राहुल…!

0
169

शतकाहून अधिक काळाचा इतिहास जमेस असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व करण्याची संधी, कर्तृत्वापेक्षाही नशिबाने, ज्यांच्या पदरी लवकरच पडणार आहे, त्या राहुल गांधींची गेल्या काही दिवसांतली अपरिपक्व वागणूक आणि त्याच तोडीची त्यांच्या राजकारणाची तर्‍हा बघितली की, या पक्षाच्या र्‍हासाला अजून कुण्या दुसर्‍या-तिसर्‍याची गरज पडेल असे वाटत नाही, इतक्या वेगात त्यांची त्या दिशेने ‘वाटचाल’ सुरू आहे. १९८९ मध्ये गांधी घराण्याच्या हातून गेलेली सत्ता नंतरच्या काळात गांधी घराण्याकडे नसली, तरी निदान कॉंग्रेस पक्षाकडे तरी शाबूत राखण्यात तरी राजीव-सोनियांना यश लाभले होते. यंदाच्या निवडणुकीत ते चित्रही बदलले. हातून निसटलेली सत्ता राहुलच्या नेतृत्वात पुढची कित्येक वर्षे पुन्हा कॉंग्रेसच्या हाती लागण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाहीय्. स्वत:ची, आपल्या घराण्याची आब राखण्यासाठी या पक्षातील लोकनेत्यांचा खात्मा करण्यात नेहरूंपासून तर सोनियापर्यंत, कुणीही, कधीही, जराही कसूर केला नाही. आता तसे नेतेच उरले नसल्याने सत्ता तर सोडा, धड विरोधी पक्षनेतेपदही या पक्षाकडे शिल्लक राहिलेले नाही. विरोधी बाकांवर बसून सरकारला धारेवर धरण्याची त्यांच्या नेतृत्वाची सध्याची तर्‍हाही इतकी अनोखी की, सामान्य लोक आणि विरोधी बाकांवरील मित्रपक्षच काय, आता या देशातील ओैद्योगिक घराणीही त्यापासून दुरावताहेत. परवा, सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयात जाऊन घेतलेली सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट, हा संघकार्याच्या अभूतपूर्व यशाचा जसा परिणाम आहे, तो विद्यमान पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीचा जसा परिपाक आहे, तशीच कॉंग्रेसची उतरती कळाही त्यातून आपसूकच ध्वनित होते.
एक काळ होता फक्त नेहरू-गांधींचा. त्या घराण्यातील नेत्यांनी बोलायला भाषा तर गरिबांच्या हिताची वापरली, राजकारणही गरिबांच्या जिवावरच केले, पण धोरणं मात्र कायम श्रीमंतांच्या हिताची राबवली. या औद्योगिक घराण्यांवर नेहरू-गांधींचा वचक इतका जबरदस्त होता की, इच्छा असूनही त्यांना कधी संघाच्या, जनसंघाच्या मदतीला धावून जाता आले नाही. अगदी परवापरवापर्यंत हेच चित्र या देशात होते. पण, आता ते दृश्य हळूहळू बदलते आहे. तमाम औद्योगिक घराण्यांच्या मानसिकतेतला हा बदल केवळ देशातील सत्ताबदलामुळे घडून आलेला नाही. एकीकडे तो रा. स्व. संघाच्या प्रभावी कार्याचा, दरम्यानच्या काळात भाजपाच्या वाढलेल्या ताकदीचा परिणाम असतो, तर दुसरीकडे विरोधी पक्षात बसलेल्या नेत्यांच्या एकसुरी, अपरिपक्व वर्तणुकीचाही तो परिणाम असतो. कोळसा-टु जी सारख्या घोटाळ्यांच्या पैशातून पक्षासाठी निधी उभारण्याचे, बोफोर्स-ऑगस्टासारख्या प्रकरणातील कमिशनमधून गर्भश्रीमंत होण्याचे मार्ग या पक्षात अंमलात येण्यापूर्वी, सारा कारभार प्रामुख्याने इथल्या उद्योजकांच्या पैशातून चालायचा याचा विसर पडल्यागत राहुल गांधी, मोदी कोणकोणत्या उद्योजकाला मदत करतात, याचेच पाढे वाचत सुटले आहेत. रोज