घर-वापसी

0
198

सकाळचं चहापाणी झालं की, समोरच्या अंगणात शांतपणे फिरणं, कम शतपावली करणं हा भाऊसाहेब वर्तकांचा रोजचा ठरलेला आवडता कार्यक्रम असतो. तसा तो आजही सुरूच होता. तेवढं फिरणं त्यांच्या वयासाठी पुरेसं होतं आणि आवश्यक होतं. फिरता-फिरता त्या अंगणातील छोट्या बगीच्यात बहरलेल्या रोपट्यांशी, वृक्ष-वेलींशी त्यांचं छानसं हितगुज चालायचं. फुलं तोडताना, उमलत्या सुगंधित कळ्या-फुलांचं ते स्वागत करायचे. त्या स्वागतात नुकतीच भर पडली होती… दोन नवजात पाखरांची आणि त्यांच्या पक्षिणी आईची. त्यांचं घरटं त्या फुलझाडावर फारसं उंचीवर नव्हतं. भाऊसाहेबांना त्या पक्ष्यांच्या हालचाली सहज दिसतील इतक्या उंचीवर होतं. त्यांचं ते घरटं, पक्षिणीचं पिलांना चारा आणण्यासाठी मधून मधून बाहेर पडणं, त्यांना चारा भरविणं, हे दिवसभर हळुवारपणे न्याहाळणं, हा भाऊसाहेबांचा एक विरंगुळा झाला होता. आपल्यामुळे तीन जीव डिस्टर्ब व्हायला नको याची ते काळजी घेत.
पण आज मात्र तो परिसर, ती पाखरं, तो बगीचा न्याहाळताना भाऊसाहेबांची नेहमीची प्रसन्नता नव्हती. त्यांना उलट एक वेगळीच हुरहुर वाटायला लागली. त्यामागचं कारणही तसंच होतं!
भाऊसाहेबांच्या एकुलत्या एक मुलाची… श्रीधरच्या बदलीची ऑर्डर आठ दिवसांपूर्वी येऊन थडकली. श्रीधर एम. एस. ई. बी.मध्ये मोठ्या पदावर होता. अकोल्याहून त्याची बदली नागपूरला प्रमोशनवर झालेली. त्यामुळे जाणं तर आवश्यकच होतं. श्रीधरच्या सेवानिवृत्तीला अजून चार वर्षे होती. म्हणजे पुढची चार वर्षे नागपूरलाच काढायची म्हणजे तिथे घर करून राहाणं क्रमप्राप्तच होतं. त्याच्याबरोबर आपल्यालाही जावं लागणार या विचारांनी भाऊसाहेब बरेच अस्वस्थ झाले होते आणि ते साहजिकच होतं. पुढील चार वर्षे नागपूरला काढायची म्हणजे तोपर्यंत आपल्या इथल्या वास्तव्याला आपल्याला मुकावे लागणार. गेल्या अनेक वर्षांपासून या आपल्या घरात आपण राहात आलो, ते सोडावे लागणार! या घराशी, या वास्तूशी एक प्रकारचे अतूट भावनिक नातं कळत न कळत निर्माण झालं होतं. घराइतकंच नाजूक नातं त्यांचं जडलं होतं, ते त्या परिसराशी, त्या अंगणाशी, त्या अंगणातील वृक्ष- वेलींशी, त्या निष्पाप पक्षी-पिलांशी! या सर्व जिवाभावाच्या सोबत्यांना सोडून जायचं…!
भाऊसाहेबांना तीच हुरहुर लागली होती. भाऊसाहेब विचार करू लागले. बरं आपण उभयता नागपूरला श्रीधरबरोबर न जाता इथेच राहिलो तर…? राहू आपण कसेही, पण कसंही राहू, हे म्हणण्याइतकं सोपं नव्हतं ते! आपण इथेच राहिलो, तर आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? उद्या अचानक तब्येत बिघडली, अटीतटीची वेळ आली, तर धावपळ कोण करणार? त्यातून सध्याचं माझं वय! या कल्पनेनेच भाऊसाहेबांना शहारे आले. शिवाय मुख्य म्हणजे, आपण आपल्या लाडक्या श्रीधरशिवाय राहू शकू? हा विचार मनात येताच त्यांच्यात त्राणच उरले नाही!
