मांजराची ‘मुलायम’ पावले

0
201

सध्या उत्तरप्रदेशात रंगलेले नाट्य कितपत खरे व किती देखावा आहे, याचीच शंका येते. कारण त्यातले रामगोपाल यादव आणि शिवपाल यादव यांच्यातले भांडण खरे असले तरी अखिलेश व त्याचा पिता मुलायमसिंग यादव यांच्यातले भांडण शंकास्पद आहे. त्याची पार्श्‍वभूमी कुटुंब कलहाची आहे, यात शंका नाही. तो कुटुंबकलह फारसा स्पष्टपणे समोर आलेला नाही. तो आधीच समोर आला असता तर हा इतका तमाशा झाला नसता. मुलायमसिंग यांच्या दोन बायका आणि त्यातल्या पहिल्या पत्नीचा पुत्र म्हणून अखिलेश हा लाडका थोरला वारस आहे. साहजिकच राजकारणातला वारस म्हणूनच त्याला सतत पुढे करण्यात आले. अगोदर भावांना मुलायमनी पुढे आणलेले होते. पण जसजसा पुत्र वयात आला, तशी भावांना मागे पडावे लागले. यात रामगोपाल हा भाऊ कधीच महत्त्वाकांक्षी नव्हता. म्हणूनच त्याने राजकारणात मुलायमच्या आदेशाचे पालन करून दिवस काढले. शिवाय त्याला राज्यसभेत असल्याने राज्यातील महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. पण शिवपाल यादव हा उत्तरप्रदेशी खेळातला बिलंदर म्हणून अनेक डाव खेळत होता. मात्र, विधानसभेत बहूमत मिळाल्यावर अखिलेशची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर हा नेता भाऊ बिथरला आणि त्याने आपले वेगळे खेळ सुरू केले. लाडक्या पुत्राला मुलायम झुकते माप देणार म्हणून त्याला शह द्यायला शिवपालने कैकेयीला पुढे करण्याची खेळी केली. दीर्घकाळ कुटुंबापासून बाजूला असलेल्या दुसर्‍या पत्नीला तिचा हक्क देण्याच्या आमिषाने शिवपाल कुटुंबात घेऊन आला. तिथे आल्यावर आपल्या मुलालाही राजकीय वारसा मिळावा असे तिला वाटणे स्वाभाविक होते. ते प्यादे हाती आल्यावर शिवपालने थेट अखिलेश विरोधातले डावपेच सुरू केले. तर त्याला शह देण्याच्या खेळात मुख्यमंत्री अखिलेशने थोरल्या चुलत्याला हाताशी धरून ठेवला. अशी कुटुंबाची विभागणी झाली.
एका बाजूला दुसर्‍या पत्नीचा दबाव आणि जुन्या सवंगड्यांचा ससेमिरा, यामुळे मुलायमना अखिलेशला आपण लगाम लावू शकतो, हे दाखवणे तरी भाग होते. म्हणूनच त्यांनी लोकसभेतील पराभवानंतर पक्षाची व्यापक बैठक घेऊन अनेकांची झाडाझडती घेतली. पण तितके होऊन पुन्हा अखिलेशला मोकळे रान कायम ठेवले. तरीही अन्य सवंगड्यांना झुकते माप देण्यासाठी त्यांच्या काही मागण्या पुर्ण केल्या. त्यात अमरसिंह हा जुना मुरलेला खेळाडू पक्षात आणला गेला. त्यामुळे शिवपालचा गोट मजबूत झाला, असे मानले गेले होते. पण अखिलेशने त्याला झुगारून आपल्या काही कारवाया केल्या. त्या कोणी अपेक्षित केल्या नव्हत्या. त्यात शिवपाल यांची खाती व मंत्रिपदे काढून घेण्यापर्यंत या तरुण नेत्याने हिंमत दाखवली. तिथेच खरे तर मुलायमच्या जुन्या सवंगड्यांनी सावध व्हायला हवे होते. अमरसिंह यांच्या विरोधात आधीपासूनच असलेले आझमखान वा रामगोपाल अशा लोकांनी अमरसिंग यांच्या प्रवेशाला वा त्यांना राज्यसभा द्यायला विरोध केला नाही. पण आपली स्पष्ट नाराजी दिसेल असे ते वागत राहिले. पण त्यातला संकेत विसरून शिवपाल गेम खेळत गेले. त्यात गुंड वा बदनाम लोकांनाही पक्षात आणायचा सपाटा त्यांनी लावला होता. दुसरीकडे अखिलेश व रामगोपाल यांनी नव्या पिढीतल्या तरुण समाजवादी नेत्यांची पक्की फळी उभारण्याला प्राधान्य दिलेले होते. अधिक विधानसभेतील आमदार हीच आज पक्षाची शक्ती आहे, तिलाही शिवपाल व जुन्या खोडांच्या विरोधात एकजुट करण्यात पुत्राला यश मिळाले होते. ही सगळी जमवाजमव मुलायमसारख्या मुरब्बी राजकारण्याला समजत नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. पण त्यांनी तिथे जाणीवपूर्वक काणाडोळा करीत शिवपाल व अन्य जुन्या सहकार्‍यांना वेगळ्या गोटात जमा होण्याची मोकळीक दिली. त्याचा नेमका अर्थ काय काढायचा?
