पाकला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ!

0
171

मानवता व माणुसकीला कलंकित करणार्‍या काश्मीरमधील उरी लष्करी तळावर पाकच्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या २० जवानांच्या बलिदानाच्या जखमा ताज्या असतानाच, नियंत्रणरेषेवर भारतीय लष्कराच्या गस्तीपथकावर पाकआश्रित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. मृतदेहाच्या सन्मानाचे सर्व आंतरराष्ट्रीय लष्करी संकेत धाब्यावर बसवून एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली. देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वत्र सर्व स्तरावर पाकची निंदा व निषेध होत आहे. बदल्याची मागणी होत आहे. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे. जनता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना प्रकट करीत आहे, तर देशाची सर्वश्रेष्ठ पंचायत संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नोटबंदी’ प्रकरणावर समस्त विपक्ष एकवटले आहेत. संघटित होऊन एकच गदारोळ करीत आहेत. संसद बंद पाडून २२५ खासदारांनी काळ्या धनाच्या संरक्षणार्थ ‘मानवी साखळी’चे वलय निर्माण करून निषेध नोंदविला.
मृत जवानांच्या दुःखद संवेदनापेक्षा सत्तेचा दुरुपयोग करून गैरमार्गाने संचित केलेला काळा पैसा मातीमोल झाल्याच्या वेदना त्यांना जास्त क्लेशदायक व असहाय झाल्या आहेत. विवेक, सद्बुद्धी हरविली आहे. देशाच्या संरक्षणार्थ प्राणांची आहुती देणार्‍या या वीर जवानांची देशभक्ती एकीकडे, तर दुसरीकडे स्वार्थ, संपत्तीच्या दुष्टचक्रात फसलेल्या या लोकप्रतिनिधींची नोटनीती (अ)राजनिती. केवढा हा विरोधाभास! खरे म्हणाल तर पाकच्या या नापाक कृत्यामुळे स्वतःच जनतेचे प्रतिनिधी, देशाचे भाग्यविधाता म्हणून लौकिकाचे दिवे पाजळून घेणार्‍या खासदारांचे रक्त संतापाने तापायला हवे होते. संसदेत पाकची निंदा, निषेध करायला हवा होता. अशा या देशसंकटात एकजूट, संघटित होऊन सरकारचे बळ मजबूत करायला हवे होते. नैतिक पाठिंबा द्यायला हवा होता. पाकच्या नापाक कारवायांचा प्रतिकार करण्यास समस्त भारत कटिबद्ध आहे, हा सज्जड इशारा- संदेश पाकला द्यायला हवा होता. जनतेचे प्रतिनिधित्व करणार्‍या या खासदारांचे ते घटनात्मक नैतिक दायित्व होते. त्यात ते विफल ठरले. देशापेक्षा काळ्या धनाची चिंता खासदारांना अधिक, हा विघातक संदेश देशात व देशाबाहेर गेला आहे. अशा या स्वाभिमानशून्य देश व जवानांप्रती उदासीन असलेल्या स्वार्थ, सत्ता व संपत्तीच्या लाल त्रिकोणात बंदिस्तांना जनतेचे प्रतिनिधी म्हणून भारताच्या सर्वश्रेष्ठ पवित्र मंदिरात बसण्याचा अधिकार आहे काय, हा प्रश्‍न सृजनशील मनाला त्रस्त करीत आहे.
प्राणांची बाजी लावून देशाला व देशवासीयांना सुरक्षिततेचे कवच देणार्‍या जवानांप्रती लोकप्रतिनिधींनी उदासीन, असंवेदनशील असावे, यापेक्षा या देशाचे दुसरे दुर्भाग्य कोणते? या हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांपैकी दोन जवान उत्तरप्रदेशातील आहेत. एका जवानाच्या निवासस्थानापासून केवळ ३४ कि.मी. अंतरावर समाजवादी पक्षाची परिवर्तन रॅली होती. अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पण, एकाही नेत्याने प्रत्यक्ष भेट देऊन हुतात्म्याप्रती सहवेदना व्यक्त करण्याची माणुसकी दाखविली नाही. हीच का नेत्यांची लोकाभिमुखता?
