बेजबाबदार, विसकटलेले…!

0
100

भारतीय राजकारणात ज्या वेळी विरोधी पक्ष अधिक सक्षम आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका करणारा हवा होता, त्याच काळात तो अत्यंत बेजबाबदार आणि अनेक तुकड्यांमध्ये विसकळीत दिसतो आहे. पंतप्रधानांचे प्रमुख विरोधक असे ज्यांच्याकडे देश पाहतो त्या राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व वरचेवर टिंगलटवाळीचा विषय बनावे, अशा पद्धतीने त्यांनीच स्वतःला जनतेसमोर आणले आहे. देशाच्या इतिहासातील आर्थिक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णयातील नोटाबंदीचा एक निर्णय झाला. या निर्णयाचे पन्नास दिवस पूर्ण झाले असतानाचे भारतीय राजकारणातील विरोधी पक्षांचे हे चित्र फारच निराशाजनक आहे. अतिशय बालिश आणि हास्यास्पद बनलेला प्रमुख विरोधी पक्ष, त्यांच्यासोबत जाण्यासाठी बैठकीलाही उपस्थित न राहणारे अन्य विरोधी पक्ष, उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षात पडलेली उभी फूट हे सगळे चित्र पाहिले की, विरोधी पक्षांची अवस्था वरचेवर केविलवाणी होत चालल्याचे लक्षात येते.
एकीकडे प्रचंड मोठा निर्णय केल्यानंतरही म्हणावे तितके सर्वसामान्य लोकांना थेट होणारा त्रास कमी करण्यात यश न मिळालेले केंद्र सरकार, सकारात्मक परिणामाची अतिशय संयमाने वाट पाहत असलेले पंतप्रधान मोदी आहेत. अजूनही सर्वसामान्य जनता मोदी जे करतील ते चांगलेच करतील, अशा विश्‍वासाने मोदी यांच्यामागे उभी असलेली दिसत आहे. या उलट अतिशय बालिश विधाने करत विनोदाचा विषय बनत चाललेले राहुल गांधी! राहुल गांधींनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीकडे पाठ फिरवणारे विरोधी पक्ष असे चित्र आहे. विरोधी पक्षात ममता बॅनर्जी यांच्यासारखे आक्रस्ताळे आणि त्यामुळेच विश्‍वासार्हता गमावलेले विरोधक आहेत. सर्वात मोठ्या राज्यात- उत्तरप्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील कुटुंबकलह चव्हाट्यावर आला आहे.
भारतीय राजकारणात विरोधकांची शक्ती संसदेच्या आकडेवारीत अगदीच क्षीण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अगदी सुरुवातीला पं. नेहरू यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलेले असल्यामुळे कॉंग्रेसला मोठे बहुमत मिळत असे. मात्र, त्या काळातही विरोधी पक्षात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बॅ. नाथ पै, कम्युनिस्ट नेते अशी मंडळी होती, ज्यांचा देशाच्या निर्णयप्रक्रियेवर, सरकारवर वचक होता. राजीव गांधी यांच्या काळात इतिहासातील सर्वाधिक जागा कॉंगे्रसला मिळाल्या. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार लोकसभेत विजयी झाले, तरीही विरोधी पक्ष म्हणून धार कमी झाली नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता राहिली नाही, इतके राजकीय परिवर्तन विरोधी पक्षांनी घडविले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. २५ वर्षांनंतर पहिल्यांदा एका राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत भारतीय मतदारांनी दिले. कॉंग्रेस पक्षाचा इतिहासातील सर्वात दारुण पराभव झाला. आणिबाणीनंतरच्या १९७७ च्या निवडणुकीतसुद्धा जेवढा मोठा पराभव झाला नव्हता तेवढा मोठा कॉंग्रेसचा पराभव झाला. विरोधी पक्षनेतापदसुद्धा मिळणार नाही इतकी कमी संख्या निवडून आली. अशा वेळी कॉंग्रेसमध्ये काही आत्मचिंतन होऊन कॉंग्रेस एका नव्या जोमाने देशात उभी राहील, अशी लोकांना अपेक्षा होती. कारण कॉंग्रेसकडे बांधील असलेला एक मोठा मतदारांचा भक्कम आधार आहे. कॉंग्रेसमध्ये राहुल गांधींचे नव्या जोमाचे नेतृत्व होते. मात्र, प्रत्यक्षात जसे जसे राहुल गांधी कॉंग्रेसचा नेता म्हणून सक्रिय होत चालले आहेत, तसतशी कॉंग्रेसची लोकप्रियता वेगाने घसरत चालली आहे. ज्या ज्या राज्यात सुरुवातीला राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन प्रचार केला, त्या राज्यात बिहारवगळता (अल्प जागा) सर्वत्र कॉंग्रेसचा सपशेल पराभवच झाला. बिहारमध्येही कॉंग्रेसचा विजय झालाच नाही, फक्त मोदी यांचा विजय रोखण्यात यश आले.
