निवडणुकीआधीच सायकल पंक्चर?

0
158

दिल्लीचे वार्तापत्र
उत्तरप्रदेशसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली असली तरी उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीची सायकल निवडणुकीआधीच पंक्चर झाली आहे. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीतील दोन्ही गट सायकलवर दावा करत असले तरी पंक्चर दुरुस्त करण्याची कोणाची तयारी नाही. समाजवादी पार्टीतील संघर्ष जास्तच चिघळत चालला आहे. कोणत्याही एका गटाने माघार घेतल्याशिवाय हा संघर्ष थांबण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, सध्यातरी दोन्ही गट अतिशय आक्रमक पवित्र्यात आणि माघार घेण्याच्या स्थितीत नसल्यामुळे या संघर्षाची परिणती समाजवादी पार्टीत फडलेल्या फुटीवर औपचारिक शिक्कामोर्तब होण्यावर होणार आहे. समाजवादी पार्टीत पडलेल्या या फुटीचा परिणाम त्या पक्षासोबत राज्यातील निवडणूक समीकरणांवरही होणार आहे.
समाजवादी पार्टीत गेल्या चार महिन्यांपासून अंतर्गत सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची प्रदेश अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर या सत्तासंघर्षाचा स्फोट झाला, अध्यक्षपद त्यांचे काका शिवपाल यादव यांच्याकडे सोपवण्यात आले. याचा बदला म्हणून अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांसह काही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. विशेष म्हणजे शिवपाल यादव अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री होते, पण या दोघांतील संबंध सुरुवातीपासूनच तणावपूर्ण होते. समाजवादी पार्टीच्या व्यापक हितासाठी या दोघांतील संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न मुलायमसिंह यादव यांच्यासह कोणीच केला नाही. समाजवादी पार्टीतील या सत्तासंघर्षाला शिवपाल यादव यांची वाढती राजकीय महत्त्वाकांक्षा, तसेच मुलायमसिंह यादव यांची अनाकलनीय हतबलता जबाबदार आहे.
सत्तासंघर्षाच्या मुळाशी न जाता आतापर्यंत वरवरची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे समाजवादी पार्टी राज्यातील ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीयदृष्ट्या अडचणीत आली आहे. याची किंमत तिला निश्‍चितपणे चुकवावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ऐक्याच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग समाजवादी पार्टीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, त्याने फार काही साध्य होणार नाही. कारण समाजवादी पार्टीच्या दोन्ही गटातील संबंध विकोपाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांनी एकत्र येण्याचे नाटक केले तरी त्यावर राज्यातील मतदारांचा किती विश्‍वास बसेल, हे सांगता येणार नाही.
समाजवादी पार्टीच्या स्थापनेतील, आजवरच्या राजकीय प्रवासातील आणि प्रगतीतील मुलायमसिंह यादव यांचे योगदान कोणीच नाकारू शकणार नाही. मुलायमसिंह यादव यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल पूर्ण आदर ठेवून समाजवादी पार्टीच्या आजच्या दुरवस्थेला तेच जबाबदार असल्याचे नमूद करावेसे वाटते. मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीला घराणेशाहीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवले, हीच घराणेशाही आता समाजवादी पार्टीच्या मुळावर आली आहे.
मुलायमसिंह यादव यांनी २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला बहुमत मिळवून दिल्यानंतर अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री केले. पण अखिलेश यादव मुख्यमंत्री आहेत, याचे भान नंतर मुलायमसिंह यांना राहिले नाही. मुख्यमंत्रिपदावर नवखे असल्यामुळे सुरुवातीला अखिलेश यादव यांच्या हातून काही चुकाही झाल्या असतील. पण या चुकांसाठी अखिलेश यादव यांचा जाहीर पाणउतारा करण्यास मुलायमसिंह यादव यांनी सुरुवात केली. अखिलेश यादव आपला मुलगा असला तरी तो आता राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मुलगा म्हणून नाही, पण त्याच्या पदाचा मान आपण राखला तर पक्षातील अन्य लोक आणि नोकरशाहीही राखेल, याचे भान मुलायमसिंह यांना राहिले नाही. त्यामुळेच अखिलेश यादव आतून दुखावल्या गेले.
