कलेतील प्रतिमात्मक चिंतन

0
150

कलाकृतीच्या अपूर्णतेच्या तत्त्वात खरे तर प्रतिमेची असंदिग्धक्तता व अस्पष्टपणा दडून बसलेला असतो. विसाव्या शतकातील कलावंतामध्ये कलाकृती अपूर्ण ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते. पात्राच्या भविष्याविषयीची जुजबी माहिती देऊन नाटककार किंवा लेखक त्या पुढील भाग वाचकांवर किंवा प्रेक्षकांवर सोडून देत असत.
उच्च दर्जाच्या कलाकृतीत प्रतिमांना विविध पैलू असतात. त्यांचे अर्थ बरेचदा उशिरा कळतात. अभिजात प्रतिमेतील विविध अर्थछटा बराच काळ लोटल्यावरसुद्धा औचित्यपूर्ण राहतात. एकोणिसाव्या शतकातील प्रेक्षकांना हॅम्लेट बुद्धिवान वाटला. मात्र तोच हॅम्लेट विसाव्या शतकातील कलाप्रेमींना एक उत्तम योद्धा वाटला. दुष्ट प्रवृत्तींशी शूरपणे लढणारा असे चित्र रंगविण्यात आले. शेक्सपियरच्या किंगलियर यातील किंगलियर असेच एक व्यामिश्र स्वरूपाचे पात्र आहे. या शोेकनाट्याच्या विविध अर्थछटा बघायला मिळतात. कुणाला हे शोकनाट्य आपल्याच अपत्यांनी विश्‍वासघात केल्यामुळे आणि वडिलांविषयी कृतघ्नता दाखविल्याने घडलेले एक साधारण कुटुंब नाट्य वाटते. इतरांना असेही वाटते की, या शोकनाट्यांचे मूळ राजकारणात आहे. कारण जेव्हा ऐक्य ही एक ऐतिहासिक गरज होती तेव्हा किंगलियरने आपल्या राज्याची वाटणी करून टाकली.
प्रतिमेला जर तर्कशास्त्राची भाषा आली असती तर विज्ञानाची जागा कलेने घेतली असती. प्रतिमेला जर भाषांतरितच करता आले नसते, तर कला-समीक्षा करताच आली नसती. कला सिद्धांत प्रस्थापितच करता आले नसते. थोडक्यात, प्रतिमा तर्काच्या कक्षेत आणणे शक्यही नाही व अशक्यही नाही. तिचे भाषांतर शक्य नाही. कारण कितीही व कसेही विश्‍लेषण केले तरी प्रतिमेचा गर्भित अर्थ सरतेशेवटी शिल्लक राहतोच. प्रतिमेचे भाषांतरण शक्यदेखील आहे. कारण कलाकृतीचा शोध घेतल्यास, तिच्या आशयाचे अनेक पापुद्रे दिसायला लागतात. प्रतिमेत व्यामिश्रतेचा गुणधर्म असतो. संवेदनेच्या पातळीवर ती वैभवसंपन्न असते. जीवनाच्या वैविध्यपूर्णतेचे दर्शन प्रतिमेतून घडते. त्यामुळे प्रतिमेचे रसग्रहण अनंत प्रकारे होऊ शकते. तिच्या अर्थछटा जाणून घेण्यासाठी खोलपर्यंत जाता येते.
कलेतील प्रतिमा अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाची असते, पण त्याचबरोबर ती सर्वसाधारण व व्यापकही असते. एखाद्याचा कल्पनेचा पल्ला किती मोठा असू शकतो, हे त्याने आविष्कृत केलेल्या प्रतिमेतून कळते. कारण प्रतिमेचे रूपांतरण तो एका प्रत्यक्ष सिद्ध वस्तूत करून दाखवतो. जीवनात व्यक्तिगतता व सार्वत्रिकतेचा अन्योन्य संबंध असतो. सार्वत्रिकतेचे अस्तित्व व्यक्तिगततेत असते आणि ते व्यक्तिगततेतूनच संभवते. सार्वत्रिकता व व्यक्तिगतता यांच्यासंबंधीच्या विचारांचे तर्कशास्त्र त्यांच्या जीवनातील असलेल्या ऐक्यावर अवलंबून असते. कलेत हे ऐक्य प्रकर्षाने दिसून येते.