पाकव्याप्त प्रदेशात यशस्वी सर्जिकल कारवाई करून ज्यांनी शौर्याची गाथा रचली, देशाचा स्वाभिमान उंचावला अशा गौरवशाली घटनांचेदेखील, कॉंग्रेस नेते राहुल गांधी व आपचे विदूषक नेते केजरीवाल यांनी गलिच्छ व अगदी खालच्या पातळीचे राजकारण करून सैनिकांचा अपमान केला. त्यांच्या शौर्यगाथेवर शंका उपस्थित केली. राहुल गांधींनी तर मोदी, सैनिकांच्या वीरगतीचे राजकारण करीत आहेत, ‘खून की दलाली करीत आहेत’ असे उद्गार काढून आपल्या सैन्याप्रतीच्या असंवेदनशीलतेचा परिचय दिला.नियंत्रण रेषेवर पाकच्या नापाक कारवायांमुळे असंख्य जवानांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या बलिदानाचा सन्मान, त्यांच्या प्रती श्रद्धांजली, आदरांजली, त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदनेचा एक शब्द केजरीवाल, राहुल गांधींनी कधी काढला नाही. वीरगती प्राप्त झालेल्या शहीदांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले नाही. त्या उलट ‘वन रँक वन पेन्शन’ या कॉंग्रेसच्या सत्ताकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्‍नाचे भांडवल करून हरयाणाचे निवृत्त सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली. ही निश्‍चित दुःखदायक, धक्कादायक घटना होती.
तितकीच किंबहुना त्याहून अधिक असंवेदनशील बाब म्हणजे, त्यांच्या आत्महत्येचे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेले राजकारण आंदोलनाच्या पलीकडे जाणारे होते. ते मृत सैनिकांप्रतीच्या संवेदनशीलतेचे, सहवेदनाचे लक्षण नव्हते. तो एक राजकीय स्टंट होता. ग्रेवाल यांनी निश्‍चितच देशसेवा केली होती. या आत्महत्येला हुतात्म्याचे स्वरूप देऊन केजरीवाल यांनी आर्थिक मदतही जाहीर केली. आत्महत्या करणारा सैनिक हुतात्मा होऊ शकतो, त्याच्या प्रती या नेत्यांना इतक्या सहवेदना जाणवतात, तर देशसंरक्षणार्थ शत्रूशी लढता लढता प्राणाची आहुती देणार्‍या सर्वोच्च बलिदानाचे मोल या राजकारण्यांना का कळू नये? त्यांच्याप्रती उदासीनता, असंवेदनशीलता का असावी, हे अनाकलनीय आहे. सत्ता, स्वार्थ, संपत्तीचं राजकारण करावं, पण राष्ट्राभिमान, राष्ट्रीय अस्मिता, घटनात्मक दायित्व व माणुसकीला तिलांजली देऊन नव्हे!
युद्धविराम व नियंत्रण रेषेसंबंधातील सर्व संकेत उल्लंघून पाक सैन्य व दहशतवाद्यांकडून सातत्याने होत असलेला गोळीबार निश्‍चितच चिंतेचा, चिंतनाचा, आत्मसंरक्षणाचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्‍न झाला आहे. भारत सबुरीची, सलोख्याची, सौहार्दाची भूमिका घेत आहे. पाक मात्र गोळीबार करून भारतीय जवानांचे रक्त सांडीत आहे. निष्पाप सैनिकांचे जीव घेत आहे. हुतात्म्यांचे गोंडस संसार उघड्यावर पाडीत आहे. ‘लातों कें भूत बातों से नहीं मानते’ हेच पुनःपुन्हा सिद्ध करीत आहे. पाकिस्तानच्या नापाक, अमानुष कृत्यांना शह देण्याची आता वेळ आली आहे.
पाकिस्तानच्या घातपाती कृत्याचा कडवा प्रतिकार करण्याचे मनोधैर्य, प्रबळ इच्छाशक्ती आता सरकारने एकवटायला हवी. भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यायलाच हवा. जबर जरब बसवायलाच हवी. सरकारच्या सबुरीच्या धोरणाचा फटका सैन्याला बसत आहे. पाकच्या भारतविरोधी गतिविधींना उधाण येत आहे. देशाचे संरक्षण करणारे शूरवीर जवान नाहक बळी पडत आहेत. उच्चतम बलिदानाचा बदला घेण्यातच खर्‍या अर्थाने शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली दिल्याचे समाधान भारतीयांना लाभेल. हीच समस्त भारतीयांची सरकारकडून रास्त अपेक्षा आहे. सरकारविरोधी विद्वेषी, स्वार्थी, सत्तालोलुप, स्वाभिमानशून्य विपक्षाकडून देशभक्तीची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.
मोदीजी आगे बढो! १२५ कोटी जनता आपल्या राष्ट्रीय महायज्ञात सहभागी आहे. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, यावर विश्‍वास ठेवा. बोलू नका, पण पाकला धडा शिकवा. शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली व शतशः प्रणाम!
दिगंबर शं. पांडे,९४०३३४३२३९