सत्तेसाठी देशहिताशी तडजोड!

0
174

रविवारची पत्रे
‘काळ्याचे’ कर्दनकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या दुरात्म्यांच्या विरोधात सर्वंकष युद्ध छेडल्यापासून कुटिल राजकारण करणार्‍यांचा श्‍वास कोंडला आहे. हजार आणि पाचशेच्या निष्कासित नोटांची कोठारे असूनही ते आता भिकारी झाले आहेत. सर्व बाजूंनी गोची झाल्याने, परिस्थिती प्रतिकूल झाल्याने त्यांनी आता तोंड उघडले आहे. पण ते कन्फेशनसाठी नाही, तर मोदींविरुद्ध गरळ ओकण्यासाठी. डिमॉनेटायझेशनमुळे जनसामान्यांना होत असलेला त्रास अतिरंजित करून, जनतेविषयी खोटा कळवळा आणून त्यांनी मोदींना शिव्यांची लाखोली वाहणे सुरू केले आहे. आम जनतेला हाती धरायची कोशिश करून त्या प्रयत्नात विफल झाले तरीही ते जितंमया, जितंमयाच्या खोट्या वल्गना करत आहेत.
या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर एक नवचैतन्य देणारी बाब (शॉट इन दि आर्म) मोदीजींना समजली. गोष्ट आहे तब्बल ४५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी १९७१ साली इंदिराजींचे अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी काळ्या पैशाच्या समस्येवर तोडगा म्हणून इंदिरांजींना निश्‍चलनीकरणाचा उपाय सुचवला होता. पण इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांकडे पाहून, ‘‘क्यो चौहान साब, पार्टी को अगला चुनाव लडना नही है क्या?’’ असा भेदक/सूचक प्रश्‍न विचारला.
इंदिरा गांधी यांच्या या मानसिकतेमुळे चव्हाणांनी तो राष्ट्रहिताचा प्रश्‍न पुन्हा धसास लावला नाही आणि प्रकरण कायमचे थंड्या बस्त्यात पडून राहिले. मोदींनी नुकत्याच आटोपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील अखेरच्या भाजपा संसदीय बैठकीत सभासदांना संबोधित करताना माधवराव गोडबोले यांच्या एका पुस्तकाचा दाखला देऊन १९७१ मधील यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यातील वरील संवाद सांगून ‘आपण परिणामांची पर्वा न करता सत्तेपेक्षा देशहिताला प्राधान्य दिले’, असा संदेश भाजपा खासदारांमार्फत देशाला दिला. शिवाय मार्क्सवादी पार्टीचे तत्कालीन दिग्गज ज्योतिर्मय बसू, हरकिशन सुरजित आदींनीही नोटाबंदीची गरज वेळोवेळी बोलून दाखविली होती, याची कॉंग्रेसला आठवण करून दिली.
येनकेनप्रकारेण सत्तेला चिकटून राहायची इंदिरा गांधी यांची कृती त्यांनी त्यांच्या लोकशाहीविरोधी कारवायांनी दाखवून दिली. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, पंतप्रधानपदाच्या तख्ताला चिटकून राहाण्यासाठी त्यांनी देशाला अंतर्गत आणिबाणीच्या खाईत लोटले. जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या अजातशत्रू देशहितैषीला ते किडनीच्या क्रॉनिक आजाराने त्रस्त असतानाही जेलमध्ये डांबले. शेवटी त्या इतक्या अप्रिय झाल्या की, इमर्जन्सीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत राजनारायण यांच्यासारख्या दुय्यम दर्जाच्या नेत्याकडून त्या पराभूत झाल्या.
या घटनांवरून कॉंग्रेसने आणि विशेषत: राहुल गांधींनी बोध घ्यावा आणि विरोध करायचाच असेल, तर तो सकारात्मक आणि देशहित नजरेसमोर ठेवून करावा.
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०२७२

