सोनिया गांधी यांचा छुपा अजेंडा फसला

0
186

दिल्लीचे वार्तापत्र
नोटबंदीच्या मुद्यावर मोदी सरकारला पुन्हा घेरण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न फसला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १६ विरोधी पक्षांनी नोटबंदीच्या मुद्यावर सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता, पण अधिवेशन संपतासंपता विरोधकांत फूट पडली. या फुटीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी कारणीभूत ठरले.
राहुल गांधी नोटबंदीच्या मुद्यावरून मोदी सरकारवर आक्रमक हल्ला चढवत होते, मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. पण शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पंतप्रधानांना भेटायला जाताना राहुल गांधी यांनी आम्हाला विश्‍वासात घेतले नाही, असे म्हणण्यापेक्षा अंधारात ठेवले, असा विरोधी पक्षांच्या नेत्याचा आक्षेप होता. एखाद्या मुद्यावर तुम्ही सरकारविरुद्ध एकत्रित येऊन लढत असताना त्याच्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना आपल्या सोबतच्या पक्षांशी आणि नेत्यांशी चर्चा करायला हवी होता, असे या नेत्यांचे म्हणणे होते. पण एवढी राजकीय समज आणि प्रगल्भता दाखवतील, ते राहुल गांधी कसे?
कोणताही निर्णय घेताना आपल्या जे पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांना विश्‍वासात घेत नाही, त्यांच्याशी सल्लामसलत करत नाही, ते राहुल गांधी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्‍वासात घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील, असे मानणे म्हणजे कॉंग्रेसचा भ्रष्टाचार लोक विसरले असे समजण्यासारखे आहे. राजकारण आपल्यापेक्षा जास्त कोणालाच समजत नाही, आपणच राजकारणकुशल आहोत, असा राहुल गांधी यांचा समज झाला असावा. त्यामुळे कोणाला काही विचारण्याची, त्यांचा सल्ला घेण्याची गरज त्यांना वाटत नाही. राहुल गांधींचे जेवढे वय आहे, तेवढा राजकारणाचा अनुभव असलेले अनेक नेते विरोधी पक्षातच नाही, तर कॉंग्रेस पक्षातही आहे.
कॉंग्रेस पक्षातील सारेच नेते भ्रष्ट आहेत, असे नाही. काही नेते चांगलेही आहेत, जे देशाचा आणि लोकांच्या कल्याणाचा विचार करतात. या नेत्यांच्या अनुभवाचे बोल ऐकले, त्यांचा सल्ला मानला तर राहुल गांधी यांचे भले होईल आणि त्यांच्या पक्षाचेही कल्याण होईल, पण राहुल गांधी यांना ते मान्य नाही. जगात माझ्यापेक्षा शहाणा दुसरा कुणी नाही, असा त्यांचा ठाम समज आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपल्या पक्षातील जुन्या आणि जाणत्या नेत्यांना कचर्‍याच्या टोपलीत टाकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच प्रत्येक वेळी राहुल गांधी यांची फजिती होते, लोकांच्या टिंगलटवाळीचा ते विषय बनतात, पण याचे भान त्यांना राहात नाही.
राजकारणी माणसाने प्रत्येक चुकीतून काही शिकायचे असते, पण राहुल गांधींचे वेगळेच आहे, ते आधीच्या चुकीपासून काही धडा घेण्याऐवजी पुन्हा नवीन चूक करत असतात. विशेष म्हणजे आपले काही चुकत आहे, याची जाणीवही त्यांना नसते. राहुल गांधी प्रत्येक वेळी चूक करतात आणि सोनिया गांधी त्यांच्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राहुल गांधींकडे असे अनेक पांघरूण जमा झाले आहेत. पांघरूण गोळा करण्याचा त्यांना नादच लागला आहे.
नोटबंदीच्या मुद्यावर विरोधकांची संयुक्त पत्रपरिषद हा त्याचाच एक भाग होता. राहुल गांधींच्या चुकीमुळे विखुरल्या गेलेल्या विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा सोनिया गांधी यांचा हा प्रयत्न होता. पण या प्रयत्नांत त्यांचा छुपा अजेंडा दडला होता. नोटबंदीच्या मुद्यावर स्वत:च्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता, तर कदाचित सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असते. पण यातून श्रीमती सोनिया गांधी यांना राहुल गांधींचे नेतृत्व प्रस्थापित करायचे होते. सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य आहे, राहुल गांधी यांची राजकीय स्वीकारार्यता वाढली आहे, असा संदेश श्रीमती सोनिया गांधी यांना द्यायचा होता.
