रविवारची पत्रे

0
162

माहीत नाही…!
‘‘माहीत नाही…!’’ असे उत्तर दिवसातून अनेकदा आपल्या वाट्याला येते. फरक असला तर आय डोण्ट नो, मालूम नहीं, पता नहीं, यांसारख्या शब्दांचा! अर्थ तोच असतो. परिणाम एकच असतो की, आपण नव्याने प्रयत्न करणे.
माहीत नाही, असे उत्तर आले की दोन शक्यता असतात. त्या व्यक्तीचे अज्ञान किंवा मदत करण्याची मानसिकता नसणे. सरकारी कार्यालयात नोकरी असली की, माहीत नाही, असे उत्तर कर्मचारी इतके वेळा देतात की, काही दिवसांनी तिथल्या भिंतीही असेच उत्तर देऊ शकतील की काय, असे वाटते! सरकारी कार्यालयात साहेब जागेवर नसतात अशा वेळी साहेब कुठे आहेत? असे विचारले, तर माहीत नाही असे उत्तर हमखास मिळते! शहरी भागात एखादा नवागत पत्ता शोधत असेल, तर त्याला अशा उत्तराचा सामना करावा लागतो. पोलिसांनी पकडलेले आरोपी माहीत नाही याचा आधार घेतात, मात्र पोलिसांकडे थर्ड डिग्री नावाचे औषध असल्याने, त्या औषधाचा वापर केल्यावर असे आरोपी पोपटासारखे बोलू लागतात!
समाजात आपल्याला रोज शिक्षण मिळत असते म्हणजे नेमके काय? तर समाजातलाच एक घटक आपल्याला जबाबदार समजून काही माहिती विचारतो. समजा आपल्याला माहिती नसेल, तर ही माहिती आपल्याजवळ कशी नाही, याची खंत वाटायला पाहिजे, पण तसे न होता, कपाळावर आठ्या पडतात. समोरच्याला आपण मनातल्या मनात बावळट संबोधून त्याची बोळवण करतो. युवा पिढीच्या हातात स्मार्टफोनसारखे उपकरण व गुगलसर्चसारखी सोय असूनही ‘माहीत नाही’ असे उत्तर देताना युवापिढीला संकोच वाटत नाही. कदाचित मागच्या पिढीचे संस्कारही कारणीभूत असू शकतील! तुमचे घर मनपाच्या कोणत्या प्रभागात येते, तुमच्या घराचा पोस्टाचा संकेतांक (पीन) कोणता, तुमच्या जिल्ह्याचा आरटीओ कार्यालयाचा संकेतांक कोणता, घराजवळ टपालपेटी कुठे आहे, सार्वजनिक रुग्णालय कुठे आहे… यांसारख्या बाबी तर सहज माहीत असाव्यात. सामान्यज्ञान वाढले की, इतिहास लक्षात राहू लागेल. इतिहास माहीत झाला की चेतना जाग्या होतात आणि समाजाला चेतना असलेल्या, सचेत नागरिकांचीच आवश्यकता आहे!
हेमंत कद्रे
९४२२२१५३४३
सशस्त्र सेनेची गोपनीयता
सशस्त्र सेनेची मदार आणि कामकाज हे सर्वस्वी गोपनीयतेवर अवलंबून असते. सद्यःकाळात प्रसारमाध्यमे सैन्याच्या इसमाला उचकावून अथवा काही प्रलोभन दाखवून सेनेबद्दलची अंत:स्थ माहिती काढून घेण्याचा आटापिटा करीत असतात. वास्तविकत: हे चुकीचे आहे. पण, कुठलाही शिस्तबद्ध आणि मुरब्बी सैनिक अशा प्रलोभनांना कदापिही बळी पडत नाही, ही बाब अलहिदा!
पण, त्यामुळेच सशस्त्र सेना आपली मोहीम यशस्वीपणे पार पाडू शकते; अन्यथा इतरांच्या लुडबुडीमुळे ते कधीही शक्य झाले नसते!
