साप्ताहिक राशिभविष्य

0
536

                                             रविवार, ८ ते १४ जानेवारी २०१७
सप्ताह विशेष
• सोमवार, ९ जानेवारी :Cपुत्रदा भागवत एकादशी, •मंगळवार, १० जानेवारी : भौमप्रदोष, रवि उत्तराषाढा नक्षत्रात (२५.०३), •बुधवार, ११ जानेवारी : भद्रा १९.५० ते ३०.२६, •गुरुवार, १२ जानेवारी : शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र समाप्ती, माघस्नानारंभ, गुरुपुष्यामृत २५.१७ ते सूर्योदय, स्वामी विवेकानंद जयंती, सिद्धेश्‍वर यात्रा- सोलापूर, •शुक्रवार, १३ जानेवारी : भोगी धमुर्मास समाप्ती, •शनिवार, १४ जानेवारी ः मकर संक्रांत, रवि मकर राशीत सकाळी ७.३६, संक्रांति पुण्यकाल ७.३६ ते सूर्यास्त

मेष : प्रारंभीच शुभवार्ता कळावी
आपला राशिस्वामी मंगळ लाभस्थानात शुक्र व केतूसोबत आहे. कर्म व धनस्थानावर गुरूची शुभ दृष्टी आहे. चंद्र आपल्या राशीतून भ्रमण सुरू करीत असून, तो या आठवडाअखेर सुखस्थानात जाईल. सुरुवात काहीशी खर्चीक असली तरी नंतर ती आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. व्यावसायिक उन्नती आणि नोकरीत वेगवान प्रगती दर्शवीत आहे. प्रारंभातच या अनुषंगाने एखादी शुभवार्ता कळू शकते. सरकारदरबारी अडलेली कामे, कोर्टातील प्रकरणे वेग घेतील. काही तर पूर्णत्वासदेखील जाऊ शकतात. विवाहेच्छुक युवांचे विवाह योग यावेत.
शुभ दिनांक- ९,९,१०.
वृषभ : जीवनाला नवे वळण
आपला राशिस्वामी शुक्र दशम स्थानात केतू व मंगळासोबत आहे. पंचमातील गुरूची भाग्य, लाभ व राशिस्थानावर शुभ दृष्टी आहे. चंद्र व्ययातून भ्रमण सुरू करीत असून, तो या आठवडाअखेर पराक्रम स्थानात जाईल. प्रतिष्ठा, हुद्दा आणि सन्मान वाढविणारे योग आपल्याला लाभणार आहेत. पंचमातील गुरू आपणास हे सारे खुशी व खुबीने बहाल करणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एखादे नवे वळण मिळण्याचीदेखील शक्यता राहील. नोकरीत असलात किंवा आपला व्यवसाय असला तरी ते आपली प्रतिष्ठा वाढीस लावणारे असेल. नोकरीत पगारवाढ, पदोन्नती मिळू शकेल. महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्यामुळे सहकार्‍यांमध्ये आपले महत्त्व वाढेल.
शुभ दिनांक- ९,१०,११.
मिथून : भाग्योदयकारक घटनाक्रम
आपला राशिस्वामी बुध सप्तमस्थानात रविसोबत आहे. वक्री बुध आता मार्गी होत आहे. शुक्र व मंगळ भाग्यात आहेत. चंद्र लाभस्थानातून भ्रमण सुरू करीत असून, तो या आठवडाअखेर आपल्या धनस्थानात येईल. सुरुवातीलाच बुध मार्गी होत आहे. यामुळे आता सर्व चांगल्या योगांमध्ये आपल्या राशिस्वामीचे पाठबळ मिळणार आहे. यामुळे आता आपणास बर्‍यापैकी दिलासा मिळू शकेल. काही सुखवार्ता कानी पडतील. युवा वर्गाच्या विवाहाच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण हालचाली घडतील. स्थळ पक्के करणे, विवाहाची बोलणी होणे, साक्षगंध-साखरपुडा असे कार्यक्रम घडू शकतात. घरात पाहुण्यांची, मित्रवर्गाची वर्दळ राहील. मुला-मुलींच्या प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. शुभ – ११,१२,१३.
