याला काय म्हणावे…?

0
234

आजपासून इंग्रजी नवीन वर्ष सुरू होते आहे. कालपर्यंत आपण गेल्या वर्षात होतो. आज एकदम नव्या वर्षात प्रवेश करीत आहोत. अर्थात कित्येक बिचार्‍यांना कालची रात्र तरी स्मरणात असेल की नाही कोण जाणे…! नव्या वर्षाचे स्वागत साहेबाच्या पद्धतीने करताना आपण स्वत्व आणि स्वाभिमान या गोष्टींना कधीच तिलांजली दिली आहे. दारू प्यायल्याशिवाय आणि धांगडधिंगा घातल्याशिवाय आपल्याकडे नव्या वर्षाचे स्वागत होत नाही ना..! ज्या गोर्‍यांनी वर्षानुवर्षे आपल्या पूर्वजांवर अन्याय व अत्याचार केले. इंग्रज आणि पोर्तुगीजांनी येथून जावे म्हणून सहस्रावधींनी संघर्ष केला, गोळ्या झेलल्या, फासाला कवटाळले, सत्याग्रहात डोकी फोडून घेतली, इन्क्विझिशनचा छळ सोसला आणि मोठ्या हाल-अपेष्टातून स्वराज्य मिळवले त्यांच्या त्यागाचे आपण चांगले पांग फेडतो आहोत. मध्यरात्रीच्या अंधारात नव्या वर्षाचा सूर्योदय कसा होतो ते असे साजरेकर्ते जाणोत.
२५ डिसेंबरच्या आगेमागे ख्रिसमस शुभेच्छांची रेलचेल उडते. सोशल मीडियातून संदेशांची धामधूम असते. शुभेच्छा देणे गैर आहे असे आमचे अजीबात म्हणणे नाही. पण ही प्रक्रिया उभयपक्षी हवी. आम्ही देखील आमच्या काही ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देतो. ते देखील संपूर्ण वर्षातील हिंदू सणांच्या शुभेच्छा आम्हाला देत असतात. असे काही होत असले तर उत्तम, तथापि बहुतेक ठिकाणी ही एकमार्गी व्यवस्था असल्याचे दिसते. उभय बाजूंनी तसे होत असले तर त्याला खर्‍या अर्थाने सेक्युलरपणा येईल. सध्या चालू आहे तो फेक्युलरपणा होय. तशात इस्कॉनने हिंदूंची सद्गुणविकृती उचलत राधा-कृष्णाच्या मूर्तीला सॅण्टाक्लॉजचे कपडे चढवले. असे ते प्रतिवर्षी करतात. ते पाहून अन्य काहींनी तो आदर्श उचलला.
ते पाहून सोशल मीडियावरील एक जागरूक अभ्यासिका अपर्णा लळिंगकर, या खूप छान व्यक्त झाल्या आहेत. लेखिकेच्या मतांना नक्कीच वजन आहे. कारण त्या वाढल्या आपल्या संस्कृतीत आणि त्यांनी भिन्न संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीशी विवाह केला आहे. सध्या ते उभयता डॉक्टरेट करण्यासाठी तिसर्‍याच संस्कृतीत राहात आहेत. म्हणजे भरपूर शिक्षण असलेली आणि जग पाहिलेली अशी ही विदुषी आहे. तरीही आपल्या मूळ गोष्टींची नाळ तिने तुटू दिलेली नाही हे विशेष. त्यांचे मत खाली देत आहे, अर्थात त्यांच्या अनुज्ञेने हे सांगायला नकोच.
राधा-कृष्णाच्या मूर्तीला सॅण्टाक्लॉजचे कपडे घातलेले छायाचित्र जेव्हा समोर आले तेव्हा हाच प्रश्‍न मनात आहे, की हे असे हिंदूंच्या देवतांच्या बाबतीतच का होते? आत्तातर मी एका ज्यूबहुल प्रदेशात आहे. याच प्रदेशात येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान आणि अरब मुस्लिमांचेही पवित्र स्थान एकाच जागी किंवा एकाच शहरात आहे. पण ज्या प्रकारचा ख्रिसमसचा उत्साह हिंदूबहुल भारतात मी पाहते, त्याप्रकारे मला २५ डिसेंबरचा ख्रिसमस साजरा करण्याचा उत्साह इथे अजीबात दिसत नाही. हेच ईद किंवा इतर मुस्लिम सणांच्या बाबतीतही आहे.
इथे टेक्निऑन, वाईजमन इन्स्टिट्यूट सारख्या उत्तम शैक्षणिक संस्थांमधे देखील आज सुट्टी ख्रिसमस म्हणून नसून ज्यू धर्मीयांच्या हनुका या सणासाठी आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी मी माझ्या काही सहकार्‍यांशी २५ डिसेंबरच्या सुट्टीबाबत बोलत होते तर त्यांना त्या दिवशी हनुका आहे इतकेच माहिती होते किंवा निदान ते तसे भासवत तरी होते.
