देवदूत

0
200

सायंकाळ उत्साहपूर्ण होती. अंगावर छानसे कपडे घालून तो मित्राच्या घरी थर्टी फर्स्टच्या पार्टीला कॅम्प रोडनी निघाला. हवेत गारवा होता आणि तो त्याला खूपच आवडला होता. आज दुपारपासून सूर्य दिसलाच नाही. वातावरण ढगाळलेलं होतं आणि रात्री पावसाचे बारीक थेंब येतील की काय, असं वाटत होतं. पण आलेही तरी काय, त्याने मजा आणखीच वाढणार होती.
यावर्षी तो आर्ट्‌सच्या पहिल्या वर्षाला होता. आजवर कॉलेज सुरू झाल्यापासून तो आणि त्याचा अभ्यास याशिवाय त्याला काही माहिती नव्हतं. पण तो आता बरोबरीच्या मित्रांत मिसळत चालला होता आणि ते त्याच्यासाठी आवश्यकही होतं. कारण त्याच्या आई-वडिलांनाही वाटायचं की त्याचा एकलकोंडा स्वभावजायला हवा.
‘‘आई, मी आज थर्टी फर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत जाणार आहे’’ त्यानं मोठ्या आनंदानं आईला सांगितलं.
‘‘बघ रे बाबा, माझा काही तुला विरोध नाही. परंतु तुझ्या बाबांना कदाचित ते आवडणार नाही.’’ आई म्हणाली.
‘‘आई प्लीज, आज पहिल्यांदा जातोय् मी. छान ग्रुप आहे आमचा. आणि हो, अगदी साधी पार्टी आहे गं. म्हणजे नुसतं वांग्याचं भरीत आणि बरंच काही चटचटीत.’’
‘‘तुमच्या मुलांचं काही खरं आहे का, तिकडे नजरेआड काय करणार तुम्ही, याचा अंदाज थोडीच लागणार आहे. ’’
‘‘आई….. माझ्यावर विश्‍वास नाही तुझा? ’’
‘‘हो बाबा, माझा आहे तुझ्यावर विश्‍वास, पण….. ’’
‘‘वांग्याचं भरीत?’’ त्याची सारी मित्र खो खो हसू लागले.
‘‘नाही रे बाबा, वांग्याचं भरीतबिरीत नाही करणार.’’ त्याच्या एक मित्र म्हणाला.
‘‘थर्टी फर्स्टला वांग्याचं भरीत? ’’ दुसर्‍यानं प्रश्‍न केला.
‘‘अरे घरी सांगावं लागतं बाबा तसं.’’ त्यानं हसून उत्तर दिलं.
‘‘ओहो’’ पुन्हा त्याची मित्र जोराने हसले.
‘‘अगदी साधासुधा होता रे, इतक्या लवकर आमच्यासोबत बिघडशील आम्हाला वाटलं नव्हतं.’’ तिसर्‍या मित्रानं एका मित्राच्या हातावर टाळी देत म्हटलं.
‘‘आपला ग्रुपच आहे तसा’’ त्यातील एक बोलला.
‘‘अहो ऐकलं का, तुमचा मुलगा थर्टी फर्स्टच्या पार्टीला जातो म्हणतोय्.’’ त्याची आई त्याच्या बाबांसोबत बोलत होती.
‘‘काय म्हणतेस काय, पण हे बरं नाही, अशानी त्याला नको त्या गोष्टींचा छंद लागेल.’’ ते मासिक चाळत होते.
‘‘अहो नाही हो, माझ्या मुलावर विश्‍वास आहे माझा. छानपैकी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा कार्यक्रम आहे कदचित त्यांचा’’ त्याची आई पुन्हा बोलली.
‘‘आता नाही म्हटलं तर त्याला वाईट वाटेल. तसाही तो आजवर कुठंही गेला नाही. त्याला नाही तरी कसं म्हणावं हाही प्रश्‍नच आहे.’’ त्याच्या वडिलांनी एक दीर्घ श्‍वास घेतला.
‘‘नका हो इतकी काळजी करू. सर्वच मुलं तशी नसतात. त्याचा ग्रुप छान आहे.’’ त्याच्या आईच्या स्वरात खात्री होती.
‘‘ओके बाबा.’’ त्याचे वडील म्हणाले.
राहून पावसाचे बारीक थेंब सुरू झाले होते. अंगात असलेलं जाकीट त्यानं अंगाभोवती आणखी घट्‌ट लपेटलं आणि त्याला मजा वाटू लागली.
रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडं त्याला आकर्षक वाटू लागली होती. आता अंधारत होतं आणि रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश त्याला आकर्षक वाटू लागला होता. रस्त्यावरून असं पायी फिरण्यातही किती मौज असते, आपल्या आजूबाजूचं शहर न्याहाळत त्याच्या मनात विचार आला. मांगीलाल कॉलनीच्या तो समोर आला आणि मुख्य रस्त्यावरून आत कॉलनीमध्ये शिरला. याच कॉलनीच्या शेवटच्या घरापासून त्याचा मित्र ज्या ठिकाणी राहात होता, त्या कॉलनीचं लेआउट सुरू होणार होतं. त्यांच्या ग्रुपमधला बंटीच्या घरी आजची पार्टी आयोजित केली होती त्यांनी. बंटीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी राहात होते. आणि त्याला आई नव्हती. त्यामुळे तो घरी एकटाच राहायचा. तो कॉलनीच्या शेवटी गेला पण त्याला ते लेआऊट दिसत नव्हतं. बरेच महिने झाले होते तो याकडे आला नव्हता. आणि या ठिकाणी बरीच नवीन घरं झाली होती. त्याच्या खिशातल्या फोनची रिंग वाजली आणि त्यानं पाहिलं. फोन बंटीचाच होता.
‘‘हॅलो ’’
‘‘अरे कुठं आहेस तू? अरे यार केव्हाची तुझी वाट पाहतोय्’’
‘‘अरे मी मांगीलाल कॉलनीच्या अध्ये मध्ये भटकतोय्. मला तुझं लेआऊट दिसत नाहीये.’’
‘‘लेआऊट दिसत नाहीये म्हणतोय्. पहिलेच कुठून घेऊन आला की काय?’’ त्याच्या मित्रांचं बोलणं त्याला ऐकू येत होतं. ते हसत होते.
एव्हाना सर्व स्ट्रीट लाईट लागले होते. तो एका जागी उभा राहून विचार करू लागला की नेमका कोणता रस्ता असेल. कारण कॉलनीतून शेवटाकडे जाणारे अनेक रस्ते या ठिकाणी होते. तितक्यात तो एका गल्लीत शिरला. रस्त्यावरल्या लाईटचा प्रकाश थोड्या दूरवर त्या गल्लीत पसरला होता. नंतर काळोख. तो आणखी पुढे गेला आणि त्याच्या नजरेसमोर पाच-सहा वर्षांची एक छोटी मुलगी आली, जी तिथले कागद गोळा करून त्याचा एका जागी ढीग लावत होती. तिचे केस अस्ताव्यस्त होते आणि अंगावरचा फ्रॉक जागोजागी फाटला होता.
तिने कागदाचा एक छोटासा ढीग केला आणि तिथेच असणार्‍या झोपडीत ती शिरली. पण लगेच हताश होऊन परतली. आणि तशीच त्या कागदाच्या ढिगाजवळ बसली. कदाचित ती झोपडीत माचिस आणायला गेली होती आणि तिला ती मिळाली नव्हती. तो तिच्याजवळ गेला आणि त्यानं खिशातून लायटर काढलं आणि त्या कागदाच्या ढिगाला लावलं. ढीग पेटला आणि तो विस्तवाचा पिवळा गोल प्रकाश तिच्या चेहर्‍यावर पडला. किती गोड चेहरा होता तिचा. पण नियतीनं दिलेल्या दरिद्र्यामुळे तिच्या वाट्याला ही अंधारली गल्ली आणि ही झोपडी आली होती. त्या प्रकाशात ती त्याच्याकडे पाहू लागली.
‘‘दादा…. ’’ ती बोबडे बोल बोलली
तिच्या तोंडून ‘दादा’ ऐकून तो गहिवरला आणि तिच्या कोवळ्या चेहर्‍यावरून त्यानं प्रेमानं हात फिरवला. तिचा तो इवला गाल थंडगार होता.
‘‘तू एकटी आहेस इथे? ’’
‘‘हो’’ ती राहून बोलली.
‘‘तुझे आई-बाबा? ’’
‘‘अरे उसका बाप रिक्षा चलाता है. एक एक सवारी के लिए बैठा रहता है चौक पर, आज तो देर रात तक बैठेगा वो चौक पर, कल नया साल लगने वाला है नं, तो आज उसको सवारी मिलेगी ऐसा लगता होगा. मगर पगले को मालूम नही, सबके पास आजकल गाडीयॉं आ गयी है, आज की रात लोग घुमने भी जायेंगे तो क्या इसके रिक्षेसे जायेंगे़? घर मे छोटी बच्ची है, बिमार बिवी है, मगर कोई फिकर नही उसको’’ एक दारूडा बोलत निघून गेला. त्या दारूड्याला पाहून ती घाबरली. पण त्याचा तिला आश्रय होता.
तो तिच्या चेहर्‍याकडे पाहत राहिला.
‘‘तुझी आई आहे घरात ?’’
तिनं मान हलवून ‘हो’ म्हटलं.
तो विचार करीत राहिला. तितक्यात त्या झोपडीतून आवाज आला.
