शिवसेना लढणार स्वबळावर मनपा जिप निवडणूक

0
169

तानाजी सावंत यांनी फुंकले रणशिंग
तभा वृत्तसेवा
नागपूर, १० जानेवारी
आगामी नागपूर मनपा व जिल्हा परिषदांची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, विदर्भात शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे सांगत नागपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांनी नियुक्तीनंतर नागपूरला दिलेल्या पहिल्याच भेटीत आगामी पक्षाची भूमिका पत्रपरिषदेत मांडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आ. सावंत म्हणाले, सत्तेची समीकरणे बदलविण्यासाठी प्रत्येक सत्ताधारी वॉर्ड रचना बदलवितात. यापूर्वीही तेच झाले आणि आताही तेच बघायला मिळत आहे. शासनाची धोरणे जनतेच्या हितासाठी असली पाहिजे. ती जनहिताची नसतील तर सेना त्याला विरोध करणारच. मग सत्तेत असो वा सत्तेबाहेर. मात्र आम्ही अजूनही केवळ २० टक्केच सत्तेत आहोत, असे आम्ही समजतो. युती करायची झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा-सेनेची युती राहील. अन्यथा आम्ही एकला चलो रे… या भूमिकेतून केवळ नागपूर किंवा मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पुढील वाटचाल करणार आहोत. ही पक्ष कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, असेही प्रा. सावंत म्हणाले. मनपाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असून, सेनेचे धनुष्यबाण घराघरापर्यंत पोचविण्याचे कार्य शिवसैनिक करतील आणि निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी निवडणुकांबाबत उद्या ११ जानेवारीला साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजिण्यात आला असून, यात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संवाद साधून पुढील रणनीती निश्‍चित करण्यात येईल. यावेळी सेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. आशिष जयसवाल, जिल्हाप्रमुख सतीश हरडे, संदीप हटकेलवार, किरण पांडव उपस्थित होते.