शापित प्रतिभावंत…

0
2637

सात-आठ वर्षांपूर्वीचा किस्सा. एका सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेचं, मराठी ललित साहित्यात नव्यानेच उदयाला येऊन एकदम ख्यातनाम बनलेल्या लेखकाचं, एक नवंकोरं पुस्तक हाती आलं. सलामीची दोन-चार पानं वाचली नि मी चकित झालो. उत्तर अमेरिकेतल्या कॅनडा आणि अलास्का प्रांताच्या सरहद्दीवरच्या युकॉन नदीच्या खोर्‍यात विलक्षण प्रत्ययकारी असं वर्णन होतं. तो बर्फाळ प्रदेश, कुत्र्यांनी ओढल्या जाणार्‍या घसरगाड्या म्हणजे ‘स्लेज’मधून प्रवास करणारी तिथली माणसं, अत्यंत भीषण अशी हिमवादळं आणि त्याहीपेक्षा भीषण म्हणजे या घसरगाड्यांचा पाठलाग करणार्‍या रानटी लांडग्यांच्या झुंडी; अत्यंत प्रतिकूल अशा नैसर्गिक स्थितीतही चिवटपणे जगणारी माणसं, अशा सगळ्या विस्तीर्ण पटावर उलगडत जाणारी ती कहाणी अक्षरश: झपाटून टाकत होती. मी वाचत आणि वाचतच गेलो. लेखनाचा तो झपाटणारा ओघ, तो जोश, ते चित्रण, ती रौद्र भयंकर वर्णनं यात एक विलक्षण जिवंतपणा होता. वाचता-वाचता मी थक्क होत होतो. नेहमीचंच स्वैर स्त्री-पुरुष संबंधांचं चित्रण वेगळ्या पार्श्‍वभूमीवर करून प्रसिद्धी पावलेल्या या मराठी लेखकाच्या लेखनात, उत्तर अमेरिकेतल्या रौद्र निसर्गवर्णनांचा हा जिवंत रसरशीतपणा आला कुठून?
पुस्तकाच्या शेवटच्या पानावर याचं उत्तर होतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ, शीर्षकपृष्ठ, सुरवातीचं पान या सर्वांवर लेखक म्हणून त्या सुविख्यात इत्यादी, मराठी लेखकाचंच नाव होतं. शेवटच्या पानावर मात्र म्हटलं होतं की, या पुस्तकाचे लेखक अमेरिकन पत्रकार आणि लेखक जॅक लंडन हे आहेत.
म्हणजे ज्या लेखकाच्या पुस्तकांवर आजही अमेरिका-युरोपसह जगभरचे इंग्रजी वाचक उड्या घालतात, त्याचं नाव शेवटी; आणि मुखपृष्ठासह अन्यत्र सर्व ठिकाणी आमच्या ‘प्रतिभावंत’ मराठी लेखकाचं नाव. यंव रे गब्रू!
मराठी साहित्यात सारखे असे डोस्टोव्हस्की आणि चेकॉव्ह उदयाला येत असतात. पहिल्या एकदोन पुस्तकातच त्यांची ‘प्रतिभा’ संपून जाते. मग उरते ती अशी बनवाबनवी! भन्नाट अनुभव, ते पाहण्याची नजर आणि त्या अनुभवांमधून शब्द, काव्य, चित्र, शिल्प अशा कोणत्याही माध्यमांतून काहीतरी वेगळं निर्माण करण्याची अफाट क्षमता ज्याच्याकडे असते तो खरा प्रतिभावान कलावंत!
वर्तमान २१ व्या शतकाचं दुसरं दशकही आता मावळतीकडे झुकलं आहे, हे लक्षात घेता जॅक लंडन हा गेल्याच नव्हे, तर पलीकडल्या शतकातला म्हणायला हवा. कारण त्याचा जन्म सन १८७६ साली अमेरिकेच्या पश्‍चिम किनार्‍यावरील सान फ्रान्सिस्को इथे झाला. म्हणजे अमेरिका हे स्वतंत्र राष्ट्र होऊन शंभरच वर्षं होत होती. त्यामुळे एकंदर अमेरिकन समाजजीवनावर पूर्वेचा प्रभाव टिकून होता. इंग्रज लोक अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर उतरले. तिथेच त्यांच्या पहिल्या वसाहती झाल्या. त्यामुळे न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, बोस्टन, बाल्टिमोर, कॉंकर्ड या पूर्वेकडल्या शहरांना त्याकाळी जास्त महत्त्व होतं. पश्‍चिमेकडच्या सान फ्रान्सिस्को, सान दियागो वगैरे भागातल्या लोकांना, पूर्वेकडचे लोक, गावंढळ समजत असत. पुढे अर्थात परिस्थिती फार झपाट्याने बदलत गेली.