ऐक्यासंबंधीचा नियम काव्यकलेत दिसून येत नाही. लयबद्ध काव्य एक शुद्ध अभिव्यक्ती असते. त्यात कोणतीही सरमिसळ नसते. त्यातून सार्वत्रिकता कुठे दिसून येते. पुश्किनच्या ‘आय लव्ह यू’ या कवितेत कवीचा महिलेला असलेला संदेश व्यक्तिगत स्वरूपाचा आहे. इथे सार्वत्रिकता कुठे आहे? खरे म्हणजे कलावंताचे व्यक्तिमत्त्वच सार्वत्रिकतेचे सहज वहन करते. सर्वोत्तम कवीदेखील स्वत:बद्दल लिहीत असताना सार्वत्रिकतेचा विचार करतो. त्याचे व्यक्तिमत्त्व मानवीयतेशी नाते जोडते. मानव जातीशी नाते जोडते. त्यामुळे कवीचे दु:ख इतरांना आपले दु:ख वाटायला लागते. त्याचा आत्मा आपला आत्मा वाटायला लागतो. मग कवी केवळ कवी न वाटता एक मानव वाटायला लागतो. मानव कुटुंबातलाच एक भाग वाटायला लागतो. व्यक्तिगतता जाऊन सार्वत्रिकता येते.
हेगेल या विचारवंताच्या मते कवितेच्या सादरीकरणाचे प्रतिमेच्या माध्यमातून वर्णन करता येते. मात्र प्रतिमा आपल्या ओळखीची हवी. तिचा आशय आपल्याला समजण्यासारखा असावा. त्यासाठी वापरलेली प्रतिमेची भाषा इंद्रीय ज्ञानाच्या कक्षेत असली पाहिजे. इथेच कलेतील प्रतिमा व जीवनातील प्रत्यक्ष रूप यात ऐक्य प्रस्थापित होण्याची शक्यता निर्माण होते. शब्दश: ही गोष्ट समजणे कठीण आहे. साहित्याची भाषा, संगीतातील ध्वनी वास्तुरचना यांचे रूप निसर्गाने दिसत नाही, हे जाणून घेणे आवश्यक आहे. कलेतील स्वभाव चित्रण एक नमुना म्हणून प्रत्ययास येते; परंतु त्याच वेळेस ते व्यक्तिगतही असते. कलेतील नमुना एक कलात्मक सामान्यत्व असते, जे व्यक्तिगततेतून प्राप्त होते.
कलाकार प्रत्येक घटनेतील सत्त्वाचे आकलन करतो. तिचे मर्म समजून घेतो. त्याचे चारित्र्य जाणून घेतो. याबाबतीत एक जुनी भारतीय दृष्टांत कथा प्रचलित आहे. ही कथा काही आंधळी माणसं व हत्तीसंबंधीची आहे. हत्ती कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी ही आंधळी माणसे हत्तीच्या विविध अवयवांना स्पर्श करतात. एक त्याच्या पायाला स्पर्श करून सांगतो की, हत्ती एखाद्या खांंबासारखा आहे. दुसर्‍या त्याच्या पोटाला स्पर्श करतो. त्याला ते एखाद्या मोठ्या पिंपासारखे जाणवते. तिसरा हत्तीच्या शेपटीला हात लावतो. त्याला ती एखाद्या दोरासारखी वाटते. त्याच्यापैकी कुणीच हत्ती कसा आहे, हे सांगू शकले नाही. कारण प्रत्येकाने त्याच्या बाह्य आकस्मिक लक्षणांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे हत्तीचा हत्तीपणा म्हणजेच त्याचे सत्त्व, त्याचे ‘मर्म’ त्यांना समजले नाही.
खरा कलावंत केवळ दिसणार्‍या बाह्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत नाही. कलावंताला एक प्रकारची देणगी प्राप्त झालेली असते. त्यामुळे तो बीन महत्त्वाचे, आकस्मिक असे मुख्य सत्त्वापासून वेगळे करू शकतो. जीवन प्रवाहातील ‘सत्त्व’ व ‘नेमकेपणा’ पकडण्यात तो यशस्वी होतो. कला ही जगाबद्दलच्या संकल्पनेला सामान्यत्वात आणण्याची किमया करून दाखवते व हे कलेचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे.

डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२