रविवारची पत्रे

0
173

आपण होऊ का त्यांच्यासारखे?
रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे आत्मचरित्र, आमच्या आयुष्यातील आठवणींचे वाचन, चिंतन सुरू आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अप्रतिम आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू लक्षात आले. लहानपणी आपल्या आईकडून सेवाभाव शिकलेल्या रमाबाई बालवयात लग्न होऊन सासरी आल्या. अक्षर ओळख नसलेल्या रमाबाईंना लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी हातात पाटी-पेन्सिल घ्यावी लागली. घरातील ज्येष्ठ महिलावर्गाचा विरोध पत्करून महादेवरावांनी त्यांची इतकी तयारी करून घेतली की, साध्वी स्त्रियांची चरित्रे स्वत: वाचीत व स्त्रियांना एकत्र जमवून ही चरित्रे त्यांना वाचून दाखवीत.
आपली स्थिती सुधारण्यासाठी आपणच प्रयत्नशील असले पाहिजे, ही जाणीव स्त्रियांच्या ठिकाणी निर्माण करण्याचे काम रमाबाईंनी केले. त्यांना वाचनाचा व्यासंग होता. वाचलेले समजून घेणे व ते दुसर्‍याला सांगत सभोमधून भाषणे देण्याची सुरुवात केली. सुरवातीला घाबरत असत. मात्र, पुढे भीड चेपली. इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमधून भाषणे देत. ही परिस्थिती होती, जेव्हा स्त्रिया घराबाहेरही पडत नव्हत्या तेव्हा रमाबाईंना भाषणे देण्यासाठी महादेवराव तयार करीत होते. त्यांना इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषा अवगत होत्या. बंगाली भाषादेखील शिकल्या होत्या. त्या काळात मुलांबरोबर मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असे त्यांचे मत होते. मुलींच्या प्राथमिक शिक्षणाच्या आंदोलनाच्या रमाबाई रानडे या प्रमुख नेत्या होत्या.
त्यांचे घर कार्यकर्त्या मंडळींनी सदा गजबजलेले असे. त्या सर्वांची देखभाल ठेवण्याचे कर्तव्य रमाबाई फार कुशलतेने व प्रसन्नतेने पार पाडीत. त्यांना स्वत:ला मूलबाळ नव्हते, परंतु रमाबाईंनी अनेक मुला-मुलींचे, मातृवत् प्रेमाने व काळजीपूर्वक संगोपन केले. रमाबाईंचे घर वसतिगृहातील मुलींना आपल्या आप्तस्वकीयांच्या घरासारखेच वाटे. शिवणकाम, वीणकाम, भरतकाम इ. कलांमध्ये त्यांना चांगली गती होती. महिलांकडून अशी कलाकौशल्याची कामे त्या करून घेत. सामाजिक परिषदेच्या वेळी या वस्तूंचे मोठे प्रदर्शन त्या भरवीत असत. त्यातून महिलांना आर्थिक मदत मिळत असे.
मनोरुग्णालयाच्या त्या नियमित व्हिजिटर होत्या. स्त्री रुग्णांना भेटत, त्यांची विचारपूस करीत, येरवाडा येथील स्त्री कैद्यांना भेटत, त्यांना नीतिकथा सांगत, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत. असं जगावेगळं काम त्यांनी केलं. त्यांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक व संपन्न असे होते. महिलांसाठी इतके भरीव, व्यापक कार्य करणार्‍या रमाबाईंनी सेवासदनची स्थापना केली.
पतीच्या निधनानंतर वर्षभर त्या पुण्याच्या वाड्यातून बाहेर पडल्या नाहीत. ‘न्यायमूर्ती महादेवराव रानडे यांची धर्मपर व्याख्याने’ हे पुस्तक प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या पतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्या असामान्य होत्या.
आजच्या स्त्रीला रमाबाईंसारखे होता येईल काय? विचार करा, यातले कोणते काम करू शकता? की फक्त संगणक साक्षर झाले की, आपले हात गगनाला पोहोचले! कित्येक महिलांना उपलब्ध असूनही देण्याची तयारी नसते. दुसर्‍याला देऊन पाहा आनंद मिळेल, विश्‍वास ठेवा प्रेम मिळेल, मदत करा फळ मिळेल, दुसर्‍याचा आदर करा सन्मान मिळेल. मग जायचं ना रमाबाईंच्या मार्गाने…?