नाणं सांगे रुपयाला…
शाळेत असताना नाण्याचे आत्मचरित्र असे विषय परीक्षेत असावयाचे. त्याचा जन्म कुठे झाला व तो कुठे पोहचला असा प्रवास त्याच्या कथनातून असावयाचा व मग माझ्यापेक्षा नोट भारी असे विशादही तो प्रकट करावयाचा. पण आज मात्र नाणं हसतं आहे!
नाणं म्हणतं तू मला म्हणत होतास तू किती क्षुद्र आहेस, किती छोटा आहेस, मला बघ लोक कसे प्रेमाने व आशेने जवळ बाळगतात. आपल्याजवळ जपून ठेवतात. पण तुला तर जपताच येत नाही. कारण तुझा आवाज व वजन, मी मात्र वजनरहित, नादविरहितही, त्यामुळे माझ्याकडे सगळेच आनंदाने व प्रेमाने पाहतात. तुला मात्र सहजतेने इकडून तिकडे फिरवितात. पण काळ हा नेहमीच बदलत असतो. नशीबही पालटत असतं. बघ आज तुला ज्यांनी ज्यांनी दडवून ठेवलं त्यांची झोप उडाली. त्यांना तुझाच भार वाटावयास लागला व ते चक्क तुला फाडावयास लागले, जाळावयास लागले, विकावयास लागले. यालाच म्हणतात ‘कालाय तस्मै नम:.’ म्हणून कधीच गर्वाने फुगून जाऊ नये. हेच या नाण्याच्या कथनातून सत्य कळते.
शैलजा दवणे
कर्वेनगर, नागपूर

आयुष्याची सोनेरी वर्षे
१ जानेवारीची पहाट म्हणजे नव्या नजरेची पहाट… जग खरंच बदलणार आहे या आशेची रम्य पहाट! जग बदलणार असेल तर मी स्वत: बदलायलाच हवे, हीच जाणीव करून देणारी पहाट!!
दिवा जळत असतो. जळणार्‍या दिव्याकडे पाहून असे वाटते की, तोच दिवा जळतो आहे. पण ज्योत नवीन जळत असते. तेलाच्या जुन्या थेंबाची जागा नवा थेंब घेतो, वातीचा जुना धागा जळतो आणि त्याची जागा नवीन धागा घेतो. नदीचा प्रवाह खळाळत वाहात असतो. जुने पाणी पुढे पुढे वाहून जाते… प्रत्येक क्षणी पाणी बदलत असते. पण असे वाटते की पाणी तेच आहे. जसे पाण्याच्या प्रवाहाचे तसेच जीवन प्रवाहाचे! सतत गतिशील पुढे पुढे जाणारे…!
दिवसाच्या २४ तासांपैकी आपण १२ तास प्रत्यक्ष काम करतो. पैकी आपले किमान ४ तास मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्‌स ऍप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाला दिले जातात. याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास, तर ६० वर्षाच्या आपल्या आयुष्यात ८७,६०० तास वरील साधनांवर खर्च होतात. १२ तासांचा दिवस धरला तर आपल्या आयुष्यातील उमेदीचे २० सोनेरी वर्षे या साधनांवर आपण खर्ची घालतो. या २० वर्षांच्या कालावधीत आपण तेवढेच मौल्यवान काही मिळवतोय् का? खरंच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे! (आपण आपल्या मेंदूला गोडावूनच बनवून टाकले आहे.) गेल्या अनेक वर्षांमधील तारुण्याची सोनेरी वर्षेे, महिने, तास आपण उर्वरित साधनांच्या वापरात घालवलीत. हीच वर्षे जर मिळविलेल्या ज्ञानातून काहीतरी नवनिर्माण करण्यासाठी वापरली तर…?
काळ हा कुणासाठीच कधीही थांबत नाही. काळाचे हे घड्याळ सतत टिक-टिक करून सांगत असते. ‘आला क्षण, गेला क्षण!’ जुन्याने मागे सरायचे… नवीनाने पुढे यायचे! जुन्याला ‘गुडबाय’ नव्याला ‘वेलकम!’ कालचा माणूस आज नाही, आजचा उद्या नाही. आजचे वस्त्र उद्या जुने होते, फाटून विरून जाते. आजची वस्तू उद्या शिळी होते. जुने जात असते, नवे येत असते. हाच निसर्गनियम आहे. या निसर्गनियमाला ओळखायचे आणि नव्याचे हसतमुखाने स्वागत करायचे!
सुधाकर केशव तट्टे
९८९०६४८४५३

