काही हळवे किस्से!

0
183

तीन प्रसंग. कोणीतरी सांगितलेले. कुठेतरी एखादी व्हिडीओ क्लीप बघितलेली. तसा त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही; आणि असलाच तर फक्त माणुसकीचा आहे. सारेच प्रसंग हळव्या मनाला साद घालणारे. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे. आपापल्या व्यापात गुंतलेल्यांना क्षणभर थांबून विचार करायला लावणारे…
प्रसंग पहिला
रस्त्याने जाणारी एक व्यक्ती. अत्यंत साधारण. चार घास खावेत म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलकडे बाईक वळते. गाडी स्टँडवर उभी करून आत शिरण्याच्या तयारीत असताना बाहेर भीक मागत बसलेल्या एका आई आणि तिच्या दोन मुलांकडे त्याचे लक्ष जाते. इतरांसारखाच तोही त्यांना मागे टाकून आत जातो. त्या माउलीला यात नवल वाटण्याचे काही कारण नव्हते. रोजचाच अनुभव तो. आत जाताना कुणी या भिकार्‍यांची दखल घेण्याचे प्रयोजन नसतेच. हं! बाहेर पडताना जाणवलंच कधी तर खिशात गेलेले हात दानासाठी सरसावतात. मग कधी कलदार तर कधी बंदा रुपया पदरी पडतो. त्यामुळे बाईक उभी करून आत गेलेल्या चाळीशीतल्या त्या व्यक्तीच्या वागणुकीचे नवल तसे नव्हतेच. दरम्यान, इकडे ही आत गेलेली व्यक्ती एक टेबल मिळवून ऑर्डर देण्याच्या तयारीत असताना, अचानक वेटरला थांबण्याचा इशारा करून बाहेर येते. भीक मागत बसलेल्या त्या मुलांना हात धरून आत घेऊन जाते. अर्थात आईलाही आवतन होतंच. चार जणांसाठी व्यवस्था असलेल्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर आता हे चौघेही बसलेले. मुलांना काय हवे ते विचारून ऑर्डर दिली जाते.
अगदीच एखाद्याने उदार मनाने मोठ्या रकमेची नोट झोळीत टाकण्याचा अनुभव क्वचितप्रसंगी वाट्याला यायचा. एखाद्वेळी कुणी तिथनं खरेदी केलेल्या खाद्य पदार्थांचं एखादं पुडकं समोरच्या भांड्यात टाकून निघून जायचं. पण हे असं? झगमगाटात हरवलेल्या त्या हॉटेलातला प्रवेशही नाही म्हणायला नवलाईचाच होता त्यांच्यासाठी! इथेच बाहेर बसून रोज भीक मागतो आपण आणि आज थेट आत बाकड्यांवर? ही जाणीव मनाचा संकोच काही थांबू देईना! एवढ्यात वेटर खाण्याचे पदार्थ घेऊन आला. पोरं तर भरलेल्या प्लेट्‌स समोर बघून नुसती तुटून पडली. हा आपला कौतुकानं बघतोय् नुसता त्यांच्याकडे. तोच कशाला, तिकडे दूर गल्ल्यावर बसलेल्या मालकाचेही या प्रकाराचे मोठ्या कुतूहलाने निरीक्षण चाललेले. श्रीमंती थाटातल्या या रेस्टॉरंटमध्ये हा कोण भिकार्‍यांना सोबतीला बसवून खाऊ-पिऊ घालतोय्… असा भाव मात्र कुठेही नव्हता! उलट त्याने मागितलेला प्रत्येक पदार्थ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या, ते व्यवस्थितपणे वाढण्याच्या सूचना देणे चालले होते त्यांचे आपल्या कर्मचार्‍यांना.
खाणे संपले. पोरांच्या चेहर्‍यांवर उमटलेला प्रसन्न भाव टिपताना ती माउली तर जणू कृतकृत्य झाली होती. गेल्या कित्येक दिवसांत असे घडले नव्हते. ‘त्या’ व्यक्तीसाठी मात्र ही बाब नवी नसावी बहुधा. कारण, आपण काही जगावेगळे केले असल्याच्या भावनेचा लवलेशही त्याच्या चेहर्‍यावर नव्हता. काहीच घडले नसल्याच्या थाटात तो काऊंटरवर गेला. बिल अदा करायला म्हणून त्याने स्वत:चे वॉलेट उघडले. कित्येकांच्या लक्षातही न आलेला, ज्यांच्या आला ते कौतुकाने बघत असलेले, असा हा प्रसंग. मालकाने संगणकावर बिल तयार केले. घेतल्या गेलेल्या प्रत्येक पदार्थाची नोंद त्यावर होती. बिलाच्या एकूण रकमेचा आकडाही अर्थातच त्यावर होता. फक्त ते बिल त्या व्यक्तीच्या हातात देण्यापूर्वी मालकाने जवळचा एक स्टँप त्यावर मारला. ‘फ्री’ असा उल्लेख असलेला… या बिलातला एक पैसाही हॉटेल मालकाने घेतला नव्हता. ‘त्या’ व्यक्तीच्या निर्विकार चेहर्‍यावर आता मात्र भाव उमटले होते… आश्‍चर्य अन् आनंदाचेही… जगात चांगल्या माणसांची वानवा नाही, एवढाच त्याचा मथितार्थ होता…
प्रसंग दुसरा
कुठल्याशा झोपडपट्टीत राहणारा एक शाळकरी मुलगा. अंगावर मळकट कपडे. जमेल तिथे ठिगळ लावलेले. पायातली स्लीपर कायम दगा देणारी. कधी या, तर कधी त्या पायातल्या चपलेचा निघालेला पट्टा लावण्यासाठी थांबताना नुसता त्रागा होतो मनाचा. आताही चपलेचे झेंगट सांभाळतच पायपीट चाललेली. आज स्वारी रेल्वे स्थानकाच्या दिशेने वळली होती. फलाटावर येत असताना चपलेचा पट्टा पुन्हा एकदा निघाला. खाली बसून तो नीट लावण्याची धडपड चालली होती. तेवढ्यात त्याचे लक्ष तिथल्या एका बाकड्यावर बसलेल्या, त्याच्याच वयाच्या एका मुलाच्या पायातील बुटांकडे जाते. काळेशार, चकाकणारे त्याचे ते बुट अन् याच्या पायातली तुटकी चप्पल. तुलनाच नव्हती दोघांत. याची नजर त्या बुटांवरून हलता हलत नाही.