वासंती भागवत
नागपूर
रोकडरहित व्यवहार
देशातील- पर्यायाने जगातील भ्रष्टाचार व दहशतवाद नष्ट करण्यासाठी व गरिबांचे उत्थान होण्यासाठी मोदींनी, पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदी करून, ज्यांच्याकडे रग्गड पैसा आहे, ज्यांनी काळा पैसा दडवून ठेवून देशातील अर्थव्यवस्था खुली न ठेवता दाबून ठेवली होती, त्या काळा पैसा, बनावट पैसा, नक्षलवादी व दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. कॉंग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता. पण तो नाराच राहिला! कुणाच्याही डोक्यात गरिबी कशी हटेल, याची उपाययोजना शिरली नाही. कारण त्यांना गरिबी हटवायचीच नव्हती, त्यांना फक्त गरिबांचे तारणहार आम्हीच आहोत, हे दाखवावयाचे होते. त्यामुळे गरीब, गरीबच राहिले व भ्रष्टाचारी रग्गड झाले. परंतु, मोदी सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न करून भ्रष्टाचार्‍यांची नाडी ओळखून पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी आणून काळा पैसा कुठे दडून आहे, हे बाहेर काढले. काळ्या पैसेवाल्यांचे धाबे दणाणले व कुठे कुठे पैसा दडलेला होता, हे टीव्हीवर पाहिल्यानंतर सामान्यांचे डोळे पांढरे झाले. यामध्ये उद्योगपती, मंत्री, खासदार असे अनेक दिग्गज अडकले व सापडले. त्यामुळे साहजिकच अंगाचा तिळपापड होऊन त्यांनी मोदी सरकारवर आगपाखड करण्यास सुरुवात केली. पण, लोकांनी सत्य जाणले व सरकारला- पर्यायाने मोदींना, अडचण, त्रास सहन करून साथच दिली. मोदींनी त्यातल्या त्यात रोकडरहित व्यवहाराची कल्पना केली. म्हणजे पैशाचा प्रत्यक्ष वापर वा देवाण-घेवाण न होता व्यवहार चालू राहील. देणं-घेणं चालू राहील त्यामुळे पैसा दाबून ठेवण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. यापूर्वीही रोकडरहित व्यवहार देशात होता. धान्याची देवाण-घेवाण करून व्यवहार होत होता. त्या वेळी भारत देश सुजलाम् सुफलाम् होता. लोक प्रामाणिक होते. परंतु, कर्मदरिद्री लोकांच्या हातात सत्ता आल्यावर कृषिप्रधान देश कंगाल होत राहिला. पैशालाच महत्त्व प्राप्त झाले, भ्रष्टाचार व स्वत:च श्रीमंत होण्याची स्वार्थवृत्ती बळावली, मग देशाचे काहीही होवो! देश आतून पोखरला जात होता अन् बाहेरून मात्र सूज आल्यासारखा दिसत होता. लोक आनंदी, सुखी वाटत होते, पण आतून घाबरले होते. हे मोदी सरकारने ओळखले व नोटाबंदीचा प्रहार करून भल्याभल्यांचे कंबरडे मोडले! रोकडरहित व्यवहार सुरू करण्यासाठी सर्वंकष विचार, अडचणी, परिणाम लक्षात घेऊनच ही पद्धत रूढ करावी. या पद्धतीतील दोष जाणून घ्यावे. जेणेकरून व्यवहार करताना अडचणी निर्माण होणार नाहीत. कारण अजूनही भारतीय जनता पूर्णत्वाने सुशिक्षित, शिक्षित नाही. रोकडरहित व्यवहार हा प्रयोग म्हणून शहरांसाठी प्रथम लागू करावा व नंतर खेडोपाडी त्याचा प्रसार करावा (जसा सेटटॉप बॉक्स, हेल्मेटसाठी वापर केला होता) असे वाटते. घिसाडघाईत सर्वंकष निर्णय घेऊ नये.
म. ल. भावे
नागपूर
असे असावे स्नेहसंमेलन!
२७ डिसेंबर २०१६ च्या तभामध्ये, गजानन निमदेव यांचा ‘शाळा, शिक्षण आणि उद्याचा भारत’ हा लेख वाचला. त्यात त्यांनी ‘द ब्लाईंड रिलीफ असोसिएशन’द्वारा संचालित मुंडले इंग्लिश मीडियम शाळेत ‘नो युवर आर्मी’ या संकल्पनेवर आधारित संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनाचे वर्णन, इतरांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत पोटतिडकीने केले आहे.
मुंडले शाळेच्या त्या स्नेहसंमेलनाचा आम्हीदेखील सहपरिवार अनुभव घेतला. लहान मुलांचे मन अत्यंत संवेदनशील व ओल्या मातीसारखे असते. या वयात त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार सहजतेने करण्याचे पवित्र कार्य देशभरातील सर्वच शाळांमधून सातत्याने होत असते.
