पाकिस्तानी रडगाणे

0
368

उलटतपासणी
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आल्याची घटना महिनाभर जुनी आहे. नेहमी अशा बाबतीत मुलगी वा पीडित दलित समाजाचा असला, मग त्यावरून काहूर माजवले जात असते. त्याला आजकाल पुरोगामित्व म्हणतात आणि सध्या देशातील माध्यमांनी पुरोगामित्वाची पताका आपल्या खांद्यावर घेतली असल्याने, अशा घटनांना वारेमाप प्रसिद्धी मिळत असते. साहजिकच कोपर्डीच्या घटनेत पीडित मुलगी ही मराठा समाजाची व गुन्हेगार दलित असल्याचे उघडकीस आल्याने, पुरोगामी माध्यमांनी त्याबाबतीत फारसा गाजावाजा केला नाही. किरकोळ बातम्या देऊन हा विषय गुंडाळण्याच्या प्रयास झाला. पण, सोशल माध्यमांमुळे त्याला तडा गेला आणि मराठा समाजात खदखदणारा प्रक्षोभ वेगळ्या मार्गाने उफ़ाळून येऊ लागला. ज्यांनी त्यात पुढाकार घेतला, त्यांनाही दाद द्यावी लागेल. कारण नुसत्या जातीय भूमिकेतून आक्रस्ताळी भाषा बोलली गेल्यास पुरोगामी माध्यमे आपल्याला गुंड, दंगलखोर ठरवण्याचा धोका या मोर्चेकर्‍यांनी नेमका ओळखला होता. म्हणूनच मोर्चाची संख्या डोळे दिपवणारी, पण त्यात साध्या घोषणाही दिल्या जाऊ नयेत, याची काळजी घेतली गेली. मूकमोर्चा असेच त्याचे स्वरूप असल्यावर घोषणाबाजी वा आक्रस्ताळी भाषा बोलली गेली नाही. पण, त्या निमित्ताने जमा होणारी लोकसंख्या बघितली आणि पुरोगामित्वाचा बुरखा टरटरा फाटत केला. सर्वप्रथम या मोर्चाविषयी शंकास्पद प्रतिक्रिया उमटू लागल्या, त्या पुरोगामी गोटातूनच. कारण त्यातून पीडिताला जात-वर्ण नसतो, अशी भूमिका पुढे येऊ लागली होती आणि मागील दोन दशकांत जी जातीय पुरोगामित्वाची भाषा सामान्य माणसाच्या गळी मारली गेली होती, तिचे पितळ उघडे पडू लागले होते. भारतातली जातव्यवस्था ही जणू रा. स्व. संघाचे पाप असल्याच्या देखाव्याला त्यातून तडे जाऊ लागले होते.
गेल्या दोन-तीन दशकांत देशात पुरोगामी सेक्युलर भूमिकेचा मुखवटा लावून जाती-जातीमध्ये भिंती उभ्या करण्याचे रीतसर काम होत राहिले. अर्थात असे काम अनवधानाने चाललेले नाही. त्यात कुणीतरी पैसे व गुंतवणूक करीत असतो. जेणेकरून भारतीय समाजात दुफळी माजेल आणि पर्यायाने भारताला दुबळा करता येईल अशा योजना भारताचे शत्रू योजणारच. पण, तशा योजना त्यांना इथे येऊन उजळमाथ्याने पार पाडता येत नाहीत. साहजिकच त्यासाठी भारतातच आपले हस्तक तयार करावे लागतात. इथल्या कायद्याच्या जंजाळात न फसता अशा हस्तकांना आपल्या धन्याच्या मिठाला जागावे लागत असते. तर असा एक शत्रू आहे पाकिस्तान. त्याचे अनेक हस्तक आज भारतात उजळमाथ्याने जगत असतात आणि नामवंत म्हणून देशविरोधी कर्तव्ये पार पाडत असतात. त्यांचे काम कोण ठरवून देतो? सय्यद तारिक पिरजादा नावाचे एक पाकिस्तानी अभ्यासक विश्‍लेषक आहेत. अधूनमधून अर्णब गोस्वामीच्या टाईम्स नाऊ वाहिनीवर त्यांचे दर्शन होत असते. त्यांनीच मागील वर्षी एक ट्वीट केले होते आणि एकाच वेळी राहुल गांधी व अरविंद केजरीवाल यांच्याही खात्याशी ते जोडलेले होते. त्यात हे पिरजादा म्हणतात, नरेंद्र मोदींना रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदू समाजाची जातीय तत्त्वावर आणखी विभागणी करणे. केजरीवाल आणि राहुल गांधी ते काम झकास पार पाडत आहेत. पिरजादा किंवा तत्सम पाकिस्तानी मंडळी तिथल्या हेरखात्याच्या इशार्‍यावर काम करतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मग इथे त्यांचे हस्तक त्यापासून प्रेरणा घेऊन काम करीत असतात. गेल्या काही वर्षात विविध जातीय अस्मिता उभ्या करून त्याला हिंदू वर्णव्यवस्था कारण असल्याचा देखावा पद्धतशीरपणे उभा करण्यात आला. त्याचे हेच कारण होते. त्यासाठी त्याच भूमिकेला पुरोगामी मुखवटा चढवला गेला होता.