अखिलेश यादव यांनी केलेल्या चुकांसाठी बंद दरवाज्याच्या आड त्यांचा कान पकडणे मुलायमसिंह यांना शक्य होते, याला अखिलेश यादव यांचीही हरकत राहिली नसती. पण मुलायमसिंह यादव यांचा रोख अखिलेश यादव यांची चूक दुरुस्त करण्यापेक्षा, त्यांना योग्य मार्गावर आणण्यापेक्षा अपमानित करण्यावर जास्त होता. विशेष म्हणजे हे मुलायमसिंह यादव यांनी स्वत:हून केले असे नाही, तर त्यांना यासाठी बाध्य करण्यात आले. हे करण्यात शिवपाल यादव, अमरसिंह आणि मुलायमसिंह यादव यांच्या दुसर्‍या पत्नी साधना यादव यांची मोठी भूमिका होती. आज मुलायमसिंह यादव पूर्णपणे या त्रिकुटाच्या आहारी गेले आहेत. आपल्या मनाने निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसले आहेत.
मुलायमसिंह यादव यांनी पक्षातील दोन्ही गटांना सारख्या अंतरावर ठेवले असते, तर आज त्यांच्यावर ‘हेच फळ काय मम तपाला’ असे म्हणत आपल्या जिवंतपणीच समाजवादी पार्टीच्या फुटीचे साक्षीदार होण्याची वेळ आली नसती. आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडीही झाली नसती.
समाजवादी पार्टीत मतैक्य होण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. कारण मुलायमसिंह यादव शिवपाल यादव यांना समाजवादी पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदावरून हटवू शकत नाही, अमरसिंह यांना आपल्यापासून दूर करू शकत नाही. जोपर्यंत ते या दोघांना दूर करणार नाही, तोपर्यंत समाजवादी पार्टीत ऐक्य प्रस्थापित होऊ शकणार नाही. दुसरीकडे अखिलेश यादवही प्रो. रामगोपाल यादव यांना दूर करू शकणार नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीतील फूट आता राजकीय अपरिहार्यता झाली आहे. त्यामुळेच मुलायमसिंह यादव यांना निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागत सायकल हे समाजवादी पार्टीचे निवडणूक चिन्ह आपल्या गटाकडे कायम ठेवण्याची मागणी करावी लागली.
मुलायमसिंह यादव आता समाजवादी पार्टीचा भूतकाळ तर अखिलेश यादव भविष्यकाळ आहे, त्यामुळेच अखिलेश गटाने बोलावलेल्या अधिवेशनात पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि ९० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार उपस्थित राहिले होते. त्यामुळेच आपला गट म्हणजेच मूळ समाजवादी पार्टी असल्यामुळे आपल्याला सायकल हे समाजवादी पार्टीचे निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी अखिलेश यादव गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग या दाव्यावर सध्यातरी कोणताच निर्णय घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे सायकल या निवडणूक चिन्हासाठी तरी दोन गटांना आपण एकत्र असल्याचे नाटक निवडणूक आयोगाकडे करावे लागेल, अन्यथा सायकल चिन्ह गोठवून निवडणूक आयोगाने समाजवादी पार्टीतील दोन गटांना वेगवेगळे निवडणूक चिन्ह दिले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.
मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल लोकांचा आक्षेप आजही नाही. मात्र, शिवपाल यादव आणि अमरसिंह या जोडगोळीच्या कारवायांना समाजवादी पार्टीतील लोकांचा विरोध आहे. शिवपाल यादव आणि अमरसिंह यांच्यापेक्षा अखिलेश यादव यांच्यासोबत राहणे राजकीयदृष्ट्या फायद्याचे असल्याचे या लोकांना पटले आहे. वाढत्या वयामुळे मुलायमसिंह यादव आता सायकल चालवू शकणार नाही, तर सायकल चालवण्याची क्षमता आता अखिलेश यादव यांच्यात असल्याची समाजवादी पार्टीतील नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि राज्यातील जनतेची खात्री पटली आहे. मतदारांनी समाजवादी पार्टीची सायकल पंक्चर करण्याऐवजी समाजवादी पार्टीच्या नेत्यांनीच केली आहे. येत्या काळात समाजवादी पक्ष आपली पंक्चर झालेली सायकल दुरुस्त करू शकतो का, हे पाहावे लागेल.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७