‘‘बेटा, छकू, कुठं आहे तू’’ ती तिची आई होती आणि ती बोलताना खोकलत होती.
ती पळत झोपडीकडे गेली. पुन्हा थांबली आणि त्याच्याकडे धावत आली. त्याचा हात तिनं धरला आणि त्याला झोपडीकडे घेऊन आली.
तो झोपडीत शिरला. एका शिशीत वात असणारा दिवा जळत होता. आणि खाटेवर तिची आई बसून होती. घरात थोडीफार भांडी होती. तो आत शिरला. ती त्याचा हात धरून होती.
तिच्या आईला समजलं नाही, की हा कोण?
‘‘कोण रे बाबा तू?’’ तिनं प्रश्‍न केला.
तो काही बोलणार तोच ती म्हणाली,
‘‘आई, देवदूत दादा. ’’
‘‘ देवदूत?’’ तिच्या आईनं प्रश्‍न केला.
‘‘आई, बाबा म्हणाले होते, आज रात्री देवदूत येईल आपल्या घरी आणि तो मला खूप चॉकलेट देईल.’’
‘‘तुझे बाबा काहीही म्हणतात, बाबा कोण रे तू, या गरिबाच्या झोपडीत तुला काय पाहिजे?’’
‘‘ मी चुकून या गल्लीत आलो आणि ही दिसली. आपण इथं कधीपासून राहाता?’’ त्यानं प्रश्‍न विचारला.
‘‘दोन वर्षे झाली बेटा. गावात एक घर होतं. पण जे यांच्या भावानी जाळून टाकलं. त्यांची भांडणं व्हायची नेहमी. मग या शहरात आलो. हिचे बाबा रिक्षा चालवत आहे. पण कमाई नाही बेटा. राहायला छप्पर नव्हतं. इथल्या कॉलनीतल्या बाबूनी त्यांच्या या रिकाम्या जागेवर काही दिवस परवानगी दिली.’’ ती बोलली.
‘‘तुमची भाषा खूपच छान आहे ’’ तो म्हणाला.
‘‘दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे माझं. पण घरची परिस्थिती वाईट होती. वडील मजूर होते, त्यातही दारूचा शौक. मग हिच्या वडिलांशी लग्न झालं, मेहनती माणूस, पण घरच्यांचा विरोध, भांडणं. तिथून निघण्याशिवाय पर्याय नव्हता.’’ तिनं सांगीतलं.
‘‘तुमची प्रकृती बरी राहत नाही का?’’
‘‘इतक्यात नाही. काळजीनं जीव कासावीस होतो त्यामुळे कदाचित. चांगल्या डॉक्टरांकडे जाता येत नाही.’’ ती खोकलत होती.
तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली.
‘‘अरे कुठे आहेस, थकलो आहे तुला शोधून’’ त्यानं मग इथला पत्ता सांगितला मित्रांना
तिची आई कशीबशी मग खाटेवरून उठली. कोपर्‍यात असणारी एक हात तुटलेल्या खुर्चीवर त्याला बसायला सांगितलं.
तो मग तिच्या आईला प्रश्‍न विचारत होता आणि तिची आई त्याला उत्तर देत होती. तितक्यात तिचे वडील झोपडीत शिरले आणि तिच्या आईने त्यांना त्यााच्याबाबत सांगितले.
‘‘पण तू इकडे कुठे निघाला होता?’’ छोट्या मुलीच्या वडिलांनी प्रश्‍न विचारला.
‘‘आज मित्राकडे थर्टी फर्स्टची पार्टी होती. मी तिकडे निघालो होतो.’’
‘‘मग तुला जायला हवं. ते तुझी वाट पाहत असतील’’ ते बोलले. त्यावर तो काही बोलला नाही.
त्या झोपडीसमोर बाईक थांबल्या आणि त्याचे मित्र झोपडीत शिरले.
‘‘तू इथे आहेस? काय करतोस इथे?’’ एक मित्र त्याला रागाने म्हणाला.
त्यानं त्याच्या प्रश्‍नाला काही उत्तर दिलं नाही आणि खिशातून एक नोट काढून त्याला चॉकलेट आणायला सांगितले. त्याच्या मित्राच्या काही लक्षात आलं नाही. पण तो निघून गेला आणि चॉकलेट घेऊन लगेच परतला. आणि त्यानं त्या छोट्या मुलीला दिले. ती आनंदानं उड़्या मारू लागली.
‘‘चल आता. अरे पार्टीची तयारी करायची आहे. अजून काहीच आणलं नाही रे. कम ऑन यार.’’ बंटी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
‘‘आज आपण इथेच करू पार्टी. मस्त वांग्याचं भरीत आणि घेऊन या भाकरी, ठेचा.’’ तो त्याच्या मित्रांना म्हणाला.
‘‘आर यू मॅड?’’ एकजण म्हणाला.
