कॉंग्रेसकडे १२०० उमेदवारांची दावेदारी

0
144

इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या
राकॉंसोबत युती न करण्याचा कार्यकर्त्यांचा सूर
तभा वृत्तसेवा
नागपूर, १० जानेवारी
येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍यांच्या उड्या पडत आहेत. देवडिया कॉंग्रेस भवनात शेवटच्या दिवशी जवळपास ३०० हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, तीन दिवसांत तब्बल १२०० उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रदेश कॉंग्रेस कमेटीच्या आदेशानुसार शहर कॉंग्रेस कमेटीतर्फे २६ डिसेंबरपासून इच्छुकांकडून अर्ज मागण्यात आले होते. ५ जानेवारीपर्यंत जवळपास तब्बल १२०० अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा निवड मंडळामार्फत इच्छुकांच्या मुलाखती देवडिया कॉंग्रेस भवनात ८ जानेवारीपासून सुरू झाल्या. या मुलाखती प्रभागनिहाय घेण्यात आल्या होत्या. शेवटच्या दिवशी ३०० हून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. तीन दिवस चाललेल्या मुलाखतीदरम्यान सर्वच उमेदवारांनी म्हणजे जवळपास १२०० इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. या मुलाखतीदरम्यान तुम्हाला तिकीट दिले तर मतांचे गणित कसे राहील, तुमचा प्रतिस्पर्धी कोण राहणार, खर्चाची सोय केली काय, प्रभागातून तुम्हाला सहकारी कोण हवा आहे, आदी प्रश्‍ने उमेदवारांना विचारण्यात आली. शिवाय कुठल्या पक्षासोबत युती करायला हवी, याबाबत इच्छुकांचे मतही जाणून घेण्यात आले. बहुतांश कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती न करण्याचा सूर दिसून आला.
मुलाखतीचा अहवाल शहर कॉंग्रेस कमेटीतर्फे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना सादर करण्यात येणार आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याने अहवाल तयार करण्यास विलंब लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.