दोन्ही बाजूला हेलकावे घेणारे भाऊसाहेबांचे मन अखेर स्थिरारले ते त्यांच्या लाडक्या समंजस श्रीधरमुळेच! श्रीधरने काल रात्रीच्या जेवणाच्या वेळी स्पष्टपणे जाहीर केलं.
‘‘भाऊ गेल्या पाच-सहा दिवसांपासून आपण चौघेही नागपूरला घर करण्यासंबंधी चर्चा करीत आलो आहे. सर्व बाजूंनी आपण विचारविनिमय केला. मी आता पक्क ठरविलं आहे भाऊ की, आपण चौघांनीही नागपूरला शिफ्ट व्हायचं. नागपूरला चांगलं भाड्याचं घर घ्यायचे. पूर्ण चार वर्षे तिथेच सगळ्यांनी मिळून घालवायची आणि माझ्या सेवानिवृत्तीनंतरच आपण आपल्या इथल्या घरी परत यायचं. आम्ही तुम्हा दोघांना इथे ठेवायला तयार नाही!’’
यावर कोणीच काही बोललं नाही. श्रीधर पुढे म्हणाला, ‘‘तुम्हाला या वयात मी असं एकटं ठेवणारच नाही. तुम्हा दोघांच्या तब्येतीच्या छोट्या-मोठ्या कुरकुरी तर कधीच्याच आहेत. त्यातून भाऊ, तुमचं दम्याचं दुखणं तर जन्माचंच आहे. या तुमच्या आजच्या वयात आणि अशा स्थितीत मी तुम्हाला इथे कसं ठेवणार? तुमचं इथे कोण करणार? तुम्हाला इथे ठेवल्यावर आम्हाला तरी चैन पडेल काय… तिथे नागपूरला? ते काही नाही. तुम्ही आमच्याबरोबर नागपूरला चला!’’
श्रीधरच्या बोलण्यातील निग्रह आणि आपल्याबद्दलचं प्रेम पाहून भाऊसाहेब सुखावले, पण ते काही बोलले नाही. श्रीधरच पुढे म्हणाला, ‘‘तिथे तुम्ही माझ्या नजरेसमोर असाल. काही दुखलं-खुपलं तर मला धावपळ करता येईल. नागपूरला चांगले चांगले डॉक्टर्स आहेत. तुम्ही आपल्या इथल्या घराचं काय घेऊन बसलात? माझ्या निवृत्तीनंतर आपण इथे आपल्या घरी वापस येणारच आहोत की!’’
‘‘हो, ते तर खरंच आहे.’’ भाऊसाहेब म्हणाले, ‘‘तुम्ही दोघं नक्की वापस याल, पण आमच्या वापस येण्याचा नाही हं भरवसा. मी आता पंचाण्णवमध्ये आहे आम्ही दोघं बहुतेक आता, तिकडणं… तिकडेच जाऊ वर…!’’
असं बोलताना भाऊसाहेबांची उजव्या हाताची तर्जनी पटकन वर गेली.
‘‘नाही नाही भाऊ असं का बोलता? तुम्ही पण वापस याल आमच्या सोबत, इथे, या आपल्या घरात!’’
