तैमूर…

0
290

चौफेर
चित्रपट अभिनेते सैफ अली खान आणि करिना यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून सध्या सर्वदूर वादळ उठले आहे. सोशल मीडियावर यावरून झडत असलेल्या चर्चेत तमाम बुद्धिजीवी लोक तर्क-वितर्काची पेच लढविण्यात मग्न झाले आहेत. तैमूर या नावाच्या समर्थनापासून तर विरोधापर्यंत आणि या दाम्पत्याच्या सामाजिक भूमिकांपासून तर त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या गप्पा यानिमित्ताने रंगल्या नसत्या तरच नवल! आपल्या पोराचं नाव काय ठेवायचं हा तसा सैफ आणि करिना यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. इतरांनी त्यात नाक खुपसण्याचे काहीएक कारण नाही. अशा शब्दात एखाद्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची आब राखणारे लोक स्वत:च या विषयावर सार्वजनिकरीत्या चर्चा करताहेत, याचाच अर्थ हा विषय खरोखरीच कुणाच्याही वैयक्तिक मर्यादेत सीमित राहिलेला नाही, हे स्पष्ट आहे. तसेही जगातल्या कुठल्याही देशात सेलिब्रेटींच्या ‘पर्सनल लाईफ’ची सार्वजनिक मंचांवरून होणारी चर्चा ही काही नवीन वा नवलाईची बाब राहात नाही. मग चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या जिवावर कोट्यवधी रुपये कमावणारे सैफ-करिना त्याला अपवाद कसे असतील? आणि इथे तर मुद्दा या नामकरणामागील मानसिकतेचा आहे. त्याची चर्चा झाली नाही तरच आश्‍चर्य!
साधारणपणे लोक इतिहासकालीन महापुरुषांची शालीन प्रतिमा, त्यांचे कर्तृत्व, पराक्रम, ज्ञान, त्यांनी मिळवलेले यश आदी बाबी ध्यानात ठेवून त्यांची नावे आपल्या मुलांसाठी निवडतात. काहींची पसंती देवादिकांच्या नावाला, तर अलीकडे अनेकांची पसंती काव्यात्मक प्रतिभेच्या अंगाने वळताना दिसते आहे. त्याचा स्वाभाविक परिणाम नव्या पिढीतील मुलांच्या नावांमधून प्रतिबिंबित होऊ लागला आहे. पण तैमूर…? का ठेवावेसे वाटले असेल सैफला आपल्या मुलाचे हे नाव? कोण होता हा तैमूर? चौदाव्या शतकात उज्बेकिस्तानमध्ये जन्माला आलेला आणि कालौघात तैमूर हे नामाभिधान लाभलेला मुघलवंशीय तमेद चिन्गिज खान शालीनता, ज्ञान, पराक्रम, कर्तृत्व यापैकी कशातरीसाठी ओळखला जात असल्याचे दाखले इतिहासात गवसत नाहीत. जगाला झालेली तैमूरची ओळख ही, त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी दुनियेवर केलेल्या हल्ल्यामुळे आहे. अजून सांगायचंच झालं तर हात आणि पायानेही अधू असलेल्या तैमूरने निर्माण केलेला इतिहास हा क्रूर हत्येचा आहे. त्याने मारलेली माणसं, त्याच्या राज्यात झालेले बलात्कार, त्याच्या बेदरकारशाहीमुळे अक्षरश: उजाड झालेली शहरं… बहुधा म्हणूनच गौरवाने नाव घेत नाही इथे कुणी तैमूरचे. पोटी जन्मलेल्या आपल्या बाळाचे नाव तैमूर ठेवण्याची परंपरा खुद्द मुस्लिम समुदायातही लोकप्रिय ठरल्याची वस्तुस्थिती नाही. आणि तरीही सैफ अली खान नावाच्या एका सिनेअभिनेत्याला आपलं पोर त्या तैमूरसारखं घडावं असं वाटत असेल आणि म्हणून त्यानं त्याचं तसं नाव ठेवलं असेल, तर आता मुद्दा त्याच्या मानसिकतेवर येऊन पोहोचतोच. जे लोकांच्या पचनी पडणार नाही, जे इथल्या समाजमनाला सहजासहजी रुचणार नाही, अशा बाबी जाणीवपूर्वक, सर्वांच्या नाकावर टिच्चून स्वीकारण्यात धन्यता नव्हे, आसूरी आनंद अनुभवणारी माणसंच असली उदाहरणे निर्माण करू पाहतात. घराण्याकडून मिळालेली श्रीमंती अन् पूर्वासूरींच्या आशीर्वादाने पदरी पडलेले सिनेजगतातले मानाचे स्थान यापलीकडे कर्तृत्व नसलेला सैफ ज्या बेमुर्वतखोरपणे पोराच्या नामकरणाची कहाणी जगजाहीर करतो, त्यावरून त्याच्या मुजोरीची कल्पना यावी.