कर्क : वादविवाद लांबवू नका
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी दशमस्थानात आहे व आठवडाअखेर तो आपल्या राशी स्थानात येईल. याशिवाय पराक्रमात गुरू, पंचमात शनि, तर अष्टमात मंगळ-शुक्र आहेत. धनातला राहू शुभसूचक आहे. आपण सतत कुठल्या ना कुठल्या वादविवादात, भांडणात सापडता. मतभेद-मतांतरे व्यक्त करताना कठोरतम शब्दांचा वापर करू नका. भांडणे-वाद फार काळ लांबणार नाहीत, त्यांचे स्वरूप वाढणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. मंगळ व शनिची दृष्टी पाहता हे काम जरा जिकरीचेच असणार आहे. याचमुळे अपघात-भयदेखील निर्माण होत आहे. त्यामुळे सावध असावयास हवे. वाहने सांभाळून चालवावीत. वेगावर नियंत्रण असावे. शुभ दिनांक- ९,१३,१४.
सिंह : कर्मक्षेत्री चांगल्या घडामोडी
आपला राशिस्वामी रवि पंचमात बुधासोबत असून राशीस्थानी राहू आहे. सप्तमात मंगळ व शुक्र आहे. धनस्थानातील गुरू षष्ठ व दशमाला बळ देत आहे. चंद्र सुरुवातीला भाग्यस्थानात असून तो आठवडाअखेर व्यय स्थानात येईल. हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे असे दिसते. राशीतला राहू काहीसा विपरीत वागावयास लावणार आहे. सप्तमातील मंगळ केतू स्वभावात उग्रपणा निर्माण करू शकतात. यामुळे नसते वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. रवि संततीविषयक काही चांगल्या बातम्या कानावर घालू शकतो. तो पुढे नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या घडामोडी दर्शवेल. आर्थिक लाभ होईल. आवक वाढेल.
शुभ दिनांक- १०,११,१२.
कन्या : भाग्याची साथ मिळणार
आपला राशिस्वामी बुध या आठवड्यातही सुखस्थानात रविसोबत आहे. तो वक्री होता. आता मार्गी झाला आहे. चंद्र अष्टमस्थानातून भ्रमण सुरू करीत असून, आठवडाअखेर लाभस्थानात जाईल. राशिस्वामी बुध मार्गी झाल्यानंतर राशीतून मिळणार्‍या गुरूच्या शुभत्वाचा प्रभाव अधिकच वाढणार आहे. गुरूची सप्तम, भाग्य व पंचम स्थानावरदेखील दृष्टी आहे. आपल्या निर्णयांना भाग्याची साथ मिळणार आहे. आपण अगोदर केलेली गुंतवणूक, आखलेल्या योजना या सार्‍यांना आता चांगली फळे लाभू शकणार आहेत. नोकरीत उत्तम संधी चालून येतील. आपण घेतलेले परिश्रम, केलेल्या कामांची नोंद घेतली जाऊन त्याचे नोकरीत चीज होताना दिसेल. शुभ दिनांक- ९,११,१३.
तूळ : अचानक व अनाकलनीय
आपला राशिस्वामी शुक्र मंगळासोबत पंचम स्थानात आहे. धनस्थानात शनि व व्ययस्थानात गुरू आहे. चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर दशम स्थानात येईल. राशीस्वामी शुक्र मंगळासोबत असल्यामुळे व्यावसायिक वर्गाला या आठवड्यात विशेष योग संभवतात. काहींना व्यवसायाचा विस्तार करता येईल, तर काहींना नव्या व्यवसायाला सुरुवात करता येईल. विदेशी जाण्याच्या योजना आखणार्‍यांना शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने जाण्याची संधी लाभू शकेल. पंचमातला मंगळ काही अचानक व अनाकलनीय योग देऊन आपणास इच्छापूर्तीचा आनंद देणार. युवांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तरुण वर्गाला विवाह व संततीचे योग लाभावेत. शुभ दिनांक- ८,११,१२.
वृश्‍चिक : आकस्मिक खर्चांनी बेजार
आपला राशिस्वामी मंगळ शुक्रासोबत सुखस्थानात, तर राशिस्थानी शनी आहे. शनी-मंगळाचा परिवर्तन योग कायम आहे. गुरू लाभस्थानातून पंचमावर शुभ दृष्टी ठेवून आहे. चंद्र षष्ठ स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर भाग्य स्थानात येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच व्यसनाधीनता, आजारपणे, अनावश्यक व आकस्मिक खर्चांनी आपणास बेजार व्हावे लागू शकते. नोकरीत मानहानी, पदावनती, सहकार्‍यांचे असहकार, अधिकार्‍यांची नाराजी, शत्रूंचा उपद्रव, वाढती स्पर्धा, व्यवसायात मंदीचे सावट जाणवेल. अशा परिस्थितीत मनाचा तोल न ढळू देता, आपले प्रयत्न व मेहनत न सोडता परिस्थितीला तोंड द्यावयास हवे.