श्रीधर असा बोलला खरा, पण त्याच्या स्वरातली कातरता भाऊसाहेबांच्या सहज लक्षात आली. आपल्या वर जाण्याच्या नुसत्या विचारांनी मुलगा अस्वस्थ होतो, हे पाहून ते किंचित सुखावले. आपला श्रीधर आहेच तसा! तो आणि सूनबाई किती मनापासून करत आले आहेत आपलं. मुलगा-सून असावे तर असे, असंं ते नेहमी स्वत:जवळ म्हणायचे. तो एवढ्या आग्रहाने आपल्याला नागपूरला घेऊन जातो आहे, पूर्ण चार वर्षांसाठी, तर आपण का मागे-पुढे पाहतो आहे? आजच्या काळात… इतकी माया-प्रेम… करणारी मुलं क्वचितच असतील!
आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसह चार वर्षांसाठी नागपूरला जाऊन राहाण्याचं श्रीधरनं पक्कं केलं!
अकोला की नागपूर यामध्ये हेलकावे घेणारं भाऊसाहेबांच्या विचारांचं तारू अखेर नागपूरच्या किनार्‍याला लागण्याचं आता निश्‍चित झालं खरं, तरी पण तोच प्रश्‍न त्यांच्या मनात घोंघावत होता. आपण वापस या घरी येऊ की नाही? आपल्या दोघांपैकी कोण परत येईल? कोण वर जाईल? वर जाणारी किंवा इथे वापस येणारी व्यक्ती कोण असेल? या प्रश्‍नांचं उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं आणि कोणाच जवळ नसतं!
भाऊसाहेब वर्तक! ही काही सामान्य व्यक्ती नव्हतीच मुळी! शिक्षण क्षेत्रातलं ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होतं. ते स्वत: त्या काळातले एम.बी.एड्. असलेले, विशुद्ध राष्ट्रीय बाणा जपणारे शिक्षणप्रेमी होते. त्यांनी सोमठाण्यासारख्या आडवळणाच्या छोट्या शहरात शिक्षणाबद्दल आस्था असणार्‍या समविचारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकमान्य शिक्षण संस्था स्थापन करून ‘लोकमान्य विद्यालय’ सुरू केले. या लोकमान्य विद्यालयाचे ते संस्थापक मुख्याध्यापक होते. शिक्षणाचा प्रसार-प्रचार करतानाच स्वत:मधला विशुद्ध राष्ट्रीय बाणा त्यांनी जोपासला आणि तो शिक्षक, विद्यार्थ्यांमध्येही रुजविण्याचा तन-मन-धनाने प्रयत्न केला. पाहता पाहता लोकमान्य विद्यालय खर्‍या अर्थाने ‘लोकमान्य’ होऊ लागले! त्या संपूर्ण परिसरातील नव्हे; तर दूरदूरचे विद्यार्थीसुद्धा ऍडमिशन घ्यायचे. भाऊसाहेबांच्या लोकमान्य विद्यालयात प्रवेश मिळविणे, शिक्षणक्रम पूर्ण करणे हा विद्यार्थी-पालकांमध्ये अभिमानाचा विषय व्हायला लागला. भाऊसाहेब वर्तकांच्या कार्यकाळातच शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी यथावकाश वसतिगृह बांधल्या गेल्यामुळे दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली होती. केवळ शिक्षणच नव्हे, तर खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, कला, विज्ञान या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षक वृंद अगदी झोकून काम करायचे आणि या सर्व कार्यक्रमांवर भाऊसाहेबांची घारीची नजर असायची. म्हणूनच शाळेच्या असल्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा कोणी नाकारत नव्हते. पुष्कळदा ‘वर्तकांची शाळा’ असा उल्लेख सहजपणे संबंधितांकडून व्हायचा. कधीकधी तो भाऊसाहेबांच्या कानावर यायचा. तेव्हा क्षणभर का होईना ते आनंदित व्हायचे. तरीपण आपली शिस्त, कर्तव्यनिष्ठेला त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही. त्यांनी अंगीकारलेली शिस्त शाळेच्या सर्व उपक्रमांत झिरपली होती.