आज मात्र उत्तम संस्कारांबरोबर मुलांमध्ये प्रखर देशाभिमान जागविण्याची, आपल्या भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम, त्यांच्याविषयीचा कृतज्ञभाव समाजामध्ये सर्वांपर्यंत नेण्याची जास्त आवश्यकता आहे. तेच काम या मुंडले शाळेने केले आहे. ‘नो युवर आर्मी’ या संकल्पनेवर आधारित ते स्नेहसंमेलन पाहायला जेव्हा गेलो, तेव्हा शाळेत प्रवेश करताच मन भारावून गेले. प्रवेशद्वारावरच भारताचा मोठा नकाशा अत्यंत कल्पकतेने तयार केला होता. पुढे इंडिया गेट, अमर जवान ज्योत यांची प्रतिकृती पाहून, देशासाठी हुतात्मा झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात सैनिकांप्रती आपसूक नतमस्तक झालो. आर्मीतील काही निवडक रेजिमेंट्‌सची माहिती अभिनव पद्धतीने क्रमश: मांडण्यात आली होती. त्या त्या रेजिमेंट्‌सचा पराक्रम, वैशिष्ट्ये अत्यंत बारकाईने मांडले होते. सैनिकी वेशभूषेत असलेले विद्यार्थी सहजगत्या पूरक माहिती देत होते.
‘मराठा रेजिमेंट’- सर्वप्रथम मराठ्यांचे आराध्यदैवत शिवराय! आई तुळजा भवानीचे मंदिर, एकीकडे महाराष्ट्राची ओळख असलेल्या मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सुरू होते. ते पाहता पाहता ‘शीख रेजिमेंट’ परिसरात पोहोचलो, तिथला तो छोटासा गुरुद्वारा, तिथे चाललेले गुरुग्रंथसाहिबचे पठन, काही विद्यार्थी सैनिक सरदारांच्या वेशात ‘शीख रेजिमेंट’ची शौर्यगाथा प्रभावीपणे सांगत असताना मन अभिमानाने भरून येत होते.
कारगील लढाईसारखी प्रतिकृती, पहाड, छोटे सैनिक त्यावर चढाई करतात आहेत, पुढे ‘जम्मू काश्मीर रायफल्स’, सुंदर-सुबक अशी मशीद, त्या मशिदीत गुलाबाच्या पाकळ्यांची चादर, सर्व गोष्टी बारकाईने केलेल्या होत्या. पटांगणात मध्यभागी मोठा दीपस्तंभ, त्यावर परमवीरचक्र, शौर्यचक्र अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित हुतात्म्यांच्या प्रतिमा, एकेकाचा आपल्या देशासाठीचा पराक्रम पाहून, या सर्व वीर जवानांमुळेच आपला देश, आपण सुरक्षित आहोत, याची प्रकर्षाने जाणीव होत होती. सैनिकांप्रती कृतज्ञतेचा भाव, त्यांच्याप्रती समाजाच्या सर्व स्तरातून नेहमीसाठी सन्मानच व्यक्त होणे, ही काळाची गरज आहे. सर्व शाळांतून वर्षभरात किमान दोन वेळा तरी आपल्या सेनादलांची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने देता येईल असे यथाशक्ती आयोजन करावे. जेणेकरून देशाभिमानाची ‘मशाल’ समाजात सातत्याने पेटती राहील!
मीरा त्रिफळे
९८९०५३६१७९
सायंकालीन आरोग्य सेवा असावी
सरकारी दवाखान्यांची ओपीडी सामान्यत: सकाळपासून दुपारपावेतो असते. दुपारनंतर कुणाला आजार उद्भवल्यास दुसर्‍या दिवशीच सरकारी दवाखान्यात जावे लागते. आकस्मिक आजार उद्भवल्यास खाजगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. ज्यांना सकाळीच कामावर जावे लागते अशा चाकरमान्यांची, मजुरांची, रोजगार शोधून उदरभरण करणार्‍यांची संख्या बरीच आहे. अशांना सरकारी दवाखान्याचा लाभ घेता येत नाही. तेव्हा ऐपत नसूनसुद्धा अशा रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. एक तर खाजगी दवाखान्याची नोंदणी फी जबरदस्त असते. कोणत्याही डॉक्टरला जुने रिपोर्टस् चालत नाही. त्यांना त्यांच्या पसंतीच्या विशिष्ट पॅथॉलॉजीमधूनच काढलेले रिपोर्ट पाहिजे असतात. तेव्हा हा निष्कारण खर्च या श्रेणीतल्या लोकांना परवडत नाही. तपासणी आणि त्यांनी सांगितलेला औषधोपचार यांच्या आवाक्यात बसतच नाही. तेव्हा एकतर आजाराचा मारा सहन करावा लागतो किंवा उधार उसनवार करून काम भागवावे लागते.