प्रवासातदेखील आणि सुटीवर जात असताना आर्मीच्या प्रत्येक सैनिकाला बजावण्यात येत असते की, त्याने प्रवासादरम्यान आपल्या स्वत:बद्दल तसेच आपल्या युनिटसंबंधीदेखील कुठलीही माहिती आपल्या कुणाही सहप्रवाशाला देऊ नये. कारण तो कोण, कुठला वगैरे काहीही माहिती नसताना अशा कुणाही अनोळखी इसमाला सशस्त्र सेनेची माहिती पुरविणे प्रसंगी घातक ठरू शकते.
१९६६-६७ च्या काळात मी आणि दुसरा एक सैन्याधिकारी असे आम्ही दोघे काही कामानिमित्त आसाम मेलने दिल्लीला चाललो होतो.
त्या वेळी प्रवासात असताना माझ्याबरोबर असलेला सैन्याधिकारी कुणा एक प्रवाशाने त्याची स्तुती केल्याने प्रोत्साहित झाला होता. त्यामुळे उत्तेजित होऊन तो अधिकारी त्याच्या शेजारी बसलेल्या एका सहप्रवाशाला सशस्त्र सेनेविषयी सारी माहिती मुक्तकंठाने पुरवीत होता. त्या वेळी एक-दोनदा खुणावून मी त्याला चूप बसण्यास बजावले, पण त्याकडे दुर्लक्ष करून तो सारखा बोलतच राहिला आणि शेजारी बसलेला त्याचा सहप्रवासी लक्षपूर्वक ती सारी माहिती ऐकत होता.त्या वेळी आमच्या त्या फर्स्ट क्लासच्या डब्यात आणखीही दोन-तीन प्रवासी होते, पण ते मात्र त्या दोघांचा संवाद अधूनमधूनच ऐकत होते.
त्यानंतर दिल्लीहून आम्ही परत आमच्या युनिटला पोहोचल्यावर, एके दिवशी आर्मीच्या विभागीय मुख्यालयातून मिलिटरी पोलिसचा एक सैनिक गोपनीय लखोटा घेऊन आला. त्याने तो लखोटा माझ्या त्या सहप्रवासी असलेल्या सैन्याधिकार्‍याच्या हातात दिला. त्या लखोट्यात, त्याने ताबडतोब मुख्यालयात यावे, असा त्याला हुकूम होता. त्या हुकुमानुसार तो अधिकारी मुख्यालयात पोहोचल्यावर तिथे त्याला आसाम मेलने प्रवास करीत असताना अन्य इसमांना सशस्त्र सेनेबाबतची गोपनीय अशी इत्थंभूत माहिती विनाकारण पुरविण्याबाबत बजावण्यात आले. अशा गैरवर्तनामुळे सशस्त्र सेनेच्या कामकाजावर परिणाम होऊन प्रसंगी ते घातक ठरू शकते, अशी त्याला ताकीदही देण्यात आली. त्या वेळच्या आमच्या त्या आसाम मेलच्या प्रवासात अन्य दुसर्‍या प्रवाशांमध्ये सैन्याच्या फील्ड सिक्युरिटी सेक्शनचाही एक अधिकारी प्रवास करीत होता, पण तो मात्र शांतपणे त्या सार्‍या संवादाची दखल घेऊन नोंद करीत होता. त्यानेच नंतर आर्मीच्या विभागीय मुख्यालयात त्या अधिकार्‍यासंबंधी माहितीवजा तक्रार नोंदविली होती.
पुन्हा अशा तर्‍हेच्या अवांतर गप्पागोष्टी करू नये, असे बजावून त्या अधिकार्‍यावर आणखी पुढील कारवाई न करता सोडण्यात आले होते; पण कुणाही जबाबदार अधिकार्‍याला ते लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटणे साहजिक होते. अशा त्या घटनेसंबंधी ऐकून मला स्वामी विवेकानंदांच्या एका उक्तीची आठवण झाली. स्वामीजी म्हणतात की, ‘‘देवाने आपल्याला दोन डोेळे, दोन कान, पण तोंड मात्र एकच दिले आहे. म्हणून ती सारी इंद्रिये त्या त्या प्रमाणात वापरणे उचित असते. अवतीभवतीचे सारे नीटपणे अवलोकन करावे. सतर्क राहून आजूबाजूची कुजबुजही ऐकावी, पण संतुलन आणि तारतम्य राखून वाच्यता करावी. उगीचच वाचाळ होऊन बरळत बसू नये.’’
