सोने व्यापाराला तेजोमय करणार : नितीन खंडेलवाल

0
148

तभा वृत्तसेवा
अकोला,७ जानेवारी
देशातील सोने व्यापाराला तेजोमय करण्याचा संकल्प ऑल इंडिया जेम्स ऍण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी केला आहे. जेम्स ऍण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच तरुण भारतशी बोलत होते.
सरकार आणि सोने व्यापारी यांच्यात समन्वयक म्हणून काम करणार असल्याचे सुतोवाच करीत, या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणार्‍या सोने, चांदी, हिरे व मोती यांच्या छोट्या व्यापार्‍यांपासून ते बड्या उद्यमींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोल्यातील प्रतिथयश सोने व्यापारी असलेले नितीन खंडेलवाल यांची पहिले या संघटनेच्या पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर मुंबईत झालेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या निवड प्रक्रियेत त्यांची देशभरातील सोने, चांदी व्यावसायिक, ज्वेलरी उत्पादक, होलसेलर्स व रिटेल व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या ऑल इंडिया जेम्स ऍण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकार सोबत भविष्यातील अर्थसंकल्पात काय मुद्दे असावे या विषयीची माहिती दिली. सोन्याची परदेशातून होणारी चोरी थांबविण्यासाठी आपण सरकारला काही सूचना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सूचनांमध्ये आयात शुल्क कमी करण्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून सोने चोरीत घट होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
सोने उद्योगाने हॉलमार्किंगचे स्वागत केले आहे. पण, या विषयीच्या मूलभूत सोयी सरकारने स्थानिक तसेच जिल्हा पातळीवर उभारण्याची गरज आहे.