कलेतील प्रतीकात्मक चिंतन

0
189

कलावंत प्रतिमांच्या माध्यमातून चिंतन करतो. प्रतिमा म्हणजे एक लाक्षणिक व रूपकात्मक विचार होय. या विचारातून, एकीतून दुसर्‍या अद्भुत घटनेचा उदय होतो. कलावंत असे मिलन घडवून आणतो. यातूनच त्या घटनांवर नवीन प्रकाश पडतो. प्रतिमा चिंतनातून अभिव्यक्त झालेल्या अशा लोकविलक्षण घटनेला एक नवजीवन प्राप्त होते.
आनंदवर्धन या भारतीय विचारवंताने नवव्या शतकात ध्वनी सिद्धांत मांडला. ध्वनीचे तीन प्रकार त्याने सांगितले. पहिला अलंकार ध्वनी, दुसरा वस्तू ध्वनी आणि तिसरा प्रकार म्हणजे रस ध्वनी. या तिन्ही प्रकारांची निर्मिती कलात्मक सहयोगाच्या तत्त्वावर झाली. वेगवेगळ्या अशा लोकविलक्षण घटनांमध्ये समानतेचा दुवा शोधणे म्हणजे कलात्मक सहयोगाचे तत्त्व होय. कलात्मक चिंतनाचा प्रतीकात्मक गुणधर्म प्राचीन कलावस्तूत प्रकर्षाने दिसतो. प्राण्यांच्या शरीरावर माणसाचा चेहरा काढणे, त्यांना पक्ष्यांचे पंख लावणे, माणसाच्या शरीरावर हत्तीचे शिर दाखविणे व अशा प्रकारच्या प्रतिमांची रचना करणे म्हणजे कलात्मक चिंतनाचीच उदाहरणे आहेत. पौराणिक चित्रांमध्ये अशा रचना आढळतात. प्राचीन चीनमध्ये सर्पाच्या शरीरावर स्त्रीचे शिर, प्राचीन इजिप्तमध्ये मनुष्याच्या शरीरावर कोल्ह्याचे शिर, प्राचीन ग्रीसमध्ये घोड्याच्या शरीरावर माणसाचे शिर इत्यादी प्रतिमा आढळतात. इथे कलावंताची मानसिकता वस्तूशी एकरूप झाल्याचे प्रत्ययास येते. अशा संयोगाने नवीन उत्पत्ती झाल्याचे निदर्शनास येते.
प्रतिमा एखाद्या घटनेचे वर्णन दुसर्‍या घटनेच्या माध्यमातून करते. दोन्ही स्वतंत्र प्रकारच्या घटना असतात. कलात्मक चिंतनाचे हेच सत्त्व आहे. एखाद्या वस्तूवर काही लादण्यासाठी ही प्रतिमा नसते; परंतु वस्तूंमधील भेद व त्यातील आंतरप्रक्रिया यातून निघालेली ती एक पद्धतशीर रचना असते.
कलात्मक प्रतिमाची संरचना नेहमीच पारदर्शी असते, असे नाही. तरीसुद्धा त्यात कलात्मक विचार असतो. लिओ टॉल्सटॉय किंवा डोस्टोवस्की या रशियन लेखकांनी आपली पात्रे इतर पात्रांच्या छायेत रंगविली आहेत. एक पात्र दुसर्‍याचे प्रतिबिंब वाटते. ‘वॉर ऍण्डपीस’ या टॉल्सटॉयच्या कादंबरीत प्रिंस ऍण्ड्री त्याच्या नताशावर असलेल्या प्रेमाच्या माध्यमातून चित्रित होते. त्याचे त्याच्या वडिलांच्या असलेल्या संबंधातून व्यक्त होते. अशा अनेक गोष्टींतून त्याचे स्वभावचित्रण प्रत्ययास येते.
प्रतिमा बरेचदा विरुद्ध टोकाच्या, विजोड व विसंगत अशा गोष्टींना जवळ आणते. त्यामुळे विविध वस्तूंमधील संबंध नव्याने जाणवायला लागतात. वस्तूंचा विविध पैलूंवर प्रकाश पडतो.