अरविंद भावे
९८९०४५१९७३
भाषाशैली, उपरोधिक व्यंग्य उत्तम
रविवार १८ डिसेंबर २०१६ च्या रविवारची पत्रेमधील निर्मलाताई, दादा हांडेकर, अखिलेश कोतवालीवाले, प्रा. शशिकांत अ. पांडे, राजीव दारव्हेकर, डॉ. विक्रम जोशी यांच्या लेखांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो; तसेच भाषाशैली, उपरोध, व्यंग्य, कानपिचक्या याबाबत दाद देतो. निर्मला गांधींचे राहुलबाबा (स्वयंघोषित युवराज) हे पुतणे खरे की मोमचे पुतळे? ‘संसदेत झोपा काढणारे आमचे पुतणे’ ही किती वाखाणण्याजोगी कान पिळणारी भाषा. राहुलबाबा बोलाच!
नेत्यांचे बरळणे यातील युतीत असलेले उद्धव, आपण केशव, माधव, गोविंदचे अंतरंग सखा, परंतु तुम्हीसुद्धा जनतेला विश्‍वासात घेणं म्हणजे ‘लग्नाची पत्रिका मोदीजींनी घरोघरी द्यायला हवी होती!’ ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ ऐवजी ‘उद्धवा अजब तुझे हाल!’ देशातील सद्य:स्थितीचे मार्मिकपणे दर्शन घडविणारे. मी त्या दिवसाची वाट बघत आहे ज्या दिवशी मोदीजी जाहीर करतील की, देशात फक्त एकच धर्म हिंदू धर्म! विकासाचा प्राथमिक मंत्रसुद्धा मौल्यवान आहे.
बच्चनजी, आपण कुजक्या, नासक्या मसाल्याची चव चाखली असेल, पण आईच्या हातचं जेवण लहानपणी खाल्लं नसेल, असं तुमच्या ब्रॅण्डवरून समजतं. १० डिसेंबरच्या अंकातील डोरलेसरांचा हिंदूचा धर्मग्रंथ गीता हे मला मान्य नाही, ‘वेद’ हा धर्मग्रंथ आहे.
सुरेशकुमार जीवनलाल शुक्ल
सिहोरा
आचार्यांची टोकाची भूमिका!
नागपुरात नुकताच ‘विराट धर्मसंस्कृती महाकुंभ’ सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदूंना ‘हम दो हमारे दस’चा नारा दिला. मुसलमानांच्या जलद गतीने वाढणार्‍या संख्येला काटशह देण्यासाठी हिंदूंनी ‘हमारे दो’चा विचार टाकून ‘हमारे दस’ हा मंत्र जपावा, तरच हा देश धर्मांध मुस्लिम ड्रॅगनपासून वाचू शकेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. आचार्यांचा विचार तत्त्वत: जरी पटणारा असला, तरीही हा संदेश देताना त्यांची वैचारिक बैठक कच्ची वाटते. कारण मुस्लिम संख्याबळाशी अनेक धार्मिक मुद्दे जोडलेले आहेत. मुस्लिम पर्सनल लॉनुसार प्रत्येकाला चार बायका करण्याचा अधिकार आहे. त्रितलाक पद्धतीने कोणत्याही बीबीला तो लहरीनुसार घटस्फोट देऊ शकतो. मुस्लिमांनी खंडीभर पोरं पैदा करायचे आणि या देशाने त्यांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून द्यायची, त्यांना आरक्षण द्यायचे, आर्थिक मदत करायची, हजसाठी सर्व सवलती उपलब्ध करून द्यायच्या, अशा प्रकारे गांधी-नेहरू-गांधी यांनी त्यांचे आतापर्यंत सर्व प्रकारचे लाड पुरवले आहेत. त्यामुळे भाजपाने या सोयी-सवलतींचा बेल्ट एकदम घट्‌ट आवळला, तर देशभरात ‘मुस्लिम खतरेमे/इस्लाम खतरे में’ अशी हाकाटी मुस्लिम संघटना, कॉंग्रेस आणि डावी आघाडी यांच्याकडून सुरू होईल.