श्रीमती सोनिया गांधी यांचा हा छुपा अजेंडा लक्षात आल्यामुळे माकप, भाकप, जदयू, सपा, बसपा, बिजू जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी या बैठकीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. १६ पैकी फक्त आठ पक्षांच्या नेत्यांनीच या बैठकीला हजेरी लावली. त्यात तृणमूल कॉंग्रेस वगळला तर बाकी सारे प्रादेशिक पातळीवरील छोटे पक्ष आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राहुल गांधींच्या नेतृत्वात या परिषदेत सहभागी झाल्या. ती त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये त्यांना भाजपा आणि डावे पक्ष यांच्याशी लढायचे आहे. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे कॉंग्रेसची सोबत त्यांना हवी आहे, त्यामुळे त्यांनी एकप्रकारे राहुल गांधींचे नेतृत्व मान्य केले, असे म्हणावे लागेल.
माकपचे सीताराम येचुरी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, सपाचे मुलायसिंह यादव आणि बसपाच्या मायावती यांनी राहुल गांधीच्या नेतृत्वात होणार्‍या या संयुक्त पत्रपरिषदेत सहभागी होण्यास नकार देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. राहुल गांधींचे जेवढे वय आहे, त्यापेक्षा जास्त या नेत्यांचा राजकारणातील अनुभव आहे, त्यामुळे विरोधी आघाडीचे सर्वमान्य नेते म्हणून राहुल गांधींचे नेतृत्व थोपण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्न या नेत्यांनी हाणून पाडला. यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली.
विशेष म्हणजे या संयुक्त पत्रपरिषदेची वेळही चुकली. नोटबंदीचे ५० दिवस पूर्ण झाले नाही. ते दिवस पूर्ण होण्याआधी तसेच देशातील जनतेला नोटबंदीच्या समस्यांतून दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात, सरकारी पातळीवर काय उपाययोजना केल्या जातात, हे पाहण्याआधीच परिस्थितीत फारसा फरक पडला नाही, असा निष्कर्ष घाईगर्दीत काढत या पत्रपरिषदेतून पंतप्रधान मोदी यांच्यावर दुगाण्या झाडण्यात आल्या. हे म्हणजे परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधीच एखादा नापास झाला म्हणून ऊर बडवण्यासारखे आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्‌‌‌यात या परिषदेचे आयोजन केले असते तर ते समजण्यासारखे होते.
बाहेरच्या पक्षात आणि नेत्यांमध्ये आपली स्वीकारार्हता वाढवायची असेल, तर राहुल गांधींना आधी आपल्या पक्षातील स्वीकारार्हता वाढवावी लागणार आहे. ज्या नेत्याला घरातच कोणी मनापासून स्वीकारत नाही, त्याचे नेतृत्व बाहेरच्या पक्षांनी आणि नेत्यांनी मान्य करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले म्हणजे आपण मोठे होत नाही, मोदींशी आपली बरोबरी होऊ शकत नाही, याचे भान राहुल गांधी यांनी ठेवले पाहिजे.
जनतेची लढाई लढायची असेल तर त्या जनतेने आपल्याला मनापासून स्वीकारले पाहिजे, आपले नेतृत्व मान्य केले पाहिजे. पण सध्या राहुल गांधी यांना देशातील जनतेने स्वीकारलेले नाही. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व देशातील जनतेने मान्य केले आहे, मोदी जे करतील ते देशाच्या आणि आपल्या भल्यासाठीच असेल असा विश्‍वास देशातील कोट्यवधी लोकांच्या मनात निर्माण झाला, तसा राहुल गांधींबद्दल नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बरोबरी करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, आपले कुठे चुकत तर नाही ना हे पाहावे, त्यातच त्यांचे आणि कॉंग्रेसचेही भले आहे. राहुल गांधी यांनी आधी आपल्या आणि कॉंग्रेस पक्षाच्या भल्याचा विचार करावा, देशाच्या आणि देशातील जनतेच्या भल्याचा विचार करण्यासाठी खूप लोक आहेत. त्यामुळे त्यांनी सध्या तरी देशाच्या आणि देशातील जनतेच्या भल्याचा विचार करू नये.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७