शिक्षण खात्यातही लोकमान्य विद्यालयाचा दबदबा होता. भाऊसाहेबांनी आपली ती शाळा आपलीच मानली. सेवानिवृत्त होईपर्यंत आणि सेवानिवृत्तीनंतरही स्वत:चं घर, ते अंगण, तो छोटासा बगीचा भाऊसाहेबांना जितका आपला वाटत होता; तितकीच ती शाळा… वर्तकांची समजली जाणारी; त्यांची आपलीच होती!
आता घरापासून दूर जायचं अन् आपल्या शाळेपासूनही दूर जायचं! अन् तेही कदाचित परत न येण्यासाठी?
भाऊसाहेब वर्तक अशा मानसिक अवस्थेत असतानाच एक दिवस अचानक लोकमान्य शिक्षण संस्थेचे कार्यकर्ते आणि विद्यमान मुख्याध्यापक त्यांना भेटण्यास घरी आले. वयोवृद्ध भाऊसाहेब वर्तक चार-पाच वर्षांसाठी नागपूरला जाणार हे त्यांना कळले होते. म्हणून ते भाऊसाहेबांना भेटायला आले. आज शाळा समितीचे शिष्टमंडळ एक वेगळंच मिशन घेऊन भाऊसाहेबांकडे आले होते. आल्या आल्या तब्येतीची विचारपूस झाली. क्षेमकुशल, चहापाणी वगैरे पार पडलं. नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी विषय उघड केला. ते म्हणाले, ‘‘भाऊसाहेब आम्ही आज एक विशेष प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे आलो आहोत. प्रस्ताव आपण स्वीकाराल अशी आशा वाटते. प्रस्ताव असा आहे की, आपल्या शाळेच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण होतात आहेत; अजून चार वर्षे वेळ आहे. या दरम्यान आपण नागपूरला जाणार असल्याचं कळलं म्हणून आजच आम्ही लोक बोलायला आलो आहोत. शाळेची सिल्व्हर ज्युबिली साजरी करायची आहे, असं आम्ही सर्वांनी, म्हणजे लोकमान्य शाळा समिती, आम्ही शिक्षक आणि सोमठाणा नगरवासीयांनी ठरविलं आहे. आपल्या या विद्यालयाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम चांगला थाटामाटात करायचा आहे. त्याची रूपरेषा तयार करावी, तुमच्याशी सल्लामसलत करावी, तुमचे मार्गदर्शन घ्यावं, तुम्हाला आमंत्रित करावं, यासाठी आम्ही लोक आज आलो आहोत. याच कार्यक्रमात आम्हाला तुमचा जाहीर सत्कार शिक्षणमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करायचा आहे. आपण शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक आहात. तुमचा सत्कार हा व्हायलाच पाहिजे. आपण नाही म्हणू नका.’’
‘‘आपल्या शाळेचा रौप्यमहोत्सव होणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे; हे मी काय सांगायला पाहिजे काय? पण त्या वेळी माझा सत्कार कशाला पाहिजे? आतापर्यंत बरेच सत्कार, पुरस्कार मला मिळाले आहेत. या महोत्सवात उपस्थित राहणं मला आवडलं असतं, पण तेसुद्धा जमेल असं वाटत नाही. तुम्हा सर्वांना कळलंच आहे की, आम्ही आता चार वर्षांसाठी नागपूरला जातो आहे. त्यानंतर हा कार्यक्रम आहे. शंभरी येते माझी. मी कसा सोमठाण्याला येऊ शकेन? तोपर्यंत मी असेन तरी का? की जाईन तिकडणं तिकडेच…?’’