कॉंग्रेसचा निवडणुकांमध्ये होत असलेला पराभव हा फक्त चिंतेचा विषय नाही. निवडणुकांमध्ये लागणारे निकाल त्या त्या वेळची राजकीय स्थिती दर्शवीत असले, तरी त्यावर राजकारणाचे सगळे भवितव्य अवलंबून नसते. अटलजींची काही वाक्ये आठवतात. अटलजी विरोधी पक्षनेता म्हणून वेगवेगळ्या वेळी म्हणाले होते की,
‘‘हम हारें हैं मगर हिंमत नहीं हारे.’’ ‘‘पार्टीयॉं बनेगी, टुटेगी, सरकारे आएगी, जाएगी, मगर काश्मीर से कन्याकुमारी तक हिंदुस्थान अमर रहेगा.’’ ‘‘हम कुर्सी की लडाई नही लड रहें हैं, हम सिद्धांतों की लडाई लड रहें हैं’’…
हे केवळ वेळ मारून नेणारे किंवा पराभवाला शब्दसामर्थ्याने किंवा वाक्‌पटुत्वाने झाकण्याचा प्रयत्न करणारे उद्गार नसायचे, तर हे राजकीय प्रक्रियेतील प्रामाणिक चिंतन असायचे. याच्या तुलनेत तुलनेत राहुल गांधी यांची सगळी वक्तव्ये अत्यंत बालिश आणि बेजबाबदार आहेत.
राहुल गांधी यांच्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात सातत्याने एकच एक मुद्दा येतो आहे की, मोदी हे उद्योजकांना धार्जिणे धोरण राबवीत आहेत. हे सुटाबुटाचे सरकार आहे. मूठभर लोकांच्या हितासाठी सत्ता राबविली जात आहे. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यापासून ते नोटाबंदीपर्यंत राहुल गांधी एकच एक आरोप वेगवेगळ्या शब्दांत करत आले आहेत. वारंवार तोच तो आरोप केल्यामुळे आणि त्याचा कसलाही पुरावा देऊ न शकल्यामुळे, या आरोपांमधली विश्‍वासार्हता संपली आहे. त्यामुळे त्या आरोपांमुळे मोदी यांच्या प्रतिमेवर काही विपरीत परिणाम तर कधीच झाला नाही; उलट राहुल गांधी यांची प्रतिमा मात्र हास्यास्पद होत गेली आहे. मोदी यांनी जनधन योजना, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी स्वयंपाकाच्या गॅसची योजना, पंतप्रधान विमा योजना, शेतकर्‍यांसाठी अपघात विमा योजना अशा योजना सुरू करून राहुल गांधींना कृतिशील उत्तर दिले. नोटाबंदीचा सर्वसामान्य माणसाला फक्त व्यवहारासाठी नोटा उपलब्ध होण्याबाबतीत त्रास होतो आहे. हळूहळू लोकांना नोटाविना व्यवहाराची सवय लागते आहे. मात्र, या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा अनुभव कुठेही नाही. नुकसान झालेच तर ज्यांनी बेकायदेशीर रीत्या जवळ काळा पैसा बाळगला होता त्यांचे झाले आहे. त्यामुळे कितीही ओरडून राहुल गांधींनी हा निर्णय मूठभरांच्या हिताचा होता असे सांगितले, तरी त्यावर कुणाचा विश्‍वास बसणे शक्य नाही.