‘‘अरे चला रे, हा तर पार्टीचा पूर्ण बॅण्ड वाजवण्याच्या तयारीत दिसतो. सॉरी फ्रेण्ड, तू राहा इथेच आम्ही निघतोय्. शेवटचं विचारतोय्, तुला चलायचं आमच्या सोबत?’’ दुसरा एक मित्र म्हणाला.
‘‘मला नाही यायचं. मला या माझ्या लहान ताईसोबत आज रात्री इथंच जेवण करायचं.’’ तो ठाम होता.
‘‘मी काय म्हणतो, तू जा बेटा मित्रांसोबत, अरे आम्ही गरीब. तुझ्या जेवण्याकरिता आम्ही काय करणार आहोत.’’ तिचे वडील म्हणाले.
‘‘तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला काही करावं लागणार नाही. मी घेऊन येतो बाहेरून सारं ’’ तो म्हणाला. त्यावर ते काही बोलले नाही.
‘‘ठीक आहे बॉस, ऍज यू विश. आम्ही चलतो. चला रे’’ बंटी म्हणाला. ते निघून गेले.
अर्धा तास गेला आणि तो तिच्या आई-वडिलांशी गप्पा करीत होता. तिचे आई-वडील त्याला मित्रांकडे जा म्हणून समजावत होते. पण त्यानं ऐकलं नाही. अर्धा एक तास गेला आणि पुन्हा त्या झोपडीसमोर बाईक थांबल्या.
‘‘बघ, आले तुझे मित्र तुला न्यायला.’’ तिचे वडील म्हणाले.
त्याचे मित्र पुन्हा आत शिरले. बंटीच्या हातात कॅरीबॅग होती. ती बॅग त्यानं त्याच्यासमोर धरली.
‘‘का आहे यात?’’ त्यानं विचारलं.
‘‘लहान ताईसाठी चॉकलेट आणि या काकूकरिता फळं आहेत.’’ त्यानं हसून ती हातात धरली आणि तिच्या आईच्या हाती दिली. ती नको म्हणत होती.
‘‘थॅक्स’’ तो म्हणाला.
‘‘आणि हो, आजची पार्टी आपण इथेच करणार आहोत, तुझ्या या छोट्याशा ताईच्या घरी. भाकरी, भरीत आणि सॅलेड स्पेशल ऑर्डर दिलाय्. एका तासात तयार होईल. आज शुद्ध शाकाहारी पार्टी.’’ बंटी म्हणाला. त्यानं बंटीला गळ्याशी लावलं.
एका तासानंतर एका मित्रांनी दिलेला ऑर्डर आणला. छानपैकी खाली चटई टाकली होती. प्लेट्‌स लावल्या होत्या. सर्व गोल करून बसले होते. आणि लहान छकू सर्वांना वाढत होती. तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे वडीलही गहिवरले. दिव्याच्या त्या कोमल प्रकाशात ते जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात बाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. नवीन वर्ष सुरू झालं होतं. त्यांनी हॅपी न्यू ईयर म्हणत त्या मित्रांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गळ्याशी लावलं.
रात्री उशिरा त्याच्या मित्रानी त्याला घरी सोडलं. तो बाईकवरून उरतला आणि सर्वांना गुड नाईट म्हणत गेट उघडणार तोच बंटीनं त्याला आवाज दिला. तो त्याच्याजवळ आला. बंटी म्हणाला,
‘‘थॅक्स् अ लॉट मित्रा. तुझ्यामुळे एक वेगळा आनंद आज मिळाला. आपल्या अवतीभवती किती लोकांना आपली गरज असते. त्यांच्या सुखदु:खात कु णीतरी सहभागी व्हावं, त्यांना मनापासून वाटतही असेल. वर्षातून एक दिवस आपणही त्यांच्याशी आपला आनंद शेअर करू शकतो. पण आपण कधी याचा विचार करीत नाही. कुणालातरी आपली गरज आहे, हे आपण का विसरतो ?’’ त्याचा स्वर गहिवरला होता. त्यानं पुन्हा बंटीला गळ्याशी लावलं.
एक जानेवारी. सकाळचं कोवळं उन्ह छान पडलं होतं. नवीन वर्षाचा पहिला दिवस. काल सरत्या वर्षाला आजवर असा निरोप देण्यात आला नव्हता. सकाळी सर्व मित्र शहराशेजारच्या टेकडीवर फिरायला गेले. मस्त थंडी पडली होती. इतक्यात उगवत्या सूर्याची कोवळी किरणं टेकडीच्या मागून हळुवार पसरू लागली. त्यांनी उगवत्या सूर्याकडे पाहिलं आणि आपले दोन्ही हात वर करून नवीन वर्षाचं स्वागत केलं…….

दीपक वानखेडे/९७६६४८६५४२