स्मारकाची पोटदुखी…!!

0
149

छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक समुद्रात उभे राहणार आहे. नुकताच त्याचा भूमी-जल पूजनाचा सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते दिमाखात पार पडला. देशाच्या आर्थिक राजधानीत सोळा हेक्टर क्षेत्रफळावर हे स्मारक बांधले जाणार आहे. चबुतरा आणि महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा मिळून १९२ मीटर उंचीचे असे हे नेत्रदीपक स्मारक उभारले जाणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या आणि खुद्द गुजरातेत निर्माण होणार्‍या सरदार पटेलांच्या स्मारकापेक्षा हे प्रस्तावित स्मारक उंच आणि भव्य असणार आहे. शिवराय हा शब्द उच्चारला तरी अंगातून एक वीज सळसळत जाते. युद्धनीती, धर्मनीती, समाजनीती, राजनीती, चातुर्यनीती, न्यायनीती, अफाट धाडस, अपरंपार ऊर्जा, प्रजापालक असे सर्व आदर्शवत गुण केवळ महाराजांचे नाव घेतले तरी डोळ्यासमोर उभे राहतात.
येणार्‍या पिढ्यांना स्फूर्ती देणारे असे हे नियोजित स्मारक असल्याने सरकारचे अभिनंदन करायला हवे. चंगळवादाकडे वळत चाललेल्या आजच्या पिढीला शौर्य, धैर्य, तेज, ओज, पराक्रम असलेला राजा निर्माण झाला होता, हे कळायला हवे. त्या काळात गलितगात्र होत चाललेल्या समाजात आत्मविश्‍वास आणि स्वाभिमान निर्माण केला तो शिवरायांनी, हे आजच्या तरुणांना समजायला हवे. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांना शिवरायांची धड ओळख नाही आणि मराठीतून शिकणार्‍या मुलांना नीट परिचय नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तशात जातिद्वेष निर्माण करणार्‍या संघटना बुद्धिभेद करायला आहेतच. अशा परिस्थितीत हे स्मारक दिमाखात उभे राहणे अत्यंत औचित्याचे आहे.
तथापि, काहींना दुधात मिठाचा खडा टाकण्याची सवय असते. असे लोक वेगळा विचार करणारे म्हणून आपल्याकडे ख्यात केले जातात. ते लांब चेहरा करून आणि सगळ्या जगाला शहाणपणा शिकवण्याचा मक्ता जणू आपल्याच खांद्यावर आहे अशा थाटात विविध वाहिन्यांवरून आपले अगाध ज्ञान पाजळत असतात. असे विचारजंत नेहमी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून वळवळताना दिसतात. त्यांना काही चांगले बघवत नाही. त्यांचे स्वत:चे असे सोयीस्कर ठोकताळे असतात. त्यांना ते सत्य मानून चालतात. समोर काही सत्य दिसले तरी तिकडे बघणे ते टाळतात. कारण सत्य केवळ त्यांच्याकडेच असते, असा त्यांचा ठाम समज असतो. त्यांचे समविचारी हेच केवळ मानवतावादी असतात आणि अन्य विरोधक हे अतिरेकी असतात, असे यांनीच ठरवून टाकलेले असते. या रोगाला उपाय काहीही नाही.
शिवस्मारकाला अशांपैकी कित्येकांनी विरोध केला. जे गप्प आहेत ते उघड विरोध करीत नाहीत आणि बाजूदेखील घेत नाहीत. त्यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते. खरे या लोकांची स्मारक ही पोटदुखी नाहीच. मुळात शिवराय हीच यांची पोटदुखी आहे, पण तसे प्रत्यक्ष बोलता येत नाही ही पंचाईत आहे. यांनी पूर्वी शिवरायांना सेक्युलर बनवायचा खूप प्रयत्न केला. इतिहास मात्र काही वेगळेच सांगतो. पुरावेसुद्धा देतो. या अडचणीमुळे ते लोक जरा जास्तच अडचणीत आले आहेत. मग दिशाभूल आणि बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांची मदत घेतली जाते. बुद्धिमंताची बुद्धी फिरली आणि विकृतीकडे जाऊ लागली की कठीण होते. आपण जे करीत आहोत ते सर्व बरोबर आहे, असे त्याला वाटू लागते, त्यातच समाजहित वगैरे आहे असे तो ठरवतो. त्यामुळे स्मारकाची चर्चा होऊ लागताच त्यावर प्रश्‍नचिन्हे लावण्याच्या कामाला गती आली. लोकांचा बुद्धिभेद करणारे लेख खरडले जाऊ लागले. मिळेल त्या माध्यमातून विरोधाचा आवाज उठवण्याच्या कामाला गती आली.
