साप्ताहिक राशिभविष्य

0
546

रविवार, १ ते ७ जानेवारी २०१७

rashiसप्ताह विशेष
•सोमवार, २ जानेवारी : विनायक चतुर्थी, सदानंद महाराज पुण्यतिथी- सालोड हिरापूर (वर्धा), •मंगळवार, ३ जानेवारी ः सावित्रीबाई फुले जयंती, महिला मुक्तिदिन, •बुधवार, ४ जानेवारी : सद्गुरू नारायण महाराज जयंती- हिंगोली, •गुरुवार, ५ जानेवारी : उपासनी महाराज पुण्यतिथी- साकोरी (अहमदनगर), गुरू गोविंदसिंह जयंती, •शुक्रवार, ६ जानेवारी ः दुर्गाष्टमी, शाकंभरी नवरात्रारंभ, श्री विष्णुकवी महाराज पुण्यतिथी- माहूर, •शनिवार, ७ जानेवारी : झिंगराजी महाराज पुण्यतिथी- मुर्‍हा (अमरावती), श्री रामचरणदास महाराज पुण्यतिथी- आळंदफाटा, बुलढाणा.

मेष :आर्थिक लाभ वाढणार
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी मंगळ लाभस्थानात शुक्र व केतूसोबत आहे. कर्म व धनस्थानावर गुरूची शुभ दृष्टी आहे. चंद्र दशमातून भ्रमण सुरू करीत असून, तो या आठवडाअखेर आपल्या राशीत येत आहे. ही स्थिती आर्थिक लाभ वाढविणारी आहे. मानसन्मान, प्रतिष्ठा जोपासण्याचा आपला प्रयत्न राहील, यामुळे एखादे वेळी अहंकार बळावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कार्यालयीन कामकाजात अडथळे, वादविवाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मनस्ताप वाढू शकतो. दरम्यान संततीसंबंधी काही चिंता निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. विशेषतः मकरसंक्रांतीनंतर अधिक काळजी घ्यायला हवी. शुभ दिनांक- २, ३, ७.
वृषभ : प्रकृतीची काळजी घ्यावी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी शुक्र दशम स्थानात मंगळासोबत आहे. पंचमातील गुरूची भाग्य, लाभ व राशिस्थानावर शुभ दृष्टी आहे. चंद्र भाग्यातून भ्रमण सुरू करीत असून, तो या आठवडाअखेर आपल्या व्ययात येत आहे. ही ग्रहस्थिती धनयोगासाठी उत्तम असली, तरी कुटुंबात काही बेबनाव व प्रकृतीविषयक समस्या निर्माण करू शकतो. शनीच्या दृष्टीमुळे दगदग वाढ संभवते. काहींना प्रवासयोग संभवतात. कार्यालयात काही विशेष जबाबदारी सांभाळावी लागेल. प्रकृतीसंबंधी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गृहकलह, मतभिन्नता, गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात ज्येष्ठ महिलावर्गाची प्रकृतीदेखील सांभाळावी लागू शकते.
शुभ दिनांक- १, ५, ६.
मिथून : प्रलंबित कामांना वेग
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी बुध सप्तमस्थानात रवीसोबत आहे. वक्री बुध अस्तंगत होता, आता तो उदित झाला आहे. शुक्र व मंगळ भाग्यात आहेत. चंद्र अष्टमातून भ्रमण सुरू करीत असून, तो या आठवडाअखेर लाभस्थानात येईल. राशिस्वामी आता उदित झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्थिरावल्यासारखी वाटणारी कामे आता वेग घेऊ लागतील. मात्र, अष्टमातून सुरू होणारे चंद्रभ्रमण आपल्याला प्रकृतीची काळजी घेण्यास सुचवत आहे. नोकरी-व्यवसायातदेखील तणावपूर्ण वातावरण राहील. प्रकृती साथ देणार नाही व कामाचा ताण वाढेल. सहकार्‍यांशी सलोखा ठेवा. त्यांच्या मदतीनेच अडचणीतून मार्ग निघू शकेल. कुटुंबाचेही सहकार्य मिळेल. शुभ दिनांक- २, ५, ७.
कर्क : उत्साह टिकून राहणार
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी सप्तमस्थानात आहे व आठवडाअखेर तो दशमात जाईल. याशिवाय पराक्रमात गुरू, पंचमात शनी, तर अष्टमात मंगळ-शुक्र आहेत. धनातला राहू शुभसूचक आहे. साधारण अनुकूल अशी ही ग्रहस्थिती आपल्या कामकाजात प्रगती, नोकरी-व्यवसायात उद्दिष्टपूर्ती करून आपला उत्साह टिकवून ठेवणार आहे. तथापि, अष्टमात असलेले मंगळ-शुक्र काही आर्थिक ओढाताणीच्या इशार्‍यासह व्यसनांपासून दूर राहण्याचेही सुचवीत आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलावयास हव्या. प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. प्रिय व्यक्तींशी कलह टाळा. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. कुटुंबात मतभेद टाळा. शुभ दिनांक- १, ५, ६.
सिंह : अडचणींचा निपटारा होणार
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी रवी पंचमात बुधासोबत असून राशिस्थानी राहू आहे. सप्तमात मंगळ व शुक्र आहे. धनस्थानातील गुरू षष्ठ व दशमाला बळ देत आहे. चंद्र सुरुवातीला षष्ठस्थानात असून तो आठवडाअखेर भाग्यात येईल. पंचमातील रवी उत्कर्षाच्या मार्गातील सार्‍या अडचणींचा निपटारा करण्यास समर्थ आहे. मात्र, राशीतील राहू प्रामुख्याने आरोग्य व नोकरीबाबत काही गंभीर त्रास उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरू शकतो. काहींना पोटाचे त्रास जाणवतील. आपल्या सहकार्‍यांशी सहयोग कायम ठेवा. शत्रूच्या कारवायांवर वेळीच अंकुश घाला. आर्थिक आघाडीवर समाधानाचे वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीकडे मात्र जरा लक्ष द्यावे लागेल. शुभ दिनांक- २, ३, ४.
कन्या : व्यवसायात प्रगती, आनंद
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी बुध या आठवड्यातही सुखस्थानात रवीसोबत आहे. तो वक्री व अस्तंगत होता, आता उदित झाला आहे. त्यामुळे त्याचे पाठबळ मिळू लागेल. शिवाय राशीमध्ये गुरू आहे. त्याची पंचम, सप्तम व भाग्यस्थानावर शुभ दृष्टी आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरणात बदल घडून ते आनंदी व उत्साहवर्धक बनविणारे हे ग्रहयोग आहेत. व्यवसायात सावकाश का होईना, मात्र प्रगती अवश्य होऊ लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने एखादा प्रवासयोगही येऊ शकतो. काहींना नोकरीत पदोन्नती, अधिकारवाढ मिळू शकते. कुटुंबात एखादे मंगलकार्य घडू शकेल. मित्र-पाहुण्यांच्या सहवासात कुटुंबातील वातावरण सौहार्द्रपूर्ण होण्यास हातभारच लागेल.
शुभ दिनांक- ४, ५, ६.
तूळ : मुलांसाठी उपयुक्त काळ
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी शुक्र मंगळासोबत पंचमस्थानात आहे. धनस्थानात शनी व व्ययस्थानात गुरू आहे. चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर सप्तमात येणार आहे. विशेषतः मुलांच्या संबंधाने काही महत्त्वपूर्ण घटना घडविणारा हा आठवडा राहू शकतो. काहींच्या स्वभावात जरा तीव्रता निर्माण होऊ शकते, मात्र सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर काही त्रास आपोआपच कमी होऊ शकतील. कोणाचेही मन बोलून दुखवू नका. कुसंगती, व्यसने टाळावीत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायात काही लाभकारी करार व्हावेत. कुटुंबातील वाद, मतभेद सामोपचाराने मिटू शकतील. युवांना विवाह जुळून उपयुक्त योग संभवतात. शुभ दिनांक- २, ३, ७
वृश्‍चिक : अर्थभान ठेवणे आवश्यक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी मंगळ शुक्रासोबत सुखस्थानात आहे, तर राशिस्थानी शनी आहे. शनी- मंगळाचा परिवर्तनयोग सध्याही कायम आहे. गुरू लाभस्थानातून पंचमावर शुभ दृष्टी ठेवून आहे. चंद्र पराक्रमस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर षष्ठात येणार आहे. आपले मनोबल व उत्साह टिकून राहणार आहे. व्यवसाय व नोकरीत आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवण्याच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबात आपला वट राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. त्यात आपण सतर्क राहायला हवे. कलह-वादविवाद टाळायला हवेत. मकरसंक्रांतीला रवी धनस्थानी येईल. हा बदल आपल्याला चांगला आर्थिक लाभ देऊ शकेल.
शुभ दिनांक- ४, ५, ६.
धनू : आर्थिक आघाडीवर बलवत्ता
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी गुरू दशमस्थानात असून, राशिस्थानात सध्या सप्तमेश बुध व रवी आहेत. पराक्रमात शुक्र, मंगळ व व्ययात शनी आहे. धनस्थानातून चंद्राचे भ्रमण सुरू होत असून, तो आठवडाअखेर पंचमस्थानात येणार आहे. या आठवड्यात आर्थिक आघाडीवर बलवत्ता राहावी. साडेसातीमुळे येणार्‍या प्रतिकूलतेवर मात करून पुढे वाटचाल करण्याची हिंमत देणारा हा काळ आहे. कुटुंबात मंंगलकार्याची मुहूर्तमेढ व्हावी. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करून आपला वरचष्मा निर्माण करू शकता. व्यावसायिक स्पर्धेत आघाडी राहील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील. कौतुक-मानसन्मानाचा लाभ मिळेल. काहींना नोकरीत बदल संभवतात. शुभ दिनांक- १, २, ३.
मकर : व्यावसायिक व आर्थिक प्रगती
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी शनी लाभस्थानी असून धनस्थानात योगकारक शुक्र व मंगळ आहे. भाग्यात गुरू आहे, शनी-मंगळाचा परिवर्तनयोग आहे, तर चंद्र आपल्याच राशीतून अनुकूल भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर सुखस्थानात जाणार आहे. व्यावसायिक यशाचा व आर्थिक प्रगतीचा हा आठवडा दिसतो. जोडीदाराचे व्यावसायिक सहकार्य तसेच भागीदारीच्या व्यवसायात यश मिळण्याचे योग प्रबळ होताना दिसतात. मकरसंक्रांतीला रवी आपल्या राशीत येणार असल्याने नोकरीत चांगले योग यावेत. काहींना लांबच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीची काळजी घ्यायलाच हवी. पुरेशी खबरदारी घेऊन खर्च करायला हवेत. शुभ दिनांक- १, ४, ७.
कुंभ : कार्यसिद्धी व मानसिक समाधान
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला राशिस्वामी शनी दशमस्थानात असून राशीत मंगळ, शुक्र व केतू आहेत. गुरू अष्टमात आहे. चंद्र व्ययस्थानातून या आठवड्यातील भ्रमण सुरू करणार असून तो अखेरीस पराक्रमस्थानी जाईल. हा आठवडा आपणांस कार्यसिद्धी व मानसिक समाधान देणारा आहे. मकरसंक्रांतीला रवी आपल्या व्ययस्थानात जाणार आहे, त्यामुळे काही अचानक खर्चवाढीचे योग संभवतात. तेव्हा सावध असावे. कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील. काहींच्या स्वभावात तीव्रता निर्माण होऊ शकते, त्यामुळे मित्र व सहकार्‍यांशी मतभेद निर्माण होण्याचा धोका राहील. कोणाचे मन दुखवू नका. प्रकृतीविषयक चिंता निर्माण होऊ शकते. औषध-पाणी, पथ्ये सांभाळली पाहिजेत. शुभ दिनांक- २, ३, ४
मीन : व्यवसायात नवनवीन संधी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राशिस्वामी गुरू सप्तमस्थानात असून व्ययात मंगळ-शुक्र-केतू आहे. भाग्यस्थानात शनी व दशमात रवी-बुध आहेत. या आठवड्यात चंद्र आपल्या लाभस्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर धनस्थानात येणार आहे. या अनुकूल ग्रहमानाचा फायदा व्यवसायात किंवा नोकरीत नवनवीन संधी लाभण्याच्या रूपाने दिसून येईल. आर्थिक आवक उत्तम राहील. प्रतिष्ठा वाढेल. मकरसंक्रांतीनंतर आपले हितशत्रू जोर धरण्याच्या प्रयत्नात राहतील, त्यांना वेळीच आवर घालायला हवा. वाहने सांभाळून चालवा. रस्त्यावर सदैव सतर्क राहा. जुना त्रास असलेल्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रकृती सांभाळायला हवी.
शुभ दिनांक- ५, ६, ७.
मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६