कलाकार साहचर्याच्या माध्यमातूनदेखील विचार करतो. अन्तोनचे खॉव या रशियन नाटककाराच्या ‘द सीगल’ या नाटकातील ट्रिगोरीन या पात्रास आकाशातील ढग एखाद्या उत्तम पियाओसारखे वाटतात. अशी अनेक उदाहरणं साहित्यात, काव्यात, नाटकात आणि कादंबरीमधून वाचायला व बघायला मिळतात, जिथे एकमेकांशी वास्तव जगतात काहीच संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र येतात आणि एक वेगळीच प्रतिमा आपल्या डौलदार अस्तित्वासह प्रकट होताना दिसते.
प्रतिमेला एखाद्या रॉकेटची उपमा देण्यात येते. असे रॉकेट की,जे एका कक्षेत सोडण्यात आलेले आहे. हे रॉकेट निश्‍चित केलेल्या दिशेने व विशिष्ट कोनातून जाते. अशा वेळेस हे रॉकेट स्वत:चेच तर्क असतात. ते बाहेरून लादलेले नसतात. एखादा कलावंतसुद्धा एखादी प्रतिमा विशिष्ट दिशेने लॉंच करतो. मात्र एकदा असे केले की, तो प्रतिमेच्या कलात्मक खर्‍या खोटेपणाबद्दल विचार करत नाही. प्रतिमेच्या निर्मिती प्रक्रियेत मध्यस्थी करत नाही. प्रतिमा स्वत:चा आकार घ्यायला सुरुवात करते. यात प्रतिमेची स्वत:ची लय असते. या लयीचा शेवट कुठे व कसा होईल, हे सांगता येत नाही. लेखकाला स्वत:ला अनपेक्षित शेवट बघायला मिळतो व त्याचा त्याला स्वीकार करावा लागतो. लिओ टॉल्सटॉयची नैतिक धारणा जरी वेगळी असली आणि यामुळे ‘ऍनाकॅरेनिना’तील कॅरेनिनची बाजू जरी लेखकाला घ्यावीशी वाटत असली तरी एक कलाकार म्हणून त्याला वास्तविक विचारामागाील तर्क मान्य करावा लागला. त्यामुळे अनपेक्षित गोष्टीचा सामना त्याच्याच लेखनात त्याला करावा लागला. अशा प्रकारे प्रतिमा बरेचदा वेगळे वळण घेताना दिसते. ते एक कलात्मक वास्तव असते. वास्तविक वास्तवापेक्षा ते भिन्न असते.
लहान मुले आई-वडिलांशी ज्या प्रमाणे वागतात त्या प्रमाणे लेखकानेच निर्माण केलेली पात्रे त्याच्याशी वागतात. सुरुवातीला लहान मुले आई-वडिलांच्या मताप्रमाणे वागतात. मात्र त्यांचे त्यांना कळायला लागल्यावर ते स्वत:च्या मताने वागतात. त्याच प्रमाणे लेखकाने निर्माण केलेल्या पात्रांना रूप प्राप्त व्हायला लागते, तेव्हा ते स्वतंत्रपणे व स्वत:च्या तर्कानुसार वागतात. लेखकाने तशी मोकळीक घ्यायला हवी. यातूनच अनेक शक्यता निर्माण होतात. अपेक्षेपलीकडील गोष्टी घडतात. प्रतिमेने आता स्वत: आकार घेतलेला असतो. ते प्रतिमेचे कलात्मक रूप असते.
विज्ञान व तर्कशास्त्रात प्रत्येक गोष्ट निश्‍चित व असंदिग्ध असते. मात्र कलेचे अर्थघटन अनेक प्रकारे केले जाऊ शकते. याचे कारण असे की,कलात्मक प्रतिमा आशय व रचनेच्या बाबतीत गर्भश्रीमंत असते. त्यात स्पष्टता व निश्‍चितता नसल्यामुळे ती अनेक प्रकारांनी हाताळली जाऊ शकते.
अमेरिकन लेखक हेमिंग्वेच्या मते कला एखाद्या हिमपर्वतासारखी असते. त्यातील महत्त्वाचे सत्त्व अवजड स्वरूपात आत खोलवर असते. अगदी पाण्याच्या आत. इथेच वाचक अवलोकनाकडून सृजनतेकडे वळतो. कलाकार अशा प्रकारे वाचकाला किंवा प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. वाचक नवीन शोध जरी घेत नसला तरी तो विचार प्रवृत्त बनतो. त्याला चालना मिळते. असे असले तरी सृजनकर्ता आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवतो. त्याच्यात तो खिंड पडू देत नाही व अशा प्रकारे त्याच्या सृजनात्मक कल्पनेची व्याप्ती अधिकच वाढते.