मुलायमना पक्षात माजणारी दुफळी दिसत होती आणि पुढल्या लोकसभेपर्यंत आपण राष्ट्रीय स्पर्धेत उरत नाही, हेही मुलायम पक्के ओळखून होते. म्हणूनच आपल्या नंतर वारसा भक्कम धाडसी मुलाकडे सोपवायचा निर्णय त्यांनी मनोमन घेतला होता. म्हणूनच लोकसभेतील दारुण पराभवानंतरही अखिलेशला त्याच्या पदावर कायम ठेवले गेले. त्याला आपले वर्चस्व असलेला गटही निर्माण करू दिला. त्याच्या विरोधातल्या गटात बाकीचे अडथळे जमा होतील, असे डाव मुलायम खेळत राहिले. अशा पिता-पुत्राने रचलेल्या सापळ्यात शिवपाल व जुनेजाणते सहकारी फसत गेले. हे करून मुलायम काय साध्य करणार आहेत? पहिली गोष्ट आजची राजकीय स्थिती बघता, विधानसभा जिंकणे समाजवादी पक्षाला अशक्य आहे. पण
त्या ठरलेल्या पराभवात मुलाकडे पक्षाची सुत्रे निर्णायकपणे सुपुर्द व्हावीत, अशीच मुलायमची इच्छा असावी. त्यामुळेच एका लढाईत अखिलेशने विधानसभा स्वबळावर लढवावी आणि त्यात पराभव पत्करताना पक्षातील जुनी खोडे संपवावीत; अशीच पित्याची अपेक्षा आहे. त्यात पक्ष फ़ुटला आणि अखिलेशने कॉंग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवली, तर कॉंग्रेसचे उरलेसुरले बळही अखिलेशच्या मागे येईल, हेही एक राजकीय गणित आहे. कारण कॉंग्रेसपाशी राज्यात कुठलेही समर्थ नेतृत्व नाही. यात मायावती परस्पर निकालात निघतात. कारण भाजपाने बहूमत मिळवले तरी समाजवादी पक्ष पुत्राच्या नेतृत्वाखाली दुसर्‍या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. पण खरा प्रतिस्पर्धी बसपा आणखी मागे ढकलला जाईल आणि कॉग्रेस तामिळनाडू व बिहारप्रमाणे पुरती नामशेष होऊन जाईल. थोडक्यात भाजपाच्या विरोधातला एकमेव स्पर्धक; म्हणून भविष्यात अखिलेशचा उदय यातून होऊ शकतो. हे अखिलेश जाणून आहे, तसेच मुलायमनाही कळते. म्हणूनच हा पितापुत्राचा मोठा कुटील डाव वाटतो. ह्यात नवे असे काहीही नाही. काही वर्षापूर्वी कर्नाटकात असेच नाटक रंगलेले होते. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या पक्षाला तिसर्‍या क्रमांकाची मते व कॉंग्रेसला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले होते. प्रथम देवेगौडांनी कॉंग्रेसला पाठींबा देऊन बदल्यात उपमुख्यमंत्रिपद मिळवले होते. त्यांच्या जनता दल सेक्युलर पक्षातर्फे ते पद सिद्धरामय्या यांना मिळाले होते. मग कुमारस्वामी या गौडापुत्राने कॉग्रेसशी असलेली युती मोडून भाजपाशी सौदा केला होता. त्यावेळी डोळ्यात आसवे आणुन देवेगौडा रडले होते. तरी बहुतेक आमदार पुत्रासोबत गेले आणि एकटे सिद्धरामय्या देवेगौडांच्या सोबत राहिले होते. मग त्यांच्याही लक्षात हा पितापुत्रांचा डाव आला आणि सिद्धरामय्या कॉंग्रेसमध्ये गेलेले होते. आज तेच कॉंग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा पुत्र कुमारस्वामी सव्वा वर्षे मुख्यमंत्रिपदी बसला होता. मग भाजपाला सव्वा वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची वेळ आली, तेव्हा पुत्रालाच त्या पदावर कायम राखण्यासाठी देवेगौडा यांनी भाजपा नेते अडवाणींच्या पायर्‍या झिजवल्या होत्या. पक्ष फुटताना वा आमदार पुत्रासोबत जाताना बघून अश्रू ढाळणारे देवेगौडा आणि आज पुत्र अखिलेशला इशारे देणारे मुलायमसिंग; यांच्यात नेमका कोणता गुणात्मक फरक आहे? पक्ष वाचवायच्या किंवा तत्त्वाला महत्त्व असल्याच्या बाता माध्यमांना हुलकावण्या देण्यासाठी आहेत. पण त्यातून पक्षातले पुत्राच्या विरोधातले सर्व नेते एकाच खेळीत निकालात काढण्याचा खरा डाव आहे. त्यात आपापल्या भूमिका पिता व पुत्र झकास वठवीत आहेत. बिचारे शिवपाल यादव किंवा अमरसिंग त्यातले बळीचे बकरे आहेत.
त्यांना आपण काय करीत आहोत, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. कदाचित वर्षभर उलटून गेल्यावर त्यांना आपण बळी गेल्याचा थोडाफ़ार अंदाज येईल. पण तेव्हा खेळ संपलेला असेल आणि खुप उशिर झालेला असेल. तेव्हा माजराची मुलायम पावलेच आपल्याला रक्तबंबाळ करून गेली, हे कळून उपयोग नसेल.

भाऊ तोरसेकर