महामार्गावर लूटपाट करणारी टोळी गजाआड

0
96

तभा वृत्तसेवा
नागपूर, १० जानेवारी
महामार्गावर वाटमारी करून चोरीचा माल भंगार विक्रेत्याला विकल्याप्रकरणी नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ७ जणांना अटक केली.
अपिजित उर्फ अभिजित पांडे, जगदीश पांडे, सचिन साहू, फय्याज खान, शेख अशरफ, सलमान बाबा खान आणि भंगार व्यापारी मनोज साहू (सर्व रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२६ डिसेंबर रोजी ट्रकचालक भुवनेश्‍वर जयपाल परसगाय हा आपल्या ट्रकमध्ये लोखंड भरून रायपूरहून नागपूरला येत होता. मौदा पो. स्टे. च्या हद्दीतील बोरगाव शिवारात ट्रकमधील डिझेल संपल्याने भुवनेश्‍वरने रस्त्यावर ट्रक उभा केला. ट्रकमालकाशी संपर्क साधून त्याने ही माहिती दिली. परंतु, काही कारणास्तव मालकाने चालकाला मदत केली नाही. त्यामुळे भुवनेश्‍वर तेथेच ट्रक उभा करून केबिनमध्ये झोपी गेला. ही संधी साधून अज्ञात दरोडेखोरांनी ट्रकमध्ये प्रवेश केला. भुवनेश्‍वरला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधून त्याला ट्रकसह पळवून नेले. कळमना येथील मनोज साहू यास माल विकून आरोपी ट्रक घेऊन पळून गेले. अड्याळ (जि. भंडारा) येथे भुवनेश्‍वरला ट्रकखाली उतरवून एका झाडाला बांधून ठेवले आणि ट्रक बेवारस अवस्थेत सोडून पळ काढला. ही माहिती समजताच मौदा पोलिसांनी अड्याळ येथून ट्रक ताब्यात घेतला.
याप्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे पो. नि. संजय पुरंदरे व त्यांच्या सहकार्‍यांनी महामार्गावरील ट्रान्सपोर्ट व गुप्त बातमीदारांना विचारपूस केली. पांडे नावाच्या ट्रकचालकाने ट्रक चोरून नेला असून, तो रायपूर- नागपूर या मार्गावर चालतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी पांडेवर आपले लक्ष केंद्रित करून त्याला पारडी येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर विविध पथके तयार करून इतर आरोपींना इतवारी, मोठा ताजबाग, वर्धमाननगर आणि जसवंत टॉकीज येथून ताब्यात घेण्यात आले. रेकी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २ मोटरसायकली देखील जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. संजय पुरंदरे, सहायक निरीक्षक उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, अजबसिंग जायस्वाल, शिपाई मंगेश डांगे, अमोल वाघ, महिला शिपाई नम्रता बघेल, हे. कॉ. भाऊराव खंडाते, सायबर सेलचे सहायक निरीक्षक अरविंद सराफ, शिपाई अजय तिवारी, चेतन राऊत, सचिन किनेकर यांनी केली.