साक्षरो विपरीतश्‍चेत् राक्षस: एव केवलम्‌|
सरसो विपरितोपिसरसत्वम् न मुञ्चत़ि॥
साक्षरा: हा शब्द उलटा केला की राक्षसा: असा होतो. सरस हा शब्द मात्र उलटा करूनही आपला सरसपणा सोडत नाही. थोडक्यात साक्षराची बुद्धी विपरीत झाली की, त्याचा राक्षस होतो तथापि सरस व्यक्ती मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला सरसपणा सोडत नाहीत.
त्यातून पर्यावरणाची हानी हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला गेला. मुळात बहुतांश मुंबई ही समुद्रातील भरावावर उभी आहे या सत्याकडे डोळेझाक करून मुद्दा रेटण्यात आला. याबद्दल मच्छीमार बांधवांचा जो आक्षेप आहे, तो सरकारच्या अखत्यारीत येतो आणि सरकार त्याबद्दल गांभीर्याने विचार करून मार्ग काढण्याइतके सक्षम निश्‍चितच आहे. तेव्हा हा मुद्दा गैरलागू ठरतो आहे हे पाहून लगेच खर्चाचा बालिश मुद्दा पुढे करण्यात आला. त्यावर चर्चांचे काहूर माजविण्यात आले. ३,६०० कोटी रुपयांची उधळपट्टी कितपत न्याय्य आहे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. इतक्या निधीत गोरगरिबांचे कसे कल्याण होऊ शकते त्यावर विचारमंथन की कुंथन? झाले. खेड्यापाड्यात शौचालये, वीज आणि रस्ते कसे नाहीत त्याचे रसभरीत वर्णन ऐकवण्यात आले. आता सामान्य लोक तीच टेप ऐकून कंटाळले आहेत.
आज स्मारकाला विरोध करणार्‍यांनी यापूर्वी शासकीय तिजोरीतून कुणा-कुणाच्या स्मारकावर आजवर किती अब्ज रुपये खर्च करण्यात आले त्याचा कधी जाब विचारल्याचे ऐकिवात नाही. गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी नेत्यांच्या स्मारकांवर अब्जावधी रुपये खर्च केले गेले. लक्षावधींची उधळण करीत त्या स्मारकांची उद्‌घाटने झाली. तो पैसा त्यांच्या कुटुंबीयांनी दिला होता की सरकारी होता? त्या वेळी गावागावांत वीज, पाणी आणि शौचालये निर्माण झाली होती का? याबद्दल कधीही कोणाला बोलावेसे वाटले नाही. ज्यांना करातून आलेल्या पैशाची, शिवस्मारक म्हणजे उधळपट्टी वाटते त्यांनी त्या स्मारकांबद्दल कधी आवाज उठवलेला ऐकला नाही. आपल्याकडे प्रत्येक निवडणूक ही रस्ते, पाणी, वीज या अत्यावश्यक गोष्टींवरच आजही लढवली जाते. सत्तर वर्षे स्वराज्य मिळून झाली तरी ही परिस्थिती आहे. त्याबद्दल इतक्या वर्षांत कधी कोणाला या फेक्युलर्सनी जाब विचारला होता काय? यांना आजच गरिबांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? ते आधीपासून असते तर यांनी प्रत्येक स्मारकाच्या वेळी तत्कालीन सरकारला जाब विचारला असता. यांचे हे पुतना मावशीचे प्रेम आहे. सामान्य माणसाला हे कळून चुकले आहे. तथापि यांना ते कळून घ्यायचे नाही इतकेच सत्य उरते.
गांधी आणि नेहरू कुटुंबीयांची स्मारके उभी राहिली तेव्हाही गरिबी होती आणि आजही आहे. मग आजच शिवस्मारकाच्या खर्चाचा बाऊ का केला जातो आहे? हाजची आठशे कोटींची सबसिडी यांना सलत नाही, पण स्मारक मात्र सलते, याला काय म्हणावे?
ज्या शिवरायांमुळे माणसांची मने आणि मनगटे घट्ट घडली त्यांचे स्मारक होत असल्याचा नक्कीच आनंद आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे