानेवारीच्या प्रारंभापासून परिस्थिती बर्‍यापैकी सामान्य होण्यास सुरुवात होईल,
नवा संकेत
नोटबंदी हा शेवटचा निर्णय नाही, असा संकेत पंतप्रधानांनी दिला आहे. मोदींचा संकेत केवळ संकेत नसतो. त्यांच्या डोक्यात आणखी काही बाबी सुरू आहेत. त्याही ते लागू करतील असे दिसते. बेनामी संपत्तीच्या मुद्यावर त्यांनी आपले मनोगत यापूर्वीच व्यक्त केले आहे. योग्य वेळी त्याला ते कृतीची जोड देतील.
शेवट
कलमाडींनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ मोेरारजी देसाईंच्या मोटारीवर चप्पल फेकून केला होता. त्यांच्या राजकारणाचा शेवट तिहार कारागृहात झाला. एका सुनावणीसाठी त्यांना तीस हजारी न्यायालयात आणण्यात आले असताना त्यांच्यावर जोडा भिरकावण्यात आला. चपलीचे उत्तर जोड्याने मिळाले होते. त्यासाठी ३५-४० वर्षे लागली. राहुल गांधींनी मोदींवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कदाचित त्यांनाही अशा आरोपांना सामोरे जावे लागेल.

रवींद्र दाणी