उत्तरप्रदेशातील चेहरा आणि मोहरा!

0
175

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींची अखेर घोषणा झाली. अपेक्षेप्रमाणे यात उत्तरप्रदेशची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. समाजवादी पक्षातील संघर्षाने त्यात नवा पैलू आला आहे. समाजवादी पक्षात काहीही होत असले, तरी त्याचा फायदा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना होईल, असे मानणारा एक मोठा वर्ग दिसून येतो. समाजवादी पक्षातील बहुतेक सारे खासदार, आमदार अखिलेश यादव यांच्या बाजूने आहेत. कारण, त्यांनाही जनता कुणाच्या बाजूने आहे, हे लक्षात आले आहे.
एकमेव चेहरा
उत्तरप्रदेशात आज जी चौरंगी लढत होत आहे त्यात, जनतेत लोकप्रिय असणारा एकमेव चेहरा म्हणून अखिलेश यादव यांच्याकडे पाहिले जाते. मुलायमसिंह यादव आता जननेते राहिलेले नाहीत. शिवपाल यादव, अमरसिंह यांच्याकडे सपातील संघर्षाचे खलनायक म्हणून पाहिले जात आहे. बसपा नेत्या मायावती यांचा बहर आता ओसरला आहे. दलित व्होटबँकेच्या आधारे त्या राजकारणात टिकून आहेत. सपाच्या राजवटीत गुंडागर्दी वाढते व मग बहनजी ती आटोक्यात आणतात, या भूमिकेतून त्यांना आजवर पाठिंबा मिळत होता. अखिलेश यादव यांच्या राजवटीत राज्यात गुंडागर्दी होत होती, मात्र अखिलेश त्यास विरोध करीत होते. सपा कार्यकर्त्यांवर कारवाई करत होते. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या नेत्यांचा विरोध करत होते. त्यातच त्यांच्या काळात विकासाच्या योजना राबविण्यात आल्या. लखनौ-आग्रा एक्सप्रेस-वे त्यात महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे विकास व कायदा-सुव्यवस्था राखणारा उच्च शिक्षित, शालीन नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली व ती आजही कायम असल्याचे मानले जाते.
भाजपा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविणार्‍या भाजपाजवळही चेहरा नाही! राज्यात भाजपाजवळ चांगले नेते आहेत, मात्र त्यांचा प्रभाव त्यांच्या भागापुरता मर्यादित आहे. योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव गोरखपूर, नेपाळ सीमेलगतच्या भागापुरता मर्यादित आहे. काहींचा प्रभाव लखनौ परिसरापुरता मर्यादित आहे, काहींचा प्रभाव पूर्व उत्तरप्रदेशापुरता मर्यादित आहे. त्यातल्या त्यात गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रतिमा राज्यव्यापी आहे. मात्र, ते राज्याच्या राजकारणात जाण्यास उत्सुक नसल्याचे मानले जाते.
कॉंग्रेस
राज्यात कॉंग्रेसजवळ कार्यकर्ते नाहीत आणि नेताही नाही! पक्षाने, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले आहे. राज्यातील ब्राह्मण मतदारांवर डोळा ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जाते. म्हणजे आज उत्तरप्रदेशच्या जनतेसमोर मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार म्हणून अखिलेश यादव हा एकच चेहरा आहे.
मोहरा
लखनौच्या सत्तेची दावेदार म्हणून भाजपा समोर येत आहे. भाजपाची सारी दारोमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. मोदी यांची जादू अद्याप कायम आहे. राज्यात मोदी हेच सर्वात प्रभावी नेते ठरत आहेत. म्हणजे, सपाच्या चेहर्‍याला उत्तर देण्यासाठी भाजपाने आपला मोहरा पणास लावला आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीत नोटबंदी हा एक मुद्दा राहण्याची शक्यता आहे व याचा फायदा भाजपाला मिळू शकतो. राज्यातील व्यापारी मतदार हा परंपरागत भाजपाचा मतदार मानला जातो. तो यावेळी भाजपाच्या विरोधात जाईल असे मानले जात असले, तरी समाजाचा गरीबवर्ग मात्र मोदींच्या नावावर भाजपाकडे जाऊ शकतो. तसे झाल्यास भाजपाला चांगले मतदान होऊ शकते.
चित्र अस्पष्ट