पण म्हणजे जॅक लंडनच्या बालपणात तो मागास पश्‍चिमेकडचा रहिवासी होता. त्याची आई एक उठवळ, भानगडबाज स्त्री होती. जॅकचा बाप नक्की कोण, हे तिलाही माहिती नव्हतं! जॅक लहान असताना तिने अमेरिकन यादवी युद्धातल्या एका सैनिकी अधिकार्‍याशी रीतसर लग्न केलं. जॅकचा हा सावत्र बाप प्रेमळ स्वभावाचा होता. पण, यादवी युद्धातल्या जखमांमुळे तो थोडा अपंग होता. जॅकच्या आईच्या भानगडबाजपणाला तो आळा घालू शकत नव्हता. स्वत: जॅकला आपल्या आईचा हा स्वैराचार अजीबात पसंत नव्हता. लहान असल्यापासूनच जॅक बाल कामगार म्हणून कोणत्याही नोकर्‍या करू लागला. आईच्या स्वैराचाराने मनोमन उद्ध्वस्त झालेला, घराच्या मायेच्या उबदारपणाला पारखा झालेला हा अल्पवयीन पोरगा जगाच्या अनुभवाच्या शाळेत धडे घेऊ लागला.
तशी त्याला जात्याच ज्ञानसंपादनाची ओढ होती. त्यामुळे हलक्यासलक्या नोकर्‍या करत असतानाच तो रुटुखुटु का होईना, पण शाळेत जात होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोकळा वेळ मिळाला की, सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन मिळेल त्या पुस्तकाचा फडशा पाडत होता.
वयाच्या १७ व्या वर्षी जॅक लंडन, ‘सोफिया सदरलँड’ या जहाजावर खलाशी म्हणून नोकरीला लागला. जहाजावरील विविधं कामं, दर्यावरची भयंकर वादळं आणि सील माशांची शिकार या नवीन अनुभवांची भर त्याच्या गाठी पडली.
१८९८ साली, वयाच्या २२ व्या वर्षी जॅक लंडनला एक वेगळाच मार्ग मिळाला. अमेरिकेचा वायव्येकडचा अलास्का प्रांत आणि कॅनडा यांच्यातील युकॉन नदीच्या खोर्‍यात सोनं सापडलं होतं. लोक वेड्यासारखे तिकडे धावत होते. सतत बर्फाने आच्छादलेल्या, वाहतुकीचे धड रस्ते नसलेल्या, भीषण हिमवादळांच्या त्या मुलखात सोनं शोधणं हे सोपं काम नव्हतं. फार थोड्या नशीबवान लोकांना सोनं मिळवून, जीव वाचवून परतता आलं. काहींनी सोनं मिळवलं, पण जीव गमावला. बहुसंख्यांनी जीवही गमावला आणि सोनं तर त्यांच्या दृष्टीलाही पडलं नाही.
जॅक लंडनच्या झटकन लक्षात आलं की, जमीन खणा, डोंगर खणा, असले फुकाचे उद्योग करण्यापेक्षा या सोनं शोधणार्‍या लोकांना अन्नपाणी, कपडे इत्यादींसह सर्व आवश्यक त्या वस्तू पुरवणं हा किफायतशीर व्यवसाय आहे. हा उद्योग करताना जॅकने त्या वैराण, बर्फाळ प्रदेशात प्रचंड भटकंती केली. कुत्र्यांनी ओढलेल्या ‘स्लेज’मधून तो स्वत: मैलोगणती फिरला. हिमवादळात भरकटलेल्या अशा स्लेजमधल्या माणसांचा, मालाचा आणि कुत्र्यांचा भुकेले लांडगे कसा फन्ना उडवतात, त्याच्या भीषण कथा त्याने त्या परिसरातल्या अनेकांकडून ऐकल्या.
अशा सगळ्या भन्नाट अनुभवसृष्टीतूनच त्याचं लेखन सुरू झालं. दोन-चार वर्षांमध्ये सान फ्रान्सिस्कोला परतून जॅक वेगवेगळ्या मासिकांना, वृत्तपत्रांना नियमितपणे लेख पुरवू लागला. त्याच्या लेखनातल्या वेगळेपणावर, जिवंतपणावर, रशरशीतपणावर वाचक बेहद्द खूष होऊ लागले. त्याचं लेखन छापणार्‍या वृत्तपत्रांचा खप वाढू लागला. साहजिकच त्याने आपल्या वृत्तपत्रात लिहावं म्हणून मोठमोठे संपादक जीव टाकू लागले.
