९८ व्या वर्षीही त्या योगाचे धडे देताहेत!

0
193

सर्वाधिक वयाची योगिनी
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क, १० जानेवारी
आधुनिक भारतातील प्रसिद्ध योगगुरूंमध्ये टी. कृष्णम्माचार्य, बी. के. एस. अय्यंगार, स्वामी शिवानंद, बाबा रामदेव अशा अनेक नामवंतांचा समावेश होतो. कृष्णम्माचार्य यांच्या रशियन शिष्या इंद्रादेवी यांनी युरोप, अमेरिकेतही योगविद्येचा प्रसार केला होता. सध्या जगातील सर्वाधिक वयाच्या योगगुरू म्हणून न्यूयॉर्कमध्ये राहत असलेल्या ताओ पोरचोन लिंच यांचे नाव घेतले जाते. वयाच्या ९८ व्या वर्षीही त्या पूर्णपणे सक्रिय असून योगविद्येचे धडे देतात, हे विशेष उल्लेखनीय.
गेल्या ७५ वर्षांपासून ही ‘योगिनी’ योगविद्या शिकवत आहे. त्यांच्याकडे योग शिकण्यासाठी येणार्‍यांची नेहमीच रांग लागत असते. याचे कारण म्हणजे त्यांच्या विद्येचे प्रतिबिंब खुद्द त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, शरीरात आणि जीवनातच स्पष्टपणे पाहायला मिळते. या वयातही त्या इतक्या कणखर व फिट आहेत की त्यांची अफाट कार्यक्षमता पाहून आधुनिक काळातील युवक-युवतीही तोंडात बोटे घालतात. केवळ योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार यामुळेच ताओ लिंच यांना हे साध्य झाले आहे. त्या रोज पहाटे पाच वाजता उठतात आणि नियमितपणे योगासने करतात. जगात काहीही अशक्य नाही, केवळ दृढइच्छा असावी लागते, असे त्या म्हणतात. वयाच्या आठव्या वर्षी त्या भारतात वास्तव्याला होत्या. त्यावेळेपासूनच योगविद्येकडे त्या आकर्षित झाल्या. ताओ आजही कठीण आसनेही सहजपणे करून दाखवतात.