शाळा, शिक्षण आणि उद्याचा भारत

0
213

शाळा हे शिक्षणाचे केंद्र मानले जाते. शाळेतच मुलांना शिक्षण मिळते आणि या शिक्षणाच्या आधारे मुलं आयुष्यात पुढे जातात. पण, शाळेत केवळ पुस्तकातलेच शिक्षण दिले जावे काय, हा प्रश्‍न कित्येक वर्षांपासून नुसता चर्चिला जात आहे. पुस्तकांपलीकडे मोठं जग आहे आणि या जगात काय चाललंय, हे जर मुलांना सांगितलं गेलं नाही, शिकविलं गेलं नाही, तर ही मुलं देशाचा आधारस्तंभ बनतील का, सुसंस्कृत नागरिक होतील का, पुढची पिढी संवेदनशील होईल का, समाज आणि देश याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे, याची त्यांना जाणीव होईल का… यांसारख्या बारीकसारीक मुद्यांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
पूर्वी एक म्हण होती- ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम…’ विद्यादानाचे पवित्र कार्य करणार्‍या शिक्षकांना समाजात एक प्रतिष्ठा होती, शाळेत त्यांचा प्रचंड धाक असे. शिक्षकांनी आवाज जरी काढला तरी विद्यार्थी कापत असत. पण, आता काळ बदलला आहे. कायद्यानेच छडीच्या वापरावर बंदी घातली आहे. एकूणच सामाजिक-आर्थिक परिस्थितीत बदल झाला असल्याने शिक्षण पद्धतीतही आमूलाग्र बदल घडून आले आहेत. छडी मारणारे शिक्षकही राहिले नाहीत आणि छडी खाऊनही शिक्षकांवर प्रेम करणारे विद्यार्थी राहिलेले नाहीत. आम्ही आमच्या मुलाला मारत नाही, तुम्हाला कुणी दिला अधिकार? असा प्रश्‍न विचारणारे पालक उदयास आले आहेत आणि कायद्यातही कठोर तरतुदी करण्यात आल्यामुळे शिक्षकही त्या भानगडीत पडत नाहीत. शिक्षा होणार असेल तर कोण पडेल विद्यार्थी घडविण्याच्या भानगडीत?
शिक्षण हे जग बदलविण्याचे उत्तम साधन आहे. शाळा हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे आणि शिक्षक-शिक्षिका हे या शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहेत, असतात, असले पाहिजेत. भारतीय शिक्षण संस्कृतीने शिक्षण या साधनाचा नेमका उपयोग करून सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढ्या घडविण्याचे काम वर्षानुवर्षे केले आहे. मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि उंचच उच झेप घेण्यासाठी, जीवनात एक प्रकारची उंची गाठण्यासाठी शिक्षण आपल्याला पंख देते, शाळेत शिकविणारे शिक्षक-शिक्षिका या पंखांमध्ये ज्ञानरूपी बळ भरण्याचे पवित्र कार्य करतात. त्यामुळे शिक्षणाचे केंद्र म्हणून शाळांचेही महत्त्व आहे आणि शिक्षकांचेही. आता शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने काही ठिकाणी या पवित्र कार्याला बट्‌टा लागला आहे. पण, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. समाजात जसे चांगले आणि वाईट लोक असतात, तसेच शाळांचे अन् शैक्षणिक संस्थांचेही आहे. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. शाळांचेही तसेच आहे.
शिक्षणाने विद्यार्थी ज्ञानी होतो आणि या ज्ञानाच्या भरवशावर तो पुढे अर्थार्जन करतो. परंतु, केवळ अर्थार्जन करणारा विद्यार्थी घडवून भागायचे नाही. परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविणारे शिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. मुलांची आकलन शक्ती वाढेल, त्यांच्या कल्पनाशक्तीला भरारी मिळेल, त्यांच्यातील संशोधक वृत्ती विकसित होईल, काहीतरी नवीन केले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात सतत येत राहील, समाज आणि देशासाठी आपणही योगदान दिले पाहिजे, ही वृत्ती त्यांच्यात बळावेल असे शिक्षण शाळांमधून दिले गेले, तरच उद्याचा भारत समृद्ध अन् सुरक्षित असणार आहे. मुलांमध्ये कौशल्य तर निर्माण केलेच पाहिजे, त्यांना चारित्र्यवानही बनविण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. आज जी जागतिक आव्हानं आहेत, ती पेलू शकेल अशी एक सक्षम पिढी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शाळा आणि शिक्षकच अशी पिढी निर्माण करू शकतात, यात शंका नाही. आज जी मुलं शिकत आहेत, त्यांनी पुढल्या आयुष्यात उच्च नैतिक मूल्यांची जपणूक करावी, शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करावा, मानवतेप्रती संवेदनशील राहावे, देशाचा एक कर्तव्यदक्ष नागरिक बनावे, या दृष्टीने शैक्षणिक रचना झाली तर उत्तमच!