पुन्हा एकदा भाऊसाहेबांच्या उजव्या हाताची तर्जनी पटकन सहजतेने वर गेली. मागे एकदा याच विषयासंबंधी श्रीधरशी बोलताना गेली होती तशीच…! तेव्हा श्रीधर अस्वस्थ झाला होता. आता हे ऐकल्यावर सर्व मंडळी अस्वस्थ झाली…! क्षण, दोन क्षण तसेच गेलेत. कुणीच काही बोलले नाही. शेवटी एक कार्यकर्ते म्हणाले; ‘‘भाऊसाहेब आपण माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत श्रेष्ठ अन् ज्येष्ठ आहात. तेव्हा मी काही बोलणं… म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल. तरीही बोलतोच असा नकारात्मक विचार आपण नका करू. आपण राहालच तेव्हापर्यंत आणि याल वापस… आपल्या घरी… आणि आपल्या शाळेतही! ती शाळाही तुमचं एक घरच तर आहे ना!’’
कार्यकर्त्याच्या या बोलण्यावर सर्व मंडळी खुष होऊन हसायला लागली. त्या भाऊसाहेबही सामील झाले. सगळ्यांमध्ये उत्साहाची लहर पसरली.
‘‘ठरलं तर मग!’’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘आम्ही कामाला लागतो आतापासून. तुमच्याकडे येत राहू… मार्गदर्शन, चर्चा करायला. शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी आपण आपलं आयुष्य वेचलं. त्याच शाळेच्या रौप्यमहोत्सवी कार्यास ईश्‍वराचे आशीर्वाद मिळतीलच! चला मंडळी निघू या! भाऊसाहेब; येतो आम्ही.’’
शेवटी तो दिवस उजाडला. आज भाऊसाहेब वर्तक, सहकुटुंब सहपरिवार म्हणजे मुलगा सून-नातू-नातीसह वर्तमान पुढील चार वर्षांसाठी नागपूरला जाण्यासाठी निघाले! सामानसुमानाचा ट्रक आधीच रवाना झाला होता. श्रीधरची लगबग सुरू होती. संपूर्ण तयारीवर त्याचा फिनिशिंग टच फिरत होता. फाटकाशी आरामदायी इनोव्हा गाडी उभी होती. निघण्याच्या आधी भाऊसाहेबांनी घराच्या अंगणात एक फेरफटका मारला. त्या अंगणाचा, त्या फुलझाडांचा, त्या पाखरांचा त्यांनी निरोप घेतला. आपण येईपर्यंत (?) पाखरं तर नाहीच राहणार इथे. त्यांचं काय… आज इथे तर उद्या तिथे! नागपूरचं भाड्याचं घर दुसर्‍या मजल्यावर आहे म्हणे! तिथे कुठे हे सखेसोबती मिळणार? ही बाग राहील सुरक्षित. कारण माळी ठेवणार आहे श्रीधर, पण आपला ‘वरचा माळी’ ठेवील आपल्याला तोपर्यंत? की… तिकडणं तिकडेच…?
सर्वांचा निरोप घेत भाऊसाहेब माईसह गाडीत बसले. श्रीधर, सूनबाई आपापल्या जागी बसले. ते सर्व उत्साहात होते. शेजारी-पाजारी, आप्त गाडीभोवती उभे राहून त्यांना निरोप देत होते. कुणीतरी भाऊसाहेबांच्या जवळ येऊन म्हणाले, ‘‘प्रकृतीला जपा हं भाऊसाहेब! या तुम्ही लवकर लवकर परत इथे अ!’’
‘‘पाहू या कसं काय जमेल ते नाहीतर… आम्ही आपले, जाऊ तिकडणं तिकडेच…’’
पुन्हा त्यांचा उजवा हात वर गेला… आणि उजव्या हाताची तर्जनी!!