जॅक लंडन आता तडाखेबंद लिहू लागला. रोज किमान एक हजार शब्द लिहायचेच, अशी शिस्त त्याने स्वत:ला लावून घेतली आणि विशेष म्हणजे ती पाळली. पंचविशी ओलांडलेला जॅक लंडन म्हणजे अनेक परस्परविरोधी स्वभाववैशिष्ट्यांचा नमुना होता. तो आता राजकीय लेखनही करत होता. एकीकडे तो स्वत:ला भांडवलशाही तत्त्वज्ञानाचा कट्टर पुरस्कर्ता म्हणवत असे. अतिश्रीमंत माणसांनाच परवडणारा, शिडाच्या होड्यांतून म्हणजे ‘याच’मधून फिरण्याचा शौक त्याला होता. पण दुसरीकडे, आपण स्वत: भोगलेलं आणि सर्वत्र पाहिलेलं अफाट दारिद्र्य तो विसरू शकत नव्हता. त्यामुळे तो स्वत:ला समाजवादी, गरिबांचा वाली, असंही म्हणवत असे. लेखनातून मिळणार्‍या मुबलक पैशावर त्याने पुढील काळात भरपूर प्रवास केला नि वाटेल तसा पैसा उधळला. पण, याच प्रवासात लंडन शहरातल्या ईस्ट एण्ड या गरीब वस्तीतल्या भीषण दारिद्र्याच्या नि वर्णद्वेषाच्या दर्शनाने तो कमालीचा अस्वस्थ झाला. दुसरीकडे हाच जॅक, जगाला सुधारण्याची जबाबदारी परमेश्‍वराने आम्हा गोर्‍या लोकांवरच सोपवली आहे, हे गोर्‍या वर्णाभिमानी लोकांचं लाडकं तत्त्वज्ञान पुरस्कारताना दिसतो. या तत्त्वज्ञानाला ‘रेसिस्ट’ विचार म्हणतात. एकीकडे आपण अमेरिकन आहोत याचा सार्थ अभिमान बाळगणारा जॅक लंडन, आपण पश्‍चिम अमेरिकन आहोत, आपल्याला अटलांटिकपेक्षा पॅसिफिकची जास्त ओढ वाटते; म्हणजेच न्यूयॉर्क, वॉशिंग्टनवाल्या साहित्यिकांपेक्षा आपण वेगळे आहोत, असंही म्हणतो.
तत्कालीन अमेरिकेत विल्यम रुडॉल्फ हर्स्ट हा एक भन्नाट संपादक होता. त्याने असंख्य नियतकालिकं चालू केली, चालवायला घेतली. काही बंद पडली. काही तुफान चालली. एकंदरीत अमेरिकन पत्रकारितेच्या इतिहासात विल्यम हर्स्ट हे एक भन्नाट नाव आहे. हर्स्टने जॅक लंडनला १९०४-०५ सालचं रशिया-जपान युद्ध ‘कव्हर’ करायला युद्ध वार्ताहर म्हणून पाठवलं. हे नवं आव्हान होतं. जॅकने ते लीलया पेललं. जॅक लंडनची युद्ध वार्तापत्रंही प्रचंड गाजली.
अफाट लोकप्रियता, अमाप संपत्ती आणि जातिवंत प्रतिभेचं वरदान लाभलेला हा लेखक वैयक्तिक आयुष्यात मात्र दु:खीच राहिला. त्याच्या आईचं वागणं त्याला उद्ध्वस्त करत राहिलं. आपण अनौरस आहोत, हा न्यूनगंड त्याचं मन पोखरत राहिला. त्याची व्यसनाधीनता वाढत गेली. दु:ख विसरायला त्याला दारू पुरेना. तो मॉर्फिन हे अमली द्रव्य घेऊ लागला. अखेर मॉर्फिनच्या अतिरेकाने १९१६ साली त्याचा बळी घेतला. त्या वेळी तो अवघा ४० वर्षांचा होता.
कलावंत हे यक्ष, गंधर्व असतात आणि कसल्यातरी शापाने ते भूलोकी येतात, ही लोकभावना पुन्हा खरी ठरली म्हणायची! ‘वुल्फ : दि लाईव्हज् ऑफ जॅक लंडन’ या नावाचं पुस्तक जेम्स हॅले या लेखकाने अलीकडेच बाजारात आणलं आहे. भन्नाट प्रतिभेच्या या शापित कलावंताला मरूनसुद्धा आता शंभर वर्षे होऊन गेली; पण त्याची पुस्तकं आजही अतिशय जिवंत, वाचकप्रिय आहेत…

मल्हार कृष्ण गोखले