मध्यंतरी नागपूरच्या ‘द ब्लाईंड रिलीफ असोसिएशन’मार्फत संचालित केल्या जाणार्‍या मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जाण्याचा योग आला. शाळेत स्नेहसंमेलन सुरू होते. पण, इतर शाळांमध्ये होते, तसे ते नुसते संमेलन नव्हते. यंदा शाळेतील शिक्षिकांनी अतिशय वेगळी थीम त्यासाठी निवडली होती. ‘नो युवर आर्मी’ अशी संकल्पना घेऊन त्यांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. देशाच्या सीमेचे रक्षण लष्कराकडून केले जाते आणि त्यामुळेच आपण आपल्या देशात, समाजात आणि सरतेशेवटी घरात शांतपणे झोप घेऊ शकतो. हे लष्कर देशाच्या सीमेचे रक्षण करते म्हणजे नेमके काय करते, लष्करात किती प्रकारच्या रेजिमेंटस् आहेत, या रेजिमेंटस्‌चे काम कसे चालते, याबाबतची यथासांग माहिती तज्ज्ञ मंडळींना बोलावून विद्यार्थ्यांना देण्यात आली. दिल्लीत असलेल्या इंडिया गेटची आणि हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. शाळेला जे खेळाचे मैदान आहे ते अतिशय भव्य आहे. त्या मैदानावर जाण्याचा मोह मला आवरला नाही. कारण, मैदानावर लष्कराविषयी माहिती देण्यासाठी ज्या प्रतिकृतींची मांडणी केली होती, ती अभूतपूर्व अशीच होती. सायंकाळची वेळ होती. विद्यार्थ्यांमधील उत्साह ओसंडून वाहत होता. शिक्षिकांमधील कळकळ अन् तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. आपल्या शाळेत आज शिकणार्‍या विद्यार्थ्यांमधून काहींनी तरी पुढे लष्करात दाखल व्हावे आणि देशाचे संरक्षण करावे, या उदात्त हेतूने यंदाच्या स्नेहसंमेलनाची रचना करण्यात आली होती. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली हिंगवे, मेधा पाध्ये आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिकांचे अभिनंदन केलेच पाहिजे.
आपले शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि चीनकडून आपल्याला कायम धोका आहे. पाकिस्तानकडून तर दररोज कुरापती काढल्या जातात. प्रशिक्षित अतिरेक्यांना भारतीय हद्दीत घुसवून मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया केल्या जातात. यात आमचे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडतात आणि शूर जवान शहीद होतात. अशा परिस्थितीत देशच्या सीमा सुरक्षित करण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. एकीकडे बेरोजगारी असल्याच्या बोंबा आपण मारतो आणि दुसरीकडे लष्करात हजारो जागा रिक्त असताना आणि त्या भरण्यासाठी वारंवार जाहिराती प्रकाशित केल्या जात असतानाही, भारतीय तरुणाईकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. लष्करातील जीवन, एकूणच शिस्त आणि जिवाला असलेला धोका यामुळे तरुणाई तिकडे जाण्यास कचरते. पण, लष्करात गेलेला प्रत्येकच जण मृत्युमुखी पडतो असे नाही. लष्करातून निवृत्त झालेले असंख्य लोक आज कृतार्थ जीवन जगत आहेत आणि ले. कर्नल सुनील देशपांडे यांच्यासारखे निवृत्त अधिकारी लष्करी प्रशिक्षण देणारी ‘प्रहार समाजजागृती संस्था’ चालवत आहेत. निवृत्त कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन हे युद्धकथा सांगून तरुणाईचे मनोबल वाढविण्याचे कार्य करीत आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू हा होणारच. हा निसर्गनियम आहे. त्यामुळे मृत्यू येईल म्हणून जर आपण लष्करात जाण्यास घाबरत असू, तर ते चूक आहे. आवडच नसेल तर तो भाग वेगळा.
एकूणच परिस्थिती पाहता, शाळांमधून लष्कराविषयी माहिती दिली जाणे आवश्यक झाले आहे. बालमनावर लवकर चांगले संस्कार होतात, असे जे म्हटले जाते ते लक्षात घेता, देशभरातील शाळांनी वर्षातून किमान एकदा मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबविला, तसा उपक्रम राबविला पाहिजे. अनेक शाळा राबवीतही असतील. पण, हे कटाक्षाने झाले पाहिजे. शिक्षण विभागाकडून यासाठी सक्ती करून उपक्रम राबविला जाऊ शकतो. पण, त्याला अर्थ उरणार नाही. शाळेतील शिक्षकांना आणि मुलांना मनापासून तसे वाटले पाहिजे आणि त्यांनी स्वयंप्रेरणेने असे उपक्रम राबविले पाहिजे. तरच त्याची फलश्रुती ही सकारात्मक निष्पन्न होऊ शकेल.

गजानन निमदेव