मग मोदींसाठी आणखी एक नवीन डोकेदुखी सुरू होईल. दुसरे, वासुदेवानंद सरस्वतींच्या मताशी शृंगेरी, द्वारिका, पुरी आदींचे शंकराचार्य सहमत आहेत का? हासुद्धा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तिसरे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे कुटुंब कल्याणाच्या दृष्टीने शासनाने ‘हमारे दो’चा मंत्र आम्हाला दिला आहे. सदर शंकराचार्यांच्या संदेशानुसार हिंदूंनी ढेरभर पोरं पैदा केली तर त्यांचे लालनपालन, संगोपन त्यांच्यावर सुसंस्कार करणे गरिबांसाठी अशक्य होईल. ती पोरं उनाड होतील. चोर्‍यामार्‍या करतील. तरुणींची छेडखानी करतील. वयात आल्यावर त्यांना जोडीदार न मिळाल्याने बलात्काराकडे त्यांची प्रवृत्ती वाढेल. भरमसाट मुलांना जन्म दिल्यावर त्यांच्या माता रोगग्रस्त होतील. नवरे व्यसनाधीन होतील आणि हजारो, लाखो संसार उद्ध्वस्त होतील.
मुलाला जन्म देणे म्हणजे किती वेदना होतात, हे वासुदेवानंदांना काय माहीत? म्हटलेच आहे की, ‘वंध्या नैव जानाति गुर्वीं प्रसववेदनाम्‌|’ अखेर हा देश जास्ती पोरं पैदा केल्यामुळे रसातळाला जाईल. सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी जोडपी आता ‘हम दो हमारा सिर्फ एक’ या मानसिकतेला आली आहे. तेव्हा वासुदेवा, असे फतवे काढून काम फत्ते होणार नाही. तुमचे कार्य समाजाला योग्य ते मार्गदर्शन करणे आहे, जनतेचा बुद्धिभेद करणे नाही. असा अव्यापारेषु व्यापार करू नका आणि स्वत:चे हसे करून घेऊ नका.
आपला हिंदू धर्म सर्व जगाला पथदर्शी झाला पाहिजे, प्रतिक्रियावादी नाही. वासुदेवा, तुम्हाला हिंदूंसाठी काही ठोस करायचेच असेल, तर समान नागरी कायद्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०७२७
दुसर्‍यास सांगे ब्रह्मज्ञान…
नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधानांची कोंडी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची बैठक कॉंग्रेसने बोलावली. त्यात सोनियाजींसह इतर नेते बोलणार होते, परंतु काही विरोधी पक्षांनी या बैठकीला येण्याचे टाळले. त्यामुळे विरोधी पक्षांत उभी फूट पडली. पुढेही ती पडण्याचे चिन्ह दिसत आहे. नोटाबंदीचा निर्णय घेताना आम्हाला विश्‍वासात घेतले नाही म्हणून बोंब मारणार्‍या कॉंग्रेसने काय केले? त्यांनीपण बैठकीला बोलाविताना पक्षभेद केलाच. ही पहिली वेळ नाही. हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून मोदींना भ्रष्टाचारी म्हणणारे राहुल गांधी दुसर्‍या दिवशी शेतकरी कर्जमाफीची ढाल घेऊन भेटायला गेलेत, हेही सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. तुमच्या गोष्टी तुम्ही लपवून ठेवणार व सत्तारूढ पक्षाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी, ही अपेक्षाच चूक. दुसर्‍याला नावे ठेवताना स्वत:कडे चार बोटं असतात, ते विसरू नये. ‘दुसर्‍यास सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण!’
निर्मला गांधी
९४२१७८०२९०