राहुल गांधी यांनी जी ओरड चालविली आहे त्याचे दोन दुष्परिणाम मात्र दिसत आहेत. एक म्हणजे सतत अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे देशातील बड्या उद्योजकांची नावे घेऊन आरोप करत आहेत. नरेंद्र मोदी हे त्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याची ओरड करत आहेत. अडानी, अंबानी, टाटा यांची नावे घेत हे आरोप चालले आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासारखी, नॅनो प्रकल्पाला विरोध करून बंगालमधून हकलून देणारी नेता आता राहुल गांधींबरोबर उभी राहिली आहे. देशातील बड्या उद्योजकांची प्रतिमा भयंकर, खलनायक अशी उभी करण्याचे पाप हे दोन नेते करत आहेत. कम्युनिस्टांनीही अशा प्रकारचे काम केले नव्हते. त्यामुळे देशातील उद्योजकांची फार मोठी ताकद आपल्याच पक्षाच्या विरोधात उभी करण्याची घोडचूक त्यांनी केली आहे. इतके दिवस पंडित नेहरूंपासून सतत कॉंग्रेसची छुपी आणि उघड पाठराखण करणारे उद्योजक हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपासारखे राजकीय पक्ष यांच्यापासून अंतर ठेवून होते. गैरसमजामुळे, कॉंग्रेस व कम्युनिस्टांनी केलेल्या अपप्रचारामुळे सतत उद्योजक सावधपणे हिंदुत्ववादी चळवळीपासून दूर होते. मात्र, गुजरातमध्ये मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे तसेच राहुल गांधींच्या सततच्या अपप्रचारामुळे देशातील बड्या उद्योगांना व उद्योजकांना हिंदुत्ववादी चळवळीला जाणून घेण्याची, सोबत जाण्याची इच्छा झाली असल्याचे दिसते आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय शक्ती यांचे स्वरूप अपप्रचाराच्या एकदम विरुद्ध विशाल दृष्टी असलेले, संघर्षापेक्षा सेवेला जास्त महत्त्व देणारे आहे. त्यामुळे जसे जसे हे उद्योजक या चळवळीला जाणून घेण्याचे प्रयत्न करतील तसे तसे ते अधिकच जवळ जातील. देशातील विकासाच्या प्रक्रियेला एक मोठे सकारात्मक, प्रामाणिक, परिणामकारक वळण या परिवर्तनातून मिळेल, अशी आशा वाटते आहे. राहुल गांधी यांच्या एकसुरी सतत टीकेचा हा कॉंगे्रसच्या किंवा डाव्यांच्या दृष्टीने उलटा परिणाम आहे.
दुसरी गोष्ट, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात संघटित विरोध उभा करण्यात राहुल गांधी यांना सपशेल अपयश आले आहे. नोटाबंदीच्या विरोधात सगळ्या विरोधकांना एकत्र येण्याचे त्यांनी केलेले आवाहन सपशेल फसले आहे. फक्त आठ पक्ष त्यांच्या बैठकीला आले. त्यातही ममता बॅनर्जी या सतत भूमिका बदलणार्‍या, विश्‍वासार्हता गमावलेल्या राजकारणी आहेत. राष्ट्रवादी कॉंगे्रसचे शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांच्यासोबत न जाता वेगळा सूर लावला आहे. त्यांनी नोटाबंदीचा विरोध करणे टाळले आहे.
देशात एक परिवर्तनाचा अत्यंत नाजूक, पण महत्त्वाचा काळ चालला असताना, त्यावर सकारात्मक टीका किंवा सकारात्मक सहभाग न घेता लोकसभा निवडणुकीपासून करत असलेली तीच ती टीका पंतप्रधानांवर करत राहुल गांधी यांनी बेजबाबदार विरोधी पक्ष आणि विरोधी नेता अशीच प्रतिमा तयार केली आहे. नोटाबंदीने निर्माण झालेल्या सामान्य माणसांच्या जीवनातील तात्कालिक समस्या काही दिवसात संपतील. त्यानंतर प्रत्येक दिवशी राहुल गांधी यांच्या आरोपांमधील फोलपणा पुढे येऊ लागला आणि सामान्य माणसांच्या हिताचा निर्णय होत असल्याचे चित्र दिसू लागले तर…? हे प्रश्‍नचिन्ह काही दिवसांत निघून जाऊन नेमके असेच चित्र समोर येण्याची जास्त शक्यता आहे. कॉंग्रेसमधूनही राहुल गांधी यांना आता विरोध होण्याची शक्यता आहे. पक्षात एक प्रवाह राहुल गांधी यांच्या या भूमिकेपेक्षा वेगळे मत असणारा आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या दृष्टीने एका निर्णायक वळणावर बेजबाबदार आणि विसकळीत अशा विरोधकांचे चित्र, हास्यास्पद प्रमुख विरोधी पक्षनेत्याचे चित्र, या गोष्टी निराशाजनक आहेत.

बाळ अगस्ती