जगाच्या पाठीवर नकारात्मक इतिहास निर्माण करणारी माणसं काही थोडीथोडकी झाली नाहीत. नकारात्मक असला तरी त्यांचा लौकिकही तेवढाच प्रचंड आहे. रावणापासून तर हिटलरपर्यंतची लांबलचक अशी यादी त्यादृष्टीने तयार करता येईल. अगदी कायम लोकांच्या तोंडी राहावीत अशी ही नावं आहेत. पण म्हणून जर्मनीत बाळाचे नाव हिटलर ठेवण्याची परंपरा कुणी नंतरच्या काळात जोपासलेली दिसून येत नाही. भारतात तर रावणाची एक प्रकारची नकारात्मक प्रतिमा जनमानसात निर्माण झालेली असतानाही त्याला आपला राजा मानणार्‍या काही आदिवासी जमाती इथे अस्तित्वात आहेत. पण, इतर हिंदू समाज तर सोडाच, जे लोक रावणाला ‘आपला’ राजा मानतात त्यांनी देखील त्यांच्या घरातल्या पोरांना रावणाचे नाव देण्याची पद्धत स्वीकारलेली नाही. मग सैफ अलीला का आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवावेसे वाटावे? ‘त्या’ राजानंतर मुस्लिम समुदायात तैमूर हे नाव लोक आवडीने स्वीकारत असल्याचे वा दर चार-दोन मुलांनंतर हेच नाव या समाजात मुबलक प्रमाणात आढळून येत असल्याचे दृश्य नाही. बरं हवीच असतील, तर प्रेषितांच्या नावांचीही वानवा नाही. पण त्यापैकी एकही नाव सैफच्या पसंतीस पडत नाही. तैमूरचा अर्थ होतो, पोलादासारखा मजबूत. कणखर. पण मग त्या अर्थाचे ‘हदीद’ सारखे आणखी काही शब्द आणि नावं उपलब्ध आहेत. त्यालाही सैफचा नकार असतो. तो निवडतो तेच नाव, जे इतिहासात कुख्यात असतं. त्याची पसंती त्याच नावाला असते, जे नाव फारसे आदराने कोणी घेत नाही, उलट क्रूरकर्मा अशी ज्याची ख्याती इतिहासात झाली आहे. हे कशाचे द्योतक मानायचे? या मानसिकतेचा अर्थ काय काढायचा?
सैफला पहिलं लग्न करायला अमृता सिंग चालते. पण तिने धर्मांतरण करून आधी मुस्लिम व्हावे याला त्याच्या लेखी पर्याय नसतो. दुसर्‍या लग्नाच्या वेळी करिनाबाबत धर्मांतरणाचा आग्रह धरला जात नसला तरी, दोघांच्या म्हणून जन्माला येणार्‍या बाळाचे नाव मुस्लिम म्हणूनच शोभले पाहिजे, हा दुराग्रह आणि त्यातही नावासाठी ‘तैमूर’ची निवड… मुळात हा मुद्दा मानसिकतेचा आहे. ज्याचा त्याचा प्रश्‍न म्हणून तो असा वार्‍यावर सोडून देता येत नाही. हे खरंच आहे की विवेकानंद नावाची सारीच पोरं काही शिकागोत भाषणं गाजवायला जात नाहीत. त्या नावाची पोरं चोर्‍याचपाट्या करीत नसतीलच असंही नाही. किंवा अकबर नाव ठेवले गेले म्हणून काही त्या नावाच्या प्रत्येकाच्या वाट्याला राजयोगच येतो असेही काही नाही. पण पोराचं नाव विवेकानंद, अकबर ठेवताना कुठलीशी एक कल्पना जन्मदात्यांच्या मनात रुंजी घालत असते. आपल्या मुलाने भविष्यात काय व्हावे याबाबतची स्वप्नं त्या क्षणी त्यांच्या मनात असतात. आपल्या मुलाने दरोडे घालावेत असे कुठल्या आईला वाटेल? त्याने लोकांचे मुडदे पाडावेत असे कुठल्या बापाला वाटेल? पण, मोठेपण ठावूक असूनही, त्याचा पराक्रम ठावूक असूनही इथे कुणी रावणाला मोठेपण बहाल करीत नाही. उलट पोरांचे नाव रावण न ठेवण्यामागे वाईटांवरील बहिष्काराची भावना आहे. खरं तर तसा कुठलाही फतवा नाही. कुणाचाही तसा लेखी-तोंडी आदेश नाही. तरीही समाजातील प्रत्येक जण ते संकेत पाळतो. कारण समाजाचे पाठबळ सज्जनांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, याबाबत सर्वांचे एकमत असते. म्हणूनच कुणीही कुणालाही न सांगता रावण या नावाला आपसुकच खो मिळतो. तिकडे हिटलरच्या बाबतीतही तेच घडते. लोकांच्या मनात उद्भवलेल्या संतापाच्या लाटेत पुढची पिढी ते नावच हद्दपार करते. आणि सैफ अली खान नावाच्या या माणसाला मात्र मुस्लिम समाजातील इतर सारी प्रचलित नावे बाजूला सारून इतिहासातील हे बदनाम नावच स्वीकारावेसे वाटते…हे विचारांचे वेगळेपण आहे की कुजलेल्या मानसिकतेचे परिणाम?
– सुनील कुहीकर
९८८१७१७८३३