जयललिता अम्मा…
जयललितांच्या ७७ भक्तांनी त्यांच्यावरील प्रेमापोटी आपला जीव ओवाळून टाकला. आपली आई-अम्मा गेली या भावनेने कित्येकांनी मुंडण केले. त्या राष्ट्रीय नेत्या होत्या आणि कणखर होत्या. त्यांच्या निधनानंतर प्रचंड जनसमुदाय त्यांचे अन्त्यदर्शन घेण्याकरिता आला होता. अवघा भारत त्यांच्या अन्त्यदर्शनाला चेन्नईला लोटला होता.
माझा प्रश्‍न : जयललिता या अय्यंगार ब्राह्मण असताना त्यांचे दफन कसे काय झाले? पेरीयार, अण्णा दुराई आणि एम. जी. रामचंद्रन हे द्रविड चळवळीत होते. परंतु त्यांच्या पक्षाची मृतात्म्यांना दफन करण्याची भूमिका नव्हती. या तिघांव्यतिरिक्त पक्षातील कुणाचेही दफन झाले नव्हते.
राजीव मलहोत्रा यांनी शहनिशा करून हे सिद्ध केले आहे की, ‘द्रविड’ ही काल्पनिक संज्ञा होती. १७ व्या शतकाआधी द्रविड असा मागमुसही त्यांना कुठे लागला नाही. मॅक्समूलर व कार्ल मार्क्स यांनी काल्पनिक ‘द्रविड’ चे बिज कसे काय पेरले, हे राजीव मलहोत्रा यांनी सांगितले आहे. ते अमेरिकेचे रहिवासी आहेत. ते म्हणतात, ‘द्रविड’ ही ‘नवीन’ पूर्णतया काल्पनिक अशी संज्ञा आहे. ‘द्रविड’ ओळख १७ व्या शतकानंतर मॅक्समूलर व कार्ल मार्क्स यांनी रुजविली.
राजीव मलहोत्रा यांनी ’इीशरज्ञळपस खपवळर’, ’खपवीरी पशीं’, ’इशळपस ऊळषषशीशपीं’ आणि ’इरींश्रश्रश षेी डरपीज्ञीळीं’ हे चार भारदस्त ग्रंथ लिहिले आहेत. त्यातील ’इीशरज्ञळपस खपवळर’, या ग्रंथातून डॉ. गिरीश दाबके यांनी लेख लिहिला तो ‘धर्म भास्कर दीपावली विशेषांक २०१६’ यात प्रसिद्ध झाला आहे.
यावरून द्रविड चळवळ ही चुकीची होती त्यामुळे दफन करणे ही कल्पनाच चुकीची ठरते. जयललितांची मैत्रीण शशिकलाही ब्राह्मण असावी असे मला वाटते, पण खात्री नाही. मी पूर्वी वाचलेले आहे, द्रविड चळवळीत ब्राह्मणद्वेष पराकोटीला पोचला होता. पेरीयार किंवा अण्णा दुराई यापैकी कुणीतरी रामला चपलेनी झोडपत मिरवणूक काढली होती. त्यांना कुणीतरी सांगितले, राम ब्राह्मण नव्हता.
मला वाटते पुरातन काळी अगस्ती ऋषी दक्षिणेत गेले होते. आता दक्षिणेत संस्कृत भाषा दिसते याला कारण अगस्ती ऋषी असावे. आई गेल्यावर मुंडण करणे ही तर हिंदू संस्कृती!
प्रभाकर आचार्य
९६६५३०११७२

नोटा पुराण…
मध्यंतरी मी ‘पंतप्रधान पीक विमा’ समितीच्या बैठकीसाठी ‘कृषी भवन’ दिल्ली येथे गेलो होतो. दिल्लीला माझे वास्तव्य तीन-चार दिवसांचे होते. मागील आठवड्यातच मुंबईला आंतरराष्ट्रीय ज्योतिषी संमेलन दक्षिण मुंबईत होते त्यासाठी गेलो होतो. त्या प्रत्येक ठिकाणी भारतात नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्यासंबंधी चर्चा होतीच.
माझ्या लक्षात आले की, नोटबंदीमुळे सगळी जनता हैराण झाली आहे. तरीसुद्धा काही लोक खूपच खुष आहेत.
कारण…गरिबाला वाटतंय् की आपल्यापेक्षा श्रीमंताची जास्त वाट लागलीय्…सरकारी कारकुनाला वाटतंय् की आपल्यापेक्षा आपल्या साहेबांची, मॅनेजरची जास्त वाट लागलीय्…कामगारवर्गाला वाटतंय् की आपल्यापेक्षा आपल्या मालकालाच जास्त त्रास होतोय्…रुग्णाला वाटतंय् आपल्याला लुटणार्‍या डॉक्टरांची जास्त वाट लागलीय्…मतदाराला वाटतंय् की, आपण निवडून देऊनही काम न करणार्‍या पुढार्‍यांची जास्त वाट लागलीय्. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना वाटतंय् की आपल्यापेक्षा विरुद्ध पार्टीचीच जास्त वाट लागलीय्. विरुद्ध पक्षाच्या लोकांना वाटतंय् की सत्तेवर असून आता काय कराल? सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाच पडला दणका….
आतल्या आत सगळे दु:खी आहेत, तरीसुद्धा सगळे खुष आहेत, अशी विचित्र स्थिती आहे. कारण, दुसर्‍याला दु:खी पाहून आपण खुष होतो हा मानवाचा, सध्याच्या युगात भारतीयांचा मूळ स्वभाव आहे. ज्यांना या नोटबंदीचा त्रास झाला आहे ते तर यावर काही बोलतच नाही. असा आहे पंतप्रधानांचा मास्टर स्ट्रोक.
डॉ. अनिल वैद्य
९३७१८३८९५१