नागपूरच्या नव्या आयुष्याशी मिळतंजुळतं घेत वर्तक कुटुंबीय हळूहळू नागपूर जीवनाशी समरस होऊ लागले. श्रीधर अन् सूनबाईचा फारसा प्रॉब्लेम नव्हता. कारण बदलीच्या निमित्ताने अनेक लहान-मोठ्या शहरांत ते राहिलेले होते. तसे भाऊसाहेब अन् माई जुळवून घेण्याच्या वृत्तीचे होते, सोशिक होते. भाऊसाहेबांना जुनाट असा दम्याचा विकार होताच, त्यातून वार्धक्य… आणि यामुळे उद्भवणार्‍या अन्य व्याधी हा त्यांचा मुख्य प्रश्‍न होता. श्रीधरला त्याची पूर्ण जाणीव होती. म्हणून ऑफिस सांभाळून त्यानं त्या भागातल्या डॉक्टर मंडळींशी संपर्क साधून ओळखी करून घेतल्या. त्यांना घरी बोलावून त्यांच्याकडून सगळ्या तपासण्या, इलाज वगैरे काटेकोरपणे करून घेतल्या. सुदैवाने डॉक्टर मंडळी काळजी घेणारे असेच मिळालेत. त्यांचा दम्याचा त्रास अकोल्यापेक्षा कमी होता, हा एक प्लस पॉईंट. एकंदरीत नागपूरची हवा त्यांना मानवली असावी. तरीही अकोल्याची आठवण येतच असे. त्या आठवणीत रमता-रमता चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आणि ३१ ऑक्टोबर रोजी श्रीधर सेवानिवृत्त झाला.
आता नागपूरला राहाण्यात कुणालाच इंट्रेस नव्हता. सर्वांना आता अकोल्याला परतण्याचे वेध लागले. तरीही एक-दोन महिने नागपूरलाच राहून श्रीधरने पेन्शनसंबंधी कामे पूर्ण केली. इकडे अकोल्याच्या घरात येण्यापूर्वी श्रीधरने त्या घरात व्यापक फेरबदल करून घेतले. रंगरंगोटी झाली. भाऊसाहेब, माईंच्या राहण्याची सुसज्ज व्यवस्था करून घेतली आणि एका सुप्रभाती वर्तक कुटुंबीयांनी नागपूर सोडले आणि अकोल्याच्या आपल्या सुसज्ज स्वगृही दाखल झाले!
आपल्या सुधारित घरी परतल्याचा आनंद सर्वांना होणं तर स्वाभाविकच होतं, पण भाऊसाहेबांना विशेष! कारण त्यांना परतण्याची आशा नव्हती. यथावकाश ते घर, ते अंगण, तो परिसर, तो बगिचा, त्यातील ती फुलझाडं बघितली. सर्व सवंगड्यांना ते भेटले. त्यांच्याशी बोलले. त्यांची भेट झाली नाही ती फक्त त्या पाखरांची. ती भेट शक्यही नव्हती. शेजार-पाजारचे भेटीला येऊन गेलेत.
आता भाऊसाहेब वर्तकांचा शंभरावा वाढदिवस म्हणजे सुवर्णजयंतीचा दिवस जवळ येत चालला. आता ते एकशे एक वर्षात पदार्पण करणार होते! श्रीधर, त्याची जवळची मित्रमंडळी, भाऊसाहेबांचे आप्त, अनेक ठिकाणी विखुरलेले त्यांचे विद्यार्थी जे आज साठीच्या जवळपास असलेले, त्यांच्याशी संपर्क करून सोहळ्याचे पद्धतशीर नियोजन करणे असल्या कामात व्यग्र होते. अखेर भाऊसाहेब वर्तकांच्या आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करणारा तो दिवस उजाडला. आज त्यांचे एकशे एक व्या वर्षात पदार्पण झाले! जवळजवळ शे-सव्वाशे नातलग मंडळी, आप्त, विद्यार्थी यांनी त्यांच्यावर अतूट प्रेमवृष्टी केली. ते स्वत: संघाच्या मुशीत तर तयार झाले होतेच, पण कित्येकांना संघ विचाराने प्रेरित केले होते, सुसंस्कारित केले होते, कितीतरी विद्यार्थ्यांना देशसेवा, समाजसेवेचे धडे दिले होते, याची मोजमाप करणे म्हणजे त्यांनी केलेल्या असीम कार्याला उणेपणा आणणे होय!