एवढ्यात गाडी फलाटावर येते. उतरणार्‍यांच्या गर्दीतून वाट काढत गाडीत चढण्यासाठीची काहींची धडपड. बुटं घातलेला तो मुलगाही सोबतच्या व्यक्तीचा हात धरून गाडीत चढण्यासाठी धडपडतोय्. त्या धडपडीत त्याच्या एका पायातला बुट निसटतो. इकडे गाडी सुटण्याची वेळ झालेली. अशात मागे जाऊन, निसटलेला तो बुट पुन्हा पायात घालण्यासाठी तर वेळच उरला नव्हता. बुट की गाडी? या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल गाडीची निवड होते. गाडी सुरू झाली. चढल्यावरही गाडीच्या दाराशीच उभ्या राहिलेल्या मुलाच्या चेहर्‍यावर इतका चांगला बुट गमावल्याचे दु:ख. त्याच्या बुटांकडेच लक्ष असलेला तो गरीब मुलगा आता सरसावतो. दूर कुठेतरी जाऊन पडलेला तो एक बुट त्याच्या ‘मालकाला’ देण्यासाठी. गाडीचा वेग हळूहळू वाढत असल्याने बुट घेऊन धावण्याचा त्याचाही वेग वाढलेला. इकडे दाराशी उभ्या असलेल्या मुलाच्या मनातही बुट मिळण्याची आशा बळावलेली. पण त्या मुलाच्या पळण्याच्या अन् गाडीच्या वाढत चाललेल्या वेगाचा मेळ काही जमेना… आता तर दोघांमधले अंतरही वाढत चाललेले… अशात, तो बुट आपल्याला मिळणे शक्य नाही ही बाब एका क्षणी गाडीतल्या मुलाच्या लक्षात येते आणि मग तो एकच करतो. आपल्या दुसर्‍या पायातला बुट काढून त्या मुलाच्या दिशेने फेकतो. निदान त्याला तरी ते वापरता यावेत म्हणून… काही वेळापूर्वी ज्याकडे नुसता टक लावून बघत होता, ती दोन्ही बुटं आता त्या मुलाच्या हातात असतात. गाडी तर एव्हाना दूर निघून गेलेली. हातातल्या त्या चकाकणार्‍या बुटांकडे तो फक्त बघत राहतो. कितीतरी वेळ. पायातल्या तुटलेल्या चपलांना आता पर्याय गवसलेला असतो….
प्रसंग तिसरा
तशी तर ती एका कंपनीची जाहिरात आहे. पण भलतीच इमोशनल आहे. या कंपनीच्या माणसाला एकदा एका मुलीचा फोन येतो. घरातला नादुरुस्त टीव्ही दुरुस्त करण्यासाठी. काहीही झालं तरी हा टीव्ही आज सायंकाळी सातच्या आत सुधरायलाच हवा असा तिचा आग्रह. शेवटी काय ‘ग्राहका’चा आदेश. तो शिरसावंद्य मानून कंपनीचा माणूस होकार देतो. जिथे टीव्ही दुरुस्त करायला जायचं ते घर खूप दूर असतं. कुठेतरी पहाडावर. पण दिलेला शब्द पूर्ण करायचाच, या निर्धारानं त्याचा त्या घराच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. आणि मग सुरू होते ती अडथळ्यांची शर्यत. कुठे रस्त्यात झाड कोसळून पडलेले तर कुठे सायंकाळी घराकडे परतणारा जनावरांचा कळप आडवा आलेला. होत असलेल्या उशिराने अस्वस्थ झालेल्या त्या मुलीचा पुन्हा फोन. लागलीच थोड्या वेळाने पुन्हा पाठपुरावा. दुरुस्तीसाठी पोहोचण्याचा आग्रह. महत्प्रयासाने तो त्या घरी पोहोचतो. तर एक आंधळी मुलगी त्याचे स्वागत करते. टीव्ही कुठे आहे ते सांगते. जुजबी दुरुस्त्या होऊन टीव्ही सुरू होतो. आता ती मुलगी घंटा वाजवून सर्वांना बोलावते. हॉस्टेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमधून बरीच पोरं एकत्र येतात. सारेच आंधळे. सारे टीव्हीसमोर बसतात. खरं तर टीव्हीवरचं दिसणार कुणालाच काहीच नसतं. पण आज त्यांच्यातलीच एक आंधळी मुलगी टीव्हीवरच्या गाण्याच्या एका स्पर्धेत सहभागी होणार असते. तो कार्यक्रम असतो सायंकाळी सात वाजता. तिचे गाणे जिवाचा कान करून ऐकता यावे एवढ्यासाठीच ही सारी धडपड असते…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३