शुभ दिनांक- ८,९,१०.
धनू : कुटुंबात मतभेद, तणाव
आपला राशिस्वामी गुरू दशमस्थानात असून राशिस्थानात सध्या सप्तमेश बुध व रवि आहेत. पराक्रमात शुक्र, मंगळ व व्ययात शनी आहे. पंचम स्थानातून चंद्राचे भ्रमण सुरू होत असून तो आठवडाअखेर अष्टम स्थानात येणार आहे. तो मानसिक चिंता, ताण-तणाव, कुटुंबात मतभेद, छोट्या-मोठ्या कुरबुरींना चालना देणारा असतो. दरम्यान, दशमातील राशिस्वामी गुरू आपणास काही चांगले योग देण्यास उत्सुक आहे. धन व षष्ठस्थानावरील त्याची शुभ दृष्टी आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती व आर्थिक लाभ दर्शविणारी आहे. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी लाभतील. काही मोठी कामे यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे आनंद व उत्साह अनुभवाल. शुभ दिनांक- ८,११,१२.
मकर : अतिरिक्त कामांचा बोजा
आपला राशिस्वामी शनी लाभस्थानी असून धनस्थानात योगकारक शुक्र व मंगळ आहेत. भाग्यात गुरू आहे, तर शनी-मंगळाचा परिवर्तन योग आहे, तर चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर सप्तम स्थानात जाणार आहे. आठवड्याची सुरुवात काहीसा आर्थिक पेच निर्माण करणारी ठरू शकते. काहींना आरोग्याच्या बाबतीतदेखील त्रासदायक ठरू शकतो, पण सारे काही आटोक्यात असेल. व्यवसाय व नोकरीत आपणास काही अतिरिक्त कामांचा बोजा वहावा लागू शकतो. त्यामुळे धावपळ-दगदग होणार. या परिश्रमाचे चीज होण्याचे समाधान लाभणार असले तरी त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शुभ दिनांक- ११,१३,१४.
कुंभ : आर्थिक कोंडी सुटणार
आपला राशिस्वामी शनी दशमस्थानात असून राशीत मंगळ, शुक्र व केतू आहेत. गुरू अष्टमात आहे. चंद्र पराक्रम स्थानातून या आठवड्यातील भ्रमण सुरू करणार असून तो अखेरीस षष्ठ स्थानी जाईल. या आठवड्यात लाभलेले ग्रहयोग आपली आर्थिक कोंडी सोडतील असे दिसते. आपली आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. विविध मार्गांनी पैशाची आवक सुरू होऊ शकते. नोकरी-व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक आवक वाढेल. काहींना नोकरीत पगारवाढ-पदोन्नती मिळू शकेल. शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात असणार्‍या युवावर्गाचा हा शोध संपुष्टात येऊ शकेल. व्यवसायातील उधारी, जुनी येणी आता यायला लागेल. शुभ दिनांक- ९,११,१३.
मीन : मित्रवर्गात अशांतता, नाराजी
राशिस्वामी गुरू सप्तमस्थानात असून व्ययात मंगळ-शुक्र-केतू आहे. भाग्यस्थानात शनी व दशमात रवि-बुध आहेत. या आठवड्यात चंद्र आपल्या धनस्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर पंचम स्थानात येणार आहे. गुरूच्या शुभ दृष्टीमुळे आपणास काही किरकोळ अशुभ योगांचे प्रभाव फारसे जाणवणार नाहीत. कुटुंबात सामंजस्य व सहकार्याचे वातावरण राहील. आपल्या योजनांना कुटुंबाची मदत मिळत राहील. आर्थिक समस्या संपुष्टात येऊ शकतील. दरम्यान, भाग्यातील शनी व्यवसाय वाढीस उपयुक्त असला तरी आठवडाअखेर तो मित्रवर्गात अशांतता, नाराजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सावध असावयास हवे. शुभ दिनांक- ९,१०,१३.

मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६