स्नानादी कार्यक्रम झाल्यावर घरच्या आणि बाहेरच्या सुवासिनींनी भाऊसाहेबांना एकशे एक दिव्यांनी ओवाळले. नंतर त्यांना आणि माईंना उंच आसनावर बसविले. श्रीधरने सपत्नीक गुरुजींच्या मंत्रोच्चोरात मनोभावे पाद्यपूजा यथासांगपणे केली. डोळ्यांचं पारणे फेडणारा, संस्मरणीय, पवित्र, मंगल असा सोहळा संपन्न होताना सर्वांनी डोळे भरून पाहिला!
उपस्थितांना सुग्रास भोजन देऊन एका दुर्लभ कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाची स्वत:शीच उजळणी करीत करीत जमलेली मंडळी हळूहळू पांगू लागली. जाताना भाऊसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला कुणी विसरले नाही. काही दिवसांनी सोमठाण्याच्या लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक कार्यकर्ते आले. नियोजित शाळेच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रमासाठी ते लोक भाऊसाहेब आणि श्रीधरला सन्मानाने घेऊन गेले. ठरविल्याप्रमाणे भाऊसाहेब वर्तकांनी स्थापन केलेल्या आणि नावलौकिकास आणलेल्या लोकमान्य विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांचा शंभरावा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. एका शिक्षकाने भाषणात उल्लेख केला की, पाहा; भाऊसाहेब शेवटी आलेच की… त्यांच्या आपल्या शाळेत! हा त्यांच्या अन् आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीचा विजय आहे!
हे दोन्ही भावपूर्ण कार्यक्रम संपन्न होऊन आज पंधरा दिवस झाले होते, पण आज त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी नव्याने सुरू झाल्यात. त्यांचे फॅमिली डॉक्टर मधून मधून चेकअपसाठी येत जात. भाऊसाहेबांच्या मनाची तगमग वाढत चालली होती. एका कातर संध्याकाळी भाऊसाहेब त्यांच्या आराम खुर्चीत स्वस्थपणे बसले असताना त्यांनी श्रीधरला जवळच्या स्टुलावर बसण्यास सांगितले. नेहमीच्या खोल आवाजात ते श्रीधरशी बोलायला लागले. त्यांचं बोलणं श्रीधरलाच काय ते समजायचं!
‘‘मी नागपूरहून इथे अकोल्याला आपल्या घरी वापस येईल याचीच मला खात्री वाटत नव्हती, पण चार वर्षांनंतर मी सुखरूपपणे वापस आलो. ही माझी एक घर वापसी! आमच्या सोमठाण्याच्या शाळेचा रौप्यमहोत्सव झाला. त्यासाठी मला जाता आलं. त्या वेळी माझा दैवदुर्लभ सत्कार तेथील शिक्षकांनी-नागरिकांनी केला. ती शाळा म्हणजे माझं दुसरं घरच! ही माझी दुसरी घर-वापसी!’’ थोडं थांबून भाऊसाहेब म्हणाले, ‘‘जे काही, त्या सर्वश्रेष्ठ परमेश्‍वराला माझ्याकडून करून घ्यायचं होतं ते त्याने माझ्याकडून करवून घेतलं. मला संघमय जीवन जगायचं होतं, ते यथाशक्ती, यथामती, माझं जगून झालं आहे! आता मात्र तृप्त मनाने जिथून आलो, त्या घरी वापस जायला हवं!’’
त्यांनी डोळे मिटले आणि श्रीधरच्या लक्षात येण्याआधीच ते मृत्यूच्या स्वाधीन झाले. एक कृतार्थ जीवन निमाले.
ते आता अशा ठिकाणी जाऊन पोहोचले होते; जिथून ते वापस येणार नव्हते!
तिथून कुणीच वापस येत नाही!!
डॉ. अशोक कासखेडीकर/९८८१९४७९६०