यावर एकच उपाय म्हणजे सरकारी दवाखान्यांची ओपीडी सायंकाळी/रात्री (काही वेळ) उघडी ठेवावी. त्यात सगळे विभाग कार्यरत असावे. उदा. पोटाचे आजार, कान, नाक, घसा, डोळे, दात इ. बहुतांश विभाग चालू असावे. याकरिता अधिक मनुष्यबळ पाहिजे. मनुष्यबळ कमी पडत असल्यास, कर्मचार्‍यांकरिता वेगवेगळे आयोग नेमून भरमसाट पगार वाढविण्यापेक्षा नवीन भरती करावी. त्यामुळे बेकारी तरी कमी होईल. मागे गुजरातमध्ये, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी सायंकालीन न्यायव्यवस्था (कोर्ट) चालू केली होती. आज ही व्यवस्था अनेक ठिकाणी चालू आहे. तशीच सायंकालीन आरोग्य सेवा चालू झाल्यास अनेकांना त्याचा लाभ घेता येईल.
दादा दांडेकर
९०९६३८२११२
साहित्य, ग्रंथ व ग्रंथालये
९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैदर्भीय अक्षयकुमार काळे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मनोगतात, मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनाकरिता विशेष लक्ष देण्यात येईल, असे म्हटले आहे. नक्कीच ही फार चांगली बाब आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व नूतन वर्षानिमित्त शुभकामना व त्यांना यश मिळो, हीच अपेक्षा!
परंतु, इथे नमूद करताना अतिशय दु:ख वाटते की, गेल्या ८९ वर्षांत मराठी भाषेचे संवर्धन करण्यात आम्ही सपशेल अपयशी ठरलो आहोत, हे सत्य कबूल करावे लागेल. आज आपण पाहतो आहोत की, जवळपास सर्वच मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे आहे. इंग्रजी माध्यमाची आवश्यकता आहेच, परंतु मराठी भाषा टिकली पाहिजे व टिकवली पाहिजे.
इथे दाक्षिणात्य राज्याचा उल्लेख करावासा वाटतो. तेथील नागरिक व शासनाची त्यांच्या मातृभाषेवर अमाप श्रद्धा असून, त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. त्या संदर्भात ते कोणत्याही तडजोडीस तयार होत नाहीत. हिंदीसारख्या राष्ट्रभाषेस दुय्यम स्थान देतात. तामीळ भाषेमध्ये शिकतात, परंतु महाराष्ट्रात येऊन त्यांचे विद्वान उत्कृष्ट इंग्रजी भाषेत व्याख्यान देतात. मग आम्हाला हे का शक्य होत नाही. यावरसुद्धा संमेलनाने प्रयास समाजापुढे ठेवावेत.
तसेच असे ऐकण्यात आले की, मराठी साहित्य मंडळास दरवर्षी मिळत असलेल्या पाच लाखाच्या अनुदानात शासनातर्फे वाढ करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, जे साहित्यविचार ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथांना अनेक वर्षे सांभाळून अनेक वाचकांना, अनेक वर्षे पुरविण्याचे कार्य जी ग्रंथालये करतात, ना त्यांचे उत्सव साजरे केले जातात, ना त्यांच्या अडीअडचणी विचारात घेतल्या जातात. या साहित्य संमेलनात यावर वेगळी चर्चा घडविण्यात येईल काय? त्याला सार्वजनिक केले गेल्यास अतिशय चांगले होईल.
न. दा. वाहने
नागपूर
आता त्रास, पुढे चांगले परिणाम
नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असला, तरी त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. नोटबंदीवर विरोधी पक्षांनी संसदेत चर्चेची मागणी केली असताना तेच प्रचंड गोंधळ घालत चर्चेपासून पळत आहेत. कदाचित आपले घबाड बाहेर येईल, या भीतीने गदारोळ करून कामकाज बंद पाडत आहेत. त्यामुळे २२ दिवसांत पाच मिनिटांचेही कामकाज झालेले नाही. संसदेत चर्चा करा, असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला, तरीही विरोधी पक्षसदस्यांना कळत नसेल तर दुर्दैवच म्हणावे लागेल. जर संसदेचे कामकाज नाही तर भत्ता व वेतन विरोधी पक्ष सदस्यांना केंद्र सरकारने अजीबात देऊ नये. संसदेत कोणत्याही पक्षाचा सदस्य जर गोंधळ घालत असेल, तर त्यावर कडक कारवाई व्हावी. संसदेत कामकाज कसे होईल, यावर भर द्यावा.
रमेश भिरंगी
वर्धा