चिंतन
माणसाच्या जीवनात अनेक चढउतार येत असतात. कधी चांगले, तर कधी वाईट अनुभव अनुभवावयास मिळतात. वाईट अनुभव घेताना या काळात त्याची मानसिकता, आर्थिक स्थिती, विचार करण्याची शक्ती ही भ्रमिष्ट झाल्यासारखी होते व नेमके आपण काय करावयास पाहिजे होते असा विचार त्याच्या मनात येतो आणि त्याच वेळेस ही त्याला जाणीव होते की, आपल्या आयुष्याची बरेच काही वर्षे व काल हा निघून गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीत त्यास योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचे जीवन समृद्ध व सुखकर होण्याचा मार्ग त्याला सापडतो. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रारब्धाधीत असल्यामुळे जीवनात ज्या घडामोडी घडावयाच्या असतात त्या घडल्याशिवाय राहात नाही. प्रारब्ध हे देखील भगवंताच्या अधिपत्याखालीच काम करत असते. जीवनात जे घडते ते भगवंताच्या इच्छेनेच घडते, ही खुणगाठ बांधून त्या परिस्थितीतही मनुष्याने नीतीच्या मर्यादा सोडू नये. कारण नीती हा आपल्या परमार्थाचा पाया आहे. अशा परिस्थितीत मनुष्याला स्थिर जीवन व समाधानाची गरज असते. अशा वेळेसच भगवंताचे नामस्मरण हीच एक मोठी उपलब्धी आहे. मनुष्याचे सार्थक हे नि:स्वार्थीपणामध्ये आहे. हे प्रापंचिक माणसास समजते, परंतु तो जोपर्यंत भगवंताच्या नामामध्ये रमत नाही तोपर्यंत मनुष्याला खरी निष्कामना व खरे समाधान प्राप्त होत नाही. म्हणून माणसास भगवंताच्या अनुसंधानाची आजच्या कलियुगात नितांत आवश्यकता आहे. हे अनुसंधान मनुष्य फक्त नामस्मरणातून साध्य करू शकतो. म्हणून त्यास नामसाधना करण्याची गरज आहे. गोंदवलेकर महाराज यांनी नामस्मरणाबाबत त्यांच्या प्रवचनात सुंदर विवेचन केले आहे. दिव्य शक्तीयुक्त नाम हे देवाचे प्रतीक आहे. म्हणून नामस्मरण ही देवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे व त्यासाठी नामस्मरण करणे म्हणजे सत्त्वगुणाचा उदय व बुद्धीची प्रखरता होणे होय. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. नामाने प्रपंचातले प्रसंग निवळतात, त्यात विलक्षण असे काहीच नाही. माणसाचे पूर्वचरित्र कसे का असेना जर त्याने थोडेच पण मनापासून नाम घेतले तर ते नामच फार मोठे काम करते. नामाने भगवंताच्या प्रेमाचा उदय होतो. अंत:काल आला असता नामाची आठवण होणे ही भगवंताच्या प्रेमाची खुण आहे. शिवाय ज्याने अंत:काल साधला त्याने सर्व साधले.
तरुण भारतात दत्ताभैया कुळकर्णी यांचा एक सुंदर पण वाचनीय लेख स्मरणात आहे. ते म्हणतात, माणसास त्याचे जीवन व जीवनाचा शेवट गोड व्हावा अशी अपेक्षा असते. पण शेवटचा दिवस हा शेवटावर अवलंबून नसतो, तर तो आपल्या जीवनाच्या सुरवातीच्या अभ्यासावरच अवलंबून असतो. म्हणूनच मनुष्याने त्याच्या आयुष्यातील आलेले चांगले व वाईट अनुभव व भगवंताचे नामस्मरण या दोन्ही गोष्टींची सांगड घातल्यास त्याचे त्याला समजते की आपले जीवन किती सुंदर व सुखकारक आहे. मनुष्याने खरोखरच आत्मचिंतन करणे ही त्याची गरज आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही आणि या सर्वांवर भगवंताचे नामस्मरण हाच एक रामबाण उपाय आहे.
अनिल कविमंडन
९४०३४६००४०