आपल्याकडे इतर धर्मांना फारच प्रोत्साहन देऊन आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखविण्याची चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत लोक इतके आंधळेपणाने पुढे जातात की ते हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीलाच आक्षेप घ्यायला लागतात. म्हणजे हिंदूंच्या सण, प्रथा, श्रद्धा हे सगळे अतार्किक, पर्यावरणास घातक, आरोग्यास घातक, अंधश्रद्धा, खोटेपणा, भोंदूगिरी असेच दिसते. कित्येक हिंदू तसे बोलून दाखवतात. पण त्यांना ख्रिश्‍चन धर्मातील अंधश्रद्धा, अतार्किक समज, आरोग्यास घातक, पर्यावरणास घातक, खोटेपणा, भोंदूगिरी असे काहीच दिसत नाही.
उदाहरणार्थ, येशूचा जन्म २५ डिसेंबरचा नसून मार्च महिन्यातील आहे तरी सगळे तो येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. हा खोटेपणा नाही का? तरी स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणारे आणि डाव्या विचारसरणीचे हिंदू ख्रिसमस साजरा करतात. त्याविषयी कोणतेही प्रश्‍नचिन्ह उपस्थित न करता,असे का?
सॅण्टाक्लॉज येतो आणि मुलांना भेटवस्तू देतो ही अंधश्रद्धा आहे. तरी आपले अनेक हिंदू या प्रथेचे किंवा संकल्पनेचे समर्थन करतात. आपल्याकडे वर्तमानपत्रांत, साप्ताहिकांमधे ख्रिसमस शुभेच्छांच्या जाहिराती, ख्रिसमसचे महत्त्व अधोरेखित करणारे लेख असतातच. बरेच हिंदू आताशा स्वत:च्या घरात ख्रिसमसचे झाड आणून, केक कापून, आपल्या मुलांना सॅण्टाक्लॉजच्या टोप्या-कोट घालून ख्रिसमस साजरा करताना दिसतात.
आपण ख्रिश्‍चन लोकांची किंवा पाश्‍चात्त्यांची लग्नात किंवा इतर कोणत्याही समारंभात केक कापणे ही प्रथा इतकी सहज उचलली आहे की आजकाल बहुतांश साखरपुडे, लग्न समारंभ, वाढदिवस आदींमधे केक कापले जातात. पण मी आजपर्यंत एकाही ख्रिश्‍चन अथवा पाश्‍चात्य व्यक्तीला वाढदिवसाला निरांजन घेऊन ओवाळताना, दिवाळीत अभ्यंग स्नान करताना, घराबाहेर आवर्जून रांगोळी काढताना, लग्नात मंत्रोच्चार करताना ऐकलेले किंवा पाहिलेले नाही.
इतर धर्मीय कितीही आधुनिक झाले, प्रगत झाले, जागतिकीकरणात सामील झाले तरी ते आपला धर्म आणि आपली संस्कृती सोडत नाहीत. मग हे हिंदूंच्याच बाबतीत का होतं? ज्यू लोकांमधील डावेदेखील ज्यूंच्या अनेक प्रथा आणि समजुतींना विरोध करत असले तरीही स्वत:ला ज्यू समजतात. पण डाव्या विचारसरणीचे हिंदू स्वत:ला हिंदू समजतच नाहीत. अंगावर पाल पडल्यावर ती कशी झटकली जाते तसे ते स्वत:ला हिंदू धर्मापासून वेगळे करतात. असे का होते? याला हिंदूंचा अति सहिष्णूपणा, अति मवाळपणा, अति सर्वसमावेशक स्वभाव म्हणायचा की महामूर्खपणा म्हणायचा, स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचा स्वभाव म्हणायचा, स्वत:च्याच मुळावर उठण्याचा बावळटपणा म्हणायचा?
हे सर्व वाचून झाल्यावर आपण विचार न करता विसरून जाणार असलो तर सगळा आनंदच आहे. मग गुढीपाडव्याला नाके मुरडून, आज मात्र प्रत्येक येणार्‍या-जाणार्‍याला, मित्र मंडळींना आणि कोणी भेटले नाही तर अगदी फोन करून आवर्जून म्हणा, हॅपी न्यू ईयर……!!!

डॉ. सच्चिदानंद शेवडे