विविध प्रांतामध्ये अशा रीतीने जातीय विभागणी करायची आणि त्यांच्या अस्मिता जागवून भारतीयांना विविध लहानमोठ्या गटात विभागून टाकायचे, असा त्यामागे डाव होता. त्यासाठी महाराष्ट्रात दलित व मराठा अशा जातींना फूस लावण्याचाही जबरदस्त प्रयत्न झाला. कधी नक्षलवादी मंडळींना पुढे करून दलितांना गुंडाळण्याचा खेळ झाला, तर कधी मराठा अस्मिता म्हणजे ब्राह्मणविरोध असे नाटक रंगवले गेले. अकस्मात शिवरायांना मुस्लिमांचे कनवाळू ठरवताना अफ़जल खान वा औरंगजेब यांची कौतुके सुरू झाली. त्याला आडवा येईल त्याच्यावर ब्राह्मण्याचा आरोप होऊ लागला. त्याच वेळी अशी भूमिका मांडणार्‍यांनी मुंबई हल्ल्यात करकरे यांच्यासारख्या अधिकार्‍याची हत्याही भारतीय हेरखात्यानेच घडवून आणल्याच्या वावड्या उडवल्या. ही बाब सोपी नाही, अकस्मात घडलेली नाही. त्यामागे पूर्णपणे शिजलेले कारस्थान होते आणि त्याला पुरोगामी मुखवटा चढवण्यात आला होता. म्हणूनच मराठा अस्मितेला फ़ुले-शाहू-आंबेडकर अशी बिरुदावली जोडली गेली. एकीकडे मराठा समाजाला पुरोगामी बिरुदावली जोडली गेली, तर दुसरीकडे दलितांच्या माथी आंबेडकरांच्या नावे मार्क्सवाद-नक्षलवाद मारला जाऊ लागला. त्यातून समाजाच्या विविध घटकांमध्ये वैरभावना जोपासण्याला चालना दिली जात होती. अशा भ्रमातून कोपर्डीच्या घटनेने मराठा समाजाला ओढून बाहेर काढले आहे. फ़ुले-शाहू- आंबेडकर या बिरुदावलीच्या मुखवट्यामागून मराठ्यांची अस्मिताच भरकटवली जात होती. तिला शह दिला गेला आहे. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा प्रतिष्ठेचा विषय बनवून मराठा समाजाच्या डोळ्यांत धूळफ़ेक करण्याचा खेळही त्याचाच एक भाग होता. त्या एकूणच पुरोगामी पाकिस्तानी कारस्थानाला कोपर्डीच्या घटनेने शह दिला आणि प्रस्थापित मराठा नेतृत्वाला झुगारून खरी मराठा अस्मिता उफ़ाळून आली आहे.
म्हणून तर पुरोगाम्यांनी त्यावर पहिली तीव्र प्रतिक्रिया देत, या मराठा मोर्चाकडे शंकेने बघायला आरंभ केला. पण, त्यामुळे कुणी दलित वा अन्य मागास समाजात शंका घेतली गेली नाही. आता प्रथमच रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्या मोर्चाला विरोध करणारी प्रवृत्ती संघाची असल्याचा आरोप केला आहे. अर्थात, त्यांनीच बाबासाहेबांचे विचार नक्षलवाद्यांसाठी सोडून दिले असल्याने, त्यांच्या आरोपाची गंभीर दखल घेण्याचे कारण नाही. पण, त्यामागचा हेतू स्पष्ट होणे अगत्याचे आहे. मराठा व दलित यांच्यात संघाला दुफ़ळी माजवण्याचे कारणच नाही. किंबहुना अशा सर्व भारतीय जाती-जमातींची वज्रमूठ बांधण्याचा मनसुबा संघाचा आहे. त्याच संघाने मराठाविरोधी दलित आवाज उठवण्याचा प्रश्‍नच कुठे येतो? उलट, मराठ्यांच्या मूकमोर्चाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळताना बघून संघाला आनंदच होईल. कारण मागील दहा-बारा वर्षात जी संघविरोधी पुरोगामी हवा निर्माण करण्यात आली, तिचा फ़ुगा अशा मोर्चातून फ़ुटत चालला आहे. शिवरायांना मुस्लिमांचे तारणहार व हिंदुत्वाशी महाराजांचा संबंध नाही, असे भासवण्याचे पुरोगामी नाटक रंगलेले होते. त्याला अशा मराठा अस्मिता व मोर्चातून परस्पर शह दिला जात आहे. अशा मोर्चात खुलेआम भगवे ध्वज फडकवले जात असल्याने पुरोगामी वा प्रकाश आंबेडकर विचलित झालेत, ते समजू शकते. कारण या अफाट, विराट मोर्चाला भगवा ध्वज खांद्यावर घेण्यात अस्मिता सापडली आहे. किंबहुना त्यातूनच पाकिस्तानी व पुरोगामी संयुक्त कारस्थान हाणून पाडले जाते आहे. मग त्याच्या विरोधात दलितांना उभे करण्याचा विषय कुठे येतो? संघाला व मोदींना रोखण्याचा पिरजादा वा पुरोगाम्यांचा एकमेव मार्ग उद्ध्वस्त होत असेल, तर त्याचे रडगाणे संघाला शिव्याशाप देऊनच रडता येते ना? पण, वस्तुस्थिती अशी आहे की, मराठा मोर्चा हे पुरोगाम्यांच्या मागील दोन दशकांतील मेहनतीवर ओतले जाणारे पाणी आहे.
– भाऊ तोरसेकर