कुण्यातरी बड्या उद्योजकाच्या नावाने बोटे मोडण्याचा त्यांचा कार्यक्रम नित्यनेमाने सुरू आहे. त्यात कहर म्हणजे परवा त्यांनी ममतादीदींच्या सोबतीने मोदी विरोधाचा सूर आळवला. तत्कालीन राज्य सरकारने आवतन देऊन बोलावलेला टाटा नॅनो प्रकल्प बंगालातून हद्दपार करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्‍या ममतादीदींसोबत बसून राहुल गांधी या देशातील नामांकित उद्योजकांपैकी रोज कुणाच्यातरी नावाने शंख करणार असतील, तर उभे कोण राहील कॉंग्रेसच्या दिमतीला? आणि मोदी सरकारवर उद्योजकधार्जिणे धोरण राबविण्याचा आरोप केल्याने ‘गरिबांचा हितरक्षक’ अशी आपली प्रतिमा समाजात निर्माण होत असल्याचा समज त्यांना स्वत:ला करून घेता येईलही कदाचित, पण त्यावर विश्‍वास कोण ठेवणार? स्वातंत्र्योत्तर काळातील या पक्षाच्या दिवसाकाठी बदलत गेलेल्या भूमिकांचा, गरिबांसाठीच्या त्यांच्या मनातल्या बेगडी प्रेमाचा विसर थोडीच पडलाय् इथे कुणाला? नेहरूंपासून तर इंदिरा गांधींपर्यंत आणि राजीव गांधींपासून तर आता राहुलपर्यंत कोण कुणाच्या जिवावर मोठं झालं; संजय गांधींच्या सहभागातून इथला मारुती उद्योग कसा उभा राहिला, बंद पडलेल्या नॅशनल हेरॉल्डच्या खाती देशाच्या कानाकोपर्‍यातली कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमा झाली, राजीव गांधी फाऊंडेशनच्या खात्यात कोट्यवधी रुपये कुठून जमा झाले, कॉंग्रेसच्या कोणकोणत्या नेत्याच्या नावे परदेशात इस्टेटी उभ्या राहिल्या, सोनियांचे जावई असलेल्या रॉबर्ट वढेरांच्या वाट्याला आलेल्या गर्भश्रीमंतीचे गमक… असे कित्येक मुद्दे अद्याप उलगडलेले नसताना, गांधी घराण्याच्या पलीकडे त्याचे गुपित कुणालाच ठाऊक नसताना, राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर उद्योजकांना मदतीचा हात देण्याचा आरोप करीत सुटले आहेत.
राहुल यांच्या या अकर्मण्य वागणुकीचा, बेताल बडबडीचा, अनाकलनीय वक्तव्यांचा परिणाम कधी दिल्लीतील एखाद्या महाविद्यालयात भाषणादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचा अवमान करण्यात होतो, तर कधी चारचौघांत त्यांचे हसे होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने कॉंग्रेसची अक्षरश: दैनावस्था झालेली दिसते आहेच. पश्‍चिम बंगालात ज्यांना चीटफंडचा पैसा चालतो, नक्षलवाद्यांची छुपी सोबत चालते, त्या ममता बॅनर्जी साधनशुचितेचे गोडवे गात, केंद्र सरकारवर तुटून पडतात आणि एका कमकुवत पक्षाचे नेतृत्व करणारे राहुल गांधी ‘पूर्ण ताकदीने’ त्यांच्या सोबतीने उभे राहतात, हा खरं तर एक अफलातून विनोद आहे…
एक काळ होता की, महात्मा गांधींच्या आश्रमाला बजाज घराण्याचे आर्थिक पाठबळ लाभले होते अन् तेव्हाच्या कॉंग्रेसचा कारभार बिरलांच्या घरातून चालायचा… त्याच गांधींचे नाव घेत कॉंग्रेसचा वारसा चालविण्याचा दावा करणार्‍या राहुल यांना एकूणच उद्योजकांबाबत आज अचानक चीड निर्माण होत असेल अन् गरिबांसाठी त्यांच्या मनात अचानक कणव दाटून आली असेल, तर या दृश्याचे वर्णन करायला ‘नौटंकी’सारखा दुसरा चपखल शब्द गवसत नाही…!
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३