उत्तरप्रदेशातील राजकीय चित्र आज तरी अस्पष्ट मानले जाते. सपातील वाद कसा मिटतो, हे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, त्याआधारे मुस्लिम मतदार आपले मत ठरवतील. सपा एकजूट राहिल्यास मुस्लिम मतदार सपाकडे राहतील, हे स्पष्ट आहे. आपण अखिलेशला पाठिंबा न दिल्यास सपाचे नुकसान तर होईलच, शिवाय आपलेही नुकसान होईल, याची कल्पना शिवपाल यादव यांना आली आहे. या वास्तवाने त्यांचे डोके ठिकाण्यावर आले असल्याचे म्हटले जाते. सपातील संघर्षात शिवपाल हेच खलनायक ठरले आहेत. सपा एकत्र राहिल्यास, मुस्लिम व बनिया दोन्ही घटक सपाकडे जातील. उत्तरप्रदेशात कॉंग्रेस व अजितसिंह यांची ताकद निर्णायक नसली, तरी काही भागात ते निकालांना प्रभावित करू शकतात. राहुल गांधी सध्या विदेशात आहेत. ते मायदेशी परतल्यावर कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट होईल. मुलायमसिंह यांची राजकीय हयात कॉंग्रेसला विरोध करण्यात गेली. अखिलेश यादव यांचे तसे नाही. अखिलेश यादव, राहुल गांधी व अजितसिंह यांचे सुपुत्र जयंत यांचे समीकरण तयार होऊ शकते. असे समीकरण तयार झाल्यास हे समीकरण मजबूत मानले जाईल. त्या स्थितीत यादव, जाट, बनिया, मुस्लिम हे एकत्र होतील व त्याचा फायदा अखिलेश यादव यांना होईल. या सार्‍या बाबी या आठवड्यात ठरतील व त्यानंतर उत्तरप्रदेशच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
मुख्य लढत
उत्तरप्रदेशातील मुख्य लढत अखिलेश यादव व भाजपा यांच्यात होण्याची चिन्हे आहेत. बिहार निवडणूक होण्यापूर्वी भाजपाची स्थिती बळकट मानली जात होती. मात्र, प्रत्यक्ष निकालात भाजपाची धुळधाण झाली. उत्तरप्रदेश हेही एक फसवे राज्य आहे. येथील निकाल कसे असतील, हे प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत सांगता येणार नाही. उत्तरप्रदेश निवडणूक भाजपासाठी फार निर्णायक असेल. या निवडणुकीचे निकाल भाजपासाठी प्रतिकूल लागले तर त्याचा मोठा परिणाम या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीवर होईल व त्याचा परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल असे म्हटले जात असले, तरी राजकारणात असे होत नसते. प्रत्येक निवडणुकीचे एक महत्त्व असते. मात्र, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. कोणत्याही निवडणुकीचा परिणाम कोणत्याही निवडणुकीवर होत नसतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे १९९८ च्या डिसेंबर महिन्यात दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश व हिमाचल प्रदेश या चार राज्यांत झालेल्या निवडणुका. त्या वेळी केंद्रात भाजपाचे सरकार होते. चारही राज्यांत भाजपाचा पराभव झाला आणि ७-८ महिन्यांनी लोकसभा निवडणूक झाली तेव्हा या चारही राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले. लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात, उमेदवार वेगेवेगळे असतात, मतदानाचे निकष वेगवेगळे असतात. त्यामुळे या पाच राज्यांतील निवडणुकींना सेमीफायनल वगैरे म्हणण्याचे कारण नाही.
फास आवळला
पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौर्‍यांवर टीका होत राहिली आहे. कधीकधी तो एक उपहासाचा विषय होत गेला आहे. मोदी यांच्या विदेशधोरणाची एक मोठी उपलब्धी मागील आठवड्यात दिसली. दाऊद इब्राहिमची संयुक्त अरब अमिरातीतील १५ हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. मागील अनेक वर्षांत संयुक्त अरब अमिरातीकडे भारताने दुर्लक्ष केले होते. मोदींनी मुद्दाम या देशाचा दौरा केला, त्या वेळी दाऊदची मालमत्ता हा एक विषय चर्चिला गेला. त्याचे सुपरिणाम भारताला मिळत आहेत. या महिन्यात होणार्‍या प्रजासत्ताक दिन समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून अमिरातच्या शेखला बोलविण्यात आले आहे. वास्तविक, संयुक्त अरब अमिरात हा देश पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र. त्या मित्राला भारताच्या बाजूने वळविण्यात मोदींना यश आले. त्यांच्या परराष्ट्रधोरणाच्या यशाचा आणखी कोणता पुरावा हवा? दाऊदची संपती जप्त झाल्याने त्याच्याभोवतालचा फास आवळला गेला आहे.

रवींद्र दाणी